मेक्सिकोतील फ्रिडा सोफिया या मुलीच्या प्रकरणापासून केवळ माध्यमांनीच नव्हे तर सर्वानीच धडा घेण्याची आज गरज आहे..

मेक्सिकोत मंगळवारी झालेल्या भीषण भूकंपाने अनेक इमारती कोसळल्या, वस्त्या भुईसपाट झाल्या. अवघ्या जगाने ते वृत्तवाहिन्यांद्वारे, समाजमाध्यमांद्वारे पाहिले. पण त्या भूकंपात केवळ इमारतीच नाही, तर आणखीही काही भुईसपाट झाले आहे. ते म्हणजे ‘तथ्य’ आणि तथ्यांवरचा विश्वास. दिसते तसे नसते, हे भारतीय परंपरेतून आलेले शहाणपण आपण विसरत चाललो होतो. भारतीय तत्त्वविचाराने आपणांस मायावाद दिला. ते तत्त्वज्ञान सांगते, की सगळे जग हीच एक माया आहे. आपण जे पाहतो आहोत ते मुळात नाहीच. ते सारेच मिथ्या आहे. हाच विचार पुढे काही हजार वर्षांनी आपण ‘मॅट्रिक्स’ या इंग्रजी त्रिचित्रधारेतून पाहिला. पण आपण तोही विसरलो होतो. समर्थ रामदासांनी ‘मिथ्या साचासारिखे देखिले, परि ते पाहिजे विचारिले’ असे आपल्याला बजावून सांगितले होते. ते आपण कानाआड केले होते. आज तेच मिथ्यांचे मॅट्रिक्स आपल्याभोवती पसरले आहे. अर्थात आशेला अजून जागा आहे. आपण एवढेही विचारांध झालो नाही, की आपल्याला दिसणेच बंद झाले आहे. अधूनमधून होत असते त्या मिथ्याची जाणीव. माणसांचा सत्याचा शोध सुरूच असतो. वास्तवाला भिडतच असतात लोक. पण या मूठभर जाणत्यांपेक्षा ते मिथ्यांचे मॅट्रिक्स प्रबळ असते. आपल्या मेंदूंचाच ताबा घेऊन आपल्यासमोर काही वेगळीच तथ्ये मांडत असते ते. त्या तथ्यांचे, त्या वास्तवांचे एक जग आपल्याभोवती उभे केले जाते आणि त्या आभासी वास्तवालाच आपण खरे समजून चालतो. हे सर्व घडते कसे, याचे एक छोटेसे उदाहरण परवा मेक्सिकोतील भूकंपाने आपल्यासमोर ठेवले. विचित्रच घटना होती ती. वरवर पाहता विशेष काही वाटणार नाही त्यात. अशा भयंकर भूकंपात सहसा जे घडते तेच तेथे घडले होते.

मेक्सिको सिटीमधील एका शाळेची इमारत त्या भूकंपात कोसळली होती. अनेक मुले, त्यांचे शिक्षक, शालेय कर्मचारी त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. बचाव पथके त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिवाचे रान करीत होती. अनेक अत्याधुनिक उपकरणे त्या कामाला लावण्यात आली होती. अनेक मुलांना वाचविण्यात त्यांना यशही आले. तरीही काही अजून आतच अडकलेली होती. त्यात होती एक मुलगी. बारा वर्षांची बछडी ती. तिचे नाव फ्रिडा सोफिया. बचाव पथकाला कशी कोण जाणे, तिची चाहूल लागली. एका संगमरवरी टेबलाखाली होती ती. आजूबाजूला सगळा ढिगारा. हवा येण्यासही जागा नाही. परंतु कोणाला तरी त्याच्याकडच्या यंत्राने संकेत दिला. कोणी तरी आहे तेथे हे सांगितले. त्यांनी कानोसा घेतला. तर फ्रिडा श्वास घेत होती. एका क्षणी तर तिने हाताची बोटे हलवल्याचे दिसले त्यांना. सरकारी बचाव पथकातील कोणी तरी ती आनंदवार्ता माध्यमांपर्यंत पोहोचवली. स्थानिक वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांतून – त्यातही खास करून व्हॉट्सअ‍ॅपवरून – ती बातमी पसरली. कर्णोपकर्णी झाली. मग मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही ती प्रसारित केली. फ्रिडाला वाचवण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत, याची क्षणाक्षणाची खबर देण्याची चढाओढ पत्रकारांमध्ये लागली. संपूर्ण देश त्या घटनेकडे डोळे लावून बसला होता. त्या बालिकेची सुखरूप सुटका व्हावी यासाठी प्रार्थना करीत होता. सगळ्यांच्या मनात माणुसकीची, आशेची समई तेवत होती. ट्विटरवरून तिच्या नावाचे हॅशटॅग तयार झाले होते. त्यातून प्रत्येक जण त्या घटनेशी स्वत:ला जोडून घेत होता. तिच्याबद्दलच्या माहितीच्या कणाकणाला जो-तो आसुसलेला होता. आणि ती माहिती माध्यमांना पुरवीत होते नौदलाच्या, सरकारच्या बचाव पथकातील अधिकारी. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे इंधनविहिरीच्या खड्डय़ात पडलेल्या प्रिन्स नामक बालकाच्या सुटकेसाठी जसा अवघा देश व्याकूळ झाला होता तसेच सगळे वातावरण. तीन दिवस हे नाटय़ सुरू होते. तिच्या सुटकेचा क्षण आता जवळ आला होता आणि अचानक नौदलाच्या एका अधिकाऱ्याने जाहीर केले, की त्या शाळेच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सर्व मुलांना, जिवंत वा मृत स्वरूपात, बाहेर काढण्यात आले आहे. याचा अर्थ त्या ढिगाऱ्याखाली आता एकही मूल नाही. मग फ्रिडा सोफियाचे काय झाले? बचाव पथकाकडील संवेदनशील सूक्ष्मध्वनियंत्रांतून तिचा आवाज ऐकल्याचे सांगण्यात येत होते. तिने हात हलविला अशा बातम्या आल्या होत्या. त्यावर एका नागरिकाने ट्वीट केले होते – ‘तिने हात हलविला आणि मेक्सिकोचे काळीज हलले!’ हललेल्या काळजांचा आता प्रश्न होता, की ती आता गेली कुठे? ती कुठेही गेली नव्हती. कारण ती नव्हतीच. फ्रिडा सोफिया नावाची तशी मुलगी ना त्या शाळेत होती, ना शहरात. ते सर्वच मिथ्य होते, असत्य होते. कदाचित तो बनावही असेल. १९८५ साली तंतोतंत अशीच घटना मेक्सिकोत घडली होती. त्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन कोणी तरी पसरविलेली ही अफवाही असेल आणि एक खोटे लपविण्यासाठी मग अनेक असत्ये उभी करावी लागतात. त्या न्यायाने पुढची सर्व हकीकत निर्माण झाली असेल. कदाचित लोकमानसास भिडणाऱ्या एखाद्या घटना वा कृतीकडे जाणीवपूर्वक सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे, म्हणजे अन्य काळोख्या, लाजिरवाण्या बाबींकडे दुर्लक्ष होते, हे सर्वच राज्यकर्त्यांच्या वापरातले शस्त्र येथेही वापरण्यात आले असेल. ते काहीही असो. त्यातील चांगला भाग असा, की ते सारे बनावट असल्याचे लागलीच स्पष्ट झाले. परंतु आता त्यामुळे तेथील माध्यमांवर टीकेची झोड उठली आहे. ती योग्यच आहे. याचे कारण माध्यमांनी, आजच्या सत्योत्तरी सत्याच्या काळात मिथ्यांचे मॅट्रिक्स लक्षात घ्यायला हवे होते. त्याऐवजी त्यांनी सरकारी माहितीवर, लष्कराच्या प्रवक्त्यांवर विश्वास ठेवला. बचावकार्यात सहभागी झालेल्यांच्या कथा खऱ्या मानल्या. सरकारी प्रोपगंडा हीच ज्यांची पत्रकारिता त्यांचा प्रश्नच वेगळा. बाकीच्यांनी मात्र अशा गोष्टींचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे लक्षात घ्यायला हवे होते. मेक्सिकोतील लोकांचा तथ्यांवरील विश्वासच या घटनेने भुईसपाट झालेला आहे. आणि सर्वात घातक बाब म्हणजे हेच मिथ्यांचे मॅट्रिक्स सत्ताव्यवस्थेला हवे आहे.

हे केवळ मेक्सिकोतच घडते आहे असे नव्हे. ते अमेरिकेत आहे, युरोपात आहे, अरब क्रांत्युत्तर कालखंडात ते मध्यपूर्व आणि आफ्रिकेत पाहावयास मिळाले. तेच आपल्या हातांतील व्हॉट्सअ‍ॅपमध्येही दिसत आहे. एक ‘अवस्तुनिष्ठ वस्तुस्थिती’ आपल्यासमोर मांडण्याचे प्रयत्न विविध प्रकारे सुरू आहेत. कधी ती समाजमाध्यमांतील बनावट चित्रफितींतून आपल्यासमोर येते, तर कधी मुख्य प्रवाहातील माध्यमांतील सरकारी आकडेवारीमधूनही. ही माहिती नियंत्रित करून वस्तुस्थिती हवी तशा प्रकारे ‘फिरवण्या’चा, मिथ्यांचे मॅट्रिक्स उभे करण्याचा डाव आहे. नियंत्रित माहितीद्वारे एक सोनेरी मृग आपल्याला दाखविण्यात येतो. आपण त्या भ्रमजालातच अडकतो. नंतर नंतर तो मारिच असल्याचे उघड झाले तरी काही बिघडत नसते. कारण एकदा नागरिकांचा एकूणच तथ्यांवरचा विश्वास भुईसपाट झाला, की मग ज्याच्या हाती सत्ता त्याचेच खरे हा नियम लागू होतो. मारिच मायेचा हा इतिहास जगाने वेळोवेळी अनुभवला आहे. आताही त्याचेच आवर्तन सुरू आहे. एक खरे, की ते अधिक गंभीर आहे. कारण माहिती साधनांच्या छद्मपादी ऑक्टोपसने आपल्याला सगळीकडून वेढा घातला आहे. सावध राहायचे आहे ते त्यापासून.. फ्रिडा सोफियाच्या नसण्यातून निदान एवढा तरी धडा आपण घेऊ शकतो.