21 August 2017

News Flash

भंग-अभंग

नेत्याचे द्रष्टेपण त्याच्या वाईटपणा घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते

लोकसत्ता टीम | Updated: June 19, 2017 2:54 AM

अभिनिवेशशून्यता आणि जनक्षोभाची पर्वा न करता आपल्या धाडसी निर्णयांची अंमलबजावणी करणे, ही हेल्मट कोल यांच्या कार्यशैलीची मुख्य वैशिष्टय़े होती..

नेत्याचे द्रष्टेपण त्याच्या वाईटपणा घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते आणि अशा नेत्यास फक्त पुढच्या निवडणुकीचीच नव्हे तर पिढीच्या कल्याणाची आस असते. हा असा नेता दिसतो कसा आननी हे पाहावयाचे असेल तर जर्मनीचे नुकतेच दिवंगत झालेले चॅन्सेलर हेल्मट कोल यांचे उदाहरण द्यावे लागेल. लोकांच्या रोषाची पर्वा न करता कोल यांनी एकदा नव्हे तर दोन वेळा अत्यंत दूरगामी असे निर्णय घेतले. मग तो निर्णय अमेरिकाप्रणीत North Atlantic Treaty Organisation- NATO- या संघटनेसाठी जर्मनीत क्षेपणास्त्रे ठेवू देण्याचा निर्णय असो वा बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर रेटलेला पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या विलीनीकरणाचा निर्णय असो. कोल यांनी जनक्षोभाची पर्वा केली नाही आणि धडाक्याने आपल्या दूरदृष्ट  निर्णयांची अंमलबजावणी केली. युरोपीय देशांना एकत्र येण्याखेरीज पर्याय नाही असे ठामपणे मानणाऱ्या कोल यांनी काळाची पावले फारच लवकर ओळखली आणि आपल्या देशवासीयांना युरोपीय महासंघासाठी तयार केले. हे त्यांचे यश फार मोठे. आज सर्वत्र लिंबूटिंबूंचे सत्तारोहण पाहणे अनिवार्य ठरत असताना इतक्या दूरवरचे पाहू शकणाऱ्या कोल यांचे मोठेपण समजून घेणे आवश्यक ठरते.

कोल यांचा जन्म १९३० सालचा. बर्लिनमधला. म्हणजे दुसरे महायुद्ध संपले तेव्हा ते १५ वर्षांचे होते. युद्ध संपून परत जाताना भेटलेल्या अमेरिकी सैनिकाची आठवण ते नेहमी सांगत. त्याने मला मिठाई दिली, पण युद्ध सुरूच राहिले असते तर मी सैन्यात असतो असे कोल म्हणत. युद्धानंतर येणारे दैन्य त्यांनी अनुभवले होते आणि दुभंगलेला, कंबरडे मोडलेला युरोप त्यांची पिढी सहन करीत होती. अशा काळात दाहक अनुभव घेणाऱ्याचा ओढा नैसर्गिकपणे समाजकारण, राजकारणाकडे असता. कोल यांचे असे झाले. पुढच्याच वर्षी, वयाच्या १६ व्या वर्षी, ते ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाचे सदस्य बनले. पुढे याच पक्षाचे नेतृत्व त्यांनी केले. ते त्या अर्थाने जर्मनीचे पहिले युद्धोत्तर प्रमुख. त्यांच्यातील राजकीय गुणांची चमक दिसली ती १९८० साली. त्या वर्षीच्या निवडणुकांत त्यांनी अचानक आपले प्रतिस्पर्धी फ्रांझ स्ट्रॉस यांच्यासाठी माघार घेतली. अनेक जण त्यांच्या या चालीने चक्रावले. पण कोल यांची ही खेळी किती दूरगामी होती ते दिसून आले. त्या निवडणुकांत स्ट्रॉस यांचा पराभव झाला. परिणामी त्या प्रांताचे नेतृत्व आपसूक कोल यांच्याकडे आले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत कोल यांनी जर्मनीच्या चॅन्सेलरपदी झेप घेतली. १९९८ पर्यंत, म्हणजे सलग १६ वर्षे ते या पदावर राहिले. बिस्मार्क यांचा अपवाद वगळता जर्मनीचे नेतृत्व इतका प्रदीर्घ काळ करणारा अन्य नेता नाही. ८२ साली जर्मनीचे नेतृत्व ज्या वेळी त्यांच्याकडे आले त्या वेळी अफगाणिस्तानात रशियन फौजा घुसून तीन वर्षे झाली होती आणि आशियात इराक आणि इराण यांच्यातील युद्धाने जग विभागलेले होते. पहिल्या दिवसापासून कोल यांची राजकीय भूमिका निश्चित होती. युरोपचे एकत्रीकरण आणि साम्यवादी रशियाला विरोध. या दोन धोरणांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेने कधीही फारकत घेतली नाही. कोल यांनी सत्ता हाती घेतली त्याच वर्षी जर्मनीत नाटोधारीत देशांची क्षेपणास्त्रे ठेवू द्यावीत किंवा काय यावर जनमत प्रचंड विभागलेले होते. तो शीतयुद्ध ऐन भरात असण्याचा काळ. सोव्हिएत रशियाने युरोपातील आपल्या गटातील देशांत मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्र तळ उभारणे सुरू केले होते. अशा वेळी नाटो देशांनाही याची गरज वाटत होती आणि त्यासाठीच पश्चिम जर्मनीत अशी क्षेपणास्त्रे तैनात करण्याचा प्रयत्न होता. त्या वेळचा जर्मनी पूर्व आणि पश्चिम असा विभागलेला. पूर्वेवर सोव्हिएत रशियाचे नियंत्रण तर पश्चिम ही त्या विरोधात ठाकलेली. कोल पश्चिम जर्मनीचे प्रमुख. देशातील या दुभंग वातावरणात अधिक फाळणी होऊ नये आणि नाटोचे हे विकतचे दुखणे आपण अंगावर घेऊ नये अशी बहुसंख्य पश्चिम जर्मनांची भूमिका होती. कोल यांनी या देशांतर्गत भूमिकेकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या देशात क्षेपणास्त्रे तैनातीचा निर्णय घेतला. त्यांचा मुद्दा साधा होता. देशांतर्गत मतदारांच्या विरोधापेक्षा युद्धखोर सोव्हिएत रशियासमोर ताठ मानेने उभे राहायचे की नाही. रशियासमोर लोकशाहीवादी पाश्चात्त्य जग ठामपणे उभे राहिले नाही तर लोकशाही मूल्यांची वाताहत होईल हे त्यांचे मत किती काळापुढचे होते ते आज जे काही सुरू आहे, त्यावरून कळते. त्या एकाच धाडसी निर्णयामुळे कोल पाश्चात्त्य जगात नावाजले गेले आणि पश्चिम जर्मनीस आंतरराष्ट्रीय राजकारणात काही एक स्थान मिळाले.

ते महत्त्वाचे होते. याचे कारण युरोपातील ग्रेट ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर यांची खंबीर उपस्थिती जागतिक अर्थकारणास कलाटणी देणारी ठरत होती आणि तिकडे अटलांटिकपलीकडील अमेरिकेत रोनाल्ड रेगन हे त्यांच्या आधारे काही धाडसी पावले टाकू लागले होते. लवकरच सोव्हिएत रशियात मिखाइल गोर्बाचोव यांचा ऐतिहासिक काल सुरू होणार होता. कोल यांनी या वातावरणात आपल्या देशाचे नेतृत्व प्रस्थापित केले. अध्यक्षीय कारकीर्दीच्या दुसऱ्याच वर्षी इस्रायलच्या पार्लमेंटमध्ये.. म्हणजे केनेसेटमध्ये.. भाषण देण्याइतका मनाचा मोठेपणा ते दाखवू शकले. हिटलरच्या जर्मनीत यहुदींचे झालेले शिरकाण, त्यातून संपूर्ण इस्रायली जनतेत जर्मनीविरोधात असलेली एकूणच नाराजी या पाश्र्वभूमीवर कोल यांच्या कृतीचे मूल्यमापन करायला हवे. ती निश्चितच अचंबित करणारी होती. त्याच वर्षी शेजारील फ्रान्सला भेट देऊन कोल यांनी अध्यक्ष मितराँ यांच्याशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले. पुढच्याच वर्षी, १९८५ साली, सहा युरोपीय देशांत एक ऐतिहासिक करार झाला. शेंगेन करार या नावाने तो ओळखला जातो. या कराराने युरोपीय देशांनी सामाईक बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय घेतला. आगामी युरोपीय महासंघ निर्मितीची ती नांदी होती आणि त्याच्या प्रमुख सूत्रधारांत कोल हे एक होते. हा काळच जागतिक राजकारणास नवे वळण लागण्याचा. प्रचंड उलथापालथीनंतर रशियाचे नेतृत्व गोर्बाचोव यांच्या हाती आले होते. आय लाइक्ड धिस मॅन असे त्यांचे स्वागत खुद्द मार्गारेट थॅचर यांनी केले होते आणि पाश्चात्त्य जगाला त्यांच्याकडून मोठी आशा होती. आपली ऐतिहासिक साम्यवादविरोधी भूमिका बाजूला ठेवत थेट मॉस्कोत जाऊन कोल यांनी त्या वेळी गोर्बाचोव यांची भेट घेतली. पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते. अशा वेळी पहिल्यांदा कोल यांनी पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या विलीनीकरणाची भूमिका मांडली. हे मोठे धाडस होते. १९८९ सालच्या नोव्हेंबर महिन्यात बर्लिनची भिंत कोसळत असताना हे वेडे धाडस किती शहाणे आहे हे ठरवण्याची संधी कोल यांना मिळाली. ती त्यांनी दवडली नाही. दोन जर्मनींच्या विलीनीकरणाचा मुद्दा त्यांनी ताकदीने रेटला. वास्तविक ब्रिटनच्या थॅचर यांचा यास विरोध होता. कारण त्यामागे त्यांचा ब्रिटिश स्वार्थ होता. एकत्र जर्मनी हा युरोपात आपल्याला भारी पडेल ही थॅचर यांची अटकळ. ती खरी होती. त्यांनी समविचारी अन्य युरोपीय देशांना या मुद्दय़ावर एकत्र आणून हे विलीनीकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. कोल यांना या वेळी पाठिंबा मिळाला तो अमेरिकेच्या अध्यक्षपदी असलेल्या थोरल्या जॉर्ज बुश यांचा. ते कोल यांच्या पाठीशी का उभे राहिले? तर याआधी कोल यांनी रशियाविरोधातील क्षेपणास्त्र प्रश्नावर उचललेली पाश्चात्त्यांची तळी. कारकीर्दीच्या सुरुवातीस घेतलेल्या त्या धाडसी निर्णयाचा उपयोग कोल यांना जर्मनीच्या एकत्रीकरणात झाला. त्यानंतर कोल यांनी वेळ दवडला नाही. त्यांचे त्या काळातील नेतृत्व अक्षरश: अचंबित करणारे होते. त्याच झपाटय़ात त्यांनी एकत्रित जर्मनीची राजधानी बॉन येथून बर्लिन येथे हलविण्याचा निर्णय घेतला. अखेर थॅचर आदींचा विरोध मोडून काढीत हे एकत्रीकरण यशस्वी झाले. त्यानंतर कोल यांना आपल्या दुसऱ्या स्वप्नाचा ध्यास होता.

युरोपचे एकत्रीकरण हे ते स्वप्न. आज युरोपीय संघ म्हणून जी काही व्यवस्था आहे तिच्या मुळाशी दोन करार आहेत. १९८५ सालचा शेंगेन येथे झालेला आणि १९९२ सालचा मॅस्ट्रिच करार. हे दोन्ही करार रेटण्यात कोल यांचा महत्त्वाचा वाटा होता. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय जागतिक नेतृत्व कसे करता येते हे यातून कोल यांनी दाखवून दिले. ही अभिनिवेशशून्यता हे कोल यांचे वैशिष्टय़. सुमारे साडेसहा फूट उंच आणि आकाराने अगडबंब असलेले कोल होते त्यापेक्षा साधे भासत. तसे दाखवण्यातच त्यांना आनंद असे. खाणे हा त्यांच्या प्रेमाचा विषय. मार्गारेट थॅचर यांच्याबरोबरील एका चर्चेतून काहीही हाती लागणार नाही, याचा अंदाज आल्यावर कोल यांनी काही महत्त्वाचे काम आहे असे सांगून चर्चा संपवली. आणि नंतर शांतपणे तेथील एका विख्यात हॉटेलात भलाथोरला क्रीम केक चापत बसले. हे काही वेळाने थॅचरबाईंना कळल्यावर त्या संतापल्या. आधीच दोघांचे संबंध तणावपूर्ण. त्यात हा प्रसंग. थॅचर यांनी कधीही कोल यांना माफ केले नाही. कोल यांनी अशा मुद्दय़ांची कधीच फिकीर केली नाही. युरोपीय एकसंधतेसाठी प्रयत्न आणि जर्मनीचे विलीनीकरण याखेरीज त्यांनी जर्मनीस आणखी एक देणगी दिली.

अँगेला मर्केल. द गर्ल नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यमान जर्मन चॅन्सेलर मर्केल यांना कोल यांनी घडवले. त्याही त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करतात. परंतु राजकारणात कृतज्ञता ही तेवढय़ापुरतीच असते. आयुष्याच्या उत्तरार्धात नंतर याच मर्केल यांनी कोल यांना बाजूस सारले. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे निमित्त मर्केल यांनी साधले आणि कोल यांना दूर केले गेले. काही वर्षांपूर्वी त्यांची पत्नी हॅनेलोर यांच्या आत्महत्येने ते पुन्हा चर्चेत आले. हॅनेलोर यांनी लग्नास होकार द्यावा म्हणून कोल यांनी तरुणपणी त्यांना तब्बल दोन हजार प्रेमपत्रे पाठवली होती. जे भावते त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणे हे त्यांचे वैशिष्टय़. हा विवाह अत्यंत महत्त्वाचा. हॅनेलोर यांच्यावर वयाच्या १२ व्या वर्षी रशियन सैनिकांनी बलात्कार केला होता. पुरुषाचा घाम, लसूण, मद्य, रशियन भाषा उच्चार आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रकाश यांची साथ त्यांना कमालीची नकोशी होती. प्रकाशाचा त्यांना इतका तिटकारा होता की त्यांना टीव्हीच्या पडद्याचाही प्रकाश नकोसा होत असे. त्यातच त्यांचे केस झडून त्यांना टक्कल पडले. त्या कायम अंधारात कोंडून असत आणि रात्रीच फक्त घराबाहेर पडत. आपला नवरा मात्र अशा प्रकाशात झळाळत असतो याचा त्यांना तीव्र संताप होता. १९९८ मध्ये कोल निवडणूक हरल्यावर तरी आपल्याला त्यांचा सहवास लाभेल अशी त्यांना आशा होती. ती फोल ठरली. अखेर २००१ साली झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आयुष्य संपवले. अभंग जर्मनीसाठी झटणारा, त्यात यशस्वी झालेला हेल्मट कोल हा नेता वैयक्तिक आयुष्यात मात्र भंगलेलाच राहिला. २००८ साली घरातल्या घरात पडून झालेल्या अपघाताने ते अधिकच भंगले. अखेर मृत्यूनेच ही भंगता संपवली. आज शतखंडित जगास अधिकच विदग्ध करण्यात देशोदेशींचे नेते मग्न असताना कोल समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे.

First Published on June 19, 2017 2:54 am

Web Title: helmut kohl angela merkel north atlantic treaty organisation
 1. D
  Durgesh Bhat
  Jul 4, 2017 at 6:12 pm
  उघडपणे/थेट मोदींबद्दल चांगले लिहिले तर मालक पगार देणार नाहीत या भीतीने असा उहापोह केल्याबद्दल संपादकांचे अभिनंदन. यावेळी जरा जास्तच अभ्यास करावा लागला संपादकांना.
  Reply
 2. उर्मिला.अशोक.शहा
  Jun 19, 2017 at 10:27 pm
  वंदे मातरम- संपादकांना सर्वांचा द्रष्टेपणा दिसतो फक्त मोदी चा दिसत नाही जा ग ते र हो
  Reply
 3. U
  umesh
  Jun 19, 2017 at 9:01 pm
  जर्मनीचे एकीकरण झाले तरीही फारसा फरक पडला नाही जर्मनीवर आज युरोपीय महासंघाची ताकद कायम ठेवण्याची जबाबदारी येऊन पडली आहे ती पार पाडण्यातच त्याची दमछाक होत आहे बाकी द्रष्टेपणा हा सापेक्ष असतो काही जणांना मोदी काहींना इंदिरा गांधी नेहरू हेही द्रष्टे वाटू शकतात तुमचे मत हे साऱ्या जगाचे कसे असू शकेल? देशाचा होत असलेला विकास पाहतामोदी कुणाला द्रष्टे वाटले तर त्यावर तुटून पडाल तुम्ही भक्त म्हणून हिणवाल एकूण काय तर कोहल यांच्या मोठेपणाबाबत ज्याने त्याने आपल्या परीने मूल्यमापन करावे
  Reply
 4. P
  Piyush
  Jun 19, 2017 at 6:08 pm
  जर्मनीचे एकीकरण ही साधी घटना नव्हती. या असाधारण घटनेस एका असामान्य व्यक्तीचे कर्तृत्व कामी आले. काळाच्या पुढे दृष्टी असलेला नेता हे योग्य वर्णन आपण केले. युरोपमध्ये मूल्यांची जाणीव असलेला नेता आजही अमूल्य योगदानासाठी जर्मनीत व विश्वात अमर राहील.
  Reply
 5. S
  shubham vijay
  Jun 19, 2017 at 4:49 pm
  sadhyaachyaa loksattaateel agralekhaankade paahile asataa aapan europe madhye aahot ki kaay ase vaatate.
  Reply
 6. A
  A.A.Choudhari
  Jun 19, 2017 at 3:33 pm
  वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून गम्मत वाटते .अहो! आमच्या देशात इतके गुणसंपन्न लोक आहेत का ? का? उगीच बिचार्या संपादकांना त्रास देता ? आम्ही पाश्चात्य मोठ्या लोकांच्यामागे जाणारी अजाण माणसं?
  Reply
 7. S
  Saurabh
  Jun 19, 2017 at 3:21 pm
  उत्तम लेख. "नेत्याचे द्रष्टेपण त्याच्या वाईटपणा घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते आणि अशा नेत्यास फक्त पुढच्या निवडणुकीचीच नव्हे तर पिढीच्या कल्याणाची आस असते." ह्या उक्तीबद्दल धन्यवाद. बहुदा हीच उक्ती हिंदुस्थानच्या वर्तमान नेतृत्वाबद्दलही लागू होते. कारण वर्तमान नेतृत्व कोणत्या संपादकाला काय वाटेल ह्यापेक्षा देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काय आवश्यक आहे त्याचा विचार करून निर्णय घेत आहे आणि माझी खात्री आहे की अजून २५ वर्षांनी ह्याच वृत्तपत्रामध्ये (समजा तोपर्यंत वृत्तपत्र चालू असेल तर) विद्यमान नेतृत्वाच्या दूरदर्शीपणाबद्दल लेख प्रसिद्ध होईल.
  Reply
 8. V
  vaibhav Khedkar
  Jun 19, 2017 at 2:02 pm
  खूप सुंदर लेख
  Reply
 9. A
  arun vanjare
  Jun 19, 2017 at 11:00 am
  कृ पया भारतातील घडामोडींविषयी व समस्यांना अग्रलेखात स्थान द्या येथील महान व्यक्तिमत्वाबद्दल छापावे , ही विनंती
  Reply
 10. P
  Prasad
  Jun 19, 2017 at 9:47 am
  दुसर्या देशाच्या नेत्याची भेट न घेता हॉटेलमध्ये केक खात राहणे ह्यात द्रष्टेपण कसले ? असेच मोदीनी केले तर केवढा गहजब होईल ? अशावेळी द्रष्टेपण म्हणाल का ?
  Reply
 11. S
  Somnath
  Jun 19, 2017 at 9:43 am
  उत्तम लेख पण विनाकारण "सर्वत्र लिंबूटिंबूंचे सत्तारोहण पाहणे अनिवार्य" उल्लेख खटकतो. त्या त्या बलाढ्य राष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलेल्या त्या व्यक्तीचा नाही तर त्या सुज्ञ मतदारांचा अपमान आहे. गांधी घराण्याचा बालबुद्धीचा थोराड युवा नेता सर्वोच्यापदी असता तर तो लिंबूटिंबूंच असता.आप पक्षाला आपण लिंबूटिंबूं विशेषण लावू शकता.प्रत्यक्ष नावाचा उल्लेख टाळला असला तरी सजग वाचकांना विनाकारण मारलेला तीर कोणत्या दिशेने मारला ते चांगलेच समजते.एवढी चांगली डिश तयार केली पण स्वतःच्या हाताने अंदाज न घेता भसकन मिठाचा खडा टाकावा तसा लेख तुम्ही खारट केला.इतर वेळी गरम म ,मिरचीची पूड,लवंग टाकत असता त्यापेक्षा मिठावर आलात हे हि नसे थोडके.
  Reply
 12. H
  Hemant Kadre
  Jun 19, 2017 at 8:40 am
  "नेत्याचे द्रष्टेपण त्याच्या वाईटपणा घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते आणि अशा नेत्यास फक्त पुढच्या निवडणुकीचीच नव्हे तर पिढीच्या कल्याणाची आस असते." असे विचार आपण अग्रलेखात मांडल्यावर अगदी भरभरून आले. भारतापासून लांब अंतरावर असलेल्या जर्मनी देशातील हेल्मट कोल यांची महानता आपण जाणली याकरिता आभारी आहे. ा आशा आहे की एक दिवस नक्की उजाडेल की ज्या दिवशी लोकसत्ता संपादकांना भारतातील कर्तृत्ववान लोकनेत्यांचीही महता लक्ष्यात येईल आणि "नावडतीचे मीठ अळणी" हा विचार थांबेल.
  Reply
 13. A
  arun
  Jun 19, 2017 at 5:34 am
  फार फार सुंदर लेख. इतक्या राजकीय आणि वैयक्तिक बारीक सारीक तपशिला कोल यांचं चरित्र उलगडून दाखवल्यामुळे कोल यांची ओळख झाली. मानसिक आणि बौद्धिक द्वंद्व मोठ्यांच्या वाट्याला अपरिहार्य असतं. पण अशा जागतिक नेतृत्व करण्याच्या आक्रमक आणि आग्रहक मनोबलामुळे त्यांच्या वासातील लोक फरफटत जातात हे त्यांच्या वाट्याला आलं. त्याचीही ओळख झाली.
  Reply
 14. Load More Comments