भारतीय अभियंत्याची अमेरिकेत झालेली हत्या ही चिंतेची बाब आहेच, पण या घटनेमुळे आपल्यातही आता काही बदल होणे गरजेचे आहे..

अमेरिकेसारख्या सागरात वास करावयाची संधी मिळूनही तेथे राहणारे अनेक भारतीय आपापली डबकी करूनच जगत असतात. अशा वेळी कोणत्याही संस्कृतीत आतले आणि बाहेरचे हा संघर्ष अटळ असतो. ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणामुळे या संघर्षांस शासकीय अधिष्ठान मिळाले आहे. तेव्हा हे प्रकार आता वाढणार यात शंका नाही.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
ग्रामविकासाची कहाणी
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती

जिवास धोका असेल तर भारतीय तरुणांनी अमेरिकेत जाण्याचा इतका हव्यास बाळगावा का, हा मदासनी यांचा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. अमेरिकेतील कन्सास येथे या मदासनी यांचा मुलगा आलोक आणि त्याचा जुना सवंगडी आणि सहकारी श्रीनिवास कुचिभोतला यांच्यावर एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याने हल्ला केला. या अमेरिकी नौदल अधिकाऱ्याने या दोन भारतीय तरुणांची संभावना दहशतवादी अशी केली आणि अमेरिकेतून चालते व्हा असे म्हणत त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात श्रीनिवास मारला गेला तर आलोकच्या पायास गोळी लागली. त्यानंतर मनाच्या उद्विग्न अवस्थेत या तरुणाच्या वडिलांना असा प्रश्न पडला असेल तर साहजिकच म्हणावे लागेल. श्रीनिवास याच्या पत्नीने अमेरिकी सरकारलाही असाच प्रश्न विचारला असून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आपल्या धोरणांचा श्रीनिवास याच्या हत्येशी काही संबंध नाही, असे म्हणत या प्रकरणातून आपले हात झटकून टाकले आहेत. नागरिकांच्या प्रत्येक कृतीस सरकार जबाबदार नसते हे मान्य. परंतु सरकारी धोरणांची दिशा नागरिकांना मार्ग दाखवत असते. म्हणूनच इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात शिखांचे शिरकाण होते आणि म्हणूनच रेल्वेत हिंदू धर्मीय जाळले गेल्याच्या घटनेनंतर गुजरातेत राज्यभर मुसलमानांना वेचून ठार केले जाते. तेव्हा सरकारी धोरणे आणि त्या सरकारच्या अखत्यारीतील नागरिकांची वर्तणूक यांचा संबंध नसतो असे म्हणता येणार नाही. या वास्तवाच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेत भारतीय अभियंत्यांच्या हत्येने उद्भवलेल्या परिस्थितीच्या वर्तमानासह इतिहासाचाही आढावा घ्यायला हवा.

कारण हा इतिहास हाच मुळात भारतीयांना अमेरिका प्रवासासाठी उद्युक्त करतो. हे तरुण अभियंते, संशोधक, वैद्यक आदी अमेरिकेत जातात त्यामागील अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे येथे असलेला संधीचा अभाव. स्वातंत्र्यास सत्तर वर्षे होत आली तरी आपल्याला अजून गुणवंतशाही व्यवस्था.. मेरिटोक्रसी.. निर्माण करता आलेली नाही. आरक्षण ते बिनडोक सरकारी धोरणे अशी अनेक कारणे आपल्याकडे या गुणवंतशाही व्यवस्थेच्या मुळावर येणारी आहेत. कोणतीही राजवट ती दूर करण्याचा विचारदेखील करताना दिसत नाही. तेव्हा येथे राहून प्रगतीची संधी साधणे दुस्तर आहे, असे तरुणांना वाटत असेल तर त्यात त्यांचा दोष नाही. तेव्हा जेथे आपल्यातील अंगभूत गुणांनाच महत्त्व आहे आणि त्याचे मोल मोजणारी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी बुद्धिमान मंडळी जाणारच. हे केवळ भारतातूनच होते असे नाही. तिसरे जग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वच देशांतून अमेरिकेत स्थलांतर होत आलेले आहे. तेव्हा दोष द्यायचाच झाला तर ज्या देशांतून स्थलांतर होते त्या देशांच्या नाकर्तेपणास तो द्यायला हवा. महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून मोठय़ा प्रमाणावर श्रमिक मंडळी येत असतात ती काही या प्रदेशात रामराज्य आहे म्हणून नव्हे. तर त्यांची त्यांच्या राज्यात होणारी कोंडी हे या घाऊक स्थलांतरामागील कारण असते. त्यांच्या राज्यांत श्रमाचे मोलदेखील श्रमिकाच्या जातीवर ठरते. त्या तुलनेत मुंबईसारख्या शहरांत त्यांना कोणी त्यांची जात विचारत नाही आणि त्यांच्या कमाईच्या आड येथील व्यवस्था येत नाही. म्हणून हे सर्व अभागी श्रमिक मुंबईला धावत असतात. येथे अशा सर्व श्रमिकांचे वर्णन भय्ये या हीनस्थितीदर्शक शब्दाने केले जाते. भय्या ही संकल्पना सामाजिक नाही. ती आर्थिक आहे. प्रचलित बाजारमूल्यापेक्षा कमी दरांत जो आपली सेवा उपलब्ध करून देतो, तो भय्या, ही त्याची खरी आर्थिक ओळख. तेव्हा ही व्याख्या विचारात घेतल्यास आपल्या देशातून लाखोंनी अमेरिकेत जाणारे माहिती तंत्रज्ञान ते विविध ज्ञानशाखांतील तरुण हे तेथील स्थानिकांच्या दृष्टीने सर्रास भय्येच ठरतात, हे मान्य करायला हवे. ते आपण मान्य करत नाही. त्यामुळे आपले वर्तन दुटप्पी होते. परिणामी मुंबईतील भय्यांविरोधात व्यक्त होणारा आक्रोश आपल्याला मान्य होतो, परंतु अमेरिकी जनतेने त्या देशांतील भय्यांविरोधात तसेच वर्तन केले तर आपणास दु:ख होते. कारण तेथे भय्या या वर्गवारीत आपली तरुण मुले असतात. हे या प्रकरणातील पहिले वास्तव.

दुसरे वास्तव या स्थलांतरित भारतीयांच्या तेथील जीवनशैलीशी निगडित आहे. हे असे भारतीय तरुणांनी अमेरिकादी देशांत जाऊन स्थायिक होणे म्हणजे जागतिकीकरण अशी एक भलामण आपल्याकडे केली जाते. तसे करणे शुद्ध बावळटपणाचे आहे. याचे कारण ज्याप्रमाणे बिहारातून मुंबईत येणारे भय्ये आपापले कोंडाळे करून जगतात त्याप्रमाणे आपल्या देशातून परदेशांत जाणारे आपले सुशिक्षित तरुण तेथेही आपापले कोंडाळे करूनच जगत असतात. काही मोजके अपवाद वगळता हे आपले भारतीय ना स्थानिक जीवन, संस्कृतीशी समरस होतात ना त्या देशांतील अन्य वांशिक समुदायांशी यांचे सौहार्दाचे संबंध असतात. म्हणजे येथून गेलेले मराठी तरुण हे त्या देशांतील मराठींच्या आधारसंबंधांसाठी आसुसलेले असतात आणि तो मिळाला की त्या देशांतले स्थायिक मराठी आणि हे नव्याने आलेले मराठी असे आपापल्यातच जगू लागतात. पुढे त्यांच्यात्यांच्यातच रोटीबेटी व्यवहारही होतात. यांचे तेथील जगणे प्रतिध्वनी कक्षातील जगण्यासारखे असते. म्हणजे या कक्षात ज्याप्रमाणे आपल्या आवाजाचाच प्रतिध्वनी आपल्या कानावर पडतो तद्वत ही परदेशी भारतीय मंडळी आपापलेच आवाज ऐकत राहतात. हे इतके स्वांतसुखाय असते की भारतीय वातावरणातील शुद्ध जातीय असे कधीच कालबाह्य़ व्हायला हवेत असे मौंजीबंधनासारखे विधी ही मंडळी तेथे जाऊन करतात आणि त्यांचे येथील नातेवाईक या जीवनशैलीचे ‘‘किती संस्कार राखले’’ म्हणून अजागळपणे कौतुक करतात. संस्कृतीच्या इतिहासाचे गोडवे गाणाऱ्या सर्वच समाजांकडून असे होत असते. त्यामुळे अमेरिका वा युरोपात राहूनही इस्लाम धर्मीय जेवढे वैचारिकदृष्टय़ा मागास असतात तितकेच मागास आपले भारतीयही असतात हे मान्य करायला हवे. मायक्रोसॉफ्ट, बोइंग, स्टारबक्स असे एकापेक्षा एक महाउद्योग जगाला देणाऱ्या अमेरिकेतील सिएटलसारख्या देशांत भारतीयांच्या जातीवर आधारित संघटना तयार होत असतील तर त्यातून हेच दिसून येते. कन्सास येथे मारला गेलेला श्रीनिवास हा आंध्र प्रदेशचा. अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या दहा हल्ल्यांपैकी नऊ हल्ल्यांत हे आंध्रचे तरुण बळी पडले आहेत. श्रीनिवास उत्तर अमेरिकेतील तेलुगू भाषकांच्या संघटनेचा पदाधिकारी होता. यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही संघटना सर्व भारतीयांची नाही. तर भारतातल्या फक्त आंध्रवासीयांची. यावरून त्याच शहरात असलेल्या अन्य भारतीयांशी या तरुणांचे संबंध कितपत असतील याचा अंदाज बांधता येईल. ही तरुण मंडळी स्वत:च्या विचारविश्वाचे आणि त्यामुळे आचारविश्वाचे इतके कप्पे करून परदेशांत जगत असतील तर त्यांचे स्थानिक संस्कृतीशी संबंध कसे असतील हे ओळखणे अवघड नाही. यातून अधोरेखित होते ती एकच बाब. ती म्हणजे अमेरिकेसारख्या सागरात वास करावयाची संधी मिळूनही तेथे राहणारे अनेक भारतीय आपापली डबकी करूनच जगत असतात. अशा वेळी कोणत्याही संस्कृतीत आतले आणि बाहेरचे हा संघर्ष अटळ असतो. ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणामुळे या संघर्षांस शासकीय अधिष्ठान मिळाले आहे. तेव्हा हे प्रकार आता वाढणार यात शंका नाही. हे फक्त अमेरिकेतच होते असे नाही. तर आज जगातील अनेक देशांतील स्थानिकांत परदेशांतून आलेल्यांविषयी राग आहे. सध्या सुरू असलेल्या जगाच्या संकुचीकरणाचाच तो एक भाग. अर्थात म्हणून कोणतीही हिंसा समर्थनीय ठरत नाही.

अशा वेळी हे आपल्यापुरते बदलायचे असेल तर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे येथील बुद्धिमानांना आपल्या गुणांचे चीज करण्यासाठी परदेशात जावे असे वाटणारच नाही, अशी गुणवंतशाही येथे निर्माण करणे. आणि दुसरे म्हणजे येथून परदेशात जाणाऱ्यांनी आपल्या संकुचित कचराकुंडय़ा येथेच सोडून जायला शिकणे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बिहारातून मुंबईत येणाऱ्या भय्यांविरोधात जशी नाराजी वाढत जाते तसे होतच राहणार आणि भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या उच्चशिक्षितांना तिकडे मुंबईतल्या भय्यांसारखेच वागवले जाणार. कारण मुंबईतले बिहारी असोत वा अमेरिकेतील भारतीय हे दोघेही त्रिशंकूच असतात. ना इकडचे ना तिकडचे.