विचारापेक्षा भावनेवर अधिक श्रद्धा असणाऱ्या भारतीय जनतेस स्वत:ला कोणाकडून तरी हाकून घेणे मनापासून आवडते..

डोनाल्ड ट्रम्प, इंदिरा गांधी, राजीव गांधी असो वा विश्वनाथ प्रतापसिंग वा अण्णा हजारे,आपण कसे ‘यांच्यापेक्षा’  वेगळे आहोत हे जनतेला पटवून देणे या सर्वाना शक्य झालेले असते. आपण म्हणजेच व्यवस्था आणि आपण करतो तीच व्यवस्था सुधारणा असा त्यांचा दावा असतो. अशा सर्वाचे पुढे काय होते हे इतिहासाने सिद्ध केलेले आहे. अशा वेळी आपणही याच इतिहासाचा पुढचा अध्याय बनणार आहोत किंवा काय, असा प्रश्न आता जनतेस पडावयास हवा.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

नवे जन्मते म्हणजे जुने पूर्णपणे संपुष्टात येत नसते आणि जुन्याची जनुके घेऊनच नव्याची नवता पुढे जात असते. हे वैश्विक वैज्ञानिक सत्य आहे. ते दिनदर्शिकेसही लागू पडते. त्यामुळे नव्या वर्षांच्या आगमनाची चाहुल नव्या दिनदर्शिकेने करून दिली असली तरी या नव्या वर्षांसही जुन्याच्या कित्येक खुणा वागवतच दिवस काढावे लागणार आहेत. अशा वेळी नव्यात नवे काय शोधायचे, हा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर शोधताना जुन्याचे काय त्यागायचे याची चर्चा करणे आवश्यक ठरते.

जे मिरवायचे ते मोजता यायला हवे आणि जे मोजता येत नाही ते मिरवायचे नसते हा व्यवस्थापनशास्त्रातील साधा नियम. याचा अर्थ असा की जे मोजता येत नाही ते ‘मॅनेज’ही (चांगल्या अर्थाने) करता येत नाही. अशा न मोजता येणाऱ्या घटकांचे मिरवणे हे नेहमीच भाबडय़ा मनांना आकृष्ट करणारे असते. एकुणातच सर्वत्र अशा भाबडय़ांचे बहुमत असल्याने अशा न मोजता येणाऱ्या घटकांच्या मोजमापाचा प्रयत्नही होत नाही आणि ते घटक मिरवणाऱ्यांना किमान प्रश्नदेखील विचारले जात नाहीत. उदाहरणार्थ मेक अमेरिका ग्रेट अगेन ही अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हाक. अमेरिकेस महान करू या म्हणजे काय, असे विचारल्यास त्याचे उत्तर ट्रम्प आणि पाठीराख्यांकडे नसते. परंतु तरीही जनसामान्य अशा घोषणा देणाऱ्यांच्या प्रेमात पडत असतात. अमेरिका, व्हेनेझुएला, रशिया, ग्रेट ब्रिटन, हंगेरी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान आणि अर्थातच भारत अशा अनेक देशांत गत वर्षांत असेच घडले. ब्रिटनमध्ये निर्वासितांच्या प्रश्नाचा बागुलबुवा अनेकांच्या विचारशक्तीवर मात करून गेला तर अमेरिकेविरोधातील भ्रामक भाषेने व्लादिमीर पुतिन यांनी सर्वसामान्य रशियनांना झुलवून आणखी एक निवडणूक पदरात पाडून घेतली. हंगेरीत तिसऱ्या खेपेस पंतप्रधानपद मिळवणारे व्हिक्टर ओर्बान यांनी तर थेट बाळासाहेब ठाकरे यांचे अनुकरण करीत मुक्त लोकशाहीपेक्षा बंदिस्त हुकूमशाही अधिक कल्याणकारी असते असे विधान करीत कहर केला. लोकशाही व्यवस्था प्रगतीस मारक असते हा त्यांचा सिद्धान्त. व्हेनेझुएला या देशाचा जीव तो काय. परंतु त्या देशाच्या व्हिक्टर ह्य़ुगो चावेझ यांनी अमेरिकेस मागे टाकण्याची, आव्हान देण्याची भाषा करीत आपल्या देशातील जनतेस अनेक वर्षे झुलवले आणि आपली सत्ता अबाधित ठेवली. अखेर देशाची अर्थव्यवस्था पाताळात गेल्यानंतर जनतेस भान आले आणि अमेरिकेस आव्हान देणे सोडाच परंतु या काळात आपल्याला होते तेही राखता आले नाही, याची जाणीव जनतेस झाली. एर्दोगान यांनी केमाल पाशा याच्या ऐतिहासिक कार्यावर पाणी ओतले आणि तुर्की जनतेच्या मनात पुन्हा धर्मभावना जागृत करीत आपल्याच देशातील दोन वंश समूहांत संघर्ष लावून दिला. हे न कळणाऱ्या जनतेने एर्दोगान यांच्यावर विश्वास टाकला. तो किती आंधळा होता हे आता दिसून येऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांतील घटना पाहता भारतही याच वाटेने निघाला आहे किंवा काय, असा प्रश्न पडल्यास आश्चर्य नाही.

याचे कारण स्वत:ची ही अशी अवस्था करून घेणे हा भारतीय जनतेचा स्थायिभाव आहे. विचारापेक्षा भावनेवर अधिक श्रद्धा असणाऱ्या या जनतेस स्वत:ला कोणाकडून तरी हाकून घेणे मनापासून आवडते. अलीकडच्या इतिहासात याचा प्रत्यय या देशाने इंदिरा गांधी यांच्या काळात घेतला. त्यांची गरिबी हटाव ही घोषणा हे याचे उत्तम उदाहरण. गरिबी हटाव म्हणजे नक्की काय, हे सांगण्याच्या फंदात त्या कधीच पडल्या नाहीत. तसेच आपल्या निर्णयांनी गरिबी हटणार आहे की नाही याचाही विचार त्यांनी केला नाही. पक्षाच्या डोक्यावरून जनतेशी थेट संवाद साधण्याची कला आणि गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी आणि वितुष्ट अबाधित राखण्याचे कौशल्य या आधारे त्यांनी किमान दोन निवडणुका पदरात पाडून घेतल्या. आणीबाणीची अक्षम्य चूक झाली नसती तर त्यांच्याबाबतचा भ्रमनिरासही झाला नसता. तो झाला तेव्हा जनतेस कळले की ना गरिबी हटली ना श्रीमंतांच्या श्रीमंतीचा टवका उडाला. गरीब, पिछडे, दलित, महिला, अनाथ आदींच्या कल्याणाची भाषा आणि प्रत्यक्षात भले मात्र धनिकांचेच हा तो खेळ होता हे जनतेस समजेपर्यंत दशकभराचा काळ उलटून गेला. त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांनी अशीच स्वच्छ भारताची हाक दिली आणि तीत काहीही स्वच्छ नाही हे जनतेस सुरुवातीस कळलेच नाही. पुढे भारतीयांच्या या भाबडेपणाचा बेरकी फायदा राजीव यांचे त्या वेळचे सहकारी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी उचलला आणि गांधी घराण्यास काही काळापुरते का असेना चीत केले. प्रत्येक सत्ताधाऱ्यांविषयी सद्भावना संपण्याचा एक मुहूर्त असतो. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो अचूक साधला आणि बोफोर्सचे भूत उभे केले. राजीव गांधी यांनी प्रयत्न करूनही शेवटपर्यंत ते त्यांच्या मानगुटीवरून उतरू शकले नाही. त्यांच्या कपाळावर बोफोर्सचा शिक्का बसला तो बसलाच. प्रत्यक्षात विश्वनाथ प्रताप सिंग यांनी भारत किती भ्रष्टाचारमुक्त केला ते आपण अनुभवलेच. या सामाजिक स्वच्छतेच्या दाव्याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे अण्णा हजारे यांनी छेडलेले आंदोलन. अण्णा म्हणजे कोणी देवदूत असल्याच्या भ्रमात जनता होती त्या वेळी हे आंदोलन किती पोकळ आहे याचे भाकीत आम्ही आंदोलन ऐन भरात असताना वर्तवले होते. ते खरे ठरले.

देशी असो वा परदेशी. या सर्वाच्या चालीत एक साम्य होते आणि आहे. ते म्हणजे हे सर्व स्वत:स व्यवस्थेविरोधातील व्यवस्थाबाह्य़ असल्याचे दाखवत असतात. मग ते डोनाल्ड ट्रम्प असोत वा इंदिरा गांधी वा विश्वनाथ प्रताप सिंग वा अण्णा हजारे वा अन्य कोणी. आपण कसे ‘यांच्यापेक्षा’  वेगळे आहोत हे दाखवून देणे या सर्वाना शक्य झालेले असते. आणि आपण ज्या अर्थी वेगळे आहोत त्या अर्थी ‘यांच्यापेक्षा’ अधिक चांगले आहोत हे ते सहजपणे पटवून देतात. जनतेसही ते खरे वाटते. ही व्यक्ती आतापर्यंतच्या प्रस्थापितांपेक्षा निश्चितच वेगळी आहे हे जनता स्वीकारते आणि वेगळी आहे म्हणजेच चांगली असेल असे मानत स्वत:चे समाधान करून घेते. या सर्वातील दुसरे साम्यस्थळ म्हणजे या सर्व व्यक्ती आपल्या कथित जनहितार्थ कृती नेहमी स्वकेंद्रित ठेवतात. त्यामुळे सर्व प्रसिद्धीप्रकाशझोत आपल्यावरच राहील याची त्यांच्याकडून आपोआप काळजी घेतली जाते. त्यामुळे व्यवस्थेपेक्षा या व्यक्तींचे स्तोम वाढते आणि या व्यक्ती आहेत त्या पेक्षा अधिक मोठय़ा भासू लागतात. यातून या सर्वातील तिसऱ्या साम्यस्थळाचा जन्म होतो. ते म्हणजे यातील कोणतीही व्यक्ती व्यवस्था सुधारणेस हात घालत नाही. आपण म्हणजेच व्यवस्था आणि आपण करतो तीच व्यवस्था सुधारणा असा त्यांचा दावा असतो. अशा सर्वाचे पुढे काय होते हे इतिहासाने सिद्ध केलेले आहे.

अशा वेळी आपणही याच इतिहासाचा पुढचा अध्याय बनणार आहोत किंवा काय, असा प्रश्न आता जनतेस पडावयास हवा. प्रगल्भता ही उत्तरे देणाऱ्यांपेक्षा प्रश्न विचारणाऱ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असते. तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती टाळावयाची असेल तर जनतेस आपल्या प्रश्न पडायच्या क्षमतेत वाढ करावी लागेल. नव्या वर्षांत तरी हे घडेल अशी आशा. सरत्या वर्षांने अशा प्रश्नांची गरज किती आहे ते दाखवून दिले आहे. निरुत्तर होण्यापेक्षा निष्प्रश्न होणे हे केव्हाही धोकादायक. सांप्रत काळी अशा निष्प्रश्नतेच्या संकटाच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत. हे सुचिन्ह खासच म्हणता येणार नाही.