25 September 2017

News Flash

‘सरस्वती’चा शोध

वैज्ञानिकांनी अलीकडेच लावलेला एक खगोलीय शोध अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो..

लोकसत्ता टीम | Updated: July 15, 2017 2:53 AM

पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी अलीकडेच लावलेला एक खगोलीय शोध अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो..

प्रश्न पडणे आणि विचारणे हे माणसातील जिवंतपणाचे लक्षण. पण प्रश्न असा आहे, की प्रश्न विचारणारी माणसे हवी आहेत का आपल्याला? नाही तर, ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ आणि ‘महाजनो येन गत: स: पंथा:’ यास समाजमान्यताच मिळाली नसती. सद्गुरूच्या पुढे जायचे नसते हे सांगण्याची सोय गुरूंना उरली नसती. श्रद्धा हाच ज्ञानाचा राजमार्ग बनला नसता. परंतु असे असतानाही हे मार्ग नाकारणारे निर्माण झालेच आपल्याकडे. याचे कारण मानवी मनाला सतत उद्युक्त करणारे कुतूहल, औत्सुक्य, जाणून घेण्याची आस. जे आहे ते भलेही लोकप्रिय असले तरी त्याला सवाल करण्याचे धैर्य. या धैर्याचा पहिला उद्गार आढळतो तो ऋग्वेदात. त्यातील दहाव्या मंडलातील एका सूक्ताची देवताच आहे – क:. म्हणजे कोण. आपण कोणाची प्रार्थना करीत आहोत, असा प्रश्न त्या चार हजार वर्षांपूर्वीच्या ऋचाकर्त्यां ऋषीला पडणे हे आजच्या संदर्भात तर विशेष कौतुकास्पद. एका प्रबळ ज्ञानजिज्ञासेतून ते तत्त्ववेत्ते आपल्या भवतालाचा, आपल्या जगाचा आणि पर्यायाने विश्वाचा शोध घेत होते. त्यांना प्रश्न पडत होते, की हे सारे कोठून आले आहे? ‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं..’ – पृथ्वीच्या प्रारंभी सत् नव्हते, असत्सुद्धा नव्हते. असणे नव्हते, नसणे नव्हते. अंतरिक्ष नव्हते. आकाश नव्हते. त्याला कसला आश्रय होता? कसले आवरण होते? मग हे कशातून आले? अशा प्रश्नांतूनच त्यांची ज्ञानवृद्धीची वाट जात होती. त्याच वाटेवर पुढे उपनिषदे आली. विज्ञान आले. आजही तो शोध संपलेला नाही. आजही आपले वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ त्या गूढाचा शोध घेत आहेत. त्या शोधातून ज्ञान आणि विज्ञानाचा मार्ग रुंद करीत आहेत. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात वसलेल्या ‘आयुका’ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी नुकताच लावलेला एक खगोलीय शोध महत्त्वाचा ठरतो तो यामुळेच.

हा शोध आहे एक दीर्घिका (गॅलक्सी) समूहाचा. पृथ्वीपासून सुमारे चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका प्रचंड आकाराच्या आकाशगंगांच्या समूहाचा. तिला त्यांनी नाव दिले ‘सरस्वती’. ‘आयुका’ आणि ‘आयसर’ या संशोधन संस्थेतील वैज्ञानिक गेली पंधरा वर्षे या दीर्घिका समूहाच्या मागे होते. तिचे निरीक्षण करीत होते. माहिती जमवत होते. काम सोपे नव्हते. या विश्वाचे आपल्याला ज्ञात असलेले आकारमान आहे १३.८२ अब्ज प्रकाशवर्षे. अफाटच ते. आपल्या डोक्याला कल्पनाही करता येऊ  शकणार नाही त्याची. असे म्हणतात, की जग केवढे, तर आपल्या डोक्याएवढे. खरेच आहे ते. आपल्या कल्पनांचे अश्व जेथवर धावू शकतात तेथवरच आपले विश्व. ही पृथ्वी, हे चंद्र-सूर्य-ग्रह, झालेच तर आपली ‘मिल्की वे’ म्हणजे ‘आकाशगंगा’ ही दीर्घिका. साधारणत: एवढीच आपली विश्वाची कल्पना असते. तीच आपली मर्यादा असते. त्या जोरावरच आपण आपल्याला ज्ञानसंपन्न मानत असतो. ‘मी किती अज्ञानी आहे या वस्तुस्थितीपलीकडे मला काहीही माहिती नाही,’ असे म्हणणारा धीमंत एखादाच असतो, सॉक्रेटिससारखा. बाकीचे सारे आपापल्या विश्वात खुडूकखूश असतात. पण हे विश्व आपल्या ‘डोक्या’हूनही मोठे आहे. आपली ही महाप्रचंड आकाशगंगा. तीसुद्धा अशाच एका दीर्घिका महासमूहाचा भाग आहे. त्याचे नाव ‘लॅनिआकेया’. किती दीर्घिका असाव्यात या समूहात? वैज्ञानिक सांगतात किमान एक लाख. म्हणजे आपल्या आकाशगंगेसारख्या किमान लाखभर आकाशगंगा त्या एका समूहात आहेत. अशा अनेक समूहांनी मिळून हे भलेथोरले विश्व बनले आहे. असंख्य दीर्घिका आहेत त्यात. असंख्य सूर्य आहेत. आणि याहून चक्रावून टाकणारी बाब म्हणजे हे महाविश्व अजिबात स्थिर नाही. त्याची उत्पत्ती एका महास्फोटातून झाली असे म्हणतात. जन्मल्यापासून हे बाळ फुगतच चालले आहे. पसरतच चालले आहे. ही मात्र कविकल्पना नाही. त्याच्या प्रसरणाचे प्रायोगिक पुरावेच वैज्ञानिकांना मिळाले आहेत. पण अजून त्यांच्या हे लक्षात येत नाहीये, की ते प्रसरण पावते आहे तर कशात? त्याला प्रसरण पावायचे असेल तर त्यासाठी जागा लागणार. ती जागा कशात असेल तर एखाद्या पोकळीत. पण मग ती पोकळी कशात आहे? आणि हे ‘महान उपजले’ ते कसे? साराच गुंता. असंख्य वैज्ञानिकांना भंडावून सोडले आहे त्या पोकळीने. अगदी ऋग्वेदकाळापासून ते या पोकळीचा शोध घेत आहेत. ‘आयुका’ आणि ‘आयसर’चे संशोधक हे त्यांचेच वारसदार. त्या गूढाच्या शोधयात्रेत त्यांना सापडली ती ही ‘सरस्वती’. हजारो दीर्घिकांचा आणि अब्जावधी सूर्याचा समावेश असलेली. त्यातील काही दीर्घिका तर आपल्या आकाशगंगेहून मोठय़ा. गुरुत्वाकर्षणाच्या धाग्याने एकत्र बांधलेल्या. यातही मौज अशी की आपल्या या वैज्ञानिकांना दिसत असलेली ‘सरस्वती’ ही आताची नाहीच. आजमितीला ती तेथे अस्तित्वात आहे की नाही, याचाही त्यांना पत्ता नाही. कदाचित नसेलही ती. कदाचित तिच्यातील अब्जावधी सूर्य केव्हाच विझलेही असतील. कारण आता जी दिसत आहे ती सरस्वती आहे सुमार चारशे कोटी प्रकाशवर्षांपूर्वीची. तेथून निघालेला प्रकाशकिरण आपल्यापर्यंत पोचायला एवढीच वर्षे लागतात. पण मग आज या शोधाचे एवढे अप्रूप का? याचे कारण म्हणजे यातूनच कदाचित आपल्याला दीर्घिकांच्या निर्मितीचे रहस्य समजू शकते. त्या महासमूहातील वातावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम जाणून घेता येऊ शकतो. खगोलशास्त्रातील या नव्या संशोधन क्षेत्राला सरस्वतीच्या शोधाने चालनाच मिळणार आहे. आता प्रश्न असा येऊ शकतो, की या शोधांची गरजच काय? तिकडे ‘सर्न’च्या प्रयोगशाळेत वैज्ञानिक कधीपासून कोणा दैवी कणाचा शोध घेत आहेत आणि महास्फोटाचा अभ्यास करीत आहेत. त्याची आवश्यकताच काय? मूलभूत विज्ञान आणि उपयुक्ततावादी तंत्रज्ञान यांत फरक असतो हे विसरायला झाले की असे प्रश्न रास्त वाटू लागतात. खरे तर आपल्या विश्वाबद्दलचे आपले ज्ञान यातून वाढणार आहे या उत्तरानेही हा सवाल मिटायला हवा. परंतु आपण हल्ली भलतेच भौतिक व उपयुक्ततावादी झालो असल्याने तेवढय़ाने कदाचित आपले समाधान होणार नाही. अशा शोधांतून कदाचित मानवजातीला टिकून राहण्याचे साधन मिळू शकते. आजच्याहून वेगळे अजब काही तंत्रज्ञान सापडून मानवी जीवन अधिक सुकर करणारी वेगळीच यंत्रे यातून निर्माण होऊ शकतात. थोडक्यात उद्या यातून काय हाती लागेल याची कल्पनाही आज करता येत नाही. काहीही मिळू शकते. कदाचित ‘समांतर विश्वा’चा शोधही लागू शकतो, काय सांगावे? वैज्ञानिक शोधयात्रा सुरू ठेवायच्या असतात, प्रश्न विचारायचे असतात, ते त्यासाठीच. अखेर हा ज्ञानतृष्णेचा सवाल आहे.

ही तहान काही आजची नाही. ती सातत्याने प्रश्न विचारून आपल्या तत्त्ववेत्त्यांनी, संशोधकांनी, वैज्ञानिकांनी तेवती ठेवली आहे. या विश्वाचा शोध घेणाऱ्या ऋषींनी नासदीय सूक्तात त्याची काही उत्तरेही देऊन ठेवली आहेत. ते सांगतात, ‘परम आकाशातून हे सारे पाहणारा जो आहे. तो हे सारे जाणतोच.’ पण मग त्या ऋषींनाही प्रश्न पडतो. ‘खरेच का तो हे जाणतो, की त्यालाही हे माहीत नाही?’ ही खरी विज्ञाननिष्ठा. त्यातूनच ‘सरस्वती’चा शोध लागू शकतो.. नाही तर मग काय, सरस्वती पूजनाचे कर्मकांड आपण डोळे झाकून करतच असतो!

First Published on July 15, 2017 2:53 am

Web Title: indian scientists discover saraswati galaxy
 1. R
  rohan
  Jul 22, 2017 at 2:53 pm
  वाह..मस्त...खूप दिवसांनी चांगला लेख वाचनात आला... फक्त एकच सांगायचे होते...जर प्रश्न विचारत राहणे हेच विज्ञानाचे स्वरूप आहे असे म्हटले...तर अशा संशोधनाचा फायदा किंवा उपयुक्तता काय असे प्रश्न निर्माण होणे हे पण शेवटी चांगलेच असले पाहिजे... उगाच असे प्रश्न विचारणारे म्हणजे ह्यांना काय कळणार ह्यातले अशी मानसिकता नसली पाहिजे... बाकी लेख खूप जबरदस्त आहे....
  Reply
  1. संदेश केसरकर
   Jul 21, 2017 at 1:01 am
   संपूर्ण लेख हा उत्कृष्टच नाहीतर अचूकही हि आहे. "ज्याच्या नजरेतच चुका तो त्याच्या तोंडी भुंकाच". त्यामुळे संपादक महाशयांनी त्या कडे दुर्लक्षच करावे व आपली सृजनशीलता अश्याच प्रकारच्या लेखातून द्यावेत. खार म्हणजे शास्त्रीय लेख मराठीत लिहिणे हे एक मोठे आव्हान असते आणि ते संपादक महाशयांनी उत्कृष्ट्पणे पेललेआहे. ज्यांना कोणाला काही विशिष्ट शंका असतील त्यांनी ठराविक शंकाच पोष्ट करावी, त्यांना प्रामाणिकपणे सोप्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करिन. जल्पकांनी कृपया दूर राहावे.
   Reply
   1. G
    Ganeshprasad Deshpande
    Jul 18, 2017 at 10:41 am
    श्री. दीडशहाणा, एकावर हजार शून्ये लावून जी संख्या होते ती संपादक सांगत नव्हतेच. ते सांगत होते ४५० कोटी ही संख्या. त्यांनी एकक चुकीचे वापरले हा मुद्दा आहे. यात सरस्वतीचा जन्म किती वर्षांपूर्वी झाला (ते अजून समजायचे आहे) हा मुद्दा गैरलागू आहे. ४५० कोटी ही संख्या सांगताना काळाऐवजी अंतराचे एकक वापरून विषय सोपा कसा झाला? उलट काही वाचकांची तरी दिशाभूल झाली. ‘... ४५० कोटी गुणिले प्रकाश एका वर्षात ... ती संख्या ...याचे उत्तर ....’ याची गरजच नाही आहे. कारण तो अंतराचा प्रश्न आहे, काळाचा नव्हे. तुम्ही स्वतःच किलोमीटर हा शब्द वापरून ही गोष्ट मान्य केलीच आहे. चुकीचे एकक हे विसरून ४५० कोटी वर्षात प्रकाश किती अंतर जातो असा प्रश्न तुम्ही विचाराल तर लोक काहीही म्हणोत, जाणकार मात्र तुम्ही मूळ मुद्दा सोडून भरकटता आहात असे म्हणतील. आणि अचूकतेच्या आग्रहाला शास्त्रीय शब्दप्रामाण्यवाद किंवा कर्मठ बाह्मण्य म्हणायचे तर विज्ञानाचे सारे क्षेत्रच कर्मठ बाह्मण्यग्रस्त आहे. मग मीच अपवाद कसा असणार? त्यामुळे अचूकतेचा आग्रह विज्ञानाचा आहे, केवळ माझा नव्हे एवढेच म्हणून मी माझ्यापुरती ही भरकटणारी चर्चा थांबवतो.
    Reply
    1. D
     didshahana
     Jul 18, 2017 at 1:38 am
     गणेशप्रसाद देशपांडे, एकाच्या पुढे एकहजार शून्ये लावली तर किती मोठी संख्या (फिगर) होते? ते सांगण्याचे जर एकक आपल्याकडे नसेल तर अश्यावेळी ती संख्या (फिगर) सांगण्यासाठी अंतराचे एकक संपादकांनी वापरून विषय वाचकांसाठी अधिक सोप्पा केला असेल तर तिथे कर्मठ ब्रह्माणांसारखा शास्त्रीय शब्दप्रामाण्यवाद आणून मूळ विषयाला अभद्र स्वरूप देण्याचे काही कारण आहे का? सरस्वतीचा जन्म किती वर्षांपूर्वी झाला ते आता तुम्हीच सांगा. ४५० कोटी गुणिले प्रकाश एका वर्षात किती किलोमीटर जातो ती संख्या (फिगर) याचे उत्तर जी कोणती संख्या होते ती किती ते समस्त वाचकांना सांगा आणि संपादक हे मूर्ख आहेत हे सिद्ध करा आणि तुम्हाला त्या संख्येसाठी कोणते एकक वापरायचे हे सुचत नसेल तर निदान आता तरी संपादकांना या बाबतीत दोष देऊ नका. अन्यथा लोक म्हणतील "गिरे तो भी टांग उप्पर". धन्यवाद सर.
     Reply
     1. S
      suraj
      Jul 17, 2017 at 3:16 pm
      हा खुपच छान प्रयत्न आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला तर 450कोटी प्रकाश वर्ष दूर असलेली ही दीर्घीका आता सध्या अस्तित्वात आहे की नाही हे सांगू शकत नाही
      Reply
      1. G
       Ganeshprasad Deshpande
       Jul 17, 2017 at 10:57 am
       श्री. दीडशहाणा, तुमच्या ‘...४५० कोटी प्रकाशवर्षे असू शकत नाहीत काय?’ या प्रश्नाचे उत्तर ‘असू शकतात’ असे आहे. पण ते अंतराचे वर्णन म्हणून असू शकतात, काळ मोजण्यात असू शकत नाहीत. काळ वर्षातच मोजला पाहिजे- प्रकाशवर्षांत नाही. नाहीतर आईनस्टाईनने शक्ती आणि वस्तुमानाच्या रूपांतराचे सूत्र दिल्यानंतर वजन मोजण्यासाठी अर्ग हे एकक वापरायलाही हरकत नाही. असे होऊ शकत नाही. विज्ञानातली अचूकता वैज्ञानिक नियमांनी ठरते. तुम्ही म्हणता तसा '...सरस्वतीच्या जन्माला ४५० प्रकाशवर्षे होऊन गेली' असा उल्लेख विज्ञानाच्या कोणत्याही लिखाणात सापडू शकत नाही. ा संपादकांना शिव्या घालायची काहीही गरज नाही. (त्यांच्या सोमवारच्या म्हणजे आजच्या अग्रलेखात आक्षेप घ्यावा असे काहीही नाही.) अचूकतेचा आग्रह मात्र सर्वांसाठीच धरायचा आहे. प्रतिक्रिया देण्यापूर्वी आपली माहिती विज्ञानाच्या आधारे तपासून घ्यावी, अडाणी तर्कशास्त्राच्या आधारे नाही. अडाणी अग्रलेखांच्या आधारे तर नाहीच नाही. वैंज्ञानिक अचूकतेचे मापदंड विज्ञान ठरवते, तुम्ही, मी किंवा गिरीश कुबेर नव्हे याचे भान असणे बरे पडेल. आभारी आहे.
       Reply
       1. G
        Ganesh
        Jul 17, 2017 at 4:10 am
        This doesn't even mention the name of the scientists or the work they have done till now. The image shown here is just a single galaxy and the scientists have found super-cluster i.e. millions of such galaxies separated by vast difference from each other but still considered as a one group. Read the attached article from Phys - s: phys /news/2017-07-massive-large-scale-universe This article shows the right picture and detail description which was published on July 14.
        Reply
        1. A
         arun
         Jul 16, 2017 at 7:06 am
         बुद्धिमान माणसाचं विश्वाचं रहस्य उकलण्याचा प्रयत्न आदिकालापासून चालूच आहेत. सूर्याला उगवताना, नीर ऋतूला जाणणारा, दिशांचा शोध लावणाऱ्या आदिमानवापासून सुरु झालेला हा पिढ्यान पिढ्यांचा प्रवास आता हा सरस्वतीचा शोध लावण्यापर्यंत पुढे गेला आहे. आणि हे आकलनाला अवघड असं संशोधन करताना हे निर्माण करणारा कुणीतरी अपौरुषेय आहे हे बुद्धीमंतांनाही जाणवलं, तेव्हा त्या त्या शक्तीला एक " विश्वकर्मा " ही संज्ञा त्यांनीच देऊन ठेवली.
         Reply
         1. D
          didshahana
          Jul 15, 2017 at 9:48 pm
          गणेशप्रसाद देशपांडे, प्रकाश एका वर्षात किती अंतर जातो त्याला 1 प्रकाशवर्षे असे म्हणतात ना? मग अशी ४५० कोटी प्रकाशवर्षे असू शकत नाहीत काय? म्हणजे सरस्वतीच्या जन्माला इतका महाप्रचंड कालावधी होऊन गेला आहे असा त्याचा अर्थ होत नाही का? ४५० कोटी प्रकाशवर्षात प्रकाश किती अंतर गेला "इतक्या" वर्षांपूर्वी सरस्वतीचा जन्म झाला असा त्याचा अर्थ आहे. ४५० कोटी वर्षे हा आकडा तुम्हाला समजतो म्हणून तो बरोबर आणि संपादकांना तुम्हाला शिव्या घालायच्या आहेत म्हणून त्यांनी ४५० कोटी प्रकाशवर्षे हा जो आकडा वापरला तो चुकीचा, हे कोणते ज्ञान? त्यामुळे संपादकांना काही शिकवायला जाण्यापूर्वी आपली माहिती आणि आपले शब्द अचूक आहेत याची कुणा तरी शहाण्याला विचारून खात्री करून घेत जा. धन्यवाद सर.
          Reply
          1. S
           SB
           Jul 15, 2017 at 5:23 pm
           कुबेरांनी त्यांच्या '"टाटायन या पुस्तकात टाटांनी केलेली संपत्तीनिर्मती म्हणजे लक्ष्मी-'सरस्वती'चा संगम"' असे उल्लेख अलंकारीत केलेला आहे.
           Reply
           1. H
            hemant
            Jul 15, 2017 at 5:03 pm
            Ganeshprasad deshpande - evhade ragawayache kaahich kaaran naahiy. Sampadak sahebaanchya mhananyacha artha aapalyach lakshat aalela naahiy asech watate.
            Reply
            1. M
             makarand
             Jul 15, 2017 at 2:34 pm
             मी विज्ञान वादी आहे, धर्म वादी नाही हे आधीच नमूद करतो. आपल्या कडे आजही आपले आई वडील आपल्याला अमुक दिवस चांगला, तमुक दिवस वाईट असा सांगतात. असा का? असा प्रश्न विचारला तर उत्तर एकाच, "आम्ही कधी विचारला नाही, आम्हाला माहित नाही, तुम्ही सुद्धा विचारू नका, सांगितलं तेवढा करा". काही प्रश्न ा पण पडतात. १) गुरुत्व बल म्हणजे नेमका काय? ते कसा कार्य करतं? २) चंद्रा चा गुरुत्वा मुले समुद्रा ला भरती ओहोटी कशी येते? आणि ते गुरुत्व आपल्या वर कसाकाय परिणाम करत नाही, ३) सूर्य चा गुरुत्वात ग्रह आहेत. गुरु ग्रह मुले सूर्य पृथ्वी ला आपल्या कडे ओढू नाही शकत असे मी कोठे तरी वाचले किंवा ऐकले होते. पण जर सूर्य पृथ्वी आणि गुरु एका सरळ रेषेत असतील तरच हे होऊ शकता. पण हे सदा सर्वकाळ कसा शक्य आहे. हे काही प्रश्न ा पडतात. कोणाकडे ह्या विषयी माहिती असेल तर कृपा करून सांगावे.
             Reply
             1. H
              Hemant Kadre
              Jul 15, 2017 at 1:05 pm
              वेद, उपनिषीदे यातील नमुद विज्ञानावर आपल्याकडे पाहिजे तसे संशोधन झाले नाही. इंग्रजांनी हेतुत: नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक याकडे दूर्लक्ष्य केले. माझ्या माहितीप्रमाणे जर्मनी देशात 'अस्त्र' या विषयाबाबत मागील अनेक वर्षांपासुन संशोधन सुरू आहे. मंत्र उच्चारणाने शक्ती कशी निर्माण होते हा याचा गाभा आहे. जे 'अस्त्र' भारताचा ठेवा आहेत त्यावर आपल्या सरकारने अजुनही संशोधन करण्याचा विचार केलेला नाही. लोकसत्ता संपादक दिल्लीच्या चिनी दूतवासात न डोकावता थेट व्हाइट हाउसमध्ये मुक्कामी होते पण आता पृथ्वीपासून सुमारे चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहापर्यंत पोहचले आहेत आणि या प्रवासात त्यांना मोदी दिसले नाहीत हे छान झाले.
              Reply
              1. R
               ravindrak
               Jul 15, 2017 at 11:35 am
               बाकीचे सारे आपापल्या विश्वात खुडूकखूश असतात.(पप्पू, एका गावाचा जाणता राजा वगैरे). ‘परम आकाशातून हे सारे पाहणारा जो आहे. तो हे सारे जाणतोच.’ पण मग त्या ऋषींनाही प्रश्न पडतो. ‘खरेच का तो हे जाणतो, की त्यालाही हे माहीत नाही?’ ही खरी विज्ञाननिष्ठा. ( ती हिंदूंमध्ये आहेच म्हणून प्रगती झाली,होते आहे, दुसऱ्या धर्मावर अत्याचार करणारा हा धर्म नव्हता आणि नाही !!! आता तरी ढोंगी धर्मनिरपेक्ष वाल्यानी सुधरा ???)
               Reply
               1. G
                Ganeshprasad Deshpande
                Jul 15, 2017 at 10:57 am
                माफ करा संपादकसाहेब. दुसऱ्यांदा लिहायला बसलो ते पुन्हा एक महान घोडचूक तुमच्या लिखाणात सापडली म्हणून. सर, '....आता जी दिसत आहे ती सरस्वती आहे सुमार चारशे कोटी प्रकाशवर्षांपूर्वीची' हे वाक्य हा शास्त्रीय मूर्खपणाचा नमुनाच आहे. प्रकाशवर्षे हे काळ मोजण्याचे नव्हे तर अंतर मोजण्याचे एकक आहे. एका वर्षात प्रकाश जितके अंतर जातो तितक्या अंतराला प्रकाशवर्ष म्हणतात. बरोबर वाक्य असे झाले असते- '... आता जी दिसत आहे ती सरस्वती आहे सुमार चारशे कोटी वर्षांपूर्वीची.' पुन्हा एकदा विनंती करतो सर. आपल्या समाजात अडाणीपणा आधीच खूप आहे. त्यामुळे जनतेला काही शिकवायला जाण्यापूर्वी आपली माहिती आणि आपले शब्द अचूक आहेत याची कुणा तरी शहाण्याला विचारून खात्री करून घेत जा. धन्यवाद सर.
                Reply
                1. G
                 Ganeshprasad Deshpande
                 Jul 15, 2017 at 10:44 am
                 वा वा, आज फार दिवसांनी ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात भाष्य करणारे गिरीश कुबेर भेटले. सर, '...सद्गुरूच्या पुढे जायचे नसते' हा नियम तुम्हाला कुठून समजला? विवेकानंद नाही का गुरूंच्या पुढे गेले? गुरूबद्दल श्रद्धा-भक्ती सोडायची नसते हा नियम आहे आणि तो एक तात्विक नियम आहे. इथे पुरेशी जागा असती तर अध्यात्मिक 'निगोशिएबल इंस्ट्रुमेंट्स' कायद्याबद्दल काही सांगता आले असते. आणि ज्ञानाला अध्यात्माचा विरोध असता तर ज्ञानदेवांचा 'ज्ञानियांचा राजा' असा गौरव झालाच नसता. असो. अध्यात्मात श्रद्धा हा ज्ञानाचा मार्ग नाही. ज्ञानानंतर येणारी सज्ञान श्रद्धा हा मोक्षाचा मार्ग आहे. जिज्ञासा आणि प्रश्न यांना विरोध कधीच नव्हता आणि नाही. माझे तेच बरोबर अशा अहंकारातून बंद मनाने येणाऱ्या प्रश्नांचा उपयोग नाही असा मुद्दा आहे. तुम्ही संपूर्ण अध्यात्म क्षेत्रालाच अडाणी ठरवू पाहताय. यात अस्सल अडाणी आज आपल्याला जितके कळले आहे ते आणि तितकेच संपूर्ण ज्ञान आहे असे मानणारे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक आहेत का आध्यत्मिक आहेत याचा निर्णय भविष्यात लागेलच. बऱ्याच दिवसानंतरच्या भेटीबद्दल मात्र आभार. कसे आहात सर?
                 Reply
                 1. R
                  Raj
                  Jul 15, 2017 at 5:20 am
                  "प्रश्न पडणे आणि विचारणे हे माणसातील जिवंतपणाचे लक्षण. पण प्रश्न असा आहे, की प्रश्न विचारणारी माणसे हवी आहेत का आपल्याला?" ग्रेट !
                  Reply
                  1. Load More Comments