ब्रिटनने अग्निशमन आदी सेवांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद कमी केल्याने झालेले दुष्परिणाम लंडनमधील अग्नितांडवाने समोर आले..

एके काळच्या एकमेव महासत्तेचे केंद्र असलेल्या लंडन शहराची कीवच यावी अशी परिस्थिती. राजकीय अस्थिरता, आर्थिक अस्थर्य, ब्रेग्झिटचे भूत, स्थलांतरितांचा न आवरणारा लोंढा आणि या सगळ्यास सामोरे जायचा वकूब नसलेले नेतृत्व. लंडनची ही अशी परिस्थिती आहे. ताज्या आगीच्या घटनेने ती उठून दिसली. इमारतीस आग लागली याचे दु:ख जातिवंत लंडनकरांस नसेल. पण त्याची ही वेदना नक्कीच असेल की आपले शहर या प्रसंगी एखाद्या तिसऱ्या जगातील शहरासारखे दिसले. जगभरातील लंडनप्रेमींचीही नेमकी हीच भावना आहे. भीषण आगींचा राखरांगोळी इतिहास भाळावर वागवीतच लंडन आजपर्यंत जगत आले आहे.

या शहराने भोगलेली एक आग तर ‘ग्रेट फायर ऑफ लंडन’ अशीच ओळखली जाते. ही आग १६६६ सालातील. सारे शहर पटकीच्या आजाराने ग्रासलेले असताना तेव्हाचा राजा दुसरा चार्ल्स त्या आधीच्या वर्षांत लंडन सोडून निघून गेला होता. आपल्या राजधानीला असा संकटकाळी वाऱ्यावर सोडणारा राजा हा लंडनवासीयांच्या टीकेचा विषय बनला नसता तरच नवल. वर्षभरानंतर तो परत आला आणि ही आग लागली. राजघराण्यासाठी विशेष पाव बनवणाऱ्या थॉमस फेर्नर याच्या भटारखान्यात २ सप्टेंबरच्या रविवारी मध्यरात्री पहिल्यांदा ही ठिणगी पडली. दुसऱ्या दिवशीच्या आपल्या पावनिर्मितीची तयारी करून थॉमस रात्री घरी गेला. जाताना नेहमीप्रमाणे आपण सर्व चुली विझवल्या असेच त्यास वाटले. परंतु त्यातील एक जिवंत होती आणि तिनेच घात केला. रात्री एकच्या सुमारास या न विझलेल्या चुलीतील ठिणगीने आपले काम केले आणि बघता बघता थॉमसचा सारा भटारखाना आणि आसपासच्या दुकानांना आगी लागल्या. थॉमस आणि त्याची पत्नी या आगीतून वाचले. परंतु त्याच्याकडच्या नोकरांचा तीत बळी गेला. त्या वेळी घरे लाकडाची असत आणि ती एकमेकांना खेटूनच उभारली जात. त्यात त्या वर्षीचा शुष्क उन्हाळा. त्यामुळे लंडन असेही कोरडे ठक्कआणि भकास भासत होते. त्यामुळे ते बघता बघता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. लंडनमधील साधारण १४ हजार घरांची आणि ८७ चर्चेस यांची राख झाली. परिस्थिती इतकी भीषण की खुद्द राजा दुसरा चार्ल्स आगीतून वाचलेल्यांना मदत करण्यास रस्त्यावर उतरला. त्याचे पटकीचे पाप या कृत्याने धुतले गेले तरी लंडनची सुटका मात्र इतक्या सहजपणे होणारी नव्हती. तब्बल चार दिवस लंडन धुमसत होते. किती जीवितहानी झाली याचा तपशील उपलब्ध नाही. पण लंडन शहरावरून त्या वेळी गाढवाचा नांगर फिरला इतके मात्र खरे. त्या वेळी नौदलात कारकून असलेल्या सॅम्युएल पेपेज याने या आगीची दैनंदिनी लिहून ठेवलेली आहे. तीवरून या आगीच्या आवाक्याचा अंदाज येतो. त्या वेळी आधुनिक अग्निशमन यंत्रणेच्या जवळपास जाईल अशी काही सोय नव्हती. एकच उपाय. आग लागलेली इमारत पाडायची आणि इतरांपासून तोडायची. या मार्गाने संपूर्ण लंडन शहर जवळपास उद्ध्वस्त आणि बेचिराख झाले. या आगीने दोन गोष्टी साध्य झाल्या. लंडन शहराची संपूर्ण नव्याने उभारणी आणि स्वतंत्र व्यवस्थेची निर्मिती. ही स्वतंत्र व्यवस्था म्हणजे अग्निशमन यंत्रणा. स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेच्या जन्मास ही ग्रेट फायर ऑफ लंडन कारणीभूत ठरली. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धात पुन्हा एकदा लंडनला आगीच्या ज्वाळांनी बेचिराख केले. त्याही वेळी भुईसपाट झालेले हे महानगर राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेते झाले.

परंतु लंडनच्या ताज्या आगीने या भरारीच्या मर्यादाच दाखवून दिल्या. आग विझून २४ तास होऊन गेले असले तरी या आगीत नक्की किती बळी गेले याचादेखील अंदाज अग्निशमन यंत्रणेस अद्याप आलेला नसून कोळसा झालेल्या या इमारतीत अजूनही कोणी आहे किंवा काय, याचाही तपास पूर्ण होऊ शकलेला नाही. ही इमारत २६ मजली होती आणि दुसऱ्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत तिचे २४ मजले आगीत धडधडत होते. आगीचा इशारा मिळाल्यानंतर सहा मिनिटांच्या आत पहिला बंब तिथे पोहोचला. त्यानंतर पाठोपाठ आणखी ३९ बंब आग शमवण्याच्या प्रयत्नात होते. या सगळ्या आधुनिक यंत्रसामग्रीच्या जोडीला २००हून अधिक अग्निशमन कर्मचारी आगीशी झुंजत होते. या कर्मचाऱ्यांची अशा प्रसंगातील कामाची पाळी चार तासांची असते. परंतु हे सर्वच्या सर्व १२ तास होऊन गेले तरी घटनास्थळीच होते. आग विझल्यानंतर या सगळ्यांची प्रतिक्रिया एकच होती. ‘आयुष्यात कधी आतापर्यंत अशी आग पाहिली नाही आणि परत पाहायलाही लागू नये, एका आयुष्यात अशा दोन दोन आगींना भिडणे झेपणारे नाही.’ ही झाली मानवी शौर्यकथा. परंतु या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नास आता तोंड फुटू लागले आहे. तो प्रश्न आहे अग्निशमन आदी सेवांसाठी कमी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूद. अगदी अलीकडे लंडन ब्रिज परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लंडनच्या पोलीस प्रमुखांनीही हीच चिंता व्यक्त केली होती. आता अपुऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत अग्निशमन दलानेही काळजी व्यक्त केल्याने या प्रश्नाचे गांभीर्य समोर येते.

परंतु ही थोडय़ाफार प्रमाणात साऱ्याच युरोपीय शहरांची कथा आहे. गतसाली जर्मनीतील बर्लिन शहरात वर्षअखेरच्या जलशात स्थानिक महिलांशी मोठय़ा प्रमाणावर गरवर्तन घडले. त्या वेळी बर्लिनच्या महापौराने पोलिसांसाठी अधिक तरतुदीची गरज व्यक्त केली. या गरवर्तनामागे जर्मनीत मोठय़ा प्रमाणावर आलेले स्थलांतरित होते. त्यात पलीकडील सीरियातील परिस्थिती लक्षात घेता ही स्थलांतरितांची समस्या काही मिटणारी नाही. अशा वातावरणात पोलिसांसाठी अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करायला हवी, अशी मागणी तेथेही केली गेली. जे जर्मनीत झाले तेच ब्रिटनमध्ये. स्थलांतरितांचा प्रश्न हा हा म्हणता उभा राहिला आणि त्यावर ब्रिटनवर ब्रेग्झिट संकटास सामोरे जाण्याची वेळ आली. ब्रिटिश नागरिकांना देशात नोकऱ्या नाहीत आणि पोलंड आदी देशांतून आलेल्यांना आम्हाला सामावून घ्यावे लागते, तेव्हा युरोपीय संघात राहणे ही फायद्यापेक्षा डोकेदुखीच आहे असा पवित्रा घेणारे राजकीय वारे ब्रिटनमध्ये मोठय़ा जोमाने वाहिले. परिणामी गेल्या वर्षी जून महिन्यात ब्रिटिश जनतेने ब्रेग्झिटच्या बाजूने कौल दिला. परंतु पंचाईत अशी की हे ब्रेग्झिट जरी करावयाचे तरी त्याची किंमत ब्रिटनला द्यावी लागेल. युरोपीय संघास नुकसानभरपाई दिल्याखेरीज ब्रिटनची काडीमोडाची इच्छा पूर्ण होणार नाही. भरपाई द्यायची म्हणजे आला अतिरिक्त आर्थिक ताण. तो सोसण्याची तयारीच मुदलात त्या देशात आता राहिलेली नाही. आणि हे कमी म्हणून की काय गतसप्ताहातील मध्यावधी निवडणुकांत थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाला आपले बहुमत गमवावे लागले. त्याहीपेक्षा काळजी वाढवणारी बाब म्हणजे अर्थव्यवस्थेला मागे नेऊ पाहणाऱ्या मजूर पक्षाचे मताधिक्य या निवडणुकीत वाढले.

आज संपूर्ण युरोपीय महासंघात ही परिस्थिती आहे. पोर्तुगाल, ग्रीस, स्पेन आदी अनेक देशांत आर्थिक आघाडीवर स्वस्थता नाही. जर्मनीत निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय उलथापालथ जोमात असून त्या होऊन गेल्यानंतर फ्रान्सदेखील शांततेच्या प्रतीक्षेत आहे. ऑस्ट्रिया, नेदरलॅण्ड्स आदी देशांत प्रतिगामी शक्तीचा जोर वाढू लागला असून त्यामुळे राजकीय वातावरणही तापलेलेच आहे. लंडनमध्ये इमारतीस आग लागली. पण ती द्योतक आहे युरोपच्याच अवस्थेची. या आगीची काजळी लंडनला जशी लवकरात लवकर दूर करावी लागेल त्याचप्रमाणे युरोपलाही आपली ‘राजकीय’ अग्निशमन यंत्रणा उभारावी लागेल. नपेक्षा युरोपचा प्रवास आता आहे तसाच आगीकडून आगीकडे चालू राहील.