महाश्वेता देवी यांनी वंचितांच्या व्यथा आपल्या साहित्यातून मुखर करताना प्रत्यक्ष व्यवहारातही या वर्गाला कृतिशील आधार दिला.. महाश्वेता देवींचे वैशिष्टय़ हे की त्यांच्या लिखाणातील सर्जनशीलता कधीही हरवल्याचे दिसत नाही. कलेतील अमूर्तत्व, वास्तवातीतता अशा शाळांची पटसंख्या वाढत असलेल्या काळात आधुनिक वास्तवाची लोककथा त्या सांगत होत्या.

शब्द कोठून येतात हे महाश्वेता देवींसाठी एक कोडे होते. पददलितांच्या, शोषितांच्या संस्कृतीला त्यांनी आवाज दिला असे म्हटले जाते. पण हा दावा किती खरा नि किती खोटा, किती मोठा नि किती छोटा हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता. आपण जेवढा विचार करू, जेवढे लिहू तेवढे एका व्याख्येवर येणे अधिकाधिक अवघड होत जाते ही त्यांची वेदना होती. आणि लोकांना ‘पाहण्याचे’ डोळेच नाहीत हा त्यांच्या मनातील सल होता. आपले संपूर्ण आयुष्य लहान लहान माणसांना आणि त्यांच्या तेवढय़ाच छोटय़ाछोटय़ा स्वप्नांना पाहण्यात वेचणारी ही कार्यकर्ती लेखिका. बुधवारी आपली सगळी कोडी, प्रश्न, सल आणि वेदना घेऊन त्यांनी डोळे मिटले. त्या निवर्तल्या तेव्हा कोलकात्यातील त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे म्हणाली, सुटल्या. ही स्वाभाविक प्रतिक्रिया असली, तरी खऱ्या अर्थाने त्या सुटल्या हेही खरे आहे. जनसामान्यांचा प्रत्येक संघर्ष म्हणजे दहशतवाद आणि अन्यायाविरुद्धचा हरेक हुंकार म्हणजे देशद्रोह असे द्वेषमूलक विचार सबंध आसमंतात भोपाळवायूप्रमाणे भरलेले असताना त्यात महाश्वेता देवींचा जीव गुदमरतच राहिला असता. वातावरणात पाझरत असलेला फॅसिझम त्या अनुभवत होत्या. ते पाहून चिडत होत्या. लाल हा त्यांचा आवडता रंग. परंतु त्यालाही फॅसिस्ट बुझ्र्वाई चढत चालल्याचे पाहून त्या तेव्हा विरोधात असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या मागे ठाम उभ्या राहिल्या होत्या. ममतांवर त्यांचे मुलीप्रमाणे प्रेम. पण पुढे त्याच ममतांच्या सरकारवरही फॅसिस्ट म्हणून टीका करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. अशी टीका हल्ली गांभीर्याने घेण्याची पद्धत नाही. महाश्वेता देवी यांच्या शब्दाने मात्र ममतांसारखी लढवय्यी स्त्रीही घायाळ झाली होती. याचे कारण त्या शब्दांना सत्ताकारणाचा दरुगध नव्हता. त्यात निखळ राजकारण होते. स्वातंत्र्य, न्याय यांबरोबरच समाजातील उपेक्षितांप्रतिचा पक्षपात होता. हे राजकारण हा महाश्वेता देवी यांच्या सामाजिक संघर्षांचा आणि लेखनाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. साहित्य प्रांतात कला आणि जीवन यांच्या नात्याचा वाद नुकताच कुठे मूळ धरू लागलेला असतानाच्या काळात महाश्वेता देवी संघर्षांसाठी साहित्य असा ध्वज घेऊन लिहित्या झाल्या होत्या. त्यांचे साहित्य हा त्यांच्या सामाजिक चळवळीचाच भाग होता. किंबहुना लिहिणे ही त्यांची चळवळच होती. ते त्यांचे राजकारण होते.

swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

हा कदाचित त्या काळाचाही प्रभाव असेल. फाळणीतून निर्माण झालेल्या प. बंगालमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते. वातावरणातील राष्ट्रवादाचा जल्लोष होता. पण रित्या पोटांतील कावकाव कोणत्याही घोषणेहून मोठीच असते. पुढे चीन युद्धातील पराभवाने त्या सर्व घोषणाही मलूल पडल्या. राज्यातील भूमिहीन शेतमजूर, आदिवासी यांच्यात असंतोष खदखदत होता. काँग्रेसच्या समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्थेहून प्रभावी उपाय लोकांना हवा होता. साम्यवादाचा मार्ग प. बंगालमधील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना खुणावू लागला होता. त्यांच्या डोळ्यांत स्वप्नांचे इमले होते आणि जुन्या गढय़ा नामशेष केल्याशिवाय ते उभे राहणार नव्हते. महाश्वेता देवी यांचे संवेदनशील मन या वातावरणापासून दूर राहणे अशक्य होते. टागोरांच्या शांतिनिकेतनमधले शिक्षण, कलकत्ता विद्यापीठाची इंग्रजी साहित्यातील एमएची पदवी आणि पती बिजॉन भट्टाचार्य हे ‘इप्टा’चे एक संस्थापक असल्याने घरातच असलेले क्रांतिकारी नाटकांचे वातावरण यातून घडलेले त्यांचे मन समाजातील उलथापालथ टिपत होते. पुढे १९६४ पासून महाविद्यालयात शिक्षिका म्हणून काम करताना त्या पत्रकारिताही करू लागल्या. हा सगळा घडण्याचा काळ होता. या पूर्वी १९५६ मध्ये त्यांनी झांशीच्या राणीचे चरित्र लिहिले होते. समांतर इतिहासकथनाचा तो प्रयोग होता. पुढेही त्यांच्या सगळ्या कथांतून, कादंबऱ्यांतून असाच समांतर इतिहास येताना दिसतो. तो अर्थातच उपेक्षितांचा, शोषितांचा, आदिवासींचा. खरा इतिहास हा सर्वसामान्य लोकांमधूनच येतो हा जसा त्यांचा विश्वास होता, त्याचप्रमाणे या सामान्य माणसांमध्ये इतिहास घडविण्याची ताकद असते हेही त्या जाणून होत्या. या जाणिवेचे श्रेय त्यांच्यातील पत्रकाराला द्यावे लागेल. १९६७ मध्ये प. बंगालमधल्या नक्षलबारी या खेडय़ातून शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन उभे राहिले. पाहता पाहता ते राज्यभर पसरले. १९७१च्या भारत-पाक युद्धातील विजयानंतर निर्माण झालेल्या राष्ट्रवादी लाटेत ते चिरडून टाकणे सरकारला सोपे गेले हा भाग वेगळा, पण त्या आंदोलनाने निर्माण केलेल्या विचारांचे प्रतिध्वनी महाश्वेता  देवी यांच्या साहित्यातून अखेपर्यंत उमटत राहिले. त्यांची एक गाजलेली कादंबरी ‘हजार चुराशीर माँ’ – नं. १०८४ची आई – ही या नक्षलवादी चळवळीसंदर्भातील मध्यमवर्गीय धारणांचाच जनेतिहास मांडते. कोणतीही हिंसा ही अखेर फॅसिस्टच असते आणि म्हणूनच नक्षलवादी हिंसेलाही त्यांचा विरोध होता. असे असले तरी ती हिंसा जेथून येते त्या कारणांबाबत त्यांना अपार सहवेदना होती. आदिवासी आणि महिला या समाजातील ‘ताडन के अधिकारी’ असलेल्या वर्गाच्या हक्क आणि अधिकारांसाठीचा संघर्ष नक्षलवादी विचारांतील हिंसा वगळून त्या धारेचा सहानुभूतीदारच असतो.

या दृष्टीने महाश्वेता देवी यांनी तीन वर्षांपूर्वी जयपूरमधील साहित्योत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात केलेला सवाल पाहण्यासारखा आहे. जंगलांतून उखडलेली माणसे जाणार कुठे, असा त्यांचा प्रश्न होता. त्यात आणि चंद्रपूर, छत्तीसगढपासून बिहार, ओदिशापर्यंतच्या जनआंदोलनांच्या सवालात कोणता गुणात्मक फरक होता? त्या सवालामागे सामान्य माणसांच्या सामान्य स्वप्नांची काळजी होती. त्या म्हणाल्या होत्या, या नक्षलवाद्यांसारख्या सामान्य माणसांचा गुन्हा एकच आहे. स्वप्न पाहण्याच्या औद्धत्याचा. आदिवासी, महिला यांच्या स्वप्न पाहण्याच्या अधिकारावर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात त्या आपल्या साहित्यातून, पत्रकारितेतून लढत होत्या. त्यांच्यात जाऊन त्यांचे जगणे पाहात होत्या. सत्तेचे बांधकाम निरखत होत्या. शोषकांची व्यवस्था जाणून घेत होत्या. ते सारे शब्दबद्ध करीत होत्या. अशा लेखनाला वृत्तपत्रीय रिपोर्ताजची कळा सहजच येऊ  शकते. महाश्वेता देवींचे वैशिष्टय़ हे की त्यांच्या लिखाणातील सर्जनशीलता कधीही हरवल्याचे दिसत नाही. कलेतील अमूर्तत्व, वास्तवातीतता अशा शाळांची पटसंख्या वाढत असलेल्या काळात आधुनिक वास्तवाची लोककथा त्या सांगत होत्या. त्यांच्या ‘द्रौपदी’ या कथेतील आदिवासी दोपडी ही तिसऱ्या जगातील आदिवासी महिला. तिला माओवादी समजून पोलीस पकडतात आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करतात. ती कोणत्या श्रीकृष्णाला साद देणार? ती स्वत:च उठते. चवताळून. नग्न. आणि त्या बलात्काऱ्यांना आव्हान देते, या माझ्यावर पुन्हा बलात्कार करा. तेव्हा शरमून काळेठिक्कर पडलेले ते बलात्कारी ही वसाहतवादी मानसिकतेची प्रतीके बनतात आणि दोपडी हे स्त्रीशरीर उरत नाही. ते सामान्यांच्या, आदिवासींच्या, महिलांच्या संघर्षांचे मूर्त रूप बनते. महाभारत काळापासून अविरत चालत आलेल्या संघर्षांला ही कथा उजाळा देते. अशा प्रकारच्या अत्यंत शक्तिशाली कथनातून महाश्वेता देवी लोकांचे राजकारण मांडत होत्या. साहित्यिकांमध्ये दुर्मीळ असलेली ही गोष्ट. कलेला सामाजिक बांधिलकीचेच नव्हे, तर कोणतेही बंधन नको असे मानणाऱ्यांना हे न पटणारेच. ते खरेही असले तरी कधी कधी साहित्यिक नावाची जमात अशा काही विचार-सिद्धान्तांच्या आडून आपली भीरूता तर लपवीत नाहीत ना अशी शंकाही यातून निर्माण होत असते. बांधिलकी मानणारी कला प्रत्येक वेळी दुय्यमच नसते हे दाखवून देणाऱ्या महाश्वेता देवी यांच्या साहित्यामुळे ही शंका अधिक बळकट होते. अर्थात सर्व समाज बांधिलकीबद्ध कलेला दुय्यम मानत नाही हे महाश्वेता देवी यांना मिळालेल्या ज्ञानपीठपासूनच्या विविध साहित्यिक पुरस्कारांवरून सिद्ध झालेच आहे. अखेर साहित्याला काही ना काही प्रयोजन असावेच लागते. महाश्वेता देवी यांच्या साहित्याचे प्रयोजन मुख्य प्रवाहात गाडल्या गेलेल्या उपेक्षितांच्या आवाजाला कंठ देणे हे होते. त्यांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळवून देणे हे होते. त्यांच्या मते स्वप्ने पाहण्याचा अधिकार हा माणसाचा पहिला मूलभूत अधिकार असला पाहिजे. त्या सांगतात, त्यासाठी माझा झगडा आहे. ते माझे स्वप्न आहे. अशी शुभ्र स्वप्ने पाहणाऱ्या नि पेरणाऱ्या या कार्यकर्त्यां-लेखिकेला लोकसत्ता परिवाराकडून आदरांजली.