पाळीच्या पहिल्या दिवशी रजा हवी, याचा आग्रह धरणाऱ्या महिलांना हे लिंगभावसमानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे याचेही भान नसावे, हे विशेषच..

हल्लीच्या काळात आपल्या समाजाचा विचार करू जाता एक गोष्ट तर कोणाच्याही सहज लक्षात येईल. ते म्हणजे समाजाचे या किंवा त्या टोकावर असणे. त्याचा झोका सतत एका टोकावरच असतो. त्यात फरक एवढाच असतो की तो कधी पुढून वर असतो, तर कधी मागून वर व त्यास मधली स्थिती सहसा नसतेच. समाजाची अनेक अंगे असतात व त्यातील बहुतांश ठिकाणी आपणांस हेच पाहावयास मिळते. मागील काही वर्षांत आपला समाज अशाच प्रकारे पुढून वर जाऊन बसलेला होता व त्यास आपल्याकडे समाज पुढारला असे म्हटले जात होते. हे पुढारलेपण म्हणजे एक टोकच होते, परंतु त्याची नीटशी जाणीवच या पुढारलेल्या लोकांस नव्हती. त्यातून सामाजिक, राजकीय संस्कृतीची फारच ओढाताण होत असून, ज्यांना मिल्ल व हेगेल व शिमॉन डी बोवा व मार्क्‍स व रसेल व झालेच तर जे. कृष्णमूर्ती आदी मंडळी माहीतच नाहीत असा एक मोठाच्या मोठा समूह या टोकाकडे राग-अचंब्याने पाहात होता हे या टोकावरच्या लोकांच्या गावीही नव्हते. हा पुढून वर गेलेला झोका मागून वर नेण्याची थोर इच्छा त्यांच्या मनात साठली होती व ती आता पूर्ण झाली. समाजाचा काटा असा मागून उजव्या टोकास जाऊन स्थिरावण्याची ही स्थिती खरे तर आपल्याकडे स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या एक-दोन दशकांतच येऊ  शकली असती. परंतु तेव्हाची एकूणच दुष्काळ, युद्धे आदी धामधुमीची परिस्थिती, राष्ट्रबांधणीकरिताच्या आधुनिकीकरणाची वैचारिक मागणी आणि या पुढारलेल्यांचे पुढारपण करणारी सुळक्याएवढी उंच उंच माणसे यांच्यामुळे तो झोका एकाच टोकाला बराच काळ हेलकावत राहिला. आता मात्र तो मागून वरच्या टोकाला गेला आहे व हे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत घडलेले व घडत आहे. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या प्रामुख्याने ‘इन्स्टाग्रामी’ (किंवा इन्स्टा-गामी!) समाजात सुरू असलेला महिलांच्या पाळीरजेबाबतचा वाद.

तो वाद एका विशिष्ट तृतीयपर्णी वर्तुळातच सुरू आहे किंवा एका चलाख जनसंपर्क कंपनीने जनसंपर्काच्या आधुनिक साधनांचा खुबीने वापर करून ती चर्चा सुरू केली आहे व म्हणून त्यास फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असे मानणारा एक वर्ग आपल्याकडे आहे. माध्यमांच्या माध्यमातून समाजाची कळसूत्रे हलविणाऱ्या अदृश्य शक्तींबाबतच्या प्रगाढ अज्ञानातून अशा धारणा निर्माण होत असतात. हे अज्ञान केवळ तेवढय़ापुरतेच मर्यादित नसून, समाजाच्या वैचारिक चलनवलनाविषयीच्या अनभिज्ञतेचीही त्यास जोड आहे. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. कारण की आता पाळीरजा हा विषय समाजाच्या विविध स्तरांच्याही चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे. या चर्चेकडे आपणांस दोन प्रकारे पाहता येईल. एक म्हणजे यातून आता किमान पाळी या विषयाची उघड चर्चा तरी होत असून, ती एक चांगलीच बाब म्हणून त्याचे स्वागत करता येईल. भारतीय सनातनी मनांनी जे अनेक विषय उघड-चर्चा-वज्र्य मानले आहेत त्या यादीमध्ये लैंगिक क्रियेनंतर क्रमांक लावता येईल तो पाळीचाच. वस्तुत: स्त्रियांना मासिक पाळी येणे हा नैसर्गिक देहधर्म असून, त्यामध्ये लाजिरवाणे, लपविण्यासारखे काहीही नाही. किमान आठशे वर्षांपासून महाराष्ट्र देशी तरी असा विचार अस्तित्वात आहे. त्याचा पुरावा आपणांस चक्रधर स्वामींच्या एका वचनातून मिळतो. ‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’ हे त्या महात्म्याने त्या काळात सांगितले आहे. परंतु एकूणच स्त्रीस्वातंत्र्याबाबतचा आपला झोका मागून वर जाऊन बसलेला असल्यामुळे पाळी हा शब्दही आपण वापरातून बाद केला. त्याऐवजी आजही कावळा शिवणे, अंगावरून जाणे असे शब्दप्रयोग वापरले जातात व ही अत्यंत हिंस्र अशी भाषिक कृती असल्याची जाणीवसुद्धा आपणांस नसते. या कृतीच्या जोडीला मासिक पाळी आलेल्या महिलांना अस्पृश्यतेची वागणूक देऊन त्यांचे दमन करण्याची शारीरिक कृतीही आपल्याकडे सुरू असते. धर्माच्या काही धूर्त ठेकेदारांनी तर या विटाळाचेही विज्ञान तयार केले आहे. मासिक पाळीमुळे महिलांमध्ये रजोगुण वाढतो व म्हणून तिने देवपूजा करू नये असा काही भंपक गडबडगुंडा केला की भोळ्याभाबडय़ा सुशिक्षित बायकाही त्यापुढे शरण येतात हे त्यांनी चांगलेच जोखलेले आहे. परंतु अलीकडच्या काळात हे विटाळाचे कावळे उडवून लावणाऱ्या व्यक्तीही मोठय़ा प्रमाणात दिसतात. आजच्या तरुणी त्याबाबत खुलेपणाने बोलू लागल्या आहेत. ही स्त्रीच्या वैचारिक दास्यमुक्तीची एक खूण मानता येईल. परंतु हे बोलता बोलता एकदमच पाळीरजेबाबतची जी चर्चा सुरू झाली, ती पाहता यातही दुसरे टोक गाठण्याचा प्रयत्न होत आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पाळीच्या पहिल्या दिवशी रजा हवी असा कायदा व्हावा यासाठी काही महिला प्रयत्नशील आहेत. हे लिंगभावसमानतेच्या तत्त्वाच्या विरोधात तर नाही ना, अशी शंकाही त्यांच्या मनात येऊ  नये हे विशेषच. महिलांना समान हक्क हवे आहेत. वर्षांनुवर्षे त्यांच्यावर अन्याय झाला व त्यामुळे त्या मागे पडल्या. तेव्हा संधीची समानता मिळावी याकरिता त्यांना काही सवलती देणे आवश्यक आहे, याबाबत दुमत नाही. परंतु या सवलतींमुळे संधीची दारेच बंद होणार नाहीत ना याचाही विवेक बाळगायला हवा. पाळीरजेच्या मागणीत त्याचा लवलेशही दिसत नाही. सध्याच्या स्पर्धात्मक, कंत्राटीकरणाच्या काळामध्ये अशा मागण्यांमुळे स्त्रियांचे नोकऱ्यांतील आधीच कमी असलेले प्रमाण घसरणीस लागू शकते हे जसे खरे आहे, तसेच त्यामुळे समान काम, समान दाम या स्त्रीस्वातंत्र्यवादी मागणीविरोधातही वातावरण निर्माण होऊ  शकते हेही खरे आहे. तसे होऊ  नये ही सदिच्छा झाली. वास्तवात अशा सदिच्छांना तेव्हाच किंमत असते, जेव्हा त्या व्यवस्थेस अनुरूप असतात. या व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या मूलभूत प्रश्नांबाबत संवेदनाजागृतीची गरज असताना अशा मागण्या करणे म्हणजे टोकाला जाणे होय. पाळीरजेच्या मागणीत पुन्हा आणखी एक धोका आहे. तो म्हणजे यातून एक नव्याच प्रकारचा विटाळ जन्माला येऊ  शकतो किंवा आधीच्याच विटाळ कल्पनांना बळ मिळू शकते. बाई ही ‘वेगळी’च असते ही भावना कामाच्या ठिकाणी वाढू शकते. प्रत्येक बाबतीत टोकाचाच विचार करण्याची सवय असलेला समाज याबाबतीत मध्यममार्गी उदारमतवादी विचार करील असे कोणास वाटत असेल, तर मात्र त्या बावळटपणाला नमन करण्याखेरीज पर्याय नाही.

परंतु अशा बावळट कचखाऊ  विचारांतूनच समाजाचा काटा एका टोकाला जाऊन बसतो. ते टोक मागचे असो वा पुढचे, ते अंतिमत: व्यक्तीच्या स्वातंत्र्यास, विकासास मारकच ठरते. हे जसे आजच्या टोकावरच्या समाजाचे वर्तमान आहे, तसाच तो इतिहासाने दिलेला धडाही आहे. तो शिकायचा की नाही हे अर्थातच आपल्याला ठरवायचे आहे. समाजाचा गुरुत्वमध्य कायम राहावा असे वाटत असेल, तर ते केलेच पाहिजे. गरजेचे आहे ते. कारण टोकावर नेहमीच कडेलोटाची शक्यता असते.