गुंतवणुकीचा धबधबा जेव्हा जोमात होता तेव्हा नवउद्यमी कंपन्यांची घोडदौड सुरू होती; तो आता आटतो आहे.

नवउद्यमींतील अनेक नामांकित कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी या कंपन्यांतून गेल्या १२ महिन्यांत साधारण तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला. अशा वातावरणात माहिती तंत्रज्ञानाधारित क्षेत्राचा इतके दिवस मोठय़ा जोमात फडफडणारा झेंडा मान टाकेल अशी शक्यता व्यक्त केली जाते..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप इंडिया’चा नारा दिला असला आणि त्यायोगे अर्थव्यवस्था उभी राहून धावू लागल्याचा भास एका वर्गाला होत असला तरी परिस्थिती या दाव्यापासून किती दूर आहे, याची उदाहरणे एकामागोमाग एक समोर येऊ लागली असून या वास्तवाची दखल घेणे आवश्यक ठरते. एकापाठोपाठ धापा टाकणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, त्यांतून सुरू झालेली नोकरकपात आणि पुढील काही काळासाठी या क्षेत्राचा वेग अधिकच मंदावणार असल्याचे झालेले भाकीत यामुळे या वास्तवावरील काजळी अधिकच काळी होत असून त्यातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा भरवसा आणखी किती काळ धरायचा हा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात वास्तवदर्शनासाठी प्रसिद्ध झालेले काही वृत्तान्त आणि प्रसृत झालेली ताजी आकडेवारी यांचा आधार घ्यावा लागेल.

‘आस्क मी’ ही सेवा अलीकडच्या काळातील नवतंत्रज्ञान युगाचा आरंभ दर्शवणारी. ग्राहक आणि उद्योग वा विक्रेते यांना एका पातळीवर आणून त्यांची गाठ घालून देण्याचा अनोखा प्रयोग या सेवेने केला. तो अत्यंत यशस्वी ठरला. याचे कारण ज्याला जे हवे असेल ते कोठे आणि कोणाकडून मिळेल ही अत्यंत साधी, पण आवश्यक माहिती मिळणे यामुळे अत्यंत सुकर झाले. याचे आणखी एक कारण म्हणजे उद्योगांना बाजारपेठ आणि बाजारपेठेतील ग्राहकांस विक्रेते हे आपसूक मिळू लागले. परिणामी जशी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात वृद्धी झाली तशी आस्क मी सेवेच्या नफ्यातही ती झाली. ही सेवा ग्राहकांसाठी मोफत असली तरी उद्योजक वा उत्पादक यांना आपल्या मिळालेल्या व्यवसायातील काही वाटा ‘आस्क मी’स द्यावा लागत असे. त्यात तसे गैरही काही नाही. बाजारपेठेचे विस्तारीकरण आणि व्यवसायवृद्धी सहज होत असल्याने उत्पादक/ उद्योजक वर्गास त्याविषयी काही तक्रार असावयाचे कारण नव्हते. परंतु यातील महत्त्वाचा मुद्दा हा की ही संकल्पना जन्माला आली, वाढली आणि पसरली ती गुगलपूर्व काळात. गुगलच्या आगमनाने हे सर्व चित्रच बदलले आणि बाजारपेठेसाठी तर जो जे वांछिल तो ते लाहो, अशीच परिस्थिती निर्माण झाली. आस्क मी जे काही करीत होती ते सर्व गुगलच्या माध्यमातून बसल्या जागी, एक कपर्दिकही खर्च न करता सहज मिळू लागले. परिणामी आस्क मीसदृश सेवा कालबाह्य़ झाल्या. अशा परिस्थितीत या सेवांनी आपले अवतारकार्य आवरते घेतले असते वा आपल्यात मूलभूत बदल केले असते, तर त्यांची कालबाह्य़ता इतकी तीव्र गतीने झाली नसती. परंतु कालानुरूप बदलण्याचे चापल्य त्यांनी दाखवले नाही. परिणामी अशा सेवा देणाऱ्यांचा व्यवसाय पाहता पाहता लयाला गेला. आज परिस्थिती अशी की ही कंपनी आपल्या देणेकऱ्यांची देणी तर फेडू शकलेली नाहीच. पण आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याइतकीदेखील सक्षम राहिलेली नाही. म्हणजेच एके काळचा गाजलेला नवउद्योग पाहता पाहता लयाला गेला.

या पाश्र्वभूमीवर अशा नवउद्यमींसाठी भांडवली गुंतवणूक करणाऱ्यांच्या रकमांत झालेली कपात, या क्षेत्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा दर्शवते. या नवउद्यमींचा अननुभव लक्षात घेता त्यांना प्रसिद्ध, स्थापित बँका भांडवलपुरवठा करण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अशा संभाव्य उद्योगांच्या उत्पादनांतील नवता, उपयुक्तता आणि वाढण्याची क्षमता यांचा वेध घेत अनेक खासगी उद्योजक या नवउद्यमींना भांडवलपुरवठा करतात. अशा गुंतवणूकदारांचे वर्णन देवदूत गुंतवणूकदार (एंजल इन्व्हेस्टर) असे केले जाते. तर या गुंतवणूकदारांनी नवउद्यमींसाठी भांडवलपुरवठय़ात हात आखडता घेतला असून परिणामी आपले उद्योग व्यवहार्य ठेवण्यासाठी नोकरकपात हाच एक पर्याय या नवउद्यमींसमोर राहिलेला आहे. गतसाली सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत या देवदूत गुंतवणूकदारांनी नवउद्योगांत तब्बल २९१ कोटी डॉलर्स इतकी गुंतवणूक केली. त्यानंतरच्या तीन महिन्यांत, डिसेंबपर्यंत, ही गुंतवणूक १५२ कोटी डॉलर्स इतकी घसरली, मार्च २०१६ पर्यंतच्या तीन महिन्यांत ती १४० कोटी डॉलर्सवर आली तर यंदाच्या जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत या गुंतवणुकीची रक्कम फक्त ५८ कोटी डॉलर्स इतकीच झाली आहे. या गुंतवणुकीचा धबधबा जेव्हा जोमात होता तेव्हा नवउद्यमी कंपन्यांची घोडदौड सुरू होती. फ्लिपकार्ट, ओला, झोमॅटो, फूड पांडा अशा एकापेक्षा एक नवउद्योगांची हवा या काळात तयार झाली. तीत भले भलेदेखील वाहून गेले. इतके की या कंपन्या म्हणजेच उद्योग क्षेत्र असा यातील अनेकांचा समज झाला आणि तसा ते इतरांचाही व्हावा यासाठी प्रयत्न करू लागले. एकूण हा साराच काळ या नवउद्यमी कंपन्यांच्या जाहिरातबाजीने मदहोश होण्याचा होता. या काळात या उद्योगांचा खरा विस्तार होऊन महसूलधारा सुरू होणे आवश्यक होते. तसे झाले नाही. तरीही यांची जाहिरातबाजी सुरूच राहिली. आज ना उद्या आपणास नफा सुरू होईल, ही यामागील वेडी आशा.

पण ती आता फोल ठरताना दिसत असून नवउद्यमींतील अनेक नामांकित कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी या कंपन्यांतून गेल्या १२ महिन्यांत साधारण तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. उबर या मूळ अमेरिकी कंपनीचे अनुकरण करणाऱ्या ओला या अन्य कंपनीतून ७०० जणांच्या रोजगारावर गदा आली तर झोमॅटोने ३०० जणांना निरोप दिला तर फूड पांडातूनही ३०० जणांची गच्छंती झाली. त्यात युरोपातील ब्रेग्झिटने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासमोर आणखी अडचणी निर्माण केल्या. इन्फोसिससारख्या कंपनीचे मोठे कंत्राट ब्रिटनच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे हातातून गेले. परिणामी इतक्या मोठय़ा कंपनीलाही कर्मचारी कपात करावी लागली. अजूनही अनेक भारतीय कंपन्यांच्या व्यवसायसंधी ब्रेग्झिटमुळे हुकतील असा अंदाज आहे. यात लगेच बदल होण्याची चिन्हे नाहीत. त्यात देवदूत गुंतवणूकदारांनी अधिक भांडवलपुरवठा न करण्याचा घेतलेला निर्णय. अशा वातावरणात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा इतके दिवस मोठय़ा जोमात फडफडणारा झेंडा मान टाकेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. वास्तविक गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासूनच अशी लक्षणे दिसत होती. कारण या क्षेत्रातील रोजगार संधी याच काळात आकसू लागल्या. साधारण दर तिमाहीत सरासरी तीस हजार इतके रोजगार या क्षेत्रात निर्माण होत होते. म्हणजे महिन्याला दहा हजार इतके. परंतु आता हे प्रमाण निम्म्याने घसरले असून या काळात या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवहार विस्ताराची गती जवळजवळ शून्यावर येऊन ठेपली आहे. हे असेच सुरू राहिले आणि या भांडवलशून्यतेस अधिकाधिक यांत्रिकीकरणाची जोड मिळत राहिली तर पुढील पाच वर्षांत एकटय़ा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातून तब्बल ९४ हजार रोजगार कमी होतील असे भाकीत वर्तवले जाते.

अशा वेळी आर्थिक प्रगतीसाठी या क्षेत्रावर किती भिस्त ठेवावी असा प्रश्न तज्ज्ञांत चर्चिला जातो आणि तसे होणे रास्तच आहे. याचे कारण या क्षेत्रात प्रचंड प्रमाणावर यांत्रिकीकरण आणि स्वयंचलीकरण होत असून यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता आदींचा विस्तार झपाटय़ाने सुरू आहे. यामुळे अधिकच रोजगार कपात होणार. अशा तऱ्हेने सर्व काही आलबेल असल्याचे चित्र निर्माण केले जात असले तरी वास्तव तसे नाही, हेच यातून दिसून येते.