सौदी अरेबियाच्या राजाने पुतण्यास दूर करून मुलाला राजेपद देताना सत्तांतराच्या परंपरेला नवे वळण दिले आहे.

आपल्याकडे जे घडत आले आहे, घडते आहे तेच सौदी अरेबियातही घडले. ते तसे घडणार याची अटकळ गेल्या वर्षांपासून बांधली जात होती. परंतु त्याच वेळी सौदी परंपरेचा भंग होईल असे काही होणार नाही, अशीही आशा व्यक्त केली जात होती. ती फोल ठरली. राजकारणातील उच्चपदस्थाने आपल्या कार्यक्षम पुतण्याऐवजी अखेर रक्ताच्या नात्यास प्राधान्य देत मुलाकडेच सत्तासूत्रे देण्याचे अनेक प्रसंग या महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत. तेच आता सौदी अरेबियात अनुभवास येत आहे. महाराष्ट्रात राजकारण्यांचा उत्तराधिकारी कोण? मुलगा की पुतण्या या वादाचे पडसाद त्या त्या कुटुंबाच्या प्रभाव क्षेत्रात दिसून आले. परंतु सौदी अरेबियाचे प्रभाव क्षेत्र हे या सगळ्यांपेक्षा अधिक असल्याने आणि मुख्य म्हणजे जगात उपलब्ध खनिज तेलातील एकतृतीयांशपेक्षा अधिक वाटा हा त्या एकाच देशातून येत असल्याने त्या देशातील या कौटुंबिक उलथापालथीचे परिणाम संपूर्ण जगास सहन करावे लागणार आहेत. म्हणून त्यांची दखल घेणे आवश्यक ठरते.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

सौदी अरेबिया या एका कुटुंबाच्या मालकीच्या देशाचे प्रमुखपद सध्या राजे सलमान यांच्याकडे आहे. सौदी परंपरेनुसार देशाचा प्रत्येक सत्ताधारी राजा आपला अभिषिक्त राजपुत्र ..म्हणजे क्राउन प्रिन्स.. जाहीर करतो. म्हणजे हा राजाचा उत्तराधिकारी. अधिकृत अभिषेकाच्या प्रतीक्षेत असलेला. या राजपुत्राकडे नंतर सौदी राजसत्ता जाते आणि तो अधिकृतपणे सौदी प्रमुख म्हणून देशाची सूत्रे हाती घेतो. आणखी १३ वर्षांनी आपल्या स्थापनेचा शतक महोत्सव साजरा करेल इतक्या जुन्या असलेल्या सौदी अरेबियातील आतापर्यंत सर्व सत्तांतरे अशीच झाली असून जवळपास २० हजार इतकी कुटुंब सदस्यसंख्या असलेल्या या घराण्यातील मतभेद एकदाही चव्हाटय़ावर आलेले नाहीत. आता जे काही झाले त्यामुळे मतभेद जरी उघड झाले नसले तरी अभिषिक्त राजपुत्र म्हणून नेमल्या गेलेल्या व्यक्तीस दूर करून त्याच्या जागी नवीनच उत्तराधिकारी नेमला जाण्याचा प्रकार घडला आहे. राजे सलमान यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलेला राजपुत्र महंमद बिन नाईफ याला त्या पदावरून दूर केले असून त्याच्या जागी राजपुत्र महंमद बिन सलमान याची नियुक्ती केली आहे. राजपुत्र नाईफ हा ८१ वर्षीय राजे सलमान यांचा पुतण्या तर राजपुत्र सलमान हा त्यांचा मुलगा. म्हणजेच आपल्याकडे दिवंगत बाळासाहेब ठाकरे ते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जे केले तेच राजे सलमान यांनी केले, असे म्हणता येईल. या निमित्ताने सौदी घराण्यात आणखी एक ऐतिहासिक घटना घडून आली.

ती म्हणजे सौदीच्या इतिहासात प्रथमच उत्तराधिकारी म्हणून पुढील पिढीचा कोणी निवडला गेला. आतापर्यंत सौदीतील सर्व सत्तांतरे ही भावाभावांमध्येच झाली. याचे कारण सौदीचा संस्थापक महंमद बिन इब्न सौद याने आपल्या पट्टराणीस दिलेले वचन. या संस्थापक सौद यांचा जनाना महाप्रचंड होता तरी त्यातील सुदइरी नावाची बेगम ही त्यांची अत्यंत आवडती होती. त्या राणीचा राजे सौद यांच्या आयुष्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यामुळे असेल या बेगम सुदइरी हिने राजे सौद यांच्याकडून वचन मिळवले. माझ्या पुत्रसंततीकडेच पुढचे राजेपद जाईल, हे ते वचन. या बेगम सुदइरी यांना राजे सौद यांच्यापासून सात पुत्र झाले. हे सर्व इतिहासात सुदइरी सेव्हन (सात सुदइरी) नावाने ओळखले जातात. ते सर्व राजे झाले. विद्यमान राजे सलमान हे यातील शेवटचे बेगम सुदइरीपुत्र. तेव्हा त्यांच्याबरोबर सुदइरीपुत्रांची परंपरा नष्ट होणार असून त्या निमित्ताने प्रथमच सौदीची सूत्रे पुढील पिढीच्या हाती जातील. या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व राजपुत्र नाईफ याच्याकडे होते. त्याचमुळे अंतर्गत सुरक्षा, न्याय आदी खात्यांचा कार्यभार त्याच्या हाती होता. हेतू हा की भावी राजास त्यातून आवश्यक ते प्रशिक्षण मिळावे. परंतु राजे सलमान यांनी नाईफ याच्या जागी आपला पुत्र सलमान यास नेमले आणि त्याच वेळी नाईफ याच्याकडची सर्व पदेही काढून घेतली. यापुढे नाईफ यांच्याकडील पदांखेरीज संरक्षण आदी सर्व महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी राजपुत्र सलमान याच्याकडे दिली जाईल. हा बदल त्वरित अमलात आला असून यामुळे राजपुत्र सलमान हा सौदीचा तूर्त तरी भावी राजा असेल, हे स्पष्ट झाले. राजे सलमान यांची ही कृती परंपरेस छेद देणारी म्हणून धक्कादायक असली तरी सौदी अरेबियाच्या अभ्यासकांसाठी ती तशी नाही. याचे कारण गेली जवळपास दीड वर्ष राजपुत्र सलमान याचे वाढत असलेले प्रस्थ. गत वर्षी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना त्यांचे आगतस्वागत करण्यात आणि त्यांच्या बरोबरीच्या चर्चेची सूत्रे राजपुत्र सलमान याच्याकडे होती. तेव्हाच अनेकांनी सलमानसंदर्भात अटकळ बांधली. त्यानंतर सौदी अरेबियाने शेजारील येमेन देशातील बंडखोरांसंदर्भात जी काही कारवाई सुरू केली तिचे नेतृत्व राजपुत्र सलमान याच्याकडेच होते. या कारवाईमुळे येमेन तर अशांत झालाच, परंतु इराण आणि सौदी संबंधांतही तणाव निर्माण झाला. तरीही राजपुत्र सलमान याच्यावर कसलीही टीका झाली नाही. अलीकडे सौदी अरेबियाने शेजारील कतार देशाशी सर्व राजनैतिक संबंध तोडण्याचा जो टोकाचा निर्णय घेतला त्यामागेही राजपुत्र सलमान यांचाच रेटा होता. याच्या जोडीला सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पुनर्रचित करण्याची भाषा हा नवनियुक्त राजा करतो. तसेच सौदी अरेबियात महिलांना अधिक अधिकार असायला हवेत, असेही म्हणतो. यामुळे त्याच्याविषयी अपेक्षा आणि भीती या दोन परस्पर टोकाच्या भावना व्यक्त होतात. अपेक्षा या राजपुत्र सलमानच्या आधुनिक दृष्टिकोनामुळे जशा आहेत तशीच इतका टोकाचा आधुनिक दृष्टिकोन इतक्या धसमुसळ्या पद्धतीने राबविल्यास पश्चिम आशियाचा टापू अशांत होण्याची शक्यता असल्याने या संदर्भातील भीतीदेखील आहे. तथापि राजपुत्र सलमान उचलू पाहात असलेल्या एका पावलाचे मात्र स्वागतच करावयास हवे.

ते म्हणजे सौदी अराम्को या जगातील सगळ्यांत मोठय़ा तेलकंपनीचे खासगीकरण. राजपुत्र सलमान हे आर्थिक सुधारणा करू इच्छितात. सौदी अरेबियाचा मॅगी थॅचर अशी आपली ओळख व्हायला हवी, अशी त्यांची इच्छा आहे. सौदीची अर्थव्यवस्था आतापर्यंत पूर्णपणे तेलावर अवलंबून असून हे तेलावलंबित्व जास्तीत जास्त कमी करण्यास आपण प्राधान्य देतो असे राजपुत्र सलमान म्हणतात. ही बाब कौतुकास्पद. कारण तेलातून येणाऱ्या ऐषारामामुळे सौदी अरेबिया सुस्तावला असून अन्य कोणत्याही क्षेत्रांत काहीही करावयाची गरजच त्या देशास भासत नाही. त्यामुळे सौदी अराम्कोचे पाच टक्के समभाग खुले करण्याचा राजपुत्र सलमान यांचा निर्णय हा क्रांतिकारक ठरतो. या पाच टक्क्यांतून अब्जावधी डॉलर उभे राहतील इतकी ही कंपनी मोठी आहे. याच्या जोडीला खाण उद्योग, बंदर विकास, हॉटेल्स उभारणी आदी मार्गानीही सौदीस बळ देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तेलातून मिळणारा महसूल तूर्त आटत असताना असे काही करणे आवश्यकच होते. त्यामुळे सलमानपुत्र सलमान याचे प्रयत्न कौतुकास्पद ठरतात. राजा असो वा लोकशाही मार्गाने निवडून आलेला देशप्रमुख. त्यांच्याकडून आर्थिक सुधारणांचा आग्रह धरला जात असेल तर त्याचे स्वागतच करावयास हवे.