व्यवस्थेतील उणीव, त्रुटी दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे असे मानणारे लिखाण प्रादेशिक असूनही त्यांची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली..

आपल्या मतास पुष्टी न देणारा तो आपला शत्रू हे मानले जाण्याच्या काळात सत्ताधाऱ्यांचे शत्रुत्व ओढवून घेण्याची चो यांच्यासारखी हिंमत फारच कमी संपादकांत आढळते. त्याचमुळे आज चो यांचे महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक ठरते.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामाजिक व आर्थिक भूगोल
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास

महंमद तुघलक दोन कारणांसाठी ओळखला जातो. राजधानीचे दिल्लीहून स्थलांतर आणि दुसरे म्हणजे आपल्या चलनाशी त्याने केलेला खेळ. जग जिंकण्यासाठी भरपूर पैसा हवा म्हणून या तुघलकाने तांबे आणि पितळ्याच्या नाण्यांनाही सोन्याचे मोल मिळेल असे जाहीर केले. परिणामी त्याच्या चलनाचे मोल प्रचंड घसरले. कारण सोन्याचे मोल मिळणार म्हटल्यावर घराघरात तांबे-पितळ्याची नाणी पाडली गेली आणि त्यामुळे त्याची अर्थव्यवस्था रसातळाला गेली. ही १४व्या शतकातील सत्यकथा. पण वर्तमानातील लेखकाला ती आजची वाटते. म्हणून तो या तुघलकास थडग्यातून जिवंत करतो आणि पुढे भारतातील प्रचलित राजकीय व्यवस्थेतील अजागळपणा उघड करत त्यास थेट देशाच्या पंतप्रधानपदी बसवतो. त्यांचा हा तुघलक निवडून आल्यावर जाहीर करतो की जो कोणी त्यास पाठिंबा देईल तो उपपंतप्रधान होईल. ४५० जण त्यास पाठिंबा देतात आणि सगळेच्या सगळे उपपंतप्रधान केले जातात. तुघलक थडग्यातून बाहेर येऊन पंतप्रधानपदासाठी निवडून येईपर्यंत जे काही घडते त्यातून भारतीय राजकीय व्यवस्थेचे यथोचित विडंबन समोर येते. कथेच्या शेवटी हा थडग्यातून बाहेर आलेला तुघलक आपण थडग्यातून बाहेर येण्याचा कसा बनाव आखला ते कबूल करतो आणि त्यातून भारतीय राजकीय व्यवस्थेतील एक चिरंतन सत्य समोर येते. ते म्हणजे खोटीनाटी आश्वासने देऊन, जनतेच्या भावनेस हात घालून सर्वोच्चपदी निवडून येणे फारसे अवघड नाही.

हे कथानक आजही समकालीन वाटत असेल तर ते श्रीनिवास अय्यर रामस्वामी या लेखकाचे मोठेपण. चो रामस्वामी या नावाने ओळखला गेलेला हा लेखक पत्रकार बुधवारी चेन्नईत निवर्तला. त्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि चो यांच्या निकटवर्ती जयललिता यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी तामिळनाडूतील या आदरणीय पत्रकाराचे निधन व्हावे हा योगायोग दुर्लक्ष न करता येण्याजोगा. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात जयललिता यांनी रुग्णालयात जाऊन चो यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती आणि तुम्ही लवकरच नक्की बरे होऊन कामाला लागाल, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. पुढच्याच महिन्यात जयललिता यांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले आणि अखेर काही तासांच्या अंतराने दोघांचेही निधन झाले.

चो हे जात्याच बंडखोर होते. सत्ता आणि व्यवस्थेतील मर्यादा दाखवून जनतेच्या बाजूने उभे राहणे हा त्यांचा धर्म होता. त्यामुळेच आपला वकिली पेशा बाजूला ठेवून ते लेखक, कलाकार आणि पत्रकार संपादक बनले. तुघलक हे सत्तरच्या दशकात लिहिलेले त्यांचे नाटक. ते प्रचंड गाजले. त्यास इतकी लोकप्रियता मिळाली की चो यांनी पुढे आपल्या साप्ताहिकाचे नावदेखील तुघलक असेच ठेवले. तामिळनाडूत साप्ताहिकांची कमतरता नव्हती, पण तुघलक हे वेगळे होते. दुपारी कामधाम आटोपून लवंडल्यावर वाचणाऱ्या गृहिणींसाठी कादंबऱ्या, प्रेमकथा, चित्रपटीय मनोरंजन आदींनी खच्चून भरलेल्या लोकप्रिय, झुळझुळीत तामिळी साप्ताहिकांतील काहीही मजकुरास तुघलकमध्ये स्थान नव्हते. त्यात असायचे ते केवळ प्रहसन आणि कडवे राजकीय लिखाण. म्हणजे एका अर्थी सामान्य वाचकालाच दूर ठेवणारे घटक. पण तरीही तुघलक प्रचंड लोकप्रिय झाले. इतके की ते छापणाऱ्या मुद्रणालयांना अंकांची मागणी पेलवायची नाही. हे सर्व श्रेय चो यांचे. प्रचलित राजकारण्यांविरोधात ते रोखठोक भूमिका घेत. त्यांच्या लेखणीतून वाचलेला एकही राजकारणी नसेल. याच्या जोडीला स्वत:कडेही विनोदाने पाहावयाचा मोकळेपणा त्यांच्याकडे होता. त्याचमुळे तुघलकच्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर ते दोन गाढवे दाखवू शकले. यातले एक गाढव दुसऱ्यास म्हणत होते, नवीन साप्ताहिक येतेय, म्हणजे आपल्याला आता जास्त खाद्य मिळणार. मुखपृष्ठावर असे व्यंगात्मक चित्र हे धाडस होते. हे धाडस हेच चो रामस्वामी यांचे वैशिष्टय़. तुघलक स्थिरस्थावर होत असतानाच आणीबाणी आली. चो यांनी त्यानंतरच्या पहिल्या अंकाचे मुखपृष्ठ कोरेकाळे दाखवून आपला निषेध नोंदवला (नंतर बाबरी मशीद पाडली गेल्यानंतरच्या अंकाचे मुखपृष्ठही त्यांनी असेच कोरेकाळे ठेवले होते.). चो लेखक म्हणून इतके कल्पक की त्यांनी जाहिरातींच्या माध्यमातूनही आणीबाणीस विरोध करणारे लिखाण सुरू केले. ते सूचक असे. त्यामुळे बंदी निर्णय अमलात आणणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरुवातीला ते कळलेच नाही. जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी तुघलकच्या जाहिरातीही सरकारी भिंगातून पाहणे सुरू केले. जाहिरातीही सेन्सॉर करवून घ्यावा लागणारा देशातील मी एकमेव संपादक असे चो म्हणत. या प्रत्येक मंजुरीसाठी त्यांना त्या वेळी सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागले. एकदा अशाच भेटीत त्यांनी आपले संपादकपदाचे वेतन मुख्य सेन्सॉरसमोर ठेवले. तो गडबडलेला पाहून, चो त्यास म्हणाले : या वेतनावर खरा हक्क तुमचाच. सध्या तुम्हीच संपादक आहात.

हे असे उद्योग हे चो यांचे वैशिष्टय़. त्या वेळी तामिळनाडूत करुणानिधी यांचे द्रमुक सरकार सत्तेवर होते आणि इंदिरा गांधी यांचे लांगूलचालन हा त्यांचा एकमेव कार्यक्रम होता. त्या सरकारविरोधात चो यांनी मोहीमच उघडली. ती इतकी तिखट होती की त्यांना अनेकांनी जिवास जपा, असा भयसूचक इशारा दिला. चो यांनी अर्थातच त्यास भीक घातली नाही. ते आपली लेखणी परजतच राहिले. ते आणीबाणीविरोधात होते म्हणून आणीबाणी उठल्यानंतर आलेल्या मोरारजी देसाई सरकारचे ते हितचिंतक होते असेही नाही. या सरकारातील विरोधाभासावरही ते कोरडे ओढत आणि हे सरकार कसे टिकणारे नाही, हे दाखवून देत. चरणसिंग हे मोरारजी देसाई यांचे पाय ओढतील हे भाकीत त्यांनी जनता सरकार सत्तेवर आल्या आल्याच वर्तवले होते. पुढे तसेच झाले. हे चो यांचे आणखी एक वेगळेपण. एखादी महत्त्वपूर्ण घटना घडल्यास तिच्या प्रभावाखाली येऊन आपला सारासारविवेक त्यांनी कधीही गहाण टाकला नाही. त्याचमुळे बांगलादेश युद्धानंतर त्या विजयाच्या आनंदात रममाण झालेल्या इंदिरा गांधी यांना ते लवकरच बांगलादेश भारताचा शत्रू होईल असे सांगू शकले आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांना पुढे करणारे देवीलाल हेच त्यांना हटवण्यासाठी कसे प्रयत्न करतील याचेही भाकीत त्यांनी सिंग हे पंतप्रधान झाल्या झाल्या वर्तवले. व्यवस्थेतील उणीव, त्रुटी दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे आणि तोच आपला धर्म आहे, असे ते मानत.

त्याचमुळे संतुलित पत्रकारिता या वर्णनाची ते खिल्ली उडवत. याचे कारण या वर्णनात एक प्रकारे अंगचोरी अनुस्युत आहे. सुष्ट आणि दुष्ट, योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही बाजूंना समन्यायाने हाताळले जात असेल तर ती पत्रकारिता एकवेळ संतुलित ठरू शकेल. पण ती न्याय्य नसते. पत्रकारिता न्याय्य असायला हवी असा चो यांचा आग्रह असे. तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. त्यांच्या या लेखननिष्ठेमुळे प्रादेशिक भाषेत लिखाण करणारे असूनही त्यांची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. मजकूर आणि त्यावरील निष्ठा सकस असेल तर भाषेच्या मर्यादा गळून पडतात हे चो यांनी दाखवून दिले. आपल्या मतास पुष्टी न देणारा तो आपला शत्रू हे मानले जाण्याच्या काळात सत्ताधाऱ्यांचे शत्रुत्व ओढवून घेण्याची चो यांच्यासारखी हिंमत फारच कमी संपादकांत आढळते. त्याचमुळे आज चो यांचे महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक ठरते. आज माध्यमांतील एका वर्गात सत्ताधाऱ्यांच्या कृपाकटाक्षासाठी अहमहमिका सुरू असताना सरकारला विरोध करणारी पत्रकारिता तुघलकी ठरवली जाते. परंतु सक्षम लोकशाही आणि निकोप समाजासाठी अशा ‘शहाण्या तुघलकांचे’ असणे आवश्यक आहे. त्यांच्या निधनाने असा एक ‘शहाणा तुघलक’ काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना लोकसत्ता परिवाराची आदरांजली.