मुंबईचे मोठेपण म्हणून ज्याचे काही कौतुक केले जाते ती वास्तवात असहायतेतून आलेली अपरिहार्यता आहे..

‘‘या देशात एकच महानगर आहे. ते म्हणजे मुंबई. अन्य सर्व शहरे ही विस्तारित खेडी आहेत,’’  हे एका बंगाली लेखकाचे मत. त्याने ते मांडले त्यास कित्येक दशके लोटली. अलीकडच्या काळात त्याने मुंबईला भेट दिल्यास त्याचे हेच मत कायम राहील किंवा काय, याबाबत साधार शंका व्यक्त करता येईल. विशेषत मंगळवारी २००५ च्या महाप्रलयाची केवळ हूल पावसाने दिली आणि समस्त मुंबईकरांची जी काही त्रेधातिरपीट झाली ते पाहता हे शहर यापुढे महानगर म्हणवून घेण्यास लायक आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

pimpri police commissioner office marathi news, pimpri police commissioner office latest news in marathi
पिंपरी : अखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय
Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?
What did Pune get in the state budget for the year 2024-25
अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय?… वाचा सविस्तर

शहरावर कोसळलेला पाऊस हेच केवळ त्याचे कारण नव्हे. ते केवळ एक निमित्त. मुंबईवर ही अशी अस्मानी कोसळली असताना अटलांटिकच्या पलीकडे अमेरिकेतील ह्य़ूस्टन, ऑस्टीन आदी शहरांनाही हाच अनुभव येत होता. अमेरिकेच्या दक्षिणतम अशा टेक्सास राज्यातील ही शहरे. त्यांना गेले तीन दिवस चक्रीवादळाच्या तडाख्यास तोंड द्यावे लागत आहे. मुंबईत जे काही झाले त्या तुलनेत टेक्सास राज्यास जे काही अनुभवावे लागत आहे, ते अभूतपूर्व आहे. तरीही मुंबईच्या तुलनेत त्याची अवस्था उत्तम म्हणता येईल अशी आहे. मुंबईची अवस्था अगदीच केविलवाणी दिसते. सरभर झालेले असहाय नागरिकांचे जथेच्या जथे, मुंबईस कवेत घेणाऱ्या समुद्राने परत शहराच्या नालेप्रवाहात उलटे फेकून दिलेल्या कचऱ्याचे ढीग, रस्तोरस्ती ते पसरून तयार झालेले कचऱ्याचे साम्राज्य हे सारेच विदीर्ण करून टाकणारे. त्यातही मुंबईची जीवनवाहिनी वगरे फुकाच्या मोठेपणाने ओळखल्या जाणाऱ्या लोकलगाडय़ांत अडकलेल्यांचे हाल तर रस्त्यावरच्या कुत्र्यांनीही खाल्ले नसते. समोर स्थानक दिसते आहे, परंतु तेथपर्यंत जायची सोय नाही, अशी अनेकांची अवस्था होती. यात अपवाद काय तो सदैव मदतीस तयार असणाऱ्या सामान्य मुंबईकरांचा. ते जमेल त्या मार्गाने अडचणीत आलेल्यांस मदत करीत होते. मुंबईचे मोठेपण.. मुंबईज स्पिरिट.. वगरे उगा कौतुकाने त्याचे वर्णन केले जाते. ते लटके आहे. हे म्हणजे अन्नाअभावी उपाशी राहावे लागलेल्याच्या लंघनक्षमतेचे कौतुक करण्यासारखे. मुंबईचे मोठेपण म्हणून ज्याचे काही कौतुक केले जाते ती वास्तवात असहायतेतून आलेली अपरिहार्यता आहे. एका असहायाने दुसऱ्या तितक्या वा त्याहूनही अधिक असहायास दिलेला तो मदतीचा हात आहे. त्यात मोठेपण मिरवावे असे काहीही नाही. ही असहायता मुंबईकर गेली काही दशके अनुभवीत आहेत. याचे कारण मुंबई हे महानगर जरी असले तरी ते चालवणारे ग्रामपंचायतीच्या मानसिकतेचेच आहेत. हा केवळ शिवसेना या एकाच पक्षावर केला गेलेला आरोप नाही. मुंबईशी संबंधित सर्व राजकीय पक्षांची कमीअधिक प्रमाणात हीच अवस्था आहे. परंतु या टीकेचा मोठा वाटा अर्थातच शिवसेनेस आपल्या पदरात घ्यावाच लागेल. कारण गेली जवळपास तीन दशके त्या पक्षाच्या हाती मुंबईची धुरा आहे. या काळात या पक्षाने दिलेले मुंबईचे महापौर कोण होते वा आहेत, याची उजळणी जरी केली तरी ही टीका किती सत्य आहे ते पटू शकेल. बौद्धिक चातुर्य, अभ्यास आदींपेक्षा ‘मातोश्री’वर हुजरेगिरी करण्याची क्षमता हा एकच समान धागा त्यांच्यात आढळेल. या महापौरांची त्या-त्या काळातील विधाने त्यांच्या बौद्धिक क्षमतेची वा त्याच्या अभावाची साक्ष देतात. तेव्हा अशा व्यक्तींकडून महानगराच्या दर्जाचे नेतृत्व मिळण्याची सुतराम शक्यता नाही. यातील दैवदुर्वलिास असा की महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने जरी बुद्धिवान, विचारी वगरे महापौर समजा दिला तरी तोदेखील काहीही दिवे लावू शकणार नाही.

कारण त्यास काही अधिकारच नसतो. आपल्या देशातील महापालिका चालवल्या जातात त्या आयुक्तनामक सरकारी अधिकाऱ्याकडून. तो मुख्यमंत्र्यांस उत्तरदायी. महापौर आणि महापालिकेतील सत्ताधारी पक्षास तो खुंटीवर तरी टांगू शकतो किंवा त्यांच्या हातात हात घालून आपली धन तरी करू शकतो. आपल्या महापालिकांकडे नजर टाकल्यास या दोनांतील एक तरी कसे होते ते सर्रास प्रत्ययास येते. परत महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी हे दोघे जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे असतील तर एकमेकांची अडवणूक करण्यातच उभय बाजूंची ऊर्जा खर्च होत असते. परिणामी या दोघांच्या साठमारीत शहरे मात्र मरू लागतात. मुंबईचे यापेक्षा काही वेगळे नाही. महापालिकेत सत्ताधारी असलेली शिवसेना किती नालायक आहे हे दाखवून देण्यातच भाजपच्या मुंबई शाखेस धन्यता वाटते. तसेच भाजप हा आमची किती अडवणूक करतो हे रडगाणे गाण्यात सेना आनंद मानते. काँग्रेसला या शहरात काही स्थानच नाही. या शहरात आलेल्या वा येणाऱ्या अमर्याद लोंढय़ांना सहानुभूती दाखवण्याव्यतिरिक्त काँग्रेसने काहीही केले नाही. मुंबईतील उसवत जाणाऱ्या झोपडय़ा हे आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेचे पाप. तेव्हा या महानगरीत राहावे लागण्याचे प्राक्तन असलेल्या नागरिकांसाठी हे दुर्दैव कमी म्हणून की काय, अनेक यंत्रणांच्या गळ्यात या शहराचे लोढणे अडकवून टाकलेले आहे. एका रस्त्याचा जरी मुद्दा घेतला तरी महापालिका, रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे, बंदर न्यास आदी अनेकांत ते विभागले गेले आहेत. तेव्हा नागरिकांना पहिली उरस्फोड रस्त्याच्या दुरवस्थेस नक्की कोण जबाबदार आहे, हे शोधण्यासाठीच करावी लागते. तीच बाब शहराबाबतच्या अन्य सेवांची. परत हे सर्व विसर्जित करून एकाच एक यंत्रणेकडे मुंबईची जबाबदारी देता येईल असे म्हणावे तर लगेच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव म्हणून हेच सर्व लगेच गळा काढण्यास तयार. तेव्हा अशा परिस्थितीत या शहरात सुधारणा होणार तरी कशी?

महानगरांचे व्यवस्थापन करावयाचे तर ते करू इच्छिणाऱ्यांची मानसिकता महानगरी असावी लागते. आपल्याकडे बोंब आहे ती नेमकी हीच. प्रमुख राजकीय पक्षांचे मोजकेच मध्यवर्ती नेते सोडले तर बाकी सर्व तसा आनंदच. आपल्यापेक्षा बुद्धिमान आपला कार्यकर्ता नको या आग्रहामुळे आपल्याकडे सगळेच्या सगळे राजकीय पक्ष ही फक्त होयबांची कुरणे झाली आहेत. या मानसिकतेमुळे आपल्याकडे संस्थात्मक उभारणीच होत नाही. स्वायत्त संस्था, स्वनियमित नियामक हे आपल्याला मंजूरच नाही. आपला सर्व भर हा सर्व काही पंगूच राहील यावर. महापालिका पंगू, शहर चालवणाऱ्या अन्य यंत्रणा, त्यातील माणसे पंगू आणि अशा अवस्थेत वावरणारे नागरिकही पंगूच. मंगळवारी जे काही घडले ते या सर्वच यंत्रणांचे पंगूदर्शन होते. २००५ साली २६ जुलैस हे पंगूपण किती मारक ठरू शकते याचा अनुभव वास्तविक या महानगराने घेतलेला आहे. पण कोणत्याही अनुभवातून काहीही शिकायचेच नाही, हा तर आपला सामाजिक निर्धार. त्यामुळे प्लास्टिक वापरावर बंदी, कांदळवनांची निगा, अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण वगरे निर्धार त्या वेळी पुराच्या पाण्याबरोबरच ओसरले. ते किती पोकळ होते याची जाणीव २९ ऑगस्टच्या पावसाने करून दिली.

पण त्याने काहीही बदल होण्याची शक्यता नाही. कारण हे वास्तव फक्त मुंबईपुरतेच मर्यादित नाही. कमीअधिक प्रमाणात आपल्या सर्वच शहरांची हीच परिस्थिती आहे. माध्यमकेंद्री महानगर असल्याने मुंबईची दशा दिसून येते, इतर शहरांची ती तितकी दिसत नाही इतकेच. मंगळवारी मुंबईने जे अनुभवले त्यातून या सर्वच शहरांच्या मरणकळा दिसून आल्या. आपली सर्वच शहरे मरणासन्न आहेत आणि त्यांचे मरण अटळ आहे. ते लांबवायचे असेल तर फुकाचे उमाळे थांबवून शहरांना आपले म्हणण्यास सुरुवात करावी लागेल.