17 August 2017

News Flash

आता पुरे झाले!

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची अकार्यक्षमताच दिसली आहे

लोकसत्ता टीम | Updated: August 1, 2017 3:15 AM

मुंबई विद्यापीठ

शिस्त वा तयारीविना निर्णय घेणे आणि ते निभावून नेण्यासाठी वेळीच प्रयत्नही न करणे, यातून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची अकार्यक्षमताच दिसली आहे

‘युनिव्हर्सिटय़ा ऊर्फ सरकारी हमालखाने’ असे आपल्या विद्यापीठांचे वर्णन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले त्यास १९ ऑगस्ट रोजी ११५ वर्षे होतील. १९०२ साली लिहिलेल्या लेखात बाळ गंगाधरांनी ब्रिटिशांच्या अमलाखालील विद्यापीठ अभ्यासक्रमावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर आजतागायत झाले ते इतकेच की बळवंतरावांनी विद्यापीठांना दिलेली उपाधी किती सार्थ होती हेच सिद्ध करणारे कुलगुरू विद्यापीठांना उत्तरोत्तर मिळत गेले. प्रत्येक नव्या कुलगुरूकडे पाहता गेला तोच बरा होता असे म्हणावयाची वेळ येते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे अलीकडच्या काळातील असेच नामांकित कुलगुरू. त्यांच्या आधी डॉ. राजन वेळूकर यांनी हे पद भूषविले. त्यांच्या कोणत्या गुणाकडे पाहून त्यांना इतक्या वरिष्ठपदी नेमले गेले, असा प्रश्न ज्ञानक्षेत्रातील किमान परिचितासही त्या वेळी पडत होता. परंतु सांप्रतकाळी डॉ. वेळूकर परवडले असा डॉ. देशमुख यांचा कारभार आहे. वेळूकर यांच्या काळात बरे म्हणता येईल असे विद्यापीठात काही घडले नाही. परंतु ठसठशीत असे काही वाईट घडत होते असेही नाही. वेळूकर हे समाजातील कणाहीन, सत्त्वहीन अशा धुरीणांचे प्रतीक होते. समाजावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांना अशी बिनचेहऱ्याची माणसे आवडतात. कारण त्यांच्याकडून कधी आव्हान निर्माण होत नाही. विद्यमान कुलगुरू डॉ. देशमुख हे त्याच मालिकेतील. पण तरीही वेळूकर यांच्यापेक्षा ते अधिक वाईट ठरताना दिसतात. याचे कारण आपल्याला बरेच काही कळते वा जमते असा त्यांचा गंड. या गंडातून त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे पुरते तीनतेरा वाजवले असून या गर्तेतून बाहेर येण्यासाठी विद्यापीठास बराच काळ जावा लागेल.

परीक्षा घेणे हे विद्यापीठाचे परमकर्तव्य. पण या कुलगुरूच्या काळात विद्यापीठास तेच झेपेनासे झाले आहे. गेले काही दिवस या परीक्षा व्यवस्थापनातील, खरेतर व्यवस्थापनशून्य अवस्थेच्या विद्यापीठाच्या अब्रूचे धिंडवडे दररोज निघत असून डॉ. देशमुख यांना या अनागोंदीची काही चाड आहे, अशी चिन्हे दिसलेली नाहीत. मुंबई विद्यापीठाचे हे जे काही भजे झाले त्यास केवळ कुलगुरू या नात्याने नव्हे तर शब्दश: देखील डॉ. देशमुख हेच जबाबदार आहेत. याचे कारण दोन वर्षांपूर्वी त्यांची जेव्हा कुलगुरूपदी नेमणूक झाली त्या वेळी नवा विद्यापीठ कायदा अस्तित्वात येणार अशी चिन्हे होती. परंतु प्रत्यक्षात ती लांबली. अशा वेळी खरे तर परिस्थितीचा अंदाज घेत कुलगुरूंनी आहे त्या कायद्याच्या आधारे महत्त्वाच्या नेमणुका आदी करणे अपेक्षित होते. परंतु डॉ. देशमुखांनी ते केले नाही. परिणामी आज दोन वर्षे झाली मुंबई विद्यापीठास प्र-कुलगुरू नाही. परीक्षा व्यवस्थापनात या प्र-कुलगुरूची भूमिका महत्त्वाची असते. परीक्षा आणि तद्नंतरच्या सोपस्कारांची जबाबदारी त्याची. पण विद्यापीठाला प्र-कुलगुरूच नाही. या देशमुखांना असे अर्धा डझन प्र-कुलगुरू हवे होते. तशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली. पण ही आचरट मागणी मान्य होण्याची शक्यताच नव्हती. ती सरकारने फेटाळली. मग यांनी एक तरी प्र-कुलगुरू नेमावा. तेही नाही. देशमुखांच्या काळात अधिसभेची देखील रचना झाली नाही. निवडणुकीच्या मार्गाने या अधिसभेची रचना होते. पण सरकारी गोंधळामुळे त्या निवडणुका झाल्याच नाहीत. सगळेच फक्त होयबा नियुक्त सदस्य. अधिसभेची स्थापनाच न झाल्यामुळे या सभेच्या सदस्यांतून तयार होणारी विविध प्राधिकरणेही तयार झाली नाहीत. विविध शाखांच्या अभ्यास मंडळांचीही तीच अवस्था. सर्वार्थाने इतक्या प्रचंड आकाराच्या विद्यापीठात अनेक महत्त्वाच्या ज्ञानशाखांच्या अभ्यास मंडळांवर अशाच होयबांची वर्णी डॉ. देशमुख यांनी लावली. नव्या कायद्याच्या अस्तित्वाअभावी हे सारे घडले. विद्यापीठाचा प्रमुख या नात्याने या सर्व गोष्टी टाळणे ही कुलगुरूंची जबाबदारी. ती देशमुख यांनी अजिबात पार पाडली नाही. उलट या निर्वात पोकळीचा त्यांनी आनंद लुटला. तो त्यांना पुरेपूर लुटता आला कारण जबाबदाऱ्या वाटून द्यायलाच कोणी नसल्याने हे सर्व अधिकार त्यांच्याच हाती राहिले. एरवी एखादा समंजस आणि वास्तववादी विचार करणारा असता तर त्याने हे सर्व काही आपल्याच्याने झेपणार नाही याची मनोमन खूणगाठ बांधत योग्य ती पावले उचलली असती.

पण हे डॉ. देशमुखांना कसे पटावे? या सर्व जबाबदाऱ्या आपण एकटय़ाने लीलया पार पाडू शकतो, असा त्यांचा समज असावा. परिणामी प्रशासनास गतिमानता यावी म्हणून काहीही केले नाही. आपण म्हणजेच प्रशासन असा त्यांचा खाक्या. या संदर्भात त्यांना कोणी काही सांगायचीही सोय नव्हती. कारण ते भेटतच नसत. प्राध्यापकांना, प्राचार्याना भेटणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे बहुधा. त्यामुळे कोणाकडून काही सूचनाही केल्या जाण्याची शक्यता नव्हती. कोणत्याही व्यवस्थापनात अनागोंदीसाठी इतके पुरते. पण जणू हे इतके कमी पडले असावे म्हणून त्यांनी उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन तपासाची घोषणा केली. त्यामागील उद्देश ठीक. पण तोच नुसता चांगला असून चालत नाही. त्या उद्दिष्टपूर्तीसाठी तशी तयारीही लागते. अशा तयारीशिवाय निर्णय रेटला की काय होते ते आपल्याला निश्चलनीकरणाने दाखवून दिलेच आहे. डॉ. देशमुख यांनी त्यापासून काही शिकण्याऐवजी त्यातून उलट प्रेरणाच घेतली आणि ही ऑनलाइन पद्धती जाहीर केली. त्यासाठी ना संगणक व्यवस्था तयार होती ना ती हाताळणारे. याचमुळे असे काही करू नये असा सल्ला त्यांना कुलसचिव, परीक्षा नियंत्रक आदींनी दिला. पण आपल्या कनिष्ठाचा सल्ला ऐकण्याचा शहाणपणा दाखवतात तर ते डॉ. देशमुख कसले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि यंदापासूनच उत्तरपत्रिकांची ऑनलाइन तपासणी जाहीर केली. हा त्यांचा निर्णय अक्षम्य म्हणावा लागेल. याचे कारण उत्तरपत्रिका परीक्षा विभागात येऊन पडल्या. त्यांचे ढीग तसेच पडून राहिले. तरी त्यांच्या ऑनलाइन तपासणी व्यवस्था उभारणीसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच नक्की झालेली नव्हती. तेव्हा जुलै संपला तरी अनेक परीक्षांचा निकाल लागलेला नाही यात काहीही धक्कादायक नाही. या संदर्भातही कुलपती राज्यपालांनी डॉ. देशमुखांचे कान उपटले नसते तर हा सावळागोंधळ असाच पुढे सुरू राहिला असता. राज्यपालांनीच अंतिम मुदत घालून दिल्याने या दिरंगाईचा बभ्रा झाला आणि पोशाखी देशमुखांच्या जाकिटावरचे अकार्यक्षमतेचे डाग दिसून आले.

विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थी एखाददुसऱ्या विषयात अनुत्तीर्ण झाला तर त्यास विद्यार्थ्यांच्या परिभाषेत ‘केटी’ लागते. त्यामुळे त्याचे वर्ष वाचते. पण ही सोय सर्वच्या सर्व विषयांत अनुत्तीर्ण झालेल्यास मिळत नाही. कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे असे सर्वच विषयांत अनुत्तीर्ण ठरले आहेत. कुलगुरूपदावरील व्यक्ती स्वत:च्या शैक्षणिक कारकीर्दीत तरी आदरणीय असावी लागते किंवा प्रशासक म्हणून तरी ती उत्तम लागते. डॉ. देशमुख यांच्याकडे दोन्हीची वानवा आहे. संघवर्तुळातील ऊठबस त्यांना या पदापर्यंत घेऊन गेली. परंतु पुढची वाटचाल त्यांना झेपली नाही. कोणत्याही पदावरील व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी दोन वर्षे हा पुरेसा अवधी आहे. डॉ. देशमुख यांना तो मिळाला आहे. त्यात त्यांची अकार्यक्षमताच ठसठशीतपणे समोर आली. तेव्हा आता पुरे झाले याची खूणगाठ बांधून सरकारने त्यांच्या खांद्यावरचे न पेलणारे कुलगुरूपदावरचे ओझे कमी करावे आणि त्यांना मुक्त करावे.

First Published on August 1, 2017 3:15 am

Web Title: mumbai university has failed to meet results deadline
टॅग Mumbai University
 1. संदेश केसरकर
  Aug 2, 2017 at 2:53 pm
  कारण त्यांच्या मते कुत्रा चावला तर बातमी होत नाही तर कुत्रा माण चावालातर बातमी होते. त्यात परत वृत्तपत्र कंपन्यांचे राजकीय लागे बांधे आणि संपादकांवर येणारी बंधन, ह्या सर्वांमुळे समाजात चागल्या घडणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. किंबहुना चांगली गोष्ट पण वाईट कशी आहे हे दाखवण्याची अहमिका लागते. कारण बातमी नसेल तर बातमी तयार करायची ह्यात पण काही पत्रकार तरबेज असतात. त्यामुळे संजय देशमुख कसे चुकले आणि ते कसे अकार्यक्षम आहेत हे चित्र रंगविण्या पेक्षा नोकरशहा कसा प्रामाणिक माणसला त्रास देतो ह्याचे चित्र लोकांना दाखवले पाहिजे. तसेच कुठलीही नवीन गोष्ट अं ात आणतांना थोडासा त्रास हा होणारच. त्यामुळे ३१जुलैपर्यंत चुकीचे निकाल लागण्यापेक्षा १५ ऑगस्ट पर्यंत प्रामाणिक निकाल लागण्यासाठी थोडी कळ काढुया. म्हणजे निदान पुढच्या पिढीलातरी त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान देवू शकू.
  Reply
 2. संदेश केसरकर
  Aug 2, 2017 at 2:41 pm
  सर्व प्रथम अमेरिकेच्या हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने "टॅलेंटेड सायंटिस्ट" म्हणून गौरवलेले किती जण मुंबई विद्यापीठावर नियुक्त झाले? एकीकडे ब्रेन ड्रेन म्हणून NRIवर टीका करणार, आणि दुसरीकडे कुणी बुद्धिमान तरी मायभूमीत परतलेतर त्यांचे मानसिक खच्चीकरण करणार. नीतू मांडके सारखे न व अमेरिका येथून जगातील अत्त्युच डॉक्टरांकडून प्रशिक्षण घेवून जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना जसलोक, ब्रीचकांडी, बॉम्बे हॉस्पिटल कुणी नोकरी देईना व शेवटी एका जैन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सातशे रुपयात नोकरी केली. देशमुखांनी इंजिनिअरिंगसाठी प्रथम ओनलाईन पद्धत यशस्वी केली मग ह्यावर्षी इतर शाखांसाठी लावली. आता ह्यापद्धतीमध्ये अनेकांचे भरणारे खिसे बंद झाले. आणि ती आत्ता यशस्वी झालीतर आपले खिसे परत कधीच भरणार नाही म्हणून अनेक नोकरशहांनी त्यात अनेक चुका जाणून बुजून केल्यात आणि जाणून बुजून विलंब केला. दुसरे म्हणजे परीक्षकांना विद्यापीठाच्या आवारात कॅमेरा खाली पेपर तपासणे सक्तीचे केले. आता अशी चागली गोष्ट पत्रकारांना पण आवडत नसते, कारण त्यांच्या मते कुत्रा चावला तर बातमी होत नाही तर कुत्रा माण चावालातर बातमी होते.
  Reply
 3. S
  sam
  Aug 2, 2017 at 1:58 pm
  This is my लास्ट message to you...
  Reply
 4. S
  SACHIN मोंडकर
  Aug 1, 2017 at 9:21 pm
  विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ हा अक्षम्य अपराध आहे. मागे काय झालं होत त्या पेक्षा गंभीर. काल आपण विद्यार्थी होतो. आज किंवा उद्या आपली मुलं मुली असतील. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि यास कारणी असलेल्याना शिक्षा व्हावी यात गैर ते काय आहे? कालपर्यंत आचरटपणा चालायचा मग आज का नको ? किंवा उद्या पण चालूच ठेवला तर काय बिघडले? हे प्रश्न चुकीचे आहेत. वास्तविक जे चालू होतं ते बदलााव अशी अपेक्षा असल्यानेच सत्ताबदल झालेला आहे. ही मुलंच उद्याची मतगार आहेत. आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर असली ससेहोलपट झाल्यावर आगामी निवडणुकांत ही अस्वस्थता प्रतिवर्तीत झाली तर नवल नको.
  Reply
 5. U
  umesh
  Aug 1, 2017 at 6:10 pm
  देशमुख अकार्यक्षम असतील तर त्याचा संघवर्तुळातील उठबसशी काय संबंध? देशमुख इतके पॉवरफुल असते तर राज्यपालांनीही त्यांची कानउघाडणी केली नसती कोणताही अधिकारी अकार्यक्षम निघाला की लगेच त्याचा संबंध संघीशी लावायचा ही गलिच्छ सवय कॉंग्रेसी लाळघोटे संपादक आणि समाजवादी येडबंबुंना आहेच कॉंग्रेसच्या सत्ताकाळात जे एकेक नरपुंगव कुलगुरूपदावर येऊन गेले आणि त्यांनी काय दिवे लावले ती यादी देऊ का? बाकी तुमच्या भाटांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यावरुन तुमच्याकडून त्यांना काहीतरी फायदा उकळायचा आहे हे दिसतेच
  Reply
 6. सदाशिव शाळिग्राम
  Aug 1, 2017 at 5:16 pm
  लो. टिळकांनी अग्रलेख लिहिला होता, 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे कां ?' काँग्रेसच्या राजवटीत सर्वच क्षेत्रांत बेशिस्त माजली उदाहरणार्थ वाहतूक, मग आता विद्यापिठ किती काळ टिकणार? मोदी सरकार तीन वर्षापूरवी आल्या पासून एकूण वेळोवेळी अग्रलेख वाटयचं, ह्या 'संपादकाचं डोकं ठिकाणावर आहे कां? अर्थशास्त्राचा अभ्यास न करता आधिकारवाणीने शेअर मार्केटचा बुडबुडा इ. जी.एस.टी. आणि नोटबंदीवर लिहणे, सर्रास खरया बातम्या खोट्या मथळ्याखाली छापणे व खोटे विचार खरे दाखवून निर्भिड व निपक्षपाती असल्याचे भासविणे आणि आता लो. टिळकांचे नांव सांगतात हीच नीती यात दिसती आहे.
  Reply
 7. S
  Shriram
  Aug 1, 2017 at 5:13 pm
  हर्षद. संगणकीय कामे करणार्यानी जाणूनबुजून जबाबदारी पार पाडली नाही आणि उत्तर पत्रिका वेळेवर तपासणी साठी उपलब्ध केल्या नाहीत तर त्या वेळेत कशा तपासल्या जाणार? हे कटकारस्थानच ठरते..स्वागताचा निरोप या अग्रलेखावरील सर्व प्रतिक्रिया दाबून टाकल्या गेल्या या विरूध्द आपण काय करू शकलो ?
  Reply
 8. A
  Anjali choudhari
  Aug 1, 2017 at 3:55 pm
  आपण गुणवत्तेला कमी महत्व देत आहोत असे वाटते. पूर्वी आम्ही उत्तरप्रदेशच्या विद्यापीठांना हसायचो आता तीच वेळ आपल्यावसर आली आहे. आपणच स्वतः महाराष्ट्राचा बिहार करतोय. महाराष्ट्र हि संतांची, कवींची, समाजसुधाकाची भूमी आहे. आपण हे जच स्वीकारायला नको आहे. आपल्यातली अस्मिता आपण पुन्हा जागी केली पाहिजे. समाजसुधारणेचं बीज हे कायम महाराष्ट्राने रोवले आहे . मग ते ज्ञानेश्वर महाराज असोत कि बाळ गंगाधर टिळक असोत व महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले असोत. छत्रपती असोत कि राणी लक्षमीबाई असोत. मग आताच आम्हाला काय झालंय? आपण टीकाही तेवढ्याच जिवंतपणे स्वीकारली आहे. कोणत्या क्षेत्रात आपण कमी होतो म्हणून असा हा भोंगळ कारभार आपण न करायचा? मराठी लोकांनो आता काय आपण आपल्या अस्मितेची पण भीक मागायची काय? जागे व्हा ......
  Reply
 9. विनोद
  Aug 1, 2017 at 3:31 pm
  येडबंबू साेम्या, तापट बापट , विक्षीप्त कद्रे, परभाषिक ताई ज्यांना मराठीचा गंध नाही यांच्या प्रतिक्रीया अतिषय उच्च दर्जाच्या भिकार अाहेत. त्यासाठी त्यांचे अभीनंदन .
  Reply
 10. V
  vivek
  Aug 1, 2017 at 3:24 pm
  सरकारच अकार्यक्षम असल्यावर इतर सरकारी संस्थांचे विचारायलाच नको
  Reply
 11. H
  harshad
  Aug 1, 2017 at 3:19 pm
  bapat- १) सेर्वजणांनी एक्तत्र येऊन कुलुगुर्जींची काय गोची केली ते सांगा? आणि तसे पुरावे द्या. फुकाचे आरोप नका करू? २) Online. उत्तरपत्रिका तपासायचा निर्णय कुणाचा होता? ३) जुनी कंत्राटे रद्द Karun नवी घालायचा घाट कुणी घातला? ३) जर सर्व मिळून त्रास देत असतील तर त्याची तक्रार सरकार कडे का केली नाही? का Maharashtra मधील सरकार पण काँग्रेस धार्जिणे? ४) येथे मुलांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला त्याचे काही नाही. पण काँग्रेस ला शिव्या घातल्या शिवाय तुमचा दिवस जात नाही. ५) जो आपल्या हाताखालच्या माणसाना सांभाळू शकत नाही तसल्या माण का बसवले? हि पहिली नाही Batra, चौहान, चंद्रकला Padia, य सुदर्शन राव लोकेश चंद्र सगळे रत्न आहेत
  Reply
 12. S
  Shriram
  Aug 1, 2017 at 2:19 pm
  अमित. माझे विचार ठाम आहेत. संपादक जरी नेहेमी त्याविरूध्द लिहीत असले तरी त्यांचे विचार स्वातंत्र्य मी मान्य करतो. मी काही त्यांना काविळग्रस्त वगैरे म्हणत नाही.
  Reply
 13. R
  Raj
  Aug 1, 2017 at 1:28 pm
  आणखी एक " गजेंद्र चौहान" !
  Reply
 14. U
  Ulhas
  Aug 1, 2017 at 12:53 pm
  ऑनलाइन पेपर तपासण्याचा, पुरेशा तयारीविना झालेला विचका म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार होय. दुर्दैवाने, सर्वच क्षेत्रात (अगदी कार्पोरेट सुद्धा) असे उंटावरून शेळ्या हाकणारे सापडतात. असे होण्यामागचे चपखल कारण अग्रलेखातच सापडते आणि ते म्हणजे 'व्यवस्थेला बिनचेहऱ्याची माणसे आवडतात. कारण त्यांच्याकडून कधी आव्हान निर्माण होत नाही.'
  Reply
 15. A
  AMIT
  Aug 1, 2017 at 12:46 pm
  बापट आणि सोमनाथ हे कमालीचे संपादक कावीळग्रस्त आहेत. यांना विद्यार्थ्यांचे बरे वाईट झाले तरी बेहत्तर पण आम्ही संपादकांच्या विरोधातच लिहिणार असा हेका घेतला आहे. संपादक बोलतात त्या भक्त गणंगांपैकी हे दोघे उच्च कोटीचे नमुने. चालुद्यात, वाचणारे या दोहोंचा नीच पणा नमूद करत आहेतच.
  Reply
 16. M
  Mahesh
  Aug 1, 2017 at 10:47 am
  Ethun pudhe asle Gadhavch kulguru vagere honar. Sangh wale yede nahit tyala kulguru karayla. Ek aakhi university pahike tashi wakwta yete na. Thod thamba, syllabus pan badlatil he lok.
  Reply
 17. B
  bhakti
  Aug 1, 2017 at 10:07 am
  हेमंत कद्रे यांची प्रतिक्रिया छानच! खरोखरी रोज वर्तमानपत्र उघडलं कि आज कोणाला धारेवर धरलं आणि त्याचा मोदींशी संबंध कसा लावलाय हे पाहणेच मजेचे ठरते .. अग्रलेखातून वैचारिक उहापॊह कधीच हद्दपार झाला आहे.
  Reply
 18. R
  Rakesh
  Aug 1, 2017 at 9:46 am
  श्रीराम, "त्या सर्वानी एकत्र येऊन कारस्थान करत दैशमुखांची कोंडी केली" हे जर सत्य असेल तर असला बुळचट माणूस इतक्या मोठ्या पदावर कशाला बसविला? ज्या माण स्वतःच्या अधिकाराचा वापर करता येत नाही आणि दुसऱ्यांकडून जबाबदाऱ्या पार पडून घेता येत नाहीत अशा माण फक्त "ते खरोखरच संघाच्या जवळ असावेत" म्हणून कुलगुरू पदी नेमणे याचे कारण काय? तर तुम्ही ज्यांची भलावण करता त्यांना या देशात परत चातुर्वर्ण्य व्यवस्था आणायची आहे म्हणून? प्रतिक्रिया - प्रयत्न पहिला - ९:४५ वाजता
  Reply
 19. H
  Hemant Kadre
  Aug 1, 2017 at 7:36 am
  मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईबाबत लिहीतांना त्याअनुषंगीक मुद्यांचा उहापोह अपेक्षीत होता. त्यात निश्चलीकरण व संघवर्तूळ याचा उल्लेख अप्रस्तुत ठरतो. याकरिता तुम्ही ट्रंप, मोदी यांना जवाबदार धरले नाही याचे आभारच मानावे लागतील! आजकाल जमानाच मोठा वशील्याचा आहे. पात्रता नसतांना व्यक्ती पदावर बसतात असे अनेक ठिकाणी दिसते. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांचे संपादकही हुजरेगिरी करण्याच्या क्षमतेवर निवडले जातात. आजचा बघितला की कालचा बरा असे म्हणायची वेळ येते. अगदी अग्रलेख देखिल मागे घेण्याची वेळ येते. कुठे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी निर्माण केलेल्या उच्च आदर्शवादी परंपरा आणि कुठे आजचे संपादक असा विचार मनात येतो.
  Reply
 20. S
  Shriram
  Aug 1, 2017 at 4:56 am
  एकूण देशमुखांच्या वाईट असण्यापेक्षा अनेकांची त्यानी अपेक्षापूर्ती केली नाही. त्या सर्वानी एकत्र येऊन कारस्थान करत दैशमुखांची कोंडी केली. ते खरोखरच संघाच्या जवळ असावेत.म्हणूनच अशी कोंडी करण्यात पूर्व कुलगुरू निवृत्त राज्यसभा सदस्य मुणगेकर यांनी खास पुढाकार घेतलेला दिसतोय.
  Reply
 21. Load More Comments