गोमांसाच्या संशयावरून देशात मुसलमानांवर हल्ल्याच्या घटना वाढत चालल्याने मोदी यांनी यावर बोलणे गरजेचे होतेच..

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाचे बोलले. छोट्यामोठ्या कलाकाराच्या वाढदिवशी शुभेच्छा ट्वीट करणारे, मोठय़ा देशांच्या प्रमुखांना स्वत:च बिलगणारे, मन की बात साऱ्या जगाला सांगणारे असे आपले बहुबोलके पंतप्रधान गोप्रेमींच्या हिंस्र धुडगुसावर सातत्याने मौन बाळगत होते. ते मौन त्यांनी गुरुवारी अखेर सोडले. जुनद खान, पेहलू खान, जाहिद रसूल भट, अबू हनिफा, रियाजुद्दीन अली आदी जवळपास १८ जणांच्या हत्येनंतर का असेना पंतप्रधान बोलले. हे सर्व गोरक्षकांच्या हल्ल्यात बळी पडलेले मुसलमान. त्यांना मारणाऱ्यांचे गाईंवर अतिशय प्रेम. आपल्या देशात कोणत्याही रस्त्यावर हाडे वर आलेल्या, भाकड झाल्या म्हणून मालकांनी सोडून दिलेल्या आणि उपाशीपोटी हिंडणाऱ्या गाईंचे कळप दिसत असतात. हे इतके सारे गोरक्षक आसपास असल्याखेरीज का गाई इतक्या मोकळेपणाने हिंडू शकतील? तेव्हा या गोरक्षकांना गाईच्या रक्षणाचा इतका ध्यास की गाईचे मांस खाल्ले जात असावे या केवळ संशयावरून त्यांचे रक्त उसळते. मग हे हिंदुहितरक्षक गोपालक आपल्या मातेचा म्हणजे गाईचा अपमान करणाऱ्याचा कोथळाच बाहेर काढतात. गाय वास्तविक शाकाहारी. पण तिचे हे मानसपुत्र भलतेच हिंसक. आतापर्यंत साधारण दीड डझन म्लेंच्छांचा जीव घेतल्यानंतर आणि आणखीही काहींना गाईंसाठी प्राणार्पण करावे लागेल ही शक्यता दिसू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी यावर बोलावेसे वाटले ही घटना कायदाप्रेमी नागरिकांसाठी निश्चितच स्वागतार्ह ठरते. मोदी यांनी आपल्या भाषणात गोरक्षकांना अहिंसेचे महत्त्व पटवून दिले. तेदेखील जागतिक कीर्तीचा अहिंसा प्रचारक मोहनदास करमचंद गांधी यांच्या साबरमतीकाठच्या आश्रमातून. ही अशी समयसूचकता अन्य कोणाकडे आहे बरे? गुजरात, गांधी आणि मोदी यांना प्रिय असलेली अहिंसा यांचे अतूट नाते असल्यामुळे त्यांच्या कालच्या विधानांकडे गांभीर्याने पाहायला हवे. सर्व जनता नाही तरी निदान गोरक्षक तरी ते तसे पाहत असतील अशी आशा करायला हवी.

मोदी यांनी या संदर्भात काही बोलावयाची निश्चितच गरज होती. याचे कारण आकडेवारी दर्शवते की, मुसलमानांवरील एकूण हल्ल्यांपकी ९७ टक्के हल्ले हे मोदी यांच्या राज्यारोहणानंतर झाले आहेत. वास्तविक गोमांसाच्या संशयावरून मुसलमानांवर हल्ल्याच्या घटना २०१० पासूनच नोंदल्या गेल्या आहेत. सरकारदरबारी अशा ६३ घटनांची नोंद आहे. त्यातील ८६ टक्के घटनांत मुसलमानांचा मृत्यू झाला आहे आणि मुसलमानांचा जीव घेणाऱ्या एकूण घटनांपकी तब्बल ९७ टक्के घटना मे २०१४ नंतर घडत गेल्या आहेत. २०१४ सालच्या मे महिन्यात मोदी सत्तेवर आले; परंतु त्यासाठी मोदी यांना बोल लावणे योग्य नव्हे. एखाद्याने एखाद्याला भोसकायचेच ठरवले तर पंतप्रधानपदावरील व्यक्ती बिचारी काय करू शकणार? आता त्या भोसकण्यामागील कारण गोमांस खाल्ल्याचा/बाळगल्याचा संशय असेल तर त्यात तरी पंतप्रधानांचा काय दोष? या सर्व घटना जेथे घडल्या तो प्रदेश राज्यांच्या अखत्यारीत असतो. कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्यांची जबाबदारी. तेव्हा केंद्रात सत्ताप्रमुख असलेल्या मोदी यांना यासाठी निश्चितच बोल लावता येणार नाहीत. आता ही बाब अलाहिदा की या ६३ गोहल्ल्यांपकी निम्म्याहून अधिक हल्ले हे भाजप-चलित राज्यात घडले आहेत. राज्यांवर राज्य असते ते मुख्यमंत्र्यांचे. तेव्हा या हत्यांसाठी त्यांना जबाबदार धरायला हवे. पंतप्रधानांना नाही. त्यामुळे कायदा आपल्या हाती घेण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे पंतप्रधानांचे कालचे गोरक्षकांना उल्लेखून केलेले विधान त्यांच्या कर्तव्यकठोरतेची साक्ष देणारेच आहे. ज्यांना कोणास गोभक्ती करावयाची असेल त्यांनी ती खुशाल करावी. परंतु त्यासाठी कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार या गोपूजकांना नाही, हे मोदी यांचे विधान निश्चितच आश्वासक ठरते. मोदी नुकतेच वॉशिंग्टनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बिलगून आले. ट्रम्प यांचे कायदाप्रेम, सहिष्णुता, अन्य धर्मीयांविषयी त्यांना असलेला आदर आदींमुळेही असेल कदाचित. परंतु अमेरिका दौऱ्याहून आल्याच्याच दिवशी मोदी यांनी गोरक्षकांना खडसावले. मनुजास ‘केल्याने देशाटन’ चातुर्य येते असे आपले पूर्वज सांगतात. हा नियम अर्थातच तुम्हाआम्हा सामान्य बुद्धिमत्तेच्या मानवांसाठी. म्हणजे ज्यांच्यात अकलेचा अभाव आहे त्यांना देशाटनाने चातुर्य येते. परंतु जे मूलत:च बुद्धिमान आहेत, चमकदार आहेत त्यांना हा नियम जसाच्या तसा लागू होत नाही. म्हणजेच मोदी हे यात मोडत नाहीत. पण तरी त्यांनाही त्यांच्या अखंड पर्यटनाचा फायदा होतच असणार. वर्षभरानंतर त्यांनी ज्या काही तीव्रतेने गोरक्षकांना खडसावले आहे, त्यावरून हेच दिसून येते.

आता हा केवळ योगायोग की मोदी यांनी पवित्र साबरमती आश्रमात गोरक्षकांना चार खडे बोल सुनावण्याच्या आदल्याच दिवशी देशभरातील प्रमुख महानगरांत निदर्शने घडली. इंग्रजी वर्तमानपत्रे वाचणारे, आपापसात इंग्रजीतूनच बोलणारे, पंचतारांकित साधेपणा अंगाखांद्यावर मिरवणारे, भारतीयांकडे ब्रिटिश जसे नेटिव्ह म्हणून पाहत तसे पाहणारे, पुरोगामी म्हणवून घेणारे आदी अनेक जण अलीकडच्या काळातील या गोरक्षकांच्या धुडगुसाचा निषेध करण्यासाठी एकत्र जमले. Not In My Name हे त्यांचे घोषवाक्य. याचा एक अर्थ असाही होतो की मी नाही त्यातला किंवा त्यातली. आता हे कसे त्यातले असणार? आणि त्यांची फिकीर सत्ताधीशांनी का करायची? हे ना निवडणुकीत मत देणारे, ना निधी देणारे. यांनी कधी नेले असणार आहे का गाईला चरायला? यातले कोणी कधी हिंडले असतील का अंगण सारवण्यासाठी शेण शोधत? काय असणार यांना गाईचे महत्त्व? नुसते अभिजन कुठले! हे वर्तमानपत्रे वाचणार, ते वाचून आपली मते बनवणार आणि वर मी नाही त्यातला असे म्हणणार. खरे तर हा अभिजन, विचारवंत वगरे म्हणवणारा वर्ग त्यातलाच काय कशातलाच नसतो. या वर्गाने प्रेमापोटी काही कधी केलेले नसते. त्यांचे सगळेच मोजूनमापून आणि सुरक्षित. त्यामुळे आपल्याला प्राणाहून प्रिय अशा गोमातेचे प्राण कोणी घेत असेल तर त्याचे प्राण घेण्यातला कर्तव्यपूर्तीचा आनंद यांना काय कळणार? अशांना चार रट्टेच दिले पाहिजेत. पण ते देता येत नाहीत ना. कारण हे अभिजन जनांत लोकप्रिय असतातच. पण आपल्या लाडक्या हिंदुहृदयसम्राटाप्रमाणे समाजमाध्यमांतही त्यांचे खूप चाहते असतात. जमिनीवरच्या चाहत्यांची फिकीर एक वेळ केली नाही तरी चालेल. त्यांच्या काय मुसक्या आवळता येतात. पण हे समाजमाध्यमांतले वावदूक काही हाताशी लागत नाहीत. त्यामुळे त्यांना गप्प बसवता येत नाही. आणि परत परदेशात बदनामी करतात हे लोक आपल्या भारतमातेची. तिकडे काय सगळेच गोमांसभक्षक. ते लगेच यांच्यावर विश्वास ठेवतात. परकीय गुंतवणूक, भांडवल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँका वगरे सर्वच परदेशी. म्हणून दखल घ्यावी लागते त्यांना काय वाटेल याची. तेव्हा आपल्या दोन परदेश दौऱ्यांच्या मधला काळ मातृभूमीच्या सेवेत घालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना का खडसावले ते समजून घेता येईल.

यामुळे आता पुढच्या परदेश दौऱ्यात कोणी समजा त्यांना विचारलेच की तुमच्या देशात गोरक्षणावरून इतका हिंसाचार सुरू आहे आणि तुम्हीच काहीच कसे करीत नाही, तर आपले पंतप्रधान या खडसावण्याचा दाखला देत ताठ मानेने म्हणू शकतील : मी नाही त्यातला.