22 October 2017

News Flash

नवनैतिकतेची नौटंकी

येनकेनप्रकारेण मिळेल त्या राज्यात सत्ता मिळवणे हे भाजपचे अलिखित ध्येय आहे, हे आता बिहारातही

लोकसत्ता टीम | Updated: July 28, 2017 3:56 AM

नितीशकुमार (संग्रहीत छायाचित्र)

येनकेनप्रकारेण मिळेल त्या राज्यात सत्ता मिळवणे हे भाजपचे अलिखित ध्येय आहे, हे आता बिहारातही दिसले..

भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर राजीनामा देणाऱ्या नितीशकुमार यांचे अभिनंदन केल्यानंतर काही तासांत तामिळनाडूतील रामेश्वरम येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्मा जयललिता यांच्या अनुपस्थितीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने तयार झालेली पोकळी जाणवते असे मोदी म्हणाले आणि आपल्यावर त्या आशीर्वादांचा वर्षांव करीत असतील अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. जयललिता यांची चारित्र्यसंपन्नता, नैतिकता आदी गुणांच्या आठवणीने पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला किंवा काय, हे कळावयास मार्ग नाही. परंतु त्यांच्या या वक्तव्याने आणि भाजपच्या एकंदरच वर्तनाने तो पक्षदेखील सत्तेसाठी नेसूचे काढून डोक्यास गुंडाळण्यास किती आतुर आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले. वास्तविक या देशात याआधी पक्षांतरे झालीच नाहीत, असे नाही. सत्तेसाठी स्वत:चा पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन करण्याचे प्रकारही अनेकदा घडले. परंतु संयुक्त जनता दलाचे नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या भाजपने जे काही केले त्यास तोड नाही. ‘भारत हा रास्व संघमुक्त झाला पाहिजे,’ ‘मोदी हे वादळ नाही, ही तर हेअरड्रायरची झुळूक’, ‘मोदी हे ‘संप्रदायी’ आहेत,’ अशी तडफदार विधाने करणाऱ्या नितीशकुमार यांनी आपली तडफ अखेर म्यान केली आणि भाजपच्या साथीने नवीन घरोबा सुरू केला. गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात उभ्या ठाकलेल्या नितीश यांच्यावर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्या जनुकांतच दोष असल्याची टीका केली. नितीश नेहमी मित्र म्हणवणाऱ्यांनाच दगा देतात, असे मोदी यांचे म्हणणे. त्यास नितीशकुमार यांनी घणाघाती हल्ल्याने प्रत्युत्तर देत ५० हजार बिहारींच्या जनुकांचे नमुनेच त्या वेळी मोदी यांच्याकडे पाठवू पाहिले.

आज ते स्वत:च मोदी यांच्यासमोर दाखल झाले. त्यांच्या लालू हटाव नाटकाची सुरुवात केंद्रीय गुप्तचर खात्याने लालूपुत्रांवर केलेल्या कारवाईतूनच सुरू झाली. किंबहुना नितीश यांना लालूंशी सहज काडीमोड घेता येऊन भाजपशी पाट लावता यावा या हेतूनेच लालूपुत्रांवर कारवाई सुरू झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लालूंच्या भ्रष्ट उद्योगांविषयी आणि ते व त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या कारवायांविषयी सहानुभूती बाळगण्याचे काहीही कारण नाही. या यदुवंशीयाने केवळ बिहारलाच नव्हे तर साऱ्या देशालाच लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यादवांच्या या थव्यांना रोखण्याची गरज होती, हे मान्यच. पण मुद्दा लालू आणि भ्रष्टाचार हा नाही. तर तो नितीशकुमार आणि भाजप यांच्या तद्दन भंपकपणाचा आहे. नितीशकुमार यांना भ्रष्टाचाराची इतकी चाड होती तर पहिल्यांदा त्यांनी लालूंशी हातमिळवणीच करायला नको होती. दुसरे असे की त्यांना निधर्मीवादाची इतकी असोशी होती तर त्यांनी मुदलात भाजपशीही हातमिळवणी करायला नको होती. हे दोन्ही उद्योग त्यांनी केले. म्हणजेच नितीशकुमार यांना ना भ्रष्टाचाराची चाड आहे ना धर्मवादी राजकारणाची. राजकारणाचे गुन्हेगारीकरण या सदाबहार बिहारी विषयावरही नितीशकुमार सज्जनतेचा आव आणत बोलतात. परंतु खुद्द त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्याच नेतृत्वाखालच्या विधिमंडळ गटात तब्बल ४७ आमदारांवर लहानमोठय़ा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणजे फक्त लालू एकटेच पापी आणि अन्य मात्र संतमहंतांची मांदियाळी असे चित्र नाही. नितीशकुमार तर या सगळ्याला अपवाद अजिबातच नाहीत. मिळेल त्याच्या मदतीने बिहारची गादी सांभाळायला मिळावी इतकीच काय ती त्यांची इच्छा. पण दरम्यानच्या काळात नितीशकुमार हे कोणी मोठे साव आहेत आणि ते पर्यायी नेतृत्व देऊ शकतात असे हाकारे निधर्मीवाद्यांच्या कळपातून घातले गेले. त्याही वेळी आम्ही यामागील फोलपणा दाखवून दिला होता. आताही तोच दाखवून द्यावा लागणार आहे. याचे कारण बिहारची सत्ता मागच्या दाराने बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न. देशभरात मोदी लाट असतानाही बिहार विधानसभेने भाजपच्या पदरात सत्तेचे दान टाकले नाही. लोकसभा निवडणुकांच्या देदीप्यमान यशाच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांत उलट बिहारी जनतेने भाजपचे नाक कापले. हा सल भाजपला सतत होता. ४० खासदार संसदेवर पाठवणारा बिहार आपल्या हाती असायला हवा ही भाजपची आस होती. ती सरळ मार्गाने पूर्ण होण्याची शक्यता नाही आणि नव्हतीही. त्यात जर नितीशकुमार हे महागठबंधन नामक अजागळ आघाडीचे नेते निवडले गेले असते तर भाजपसमोर २०१९ साली आणखीनच आव्हान निर्माण झाले असते. उत्तर प्रदेशात ८० पैकी ७२ खासदार भाजपचे आहेत. उत्तर प्रदेशाखालोखाल ४८ खासदारांना निवडणारा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु कृषी क्षेत्रावरील संकट आणि शिवसेनेचे आव्हान यामुळे पुढील निवडणुकांत तो कसा वागेल याची शाश्वती नाही. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश आदी बडय़ा राज्यांचीही शाश्वती नाही. अशा वेळी बिहारसारख्या राज्यातील परिस्थिती अनुकूल असणे भाजपसाठी आवश्यक होते. त्यामुळेच केंद्रीय गुप्तचर आदी यंत्रणांचा पद्धतशीर वापर करून आधी लालू आणि नितीश यांच्या घटस्फोटाची रीतसर व्यवस्था केली गेली आणि तो झाल्या झाल्या हाती वरमाला घेऊन टपूनच बसलेल्या भाजपने क्षणाचाही विलंब न लावता नितीशकुमार यांचा सत्तेचा मळवट पुसला जाणार नाही, अशी चोख तडफ दाखवली. व्यावहारिक भाषेत या कृत्यास व्यभिचार असे म्हणतात. काँग्रेस, लालू यांचा राजद, मुलायम सिंग यांचा सपा आदी पक्ष हे इतके दिवस अशा राजकीय व्यभिचाराचा आपला लौकिक राखून होते. पण यापुढे त्यांना या आघाडीवरही भाजपच्या कडव्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे. तेव्हा भ्रष्टाचार विरोध, निधर्मी राजकारण आदी शब्दप्रयोग हे केवळ थोतांड आहेत. मोदी म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या पक्षास भ्रष्टाचाराची इतकीच चाड असती तर व्यापम ते छत्तीसगडी मंत्र्यांच्या पत्नीचा जमीन घोटाळा यातील एका तरी प्रकरणाची तड भाजपने लावली असती. तसेच उत्तरेतील नारायण दत्त तिवारी यांच्यापासून ते दक्षिणेतील एसएम कृष्णा यांच्यापर्यंत एकापेक्षा एक भणंगभरती भाजप करता ना. या दोहोंच्या मधल्या महाराष्ट्रातही भाजपत जे नामांकित गणंग भरले गेले तेदेखील मोदी यांच्या कथित भ्रष्टाचारविरोधी भूमिकेशी सुसंगत नाही. याचा अर्थ इतकाच की येनकेनप्रकारेण मिळेल त्या राज्यात सत्ता मिळवणे हे भाजपचे अलिखित ध्येय आहे. गोवा, मणिपूर आणि आता बिहारात जे काही घडले त्यातून ते उघड दिसते. हे उद्योग करताना २०१९ वर भाजपचा डोळा आहे आणि त्यासाठी हे बेरजेचे राजकारण सुरू आहे. परंतु या संदर्भात एक धोक्याचा इशारा द्यायलाच हवा.

तो म्हणजे राजकारणात दोन अधिक दोन याचे उत्तर चार असतेच असे नाही. ते प्रसंगी तीनदेखील असू शकते. म्हणजेच या सगळ्यांना बरोबर घेत गेल्याने यांच्या कथित शक्तीची आपल्या कथित शक्तीशी बेरीज होऊन आपले संख्याबळ वाढेल असा जर भाजपचा होरा असेल तर ते तसे होईलच असे नाही. याचे कारण असे करणे म्हणजे मतदारांना गृहीत धरणे. ते तसे धरले गेले की काय होते याचे असंख्य दाखले भारतीय राजकारणाच्या इतिहासात पावलोपावली मिळतील. त्यात मोदी आणि शहा यांच्या साहसवादी राजकारणाच्या उदाहरणाची भर पडणारच नाही असे नाही. मतदार म्हणजे भक्त नव्हेत. नैतिकता आणि नवनैतिकतेची नौटंकी यातील फरक त्यांना निश्चितच कळतो.

First Published on July 28, 2017 3:56 am

Web Title: nitish kumar back as bihar cm with nda support
टॅग Nitish Kumar