भाजपविरोधी मतांची विभागणी टाळावयाची असेल तर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे असे नितीशकुमार यांना आता वाटू लागले आहे.

आज प्रत्येक राज्यात मोदी आणि विशेषत: भाजपविरोधाची भावना प्रबळ होऊ लागली आहे. अण्णा द्रमुक, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, माकप, सपा,बसपा, आम आदमी असे अनेक पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र उभे राहू लागले आहेत. शिवसेना, अकाली दल, तेलुगू देसम असे काही मोजके पक्ष भाजपच्या साथीला आहेत. परंतु संधी मिळाल्यास भाजपला खाली पाडायला यातील एकही मागे हटणार नाही.

भारताला जेव्हा अमेरिकेने महासंगणक नाकारला तेव्हा विजय भटकर यांनी त्याचे भारतीय प्रारूप विकसित केले. प्रचंड क्षमतेच्या एका संगणकाऐवजी त्यांनी मध्यम क्षमतेचे अनेक संगणक एकमेकांना जोडले आणि समांतर प्रक्रियेच्या साह्य़ाने परम हा त्यातल्या त्यात भारतीय महासंगणक तयार झाला. त्यांची एकत्रित क्षमता महासंगणकाइतकी नव्हती हे मान्य. तरी त्याच्या जवळपास जाणारी नक्कीच होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे शिक्षणाने अभियंते आहेत. त्यांचे संगणकाचे ज्ञान कितपत आहे, हे कळावयास मार्ग नाही. परंतु तरी ते भटकर यांनी ऐंशीच्या दशकात वापरलेली क्लृप्ती एकविसाव्या शतकातील राजकारणात वापरू इच्छितात असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात त्यांनी दिलेली ताजी हाक हे याचे निदर्शक मानावे लागेल. भाजपचा पराभव करावयाचा असेल तर सर्व समविचारी पक्षांनी त्याविरोधात आगामी निवडणुकांत एकत्र येऊन आघाडी करावी असा त्यांचा प्रयत्न असून तीन वर्षांवर असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी ते आताच त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. भाजपविरोधी मतांची विभागणी टाळावयाची असेल तर सर्वच पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे त्यांना वाटते. त्यांचा मुद्दा बरोबर आहे. परंतु प्रश्न मार्गाविषयी आहे.

नितीशकुमार हे समाजवादी विचारसरणीचे अध्वर्यू दिवंगत राममनोहर लोहिया यांच्या राजकीय घराण्याचे. मुलायमसिंग आणि लालूप्रसाद हे दोन यादव, नितीशकुमार आदी लोहिया यांच्या राजकारणातील बाळे. लोहिया यांनी त्या वेळी देशात बिगर काँग्रेसवादाची हाक दिली होती. भांडवलशहांचा बगलबच्चा असलेल्या काँग्रेसला पराभूत करावयाचे असेल तर समाजवादी विचारसरणीच्या सर्वानी हातात हात घालून लढावयास हवे, असा त्यांचा आग्रह होता. आणीबाणीच्या नंतर दिवंगत जयप्रकाश नारायण यांनी काही काळ हा लोहिया यांचा बिगर काँग्रेसवाद पुढे नेला. काँग्रेसविरोधाची नशा या मंडळींना काही काळ इतकी होती की त्यासाठी त्यांनी समाजवादी विचार, धर्मनिरपेक्षता आदींचे सोवळे खुंटीवर टांगून भाजपशीदेखील हातमिळवणी करण्यास त्यांना कमीपणा वाटला नाही. परंतु काँग्रेस नको, ही त्यांची भूमिका होती. पुढे तिचे इतके विकृतीकरण झाले की काँग्रेस नको म्हणत म्हणत त्यातल्या अनेकांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्याच भल्यासाठी हातभार लावला. लालू, मुलायम आणि नितीश यांनीदेखील काँग्रेसचा ब संघ म्हणून काम केले. त्यामागे होते त्यांचे प्रादेशिक राजकारण. काँग्रेसने दिल्लीवर राज्य करावे आणि आमचे सुभे आम्हाला गोंधळ घालण्यासाठी रिकामे सोडावेत अशी ही योजना होती. त्यातून हे लालू, मुलायम वगरे समाजवादी पिलावळीतले सरंजामदार तयार झाले आणि त्यांनी अक्षरश: धुडगूस घातला. बरे, यांची भाषा धर्मनिरपेक्षतेची. त्यामुळे आंग्लाळलेल्या भाजपद्वेष्टय़ा माध्यमांनी त्यांच्या पापांकडे दुर्लक्ष केले. सुमार भाजपवाल्यांपेक्षा बनेल समाजवादी परवडला असा तो विचार होता. त्यामुळे या उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांत या मंडळींच्या बेडक्या चांगल्याच फुगल्या. नितीशकुमार हे यांतील पुढल्या पिढीचे.

वास्तविक राष्ट्रीय राजकारणात त्यांना काँग्रेससमवेत शय्यासोबत वज्र्य नाही आणि राज्याच्या राजकारणात इतके दिवस भाजपचा घरोबाही त्यांना नामंजूर नव्हता. किंबहुना दिल्लीत नरेंद्र मोदी यांचा उदय होत असताना नितीशकुमार यांना सुशील हे भाजपचे दुसरे मोदी सहकारी म्हणून मान्यच होते. त्यांचे ते समीकरण पुढे फाटले. त्यामुळे भाजप त्यांच्यासाठी एकदम संकुचित जातीय, धार्मिक पक्ष बनला आणि आता त्याविरोधात एकत्र येण्याची गरज त्यांना वाटू लागली. वास्तविक बिहारात त्यांचा कार्यकाल यथातथाच सुरू आहे. दारूबंदी हीच त्यांच्या धडाडीची मजल. विचारसरणीच्या अक्षावर कोणत्याही टप्प्यावर असलेल्या आपल्या राजकारण्यांना नतिकतेचा टेंभा मिरवण्यासाठी मध्ये मध्ये दारूबंदीची उबळ येते. या मुद्दय़ावर त्यातल्या त्यात प्रामाणिक आहेत ते डावेच. कष्टकऱ्यांच्या क्रांतीच्या स्वप्नास स्कॉचची साथ हवी यावर ज्योती बसू ते सीताराम येचुरी अशा सर्वाचाच विश्वास असल्याने ते कधी दारूबंदीच्या वगरे फंदात पडले नाहीत. परंतु समाजवाद्यांचे तसे नाही. जगण्याकडे अत्यंत कुंथित नजरेने पाहणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांना दारूबंदीचा निर्णय घेतला की आपले जीवितकर्तव्य पूर्ण झाल्यासारखे वाटते. नितीशकुमार हेदेखील याच माळेतले असल्याने बिहारच्या प्रगतीसाठी त्यांनी नुकतीच दारूबंदी केली. त्याचमुळे या निर्णयाच्या नशेत नितीशकुमार यांनी देशात मोदींविरोधात आघाडीची हाक दिली असून राज्याराज्यांतील असे सुभेदार त्यावर धावून येतील अशी आशा त्यांना आहे. ती अनाठायी नाही. याचे कारण आज प्रत्येक राज्यात मोदी आणि विशेषत: भाजपविरोधाची भावना प्रबळ होऊ लागली असून नितीशकुमार यांच्या हाकेची म्हणूनच दखल घ्यावयास हवी. तामिळनाडूत जयललिता यांचा अण्णा द्रमुक आणि करुणानिधी यांचा द्रमुक, पश्चिम बंगालात ममता बॅनर्जीची तृणमूल काँग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट, उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यांचा सपा आणि मायावती यांचा बसपा, पंजाब आणि दिल्लीतला आम आदमी असे अनेक पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र उभे राहू लागले असून या क्षणाला भरवशाचा म्हणता येईल असा एकही साथीदार पक्ष भाजपसमवेत नाही. नाही म्हणायला महाराष्ट्रात शिवसेना, पंजाबात अकाली दल आणि आंध्रातील तेलुगू देसम असे काही मोजके भाजपच्या साथीला आहेत. परंतु ही सर्व सोयीची सोयरीक असून संधी मिळाल्यास भाजपला खाली पाडायला यातील एकही मागे हटणार नाही. त्या अर्थानेही हे काँग्रेससारखेच. काँग्रेस जेव्हा राष्ट्रीय पातळीवर जोमात होती तेव्हा त्या पक्षाच्या वळचणीलाही अनेक छोटेमोठे पक्ष असत. आता त्या पक्षाची जागा भाजपने घेतलेली असल्यामुळे आता भाजपच्या वळचणीला हे पक्ष आहेत. तेव्हा त्यांना काही भाजपचे साथीदार म्हणता येणार नाही. पंजाबातील निवडणुकांत फटका बसल्यास अकाली, आंध्रातील गरज संपल्यास तेलुगू देसम आणि पुढील वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांतील निकालांनंतर शिवसेना हे पक्ष भाजपची साथ सोडणारच नाहीत असे नाही. किंबहुना तशी ती सोडण्याचीच शक्यता अधिक. तेव्हा अशा वेळी नितीशकुमार यांच्या भाजपविरोधी पक्ष जोडो अभियानास गती येऊ शकते. परंतु याचे भान भाजपला असल्याची लक्षणे तूर्त तरी नाहीत. देशपातळीवर काँग्रेसमुक्त भारत करणे, तृणमूलमुक्त प. बंगाल करणे आणि भ्रष्टाचारशिरोमणी असलेल्या अण्णा द्रमुकला दूर करणे ही या पक्षाची स्वप्ने आहेत. परंतु त्यात वास्तवाचे भान नाही. विशेषत: भाजपचा भ्रष्टाचारविरोधाचा आव तर शुद्ध थोतांड आहे. तामिळनाडूतील ज्या व्यक्तीस भाजप देशातील सर्वाधिक भ्रष्ट ठरवतो त्याच जयललिता यांच्या अभिनंदनास पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते, याकडे कानाडोळा कसा करणार? महाराष्ट्रातही भ्रष्टाचारशिरोमणी म्हणून नावे ठेवलेल्या शरद पवार यांच्या बारामतीची धूळ मस्तकी धारण करण्यासाठीही मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तेथे भेट दिली होती, याचेही विस्मरण कसे होणार?

या सगळ्याचा अर्थ इतकाच की नितीशकुमार यांची भाजपविरोधी युतीची हाक ही तूर्त अतिरेकी कल्पना वाटत असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अमेरिकेने संगणकाबाबत ती चूक केली आणि मध्यम क्षमतेच्या संगणकांची मोट बांधून आपण मार्ग काढला. संगणकाबाबत जे घडले ते राजकारणाबाबतही घडू शकते. सध्या भाजपविरोधाची हाक देणारे सर्वच काडीपलवान असले तरी पाचपंचवीस काडीपलवानांनी पण केलाच तर  ते हिंदकेसरीस..पराभूत नसेल एकवेळ पण..जेरीस नक्कीच आणू शकतात.