वास्तवापासून पलायनाचा मार्ग चित्रपटांतून जातो; तर मोबाइलमधील खेळांनी आता वास्तवाच्या उत्कटीकरणामुळे लोकांना वेड लावले आहे.. अखेर प्रत्येक लाट एखाद्या खडकावर फुटतच असते. हे सर्वच क्षेत्रांत – मग ते रंजनाचे असे, सामाजिक असो की राजकीय – घडत असताना आपण प्रत्यही पाहतोच. त्याला कबालीवा पोकेमॉन गोअपवाद असण्याचे कारण नाही.

संपूर्ण जगात गेल्या काही दिवसांत दोन लाटा आदळल्या आहेत. त्यातील एक लाट पोकेमॉन गो या खेळाची. ती जपानमधून उगम पावली आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असे करीत जगभरात पसरली. येत्या काही दिवसांत भारतही त्यात बुडणार असून, आपल्या राष्ट्रीय सवयीनुसार अनधिकृतपणे तो अनेकांच्या मोबाइलवर आलाही आहे. दुसरी लाट आहे ती रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या नव्या चित्रपटाची. काल तो प्रदर्शित झाला. रजनीकांत यांचा कोणताही नवा चित्रपट आला की जे होते तेच या वेळी घडले. ते केवळ भारतातच घडले असे मानायचे कारण नाही. जेथे जेथे रजनीकांत यांचे चाहते आहेत, त्या-त्या देशांत हे घडले आहे. याचे कारण त्यांचा कोणताही चित्रपट येणे ही त्याच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी ऐतिहासिक घटना असते. पण या वेळी त्याच्या चित्रपटाच्या स्वागताचे आजवरचे सर्व प्रकार फिके पडावेत असे काही वेगळेच घडत असून, लालम्लाल प्रचाराची सर्व अत्याधुनिक तंत्रे वापरून ‘कबाली’चे वादळ तयार करण्यात आले आहे. परिणामी चित्रपटगृहांतील पडद्यावर झळकण्यापूर्वीच त्याने तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे. हे पाहून ‘अँटिलिया’समोर गिरगावातील चाळीला जे वाटेल, तशीच या आकडय़ाने हिंदी चित्रपटसृष्टीतील १०० कोटी, २०० कोटी अशा कमाईगटांतील चित्रपटांची भावना झाली असेल. सामान्य तर्कबुद्धीने कुंठित व्हावे असाच हा प्रकार असून, या दोन्ही लाटांनी संपूर्ण जगालाच चकित करून सोडले आहे. त्यामुळे या अघटिताचा नेमका अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. यातील ‘पोकेमॉन गो’ या खेळाची जनप्रियता ही खरोखरच मेंदूच्या करडय़ा पेशींची सालटी काढणारी आहे.

रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाने त्याच्या चाहत्यांना ‘येड’ लागणे ही जशी नवी गोष्ट नाही, त्याचप्रमाणे खेळांच्या लोकप्रियतेतही काही नवलाई नाही. सर्वानाच कमी-जास्त प्रमाणात खेळांत रुची असते. किंबहुना माणूस नावाच्या प्राण्याला कळायला लागल्यानंतर आधी तो जगायला शिकला आणि जगता-जगता खेळायला असे म्हणता येईल. शिकार हे आदिम मानवाच्या जगण्याचे साधन होते. त्यातच त्याने खेळ शोधला. हा जो प्राणी मारण्याचा हिंस्र खेळ आहे, तो त्याच्या नेणिवेत एवढा खोलवर रुजलेला आहे, की आजच्या बहुतेक सर्व खेळांमध्ये त्या हिंसेचे अवशेष आढळतात. माणसाला खेळ आवडतात, अगदी ‘याड’ लावण्याएवढे आवडतात, त्याचे हे एक महत्त्वाचे कारण. एखादा खेळ एखाद्याला का आवडतो याची कारणे अनेक असू शकतात. त्यातही प्रमुख कारणे म्हणजे संस्कृती, क्षमता, ऐपत, मगदूर. क्रिकेटसारखा खेळ भारतीय उपखंडात एवढा लोकप्रिय का किंवा फुटबॉलपायी युरोपातील जनता दंगली का करते याची उत्तरे यात शोधता येतील. पण जगातील विविध देशांना, भिन्न संस्कृतींना एखादा खेळ एकाच वेळी लाटेसारखा कवेत घेतो, तेव्हा मात्र त्याची कारणे नेहमीपेक्षा वेगळ्या जागी शोधणे भाग आहे. ‘पोकेमॉन गो’ हा एरवी साधा मोबाइलवरील खेळ आहे. मुळात पोकेमॉन हे एक कार्टूनपात्र. लहान मुलांना वेड लावणारे आणि म्हणून घरोघरी मोठय़ा माणसांची डोकेदुखी वाढविणारे. त्या चित्रवाणी कार्टून मालिकेतील विविध पात्रे आणि प्रसंग घेऊन हा जपानमधील निन्तेन्दो आणि पोकेमॉन या कंपन्यांनी या मोबाइल खेळाची निर्मिती केली. यातही विशेष काही नाही. अशी जनप्रिय कार्टूनपात्रे घेऊन त्यावर विविध खेळ तयार करणे, चित्रपट काढणे किंवा संगणकीय खेळांवरून चित्रपट वा कार्टून मालिका तयार करणे असे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडलेले आहेत. लोकप्रियता वटविणे हा त्यामागील मुख्य हेतू. पोकेमॉन गो मागेही याहून वेगळा हेतू नाही. मात्र हा खेळ अन्य खेळांहून एका बाबतीत वेगळा आहे, तो म्हणजे त्यासाठी वापरण्यात आलेले आधुनिक तंत्रज्ञान. वास्तव आणि अवास्तव यांची सांगड घालून वास्तवाचे उत्कटीकरण करणे हा या तंत्रज्ञानाचा गाभा. मोबाइल फोनमधील कॅमेरा, जीपीएस यांची सांगड घालून हा खेळ मोबाइलमधील संगणकीकृत वास्तव आणि ‘वास्तवा’तील वास्तव हे एकाच प्रतलावर आणतो. हा खेळ सुरू करायचा. कॅमेरा रोखत पुढे पुढे चालत जायचे आणि अचानक आपणांस परिसरातील एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी खेळातील पात्र दिसते. ते टिपायचे आणि आपले गुण वाढवायचे असे ते चाललेले असते. त्यातील ठिकाण खरे असते, पात्र मात्र संगणकीय असते. वास्तव आणि आभास या दोन मितींमधले आपले जगणे हे या खेळाने असे एकाच ठिकाणी आणून ठेवले आहे. आजवरच्या संगणकीय खेळांनी माणसांना आभासी विश्वातच अडकविले होते. या खेळाने त्याला थोडे खऱ्या जगात आणून सोडले. हाही तसा वेगळा आभासच. परंतु यामुळे अनेकांना आपण वास्तव जगाशी जोडलो गेल्यासारखे वाटत आहे. रजनीकांत आणि पोकेमॉन गो यांच्या लोकप्रियतेत फरक पडतो तो या ठिकाणी.

वास्तवापासून पलायनाचा मार्ग चित्रपटांतून जातो हे आपण केव्हाच ओळखले आहे. चित्रपटाचे माध्यम म्हणून वेगळेच सामथ्र्य आहे. परंतु सामान्यत: चित्रपट असे आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ मसालापट असा असतो आणि हे चित्रपट लोकांना वेड लावतात याचे कारण रोजच्या वास्तविक कटकटींपासून सुटका देण्याची खास ताकद त्यांच्यात असते. यात सर्वाधिक ‘शक्तिमान’ चित्रपट म्हणजे एक तर मिथकांवर किंवा सुपरमॅन वा स्पायडरमॅनसारख्या कार्टूनपात्रांवर आधारलेले. आणि एकदा हे लक्षात घेतले की रजनीकांत यांच्या वेडय़ासारख्या लोकप्रियतेचे कारण सहजीच ध्यानी येते. रजनीकांत हा कलाकार असला, तरी चाहत्यांच्या लेखी सुपरमॅनच. तो एरवी ‘क्लार्क केंट’सारखाच सर्वसामान्य माणूस. परंतु प्रेक्षकांना माहीत असते, की त्याच्यात सुपरमॅनची ताकद आहे. आपल्या कोंडलेल्या, साचलेल्या भावभावनांचा, वेदनांचा तो शब्द आहे. आपल्या आशा-आकांक्षांची तो पूर्ती आहे. या मायावी दिलाशामध्ये रजनीकांतची लोकप्रियता दडलेली आहे. बाकी मग कबालीसारख्या त्याच्या कोणत्याही चित्रपटाची विवेकबुद्धी गुदमरवून टाकणारी लाट येणे यात प्रपोगंडाचा, लालम्लाल प्रचारतंत्राचा मोठाच भाग असतो. त्या प्रचारातून केवळ रजनीकांत यांच्या चित्रपटांची जाहिरात होत नसते, त्यातून रजनीकांत नावाचा ब्रॅण्ड लोकांच्या मनावर ठसविला जात असतो. त्यामुळे चित्रपट येवो, जावो वा तिकीटबारीवर आपटो, रजनीकांत यांच्या लोकप्रियतेला मात्र अणुमात्र डंख लागत नाही. ‘कबाली’ या त्यांच्या नव्या चित्रपटाचेही असेच होणार आहे. आणखी काही काळाने तोही विस्मरणात जाईल. आणखी काही काळाने पोकेमॉन गो या खेळाची लोकप्रियताही ओसरेल. अखेर प्रत्येक लाट एखाद्या खडकावर फुटतच असते. हे सर्वच क्षेत्रांत – मग ते रंजनाचे असो, सामाजिक असो की राजकीय – घडत असताना आपण प्रत्यही पाहतोच. त्याला ‘कबाली’ वा ‘पोकेमॉन गो’ अपवाद असण्याचे कारण नाही. या सगळ्यांत लाट फुटत नसते ती लाटा तयार करणाऱ्या लाट-करांची.

लोकांच्या मनातील आदिम भावना, ग्रह-पूर्वग्रह, विचार-आचार, त्यांच्या आशा-आकांक्षा यांना खेळवणारा हा वर्ग कुठे स्पष्ट दिसत नसतो. तो आपल्यांतच असतो. खेळ, चित्रपट यांपासून राजकारणापर्यंत सगळ्याच क्षेत्रांत तो वावरत असतो. तो प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा आपल्यासमोर ठेवत असतो. आणि आपण त्याने तयार केलेल्या त्या वास्तवाच्या उत्कटीकरणात स्वत:ला चिंब बुडवून घेत असतो..