फडणवीसद्वेष आणि आपल्याला कोण विचारणार ही बेफिकिरी यामुळे खडसे बेभान झाले असून अशा वेळी त्यांना मंत्रिमंडळातून काढणे हाच मार्ग आहे.

खडसे यांचा पाय अधिकाधिक खोलात जाऊ लागला आणि आता तर खडसे सदेह चिखलातच आहेत. पुण्याजवळील औद्योगिक भूखंडाचे प्रकरण हे त्यांच्यावर शेकेल, यात शंका नाही. ज्या दूरसंचार घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठवत नरेंद्र मोदी सत्तेवर आले तो गैरव्यवहार यापेक्षा वेगळा काय होता?

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी आम आदमी पक्ष काय म्हणतो हा विचारात घ्यावा असा मुद्दा नाही. सार्वजनिक नळावरच्या भांडणांप्रमाणे कचाकचा राजकीय भाष्ये करणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांना महत्त्व देण्याचे काहीही कारण नाही. परंतु तरीही प्रश्न उरतो की खडसे यांचे चालले आहे काय?

भाजपच्या वर्तुळात नाथाभाऊ म्हणून ओळखले जाणारे खडसे स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानत होते. धूम्रपानाच्या सवयीनंतरही दहा दहा तास भाषण करण्याइतकी सक्षम फुप्फुसे, राज्याच्या अर्थकारणाची समग्र माहिती आणि सभागृहातील नियम, संकेतांचा तगडा अभ्यास ही नाथाभाऊ यांची तिजोरी. ते जळगावचे. तेथील आणखी एक वादग्रस्त राजकारणी सर्वपक्षीय सुरेशदादा जैन यांच्याशी नैतिकतावादी खडसे यांचे संबंध विळ्याभोपळ्याचेच होते असे नाही. याचे कारण खडसे यांचे राजकारण हे नेहमीच नियमबाह्य़तेच्या उंबरठय़ावर रेंगाळत राहिले. त्याचमुळे भाजपविरोधात असताना शरद पवार यांच्यासारखा नेता खडसे यांच्याविषयी तोडपाण्याचा आरोप करू शकला. विरोधी पक्षांत असूनही खडसे हे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी योग्य त्या कारणांसाठी संधान साधून आहेत, असा पवार यांच्या म्हणण्याचा मथितार्थ. तो शंभर टक्के खरा होता आणि आहेही. याचे कारण महाराष्ट्र भाजपच्या क्षितिजावरून गोपीनाथ मुंडे आणि त्या आधी प्रमोद महाजन यांचा अस्त झाल्यानंतर आता आपणच काय ते नोंद घ्यावी असे नेते, असा खडसे यांचा समज होता. नागपूरशी खास घरचे संधान साधून असलेले नितीन गडकरी हे तेवढे त्यांना ज्येष्ठ. परंतु गडकरींचा मार्ग वेगळा. त्यामुळे ते आपल्या समोरील आव्हान नाहीत, हे खडसे यांनी हेरले आणि त्याप्रमाणे आपल्या चाली त्यांनी खेळल्या. राजकारण, प्रशासन वगैरेंचा दांडगा अभ्यास असलेले खडसे एका चालीवरून मात्र फसले आणि फसतच राहिले.

ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी पत्करलेला उभा दावा. फडणवीस यांच्याविषयी हा कालचा पोरगा कानामागून येऊन तिखट झाला अशी त्यांची भावना होती आणि ती उघड व्यक्त होऊ नये यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. याचा अर्थ मनात काय आहे ते ओठावरून निसटणार नाही याची दक्षता घेण्याचे चातुर्यही खडसे यांनी कधी दाखवले नाही. राजकारणात असो वा खासगी आयुष्यात. आपला वरिष्ठ निवडण्याचा अधिकार कोणालाही नसतो, ही साधी बाब खडसे विसरले. अशा वेळी सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीकडून जी चूक होते तीच खडसेदेखील करीत गेले. ती म्हणजे मुख्यमंत्र्यांना न जुमानणे. खडसे यांचे हे औद्धत्य डोळ्यांवर येणारे होते. आपण म्हणजे कोणी राजकीय गुरू वगैरे आहोत आणि आपल्याला आव्हान देणारा आसमंतात कोणी नाही, अशा प्रकारच्या दपरेक्ती खडसे यांच्याकडून वारंवार केल्या जात होत्या. ही अशी दपरेक्ती हे न्यूनगंडाचे लक्षण असते. काँग्रेसमध्ये नारायण राणे हे या गंडाचे मूर्तिमंत उदाहरण. खडसे त्यावरून काही शिकले नाहीत आणि आपल्याच मिजाशीत राहिले. ही अशी मिजास करण्यात काहीही गैर नाही. परंतु त्यासाठी एक किमान पात्रता अंगी असावी लागते.

ती म्हणजे आपले हात स्वच्छ असावे लागतात. ते खडसे यांचे नाहीत. आपण वाटेल ते, वाटेल तसे उद्योग करावयाचे आणि तरीही व्यवस्थेच्या दरवाजावार धडका मारीत राहायचे या दोन्ही क्रिया एकाच वेळी करता येत नाहीत. खडसे ते करू पाहात होते. त्यांची तसे करण्याची वेळ आणि काळ दोन्हीही चुकत गेला. तेव्हा आपले वागणे जरा अतीच होत आहे, याची जरा जरी जाणीव खडसे यांना असती तर स्वत:च्या सचिवाविषयी झालेले प्रकरण पाहून त्यांनी सावधगिरी बाळगली असती. ते सोडाच. वर माझे कोण काय वाकडे करू शकणार अशी दपरेक्ती मारण्यात खडसे मोठेपणा मानत राहिले. त्यांच्या सचिवाच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाष्य हा वास्तविक धोक्याचा पहिला इशारा होता. तो त्यांना मानला नाही. मंत्रालयात खडसे यांच्या कार्यालयात काय उद्योग चालतात, जळगावातला कोणता आमदार जागांच्या व्यवहारांसाठी कोणाच्या संपर्कात आहे, खडसे कोणा आमदाराशी कोणत्या कारणांसाठी अतिजवळचे आहेत आदींविषयी पत्रकारांना माहिती मिळत असेल तर ती मुख्यमंत्र्यांना असणार नाही, असे मानणे म्हणजे शुद्ध दूधखुळेपणाच. खडसे तो करीत गेले. त्याचमुळे बघता बघता त्यांच्या स्वीय सहायकाचे प्रकरण बाहेर आले. वास्तविक त्या संदर्भातील माहिती आपल्याच आसपासच्या ज्येष्ठ/ कनिष्ठ सहकाऱ्यांनी दिली असू शकेल ही शक्यतादेखील खडसे यांनी विचारात घेतली नाही. परिणामी खडसे यांचा पाय अधिकाधिक खोलात जाऊ लागला आणि आता तर खडसे सदेह चिखलातच आहेत.

पुण्याजवळील औद्योगिक भूखंडाचे प्रकरण हे त्यांच्यावर शेकेल, यात शंका नाही. तसे होण्यामागील कारणे दोन. एक म्हणजे या प्रकरणात खडसे यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्या अंगाचा चिखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला लागणारच लागणार. आणि दुसरे कारण म्हणजे तसा तो लागावा यासाठी या भूखंडाची मालकी ज्या खात्याकडे आहे त्या खात्यातर्फेच विशेष प्रयत्न होणार. हे खाते सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची गेल्या काही दिवसांतील वक्तव्ये या संदर्भात महत्त्वाचीच ठरतात. देसाई यांनी थेटपणे खडसे यांना दोषीच ठरवले आहे. महसूल खात्याचे मंत्री या नात्याने आपले अधिकार वापरीत खडसे यांनी हा भूखंड पत्नी आणि अन्यांच्या नावे केला ही बाब उघड झाली नसती तर तोच भूखंड चढय़ा भावाने त्यांना तो सरकारला विकता आला असता. तसे शक्य होते कारण महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळाने सदर जमीन स्वत:कडे हस्तांतरित केली आहे. ज्या दूरसंचार घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठवीत नरेंद्र मोदी सत्तेवर आले तो गैरव्यवहार यापेक्षा वेगळा काय आहे? तेथेही मंत्र्यांच्या आशीर्वादाने काही टिनपाट कंपन्यांना वायुलहरी प्रदान केल्या गेल्या आणि या कंपन्यांनी मग प्रचंड पटींनी त्यावर नफा कमवीत त्या बडय़ा दूरसंचार कंपन्यांना विकल्या. मधल्या मध्ये हा उद्योग करणाऱ्या कंपन्यांचे उखळ पांढरे झाले. परिणामी सरकारचे नुकसान झाले. हे प्रकरण उघडकीस आले नसते तर खडसे यांच्या कुटुंबीयांकडूनही तेच झाले असते. तेव्हा कितीही आव आणला तरी खडसे यांचे हात दगडांखाली अडकलेले आहेत, यात शंका नाही.

तेव्हा आता जो काही निर्णय घ्यावयाचा आहे तो खडसे यांना नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. साध्यसाधनशुचितेचा आग्रह धरणाऱ्या फडणवीस यांना खडसे यांच्यासारखी व्यक्ती मंत्रिमंडळात असणे परवडणारे नाही. फडणवीसद्वेष आणि आपल्याला कोण विचारणार, ही बेफिकिरी यामुळे खडसे बेभान झाले असून त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणे निष्फळ ठरेल. अशा वेळी त्यांना मंत्रिमंडळातून काढणे हाच मार्ग आहे. ते पाऊल उचलण्याचे धैर्य फडणवीस यांनी दाखवले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छतानिष्ठेवर प्रश्न निर्माण होतील. खडसे यांचा ‘वेग’ त्यांची भाजपतील भुजबळ बनण्याची आस दर्शवतो. त्यांना मुख्यमंत्र्यांनी रोखावे. अन्यथा या नवभुजबळनिर्मितीचे अपश्रेय फडणवीस यांनाही घ्यावे लागेल.