भारतमातेचे पुतळे उभारून देशप्रेमाचे बटबटीत, बेगडी दर्शन घडवीत आपले घृणास्पद स्वार्थ साधणाऱ्यांचे पितळ अ‍ॅम्बी व्हॅलीवरील कारवाईच्या निमित्ताने उघडे पडले.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस सहारा परिवाराच्या महाराष्ट्रातील लोणावळा येथील अ‍ॅम्बी व्हॅली या बहुप्रसिद्ध, बहुचर्चित, उच्चभ्रूंसाठीच्या सप्ततारांकित आदी प्रकल्पाच्या जप्ती प्रक्रियेस सुरुवात व्हावी हा एक सूचक योगायोग. उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकल्पाच्या लिलावी विक्रीची सुरुवात केली. त्यासाठी बेलीफ आदी नेमणुका सुरू झाल्या. सहारा हा गडबडगुंडा उद्योगसमूह सरकारला जे काही देणे लागतो त्याच्या महावसुलीच्या एकंदर प्रयत्नांतील एक प्रयत्न म्हणजे अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्पाची विक्री. यातून जमा होणारा निधी या समूहाच्या सरकारी देण्यांसाठी वापरला जाईल. या प्रकल्पाची राखीव किंमत ३७ हजार कोटी इतकी असेल, असे सरकारचे म्हणणे. म्हणजे ज्या कोणास हा प्रकल्प विकला जाईल त्यास किमान इतक्या रकमेची तजवीज करावी लागेल. तसेच इतकी रक्कम भरणारा कोणी भेटलाच नाही तर हा प्रकल्प सरकारी ताब्यात राहील. सहारा समूहाच्या मते या प्रकल्पाची किंमत १ लाख कोटी इतकी आहे. परंतु सहारा समूहास एकंदरीतच आकडय़ांची जी काही पतंगबाजी करावयास आवडते ती पाहता त्यांच्या अपेक्षित किमतीस महत्त्व देण्याची गरज नाही. तरीही हा प्रकल्प मोठा आहे, याबाबत कोणाचेच दुमत असणार नाही. रोख रकमांच्या वर्षांवात चिंब भिजणारे भारतीय क्रिकेटपटू ते भल्याबुऱ्या मार्गानी धनाढय़ झालेले अशा अनेकांसाठी हा प्रकल्प आकर्षण केंद्र होता. सहारा समूहाची एकंदरच जी काही पापे पुढे आली त्यात या प्रकल्पाचेही दिवाळे निघाले. आज त्याच्या वसुलीची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस या लिलावाचे महत्त्व का ते या प्रकल्पास ज्याने कोणी भेट दिली असेल, त्यास कळेल.

ते म्हणजे या प्रकल्पाच्या दर्शनी भागातच असलेला भारतमातेचा भव्य पुतळा. सुब्रतो राय सहारा यांचे भारतमातेवर गाढ प्रेम. आता भारतमातेवर प्रेम याचा अर्थ भारतावरही प्रेम असा काढल्यास ते चुकीचे ठरणार नाही. त्याच देशप्रेमापोटी बहुधा त्यांनी जे काही करायला नको ते केले असावे. याची जाणीव झाल्यानेही कदाचित त्यांना भारतमातेच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन पापक्षालनाची गरज वाटली असावी. वजनात मारणारे नंतर शिर्डी वा अन्य ठिकाणी कोणा महाराज वा बापूंच्या अंगावर सोनेनाणे चढवतात, तसेही असेल. कारण काहीही असो. परंतु सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीत भारतमातेचा पुतळा प्रवेशद्वाराशीच आहे. शुभ्र वस्त्रांकित, केस मोकळे, कंबरपट्टय़ाने बांधलेली साडी, डोक्यावर मुकुट, हाती गर्जना करीत धावून जाणाऱ्या चार (चारच का, सहा किंवा आठ वगैरे का नाही हे कळावयास मार्ग नाही.) सिंहांच्या रथाची दोरी आणि मागे भारताचा तिरंगा अशी ही भारतमाता अ‍ॅम्बी व्हॅलीत येणाऱ्याजाणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. ही भारतमातेची मूर्ती आणि सहारा अ‍ॅम्बी व्हॅलीत जे काही चालते त्याचा आणि या व्हॅलीत घरे असणाऱ्यांच्या वृत्तीचा खरे तर काहीही संबंध नाही. तरीही तिची तिथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. ती का, या प्रश्नाचे उत्तर सहाराश्री यांच्या मातृभूमीवरील प्रेमात सापडू शकेल. खरे तर या अ‍ॅम्बी व्हॅली प्रकल्पास सर्वच एकापेक्षा एक देशभक्तांची साथ लाभली. हा प्रकल्प जेव्हा आकारास येत होता तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना व भाजप या पक्षांचे सरकार होते. हे दोन्हीही पक्ष तसे देशाभिमानीच. त्यांचे भारत आणि भारतमाताप्रेम लक्षात न घेता त्या वेळी त्यांच्यावर सर्व नियम धाब्यावर बसवून प्रकल्पास मंजुरी दिली जात असल्याचा आरोप झाला. पण या पक्षांचे भारत आणि भारतमाताप्रेम इतके सच्चे की त्यामुळे यातील एकही आरोप त्यांना चिकटला नाही. त्या वेळी सर्व विरोध डावलून हा प्रकल्प रेटला गेला आणि सर्व देशप्रेमी धनिकांना आणि तसेच भारतमातेस हक्काचे घर मिळाले. परंतु सहाराश्री वा अन्यांचे मातृभूमीप्रेम आधी सेबी आणि नंतर सर्वोच्च न्यायालय यांना पाहवले नाही. त्यांनी उत्तर प्रदेशातील कोणा क्षुद्र गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत असे बालंट सहाराश्रींवर ठेवले आणि त्यांना थेट तुरुंगातच डांबले. पैसे द्या नाही तर राहा तुरुंगात, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सुब्रतो राय यांच्यासारख्या सच्च्या फक्त भारतभक्तच नव्हे तर भारतमाताभक्तावर अन्याय करणाराच. आता अखेर सहाराश्रींच्या कर्मामुळे त्यांच्याच अ‍ॅम्बी व्हॅली कर्मभूमीचा लिलाव होत असताना या भारतमातेचे कसे आणि काय होणार हा प्रश्नच आहे. याचे कारण या अशा भारतमाता प्रतीकांचे प्रेम आणि पेव अलीकडे फारच मोठय़ा प्रमाणावर फुटलेले आहे. काहीही उद्योग करावेत आणि समोर भारतमाता ठेवावी. एकदा का तिचा जयजयकार केला, तिच्या नावे आरती केली की आपण काहीही करावयास मोकळे. जेथे साठमारीपासून खंडणीखोरीपर्यंत काहीही होते अशांच्या शाखांत ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला जातो, त्याचे राष्ट्रीय स्वरूप आता भारतमातेच्या रूपाने दिसू लागले आहे. म्हणजे पुण्यकर्म राज्य स्तरापुरतेच करावयाचे असेल तर छत्रपतींचा पुतळा पुरे. ते राष्ट्रीय पातळीवर न्यायचे असेल तर मग मात्र भारतमाता हवी. त्यास आता तर वंदे मातरम.. हे गीत गाण्याच्या सक्तीची जोडही मिळालेली आहे. मुंबईचे सच्चे देशप्रेमी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नामक पक्षाने तर महापालिका शाळांत ‘वंदे मातरम..’ गायले गेलेच पाहिजे असा फतवाच काढलेला आहे. वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ कादंबरीतील हे एक गीत. परंतु ते म्हणण्याचा आग्रह करणाऱ्या मठ्ठांना हे माहीत नाही की त्यात केवळ बंगालचे वर्णन आहे. श्री. अरविंद यांनी त्याचा उल्लेख  ‘बंगालचे राष्ट्रगीत’ असा केलेला आहे. आता एरवी मर्द मावळ्यांच्या नावे आपल्या खऱ्याखोटय़ा मराठी शौर्याचे गोडवे गाणाऱ्यांनी या गीताचा आग्रह धरावा या कर्मास काय म्हणावे? खरे तर केवळ यांनाच बोल लावून उपयोगाचे नाही. हा वेडपट आग्रह सध्या तर राष्ट्रीय पातळीवरच होताना दिसतो. कसे सांगणार या मंडळींना की देशातल्या एका मोठय़ा प्रदेशातील नागरिकांना वंदे मातरम या गीतातील संदर्भ कधीच प्रत्ययास येणार नाही. उदाहरणार्थ राजस्थानच्या वाळवंटी भागात राहणाऱ्यास ‘सुजलाम’ म्हणजे काय हे कसे कळावे? म्हणजे वर्णाने शाळिग्रामी असणाऱ्या, पिण्याच्या पाण्यासाठी मैलांची पायपीट करणाऱ्यांना ज्याप्रमाणे गोरीगोमटी, सुस्नात अशी भारतमाता आपली वाटणार नाही तद्वत देशातील बंगालेतर नागरिकांना वंदे मातरमविषयी तितकी आपुलकी वाटायलाच हवी होती असे नाही. त्याचे महत्त्व आहे ते स्वातंत्र्य चळवळीत ते गायले गेले म्हणून. परंतु १९५० साली प्रजासत्ताकाच्या स्थापनेवेळी रवींद्रनाथ टागोर यांचे जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणून निवडले गेल्यानंतर पुन्हा वंदे मातरम या राष्ट्रगानाचा आग्रह धरणे हास्यास्पद ठरते.

परंतु अलीकडे नवराष्ट्रवादाचे मतलबी वारे वाहत असताना या असल्या हास्यास्पद कृत्यांनाच महत्त्व आले आहे हे आपले दुर्दैव. तेच अ‍ॅम्बी व्हॅली येथे सुरू झालेल्या जप्तीच्या कारवाईने अधोरेखित झाले. भारतमातेचे पुतळे उभारून देशप्रेमाचे बटबटीत, बेगडी दर्शन घडवीत आपले घृणास्पद स्वार्थ साधणाऱ्यांचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे घडणे हा योगायोग म्हणून महत्त्वाचा. सध्याच्या कंठाळी, प्रदर्शनी, तोंडदेखल्या देशप्रेमींपासून या भारतमातेस मुक्त करा असा आजच्या १५ ऑगस्टचा सांगावा आहे.

  • सहारा अ‍ॅम्बी व्हॅलीच्या प्रवेशद्वाराशीच असलेली भारतमातेची मूर्ती आणि या व्हॅलीत घरे असणाऱ्यांच्या वृत्तीचा खरे तर काहीही संबंध नाही. तरीही तिची तिथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. परंतु अलीकडे नवराष्ट्रवादाचे मतलबी वारे वाहत असताना अशा हास्यास्पद कृत्यांनाच महत्त्व आले आहे. तेच अ‍ॅम्बी व्हॅली येथे सुरू झालेल्या जप्तीच्या कारवाईने अधोरेखित झाले.