शशिकला दोषी ठरल्या, हे उत्तमच. पण या घडामोडीमागचे योगायोग लक्षवेधी आहेत..

मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपासून शशिकला यांना दूर ठेवण्याचा मनसुबा तडीस गेला, म्हणून पनीरसेल्वम किंवा भाजप यांची डोकेदुखी संपेल असे नव्हे. शशिकला तुरुंगातही जातील, पण तामिळनाडूच्या राजकीय संस्कृतीत त्यामुळे तसूभरही बदल होणार नाही..

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्या शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले ही एक उत्तम घटना. परंतु तिचे महत्त्व अधोरेखित करताना या अनुषंगाने काही महत्त्वाच्या योगायोगांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. जवळपास २१ वर्षांनी का असेना पण या प्रकरणाचा निकाल लागला. भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी १९९६ साली पहिल्यांदा या प्रकरणात तोफ डागली होती. यातील विरोधाभास म्हणजे हेच स्वामी याच जयललिता यांच्या भ्रष्ट साथीदार शशिकला यांच्याकडेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद राहावे म्हणून प्रयत्नशील होते. राज्यपाल विद्यासागर राव यांनी हंगामी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांना दूर करून शशिकला यांनाच मुख्यमंत्रिपदाची शपथ द्यावी असा त्यांचा आग्रह होता आणि तो पुरा होत नाही म्हणून राज्यपाल हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. तेव्हा त्यांनी जयललिता यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर खटला दाखल केला ही वस्तुस्थिती असली तरी त्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणातून बरेच पाणी वाहून गेले. नंतर खुद्द जयललिता या भाजपला कधी जवळच्या वाटल्या तर कधी अतिजवळच्या. भ्रष्टाचारविरोधी खटल्यात त्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने सोडले आणि सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तोच निकाल रद्दबादल केला. मधल्या काळात त्यांच्यावरचे किटाळ पूर्णपणे दूर झालेले नसतानाही विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे तुरुंगातून मुक्तता झाली म्हणून जातीने दूरध्वनी करून अभीष्ट चिंतिले होते. हा इतिहास काढावयाचे कारण इतकेच की संबंधितांची भाषा भ्रष्टाचारविरोधाची असली तरी कृती तशीच असते असे मानावयाचे कारण नाही, हे कळावे. तामिळनाडूतील राजकीय गुंता समजून घेण्यासाठी ते कळून घेणे आवश्यक असते. याचे कारण एरवी साक्षरता आदींत आघाडीवर असणारे हे राज्य राजकीय संस्कृतीच्या मुद्दय़ावर कमालीचे मागास असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने हे मागासपण जोपासण्याचाच प्रयत्न केला आहे. तेव्हा जयललिता यांच्या साथीदारांना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवले म्हणून हे मागासलेपण दूर होणे सोडाच, पण कमीही होण्याची शक्यता नाही.

याचे कारण या भ्रष्टाचाराचे मूळ हे त्या राज्यातील व्यक्तिवादी व्यवस्थाशून्य राजकीय व्यवस्थेत आहे. जयललिता यांचे राजकीय गुरू एमजीआर, त्यांचे कडवे प्रतिस्पर्धी करुणानिधी आणि नंतर खुद्द जयललिता यांची राजवट ही कमालीची व्यक्तिकेंद्री होती. जयललिता तशा का झाल्या आदी मुद्दय़ांचा ऊहापोह करण्याची ही जागा नव्हे आणि प्रसंगही नव्हे. परंतु अशा राजवटीचे म्हणून काही फायदे असतात. आपली कामे करून घ्यावयाची आहेत अशांना ही हुकूमशाही कल्याणकारी वाटू लागते. एकाच मध्यवर्ती व्यक्तीस खूश केले की झाले. मग अन्य सर्व यमनियम पायदळी तुडवून वाटेल ते केले तरी कोणी हिशेब विचारीत नाही. जयललिता या त्या व्यवस्थेच्या उत्तम प्रतीक. कमालीच्या दुर्दैवी अनुभवांमुळे व्यक्तिगत पातळीवर त्यांना कोणीही सुहृद नव्हता. नातेवाईकही दुरावलेले. तरीही सत्ता गाजवण्याची ईर्षां. पण राजकारण हे एकटय़ाने करावयाचे काम नव्हे. सत्तेची सूत्रे जरी आपल्या एकटय़ाच्या हातीच राहतील अशी इच्छा असली तरी आसपास साजिंदे लागतातच. शशिकला या जयललिता यांच्या अशा साजिंद्या होत्या. जयललिता यांच्या अंत:पुरात त्यांनी मोठय़ा हुशारीने प्रवेश मिळवला. जयललिता यांच्या कार्यक्रमांचे ध्वनिचित्रमुद्रण करणे हा त्यांचा मूळ व्यवसाय. त्यातून त्यांना जयललिता यांच्यासमवेत सावलीसारखे राहावयाची संधी मिळाली. तिचा योग्य तो फायदा घेत शशिकला यांनी पक्षात आपले दुसऱ्या क्रमांकाचे स्थान सतत मजबूत करीत नेले. त्या पक्षात जयललिता यांचे कान आणि डोळे होत्या. अशा निष्ठावानाच्या मनात अप्रामाणिकपणाने प्रवेश केला की वाटेल तो घात होऊ शकतो. कसा, ते शशिकला यांनी ते दाखवून दिले. त्यांनी प्रचंड माया केली. हे सर्व जयललिता यांच्या संमतीखेरीज झाले असे मानणे दूधखुळेपणाचे ठरेल. शशिकला आणि त्यांचा नवरा यांनी तामिळनाडूचे प्रशासन पिळून काढले. मध्यंतरी खुद्द जयललिता यांनाही त्यांचा छळवास नकोसा झाला होता. त्यांनी शशिकला यांना घरातून हाकलून दिले होते. ही कारवाई क्षणिक ठरली. त्या पुन्हा जयललिता यांच्याकडे परतल्या. त्यांचा प्रभाव इतका की त्यांच्या मुलाच्या लग्नाला झाडून सारे राजकारणी आणि मान्यवर हजर होते. त्यांच्यामागे जयललिता होत्या हे याचे अर्थातच कारण. सदर लग्नात या बाईंनी केलेल्या खर्चाचा मुद्दा विद्यमान भ्रष्टाचारविरोधी खटल्यातील एक भाग होता. या लग्नात या बाईंनी साधारण साडेसहा कोट रुपये खर्च केले, असे न्यायालयातील तपशिलावरून दिसते. ही सर्व संपत्ती त्यांच्या ज्ञात उत्पन्नावर आधारित नाही, हे उघड होते. त्यांच्या विरोधात खटला भरला गेला तो याच मुद्दय़ावर. परंतु आपले उत्पन्न ज्ञात उत्पन्नस्रोतांशी सुसंगतच आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता. तो ग्राहय़ मानणे उचित नाही, हे अखेर न्यायालयात सिद्ध झाले आणि शशिकला दोषी ठरल्या. परंतु यानिमित्ताने दिसून आलेले योगायोग लक्षवेधी ठरतात.

पहिला योगायोग म्हणजे जयललिता हयात असताना या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी असे कधी कोणालाही वाटले नाही. तसेच, राज्यपाल विद्यासागर राव यांनी आठवडय़ाभरात विधानसभा अधिवेशन बोलवावे अशी सूचना करणारे केंद्रीय महाधिवक्ता मुकुल रोहटगी यांनी याआधी कधी जयललिता यांच्या विरोधातील हा भ्रष्टाचार खटला लवकर मार्गी लावला जावा यासाठी काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. योगायोग क्रमांक दोनदेखील तितकाच महत्त्वाचा. तो शशिकला यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेशी निगडित आहे. जयललिता यांच्या निधनानंतर ओ पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री म्हणून काम करू लागले, तोपर्यंत सर्व काही ठीक होते. परंतु पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे शशिकला यांनी हाती घेतली आणि मग त्यांची राजकीय पावले दिसू लागली. तसेच त्या पनीरसेल्वम यांना दूर करून मुख्यमंत्रिपदी आरूढ होतील असे दिसू लागल्याबरोबर लगेच त्यांच्या विरोधातील या खटल्यात पुन्हा धुगधुगी निर्माण झाली. या संदर्भात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे विद्यमान हंगामी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनाच त्या पदावर कायम केले जावे, अशी सत्ताधारी भाजपची इच्छा आहे. ती लपून राहिलेली नाही. याचाच अर्थ तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी शशिकला येऊ नयेत असेच भाजपला वाटते. तेव्हा भाजपला नको असलेल्या शशिकला यांच्या विरोधातील खटल्याला कशी गती आली, हे समजून घेणे फार काही अवघड नाही. यातील आणखी एक योगायोग म्हणजे मुख्यमंत्री निवडीसाठी किती वाट पाहावी याचा बरोब्बर अंदाज राज्यपाल विद्यासागर राव यांना आला आणि महाधिवक्त्याने आठवडाभराची मुदत नक्की केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागून शशिकला दोषी ठरल्या. झाले ते योग्यच. या बाईंच्या उचापती लक्षात घेतल्यास त्यांना शिक्षा झाली म्हणून वाईट वाटून घेण्याचे कारणच नाही, हे मान्य. परंतु प्रश्न असा की जयललिता जर हयात असत्या तर या खटल्याला गती दिली जावी, असे संबंधितांना वाटले असते का?

या प्रश्नाचे उत्तर आता मिळणार नाही हे उघड असले तरी शशिकला दोषी ठरल्या म्हणून पनीरसेल्वम यांची, आणि भाजपचीही, डोकेदुखी संपेल असे नाही. न्यायालयाच्या निकालामुळे शशिकला यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होता येणार नाही. परंतु तरी त्या पक्षप्रमुख राहू शकतात. अण्णाद्रमुकची सूत्रे सोडा असे काही न्यायालयाने त्यांना सांगितलेले नाही. याचा अर्थ इतकाच की चिन्नमा शशिकला भ्रष्टाचार खटल्यात दोषी ठरल्या म्हणून तेथील तिढा सुटणारा नाही. हंगामी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना पक्षातून काढून त्यांनी हेच दाखवून दिले आहे. एक अम्मा गेल्या, दुसऱ्या तुरुंगात चालल्या म्हणून तामिळनाडूतील राजकारणात मूलभूत बदल होण्याची शक्यता नाही.