वर्षांनुवर्षे आपण एक समाज म्हणून विविध प्रकारच्या हिंसावृत्तीची पाठराखण केली.. त्यातूनच मग येथील राजकीय व्यवस्था शेफारत गेली.

सेना खासदाराच्या गुंडगिरीविरोधात समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हाच खासदार जर या प्रतिक्रियाखोरांच्या आवडत्या पक्षाचा असता तर ते अशाच पद्धतीने प्रकट झाले असते? तेव्हा केवळ खासदार गायकवाड नावाच्या व्यक्तीला दोष देऊन भागणार नाही. ते ज्या राजकीय पर्यावरणात वाढले, जी प्रतीके घेऊन वावरले, त्यांतून त्यांच्याकडून असेच वर्तन घडणार होते.

हे तसे धक्कादायक वाटेल, परंतु शिवसेनेच्या एका खासदाराने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला पायातील वहाणेने २५ वेळा मारले यात काहीही विशेष नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी धुळ्यातील त्या डॉक्टरच्या कवटीला तडा जाईल इतकी मारहाण केली यातही काही विशेष नाही. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एका कर्जग्रस्त शेतकऱ्याला पोलिसांकडून चोप दिला जातो किंवा पोलिसाला एखादा आमदार चोपतो ही तर साधीच गोष्ट. इस्पितळांची, दुकानांची, टोल नाक्यांची, सरकारी वाहनांची तोडफोड नित्यनेमाने केली जाते, कोणा ना कोणाच्या तोंडाला कोठे ना कोठे काळे फासले जाते याही तशा सर्वसामान्य घटनाच. हा सगळा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. हीच ती न्यू नॉर्मल – नवसाधारण स्थिती. अशा परिस्थितीत आपल्याच प्रतिनिधीने एका नागरिकाला मारून, ‘केले ते योग्यच केले, खुनाचा गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही. असे अनेक गुन्हे आहेत माझ्यावर,’ असे अभिमानाने सांगितले तर त्याने देशातील नागरिकांनी एवढे दचकून जाण्याचे कारण नाही. शिवसेनेचे ते खासदार रवींद्र गायकवाड यांच्या गुंडगिरीवर टीका करण्याचेही कारण नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हे माहीत असूनही मतदारांनी त्यांना निवडून दिले आहे. तेव्हा तसेही ते पवित्रच झाले आहेत. भाजपच्या नव्या भाषेत सांगायचे तर ते आता माजी गुंड झाले आहेत. तेव्हा त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या वर्तनाने कोणीही हैराण होण्याचे कारण नाही. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या ज्या खासदारांनी गुंडगिरी केली, त्यात या रवींद्र गायकवाड यांचाही समावेश होता. तेथील एका सामान्य कर्मचाऱ्याच्या तोंडात चपाती कोंबण्याचे शौर्यकृत्य केल्याबद्दल त्या वेळी उभा महाराष्ट्र या लोकप्रतिनिधींच्या मागे उभा राहिला होता. आपणांस कोणती राजकीय आणि सामाजिक संस्कृती अभिप्रेत आहे ते अशा अनेक घटनांनी दाखवून दिले आहे. असे असताना आज कोणी विमान कंपनीचा कर्मचारी मार खातो वा शेतकऱ्याला वा डॉक्टरांना चोप दिला जातो म्हणून आपण अस्वस्थ व्हावे, यात काही अर्थ नाही. या घटनेनंतर अनेकांना असा प्रश्न पडला, की लोक साध्या साध्या गोष्टींवरून असे हाणामारीपर्यंत का येतात? हातात कायदा का घेतात? समाजातील सहिष्णूवृत्ती, सौहार्द हे सारे कोठे लोप पावले? वस्तुत सध्याच्या परिस्थितीत असे प्रश्न विचारणे हेच चुकीचे आहे. सहिष्णुता-असहिष्णुता असे शब्द उच्चारणे हा तर गुन्हाच. त्यामुळे किमान शाब्दिक हिंसाचाराला तरी तोंड द्यावे लागेल अशी हल्लीची परिस्थिती आहे. आणि तरीही अजून काही लोक प्रश्न विचारत आहेत. धाडसच ते. पण ते विचारत आहेत, की ही नवसामान्यता आली कोठून? ही हिंस्रवृत्ती पोसली कोणी? सवाल अवघड आहेत. परंतु त्यांची उत्तरे शोधण्यासाठी फार दूर जाण्याची आवश्यकता नाही. ती आपल्याच सामाजिक-राजकीय संस्कृतीमध्ये दडली आहेत. ही संस्कृती पाहायची असेल तर फार खोलात जाण्याचीही आवश्यकता नाही. साध्या-साध्या प्रतीकांमधून ती आपणांस दिसते.

राजकीय प्रचारसभांमधून नेत्याला दिल्या जाणाऱ्या त्या मखमली म्यानातल्या तलवारी. मग त्याचे तलवार उंचावून सभेला केलेले अभिवादन. लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दिलेली दाद. जणू काही आता आपले ते लाडके नेते त्या तलवारीने विरोधकांची खांडोळीच करणार आहेत. राजकीय सभांमधून कशासाठी त्या तलवारी, गदा आणि त्रिशुळांसारख्या मध्ययुगीन शस्त्रांचे प्रदर्शन केले जाते? परंतु ती तलवार ही नुसती तलवार नसते, तर ते आपल्या मनातील आदिम हिंसावृत्तीला, पौरुषत्वाच्या पारंपरिक कल्पनांना आणि सरंजामशाही मनोरचनेला केलेले आवाहन असते. आपल्याकडील राजकीय म्हणून जी शब्दावली असते, तीही अशाच प्रकारची असते. तेथे निवडणूक हे युद्ध असते, विरोधातील उमेदवार हा प्रतिद्वंद्वी असतो. आपला नेता हा स्वतला नेहमीच ‘मर्दाचा बच्चा’ म्हणवून घेत असतो. ‘सिंहाच्या जबडय़ात घालूनी हात पाडले दात’ ही त्याची मर्दुमकीची व्याख्या असते आणि ‘हातात बांगडय़ा नाही भरल्या’ हे वाक्य त्याच्या पौरुषाचा हुंकार असतो. महाराष्ट्राच्या राजकीय विचारविश्वात शिवसेनेचे योगदान काय असा प्रश्न विचारणे हे खरे तर हास्यास्पदच. परंतु कोणी तो विचारलाच, तर त्याचे उत्तर असेल – ‘शिवसेना स्टाइल’ नावाची कार्यपद्धती. यात कानाखाली जाळ काढणे, तोडफोड, जाळपोळ करणे येथपासून खंडणीखोरी येथपर्यंत अनेक बाबींचा समावेश होतो. ‘खळ्ळखटॅक’ ही याचीच आवृत्ती. तिचा अर्थ तोच. परंतु वर्षांनुवर्षे आपण एक समाज म्हणून या अशा प्रकारच्या िहसावृत्तीची पाठराखण केली. त्यातूनच येथील राजकीय व्यवस्था शेफारत गेली. त्याचबरोबर सामाजिक पर्यावरणही दूषित झाले. मध्ययुगीन पौरुषाच्या कल्पनांना लटकलेला समाजाचा एक मोठा भाग ही त्याचीच देणगी. कोणतीही व्यवस्था न मानणे, हेच या व्यवस्थेचे लक्षण ठरले आणि आम्हांला लोकशाही नव्हे, ठोकशाही हवी हे तिचे घोषवाक्य. खरे तर असे म्हणणे हा अंतिमत लोकांशी केलेला द्रोह आहे हेच आपण कधी नीट लक्षात घेतले नाही. त्याचीच फळे आपण आज भोगतो आहोत. वस्तुत लोकशाही ही केवळ राजकीय प्रणाली नाही. तो जेवढा सामाजिक, तेवढाच सांस्कृतिकही विचार आहे. आजवर सामंतशाही मानसिकतेत जगत असलेल्या समाजात आपल्या राष्ट्रनिर्मात्यांनी लोकशाहीचे बीजारोपण केले. त्यातून राष्ट्राचे आणि पर्यायाने लोकांचे उन्नयन होणे त्यांना अपेक्षित होते. लोकांनी स्वातंत्र्य, समता, आधुनिकता, न्याय अशा आधुनिक मूल्यांचा स्वीकार करावा ही त्यांची स्वप्ने होती. परंतु आपण अडकून पडलो जुन्याच प्रतीकांमध्ये. आधुनिकतेचा बाह्य़वेश आपण स्वीकारला, पण तिच्या गाभ्यातील सुसंस्कृतता.. ती आपण अंगाला लावून घेतलीच नाही. राजकारणामधील गुंडगिरीविरोधात बोलणारे आपले सुशिक्षित नेतेही गुंडांना निवडणुकीची तिकिटे देताना आघाडीवर दिसतात. मतदार त्या गुंडांना निवडून देतात. त्यातलाच एखादा तथाकथित लोकसेवक विमानातील सामान्य कर्मचाऱ्याला चपलेने मारतो. आणि मग आपण सारे मिळून संस्कृती आणि सहिष्णुतेच्या नावाने गळे काढत बसतो. या सगळ्यात काही विसंगती आहे याचेही भान आपण गमावले आहे.

अशा बे-भान समाजातच मग राजकीय कार्यकर्ते टीकाकारांवर हल्ले करतात, धर्मवाद्यांच्या फौजा नैतिक कोतवाल बनून गुंडगिरी करीत फिरतात, रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना चोपतात, रिक्षावाले एसटीच्या वाहकांना बदडतात. हिंसेचे वर्तुळ तयार होत राहते. त्याविरोधात समाजातून प्रतिक्रिया उमटत नाहीत असे नाही. त्या उमटतात, परंतु निवडकपणे. आज शिवसेना खासदाराच्या गुंडगिरीविरोधात समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हाच खासदार जर या प्रतिक्रियाखोरांच्या आवडत्या पक्षाचा असता तर ते अशाच पद्धतीने प्रकट झाले असते? तेव्हा केवळ खासदार रवींद्र गायकवाड नावाच्या व्यक्तीला दोष देऊन भागणार नाही. त्यांना तर आपण केले त्यात काही चूक होते हेच अद्याप समजलेले नाही. आपण लोकसेवक आहोत. राजे-महाराजे नाही. देशातील लाखो लोक रोज रेल्वेला, एसटी गाडय़ांना लटकून प्रवास करीत असताना आपली विमानात बसण्याची ऐषारामी व्यवस्था झाली नाही म्हणून दांडगाई करीत कायदा हातात घेण्याऐवजी सुसंस्कृतपणे तक्रार करण्याचा मार्ग आपल्याकडे आहे, हे समजण्याचे त्यांचे इंद्रियच काम करीत नाही. याला कारण सत्तेचा माज एवढेच असू शकत नाही. ते ज्या सामाजिक-राजकीय पर्यावरणात वाढले, जी प्रतीके घेऊन वावरले, त्यांतून त्यांच्याकडून असेच वर्तन घडणार होते. दोष या प्रतीकांना, त्यामागील विचारसरणीला ‘सँक्शन’ या अर्थाने मान्यता देणाऱ्या आपल्या सगळ्यांचा आहे. तेव्हा आता हिंसावृत्तीचे माजोरी तण वाढल्याबद्दल अन्य कोणाकडे बोट दाखवण्यात काय अर्थ आहे?