ट्रम्प यांच्या उजव्या, राष्ट्रवादी, देशी धोरणांचे सूत्रधार स्टीव्ह बॅनन हेही अखेर बाहेर पडले..

अमेरिकी अध्यक्षांचे निवासस्थान अलीकडे महासत्तेची धर्मशाळाच झालेले दिसते. कोण आले आणि कोण गेले याचा हिशेबच नाही. व्हाइट हाऊसमधील या ताज्या गच्छंतीत नवे नाव अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचे. त्याआधी ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील जवळपास डझनभर उच्चपदस्थांनी व्हाइट हाऊसला गेल्या काही महिन्यांत रामराम केला. या गोंधळाची जबाबदारी अर्थातच सर्वस्वी ट्रम्प यांची. समाजास बौद्धिक नेतृत्व देणारे आणि उच्चपदस्थ यांनी तटस्थ राहणे हे नेहमीच न्याय्य असते असे नाही. किंबहुना ते नसतेच. म्हणूनच अशांवर जे जे रास्त आणि व्यापक हिताचे त्याची बाजू उचलून धरण्याची जबाबदारी असते. ती पार पाडण्यात कुचराई झाल्यास काय होते ते ट्रम्प यांचे झाले आहे. अमेरिकेत गेल्या आठवडय़ात शार्लट्सव्हिल् येथे अतिरेकवादी गोऱ्या संघटनेने काढलेल्या मोर्चास हिंसक वळण मिळाले. या संघटनेचा अर्थातच अमेरिकेतील वंशविविधतेस विरोध आहे आणि अमेरिका ही फक्त गोऱ्यांपुरतीच असायला हवी असा त्यांचा आग्रह आहे. वर्णनावरूनच या निदर्शनांचे आयोजक किती मागास आहेत हे कळते. प्रत्येक समाजात अशा प्रकारच्या मागासांचे अवसान वाढेल असा काळ येत असतो. अशा वेळी देशाच्या सर्वोच्च सत्ताधीशाने ही मंडळी कह्य़ात कशी राहतील हे पाहावे लागते. अन्यथा बेबंदशाही फार दूर नसते. हे भान ट्रम्प यांना राहिले नाही. त्यामुळे या गोऱ्यांच्या वंशवादी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा नि:संदिग्ध निषेध त्यांनी केला नाही. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा दोष आहे, अशी गुळमुळीत आणि तटस्थवादी भूमिका त्यांनी घेतली. कळीच्या मुद्दय़ावर उच्चपदस्थांचा तटस्थपणा हा राजकीय सोयीचा आणि लबाडीचा निदर्शक असतो. ट्रम्प यांची तटस्थता ही तशीच होती. दोन्ही बाजूंना दोष देण्याच्या आणि गोऱ्या अतिरेक्यांचे कान न उपटण्याच्या वक्तव्यातून ट्रम्प यांची महत्त्वाच्या प्रश्नावरील अंगचोरीच दिसून आली. त्याचे काही गंभीर परिणाम संभवतात.

यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ट्रम्प यांना पदाचे काही गांभीर्य आहे की नाही, असा चहूबाजूंनी विचारला जाणारा प्रश्न. ट्रम्प यांनी नारळ दिलेल्यांतील ताजे बॅनन हे तर त्यांचे मुख्य सल्लागार होते. खरे तर कडव्या उजव्या विचारसरणीच्या बॅनन यांची धोरणात्मक सल्लागारपदी प्रमुख म्हणून जेव्हा ट्रम्प यांनी नेमणूक केली, तेव्हाच पुढे काय वाढून ठेवले आहे त्याबाबत अनेकांनी धोक्याचा इशारा दिला होता. हे बॅनन कडव्या उजव्यांची वृत्तसेवा चालवतात. विचाराने आत्यंतिक संकुचित, कठोर राष्ट्रवादाचा पुरस्कार आणि अर्थातच जागतिकीकरण आदींना विरोध हे त्यांचे गुणविशेष. ते माहीत असल्यानेच अनेकांनी बॅनन यांच्या निवडीवरून धोक्याचे इशारे वेळीच दिले. ते कोणीच गांभीर्याने घेतले नाहीत. याचे कारण ट्रम्प यांचे बॅनन यांच्या कच्छपि लागणे. अमेरिका फक्त अमेरिकींचीच, बिगर-अमेरिकी वस्तूंवर बहिष्काराची हाक आदी ट्रम्प धोरणे ही बॅनन यांच्या बौद्धिक विषवृक्षाचीच फळे. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती जेव्हा इतकी एकारलेली असते तेव्हा समाजातील अशा एकारलेल्यांना चांगलेच बळ मिळते. त्यांची भीड चेपते. अमेरिकेतही तेच झाले आणि त्यातूनच अतिउजव्या अशा गोऱ्यांच्या निदर्शनांचा घाट घातला गेला. असे काही आचरट उद्योग रोखायला हवेत हे त्याही वेळी ट्रम्प यांनी ध्यानात घेतले नाही. परिणामी जे होऊ नये ते झाले. या आंदोलनास हिंसक वळण लागले. त्यानंतर तरी ट्रम्प यांनी खमकी भूमिका घेणे अपेक्षित होते. ती त्यांनी घेतली नाही. आणि जे काही झाले त्यास दोन्ही बाजू जबाबदार आहेत, असे बोटचेपे विधान केले. परिणामी त्यांच्या विरोधात समंजस जगात चांगलाच प्रक्षोभ निर्माण झाला. अमेरिकेचा अध्यक्ष इतका मागास आणि संकुचित असेल असे अनेकांना पटले नाही.

परिणामी समाजशास्त्रज्ञ, लेखक ते उद्योगपती अशा सर्वानी ट्रम्प यांची निर्भर्त्सना केली. यात सर्वात कौतुक करावा असा घटक उद्योगपतींचा. आपल्याला सत्ताधीशांसमोर ताठ मानेने उभा राहणारा उद्योगपती पाहावयाची सवय नाही. असा एखादाच टाटा आपल्याकडे निपजलेला. परंतु अमेरिकेत अशा स्वाभिमानी धनवानांची वानवा नसल्यामुळे अनेकांनी अध्यक्षांच्या उद्योगमंडळाचा राजीनामा दिला. थ्री एम कंपनीचा प्रमुख डेनिस मॉरिसन, जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष जेफ इमेल्ट, मर्क या विख्यात औषध कंपनीचे प्रमुख केन फ्रेझिअर, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्स गॉस्र्की अशा अनेक मान्यवर उद्योजक, व्यावसायिकांनी ट्रम्प यांच्या अध्यक्षीय व्यावसायिक मंडळात सहभागी होणे नाकारले. या सर्वानी एकजात ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी भूमिकेवर टीका केली आणि अमेरिकेच्या अध्यक्षास हे शोभून दिसत नाही, असे मत जाहीरपणे व्यक्त केले. ट्रम्प यांना ते अर्थातच झोंबले. परंतु त्यावर आत्मपरीक्षण करण्याऐवजी ट्रम्प यांनी यातील अनेकांची खिल्ली उडवली. त्यातही विशेषत: मर्क कंपनीचे फ्रेझिअर यांच्यावर टीका करताना तर ट्रम्प यांनी अध्यक्षास न शोभणाऱ्या विखाराचे दर्शन घडवले. फ्रेझिअर हे अफ्रिकी-अमेरिकन आहेत आणि वर्णाने सावळे आहेत. त्यामुळे ट्रम्प यांची टीका अधिकच हीन ठरली. अमेरिकेस अभिमानास्पद वाटावा असा यानंतरचा भाग म्हणजे अमेरिकेतील सर्व प्रमुख बडय़ा उद्योजकांनी ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवली. परिणामी ट्रम्प यांना अखेर आपले हे उद्योग/व्यावसायिक सल्लागार मंडळच बरखास्त करावे लागले. एका बाजूला बाहेर हे राजीनामानाटय़. तर व्हाइट हाऊसमध्ये बॅनन आणि अन्यांतील संघर्ष हा प्रकार. अमेरिकेने जागतिकीकरणाचा त्याग करून अंतर्मुख व्हावे असा बॅनन यांचा आग्रह तर अन्य काही त्यांच्या विरोधात. एकंदर प्रशासनातील बजबजपुरी कमी म्हणून की काय, बॅनन यांनी ‘अमेरिकन प्रॉस्पेक्ट’ अशा नावाच्या एका डाव्या नियतकालिकास मुलाखत दिली. तीत ते काहीच्या बाही बहकले. ट्रम्प यांच्या राजकीय विजयामागील श्रेयावर तर त्यांनी दावा केलाच. परंतु त्याच वेळी डेमॉक्रॅट्सनी काय करायला हवे, रिपब्लिकनांतील मतभेद आदींबाबतही त्यांनी तारे तोडले. कहर झाला तो त्यांनी उत्तर कोरियाच्या प्रश्नावर केलेले भाष्य. उत्तर कोरियाची समस्या लष्करी मार्गानी सुटणारी नाही असे ठाम विधान या गृहस्थाने केले. ते देखील अशा वेळी की संरक्षणमंत्री जेस्म मॅटिस आणि खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे लष्करी उपाययोजनांची भाषा करीत असताना. तेव्हा इतके झाल्यानंतर बॅनन यांना नारळ देण्याखेरीज ट्रम्प यांच्या हाती अन्य पर्याय उरला नसावा. म्हणून बॅनन यांना अपेक्षेप्रमाणे बाहेरचा रस्ता अखेर दाखवला गेला. व्हाइट हाऊसमधून बाहेर पडणारे ते त्रू्त तरी शेवटचे. व्हाइट हाऊसचे कर्मचारीप्रमुख रिन्स प्रेबस, माध्यम संपर्कप्रमुख शाँ स्पायसर, एथिक्स डायरेक्टर वॉल्टर श्वाब, एफबीआयप्रमुख जेम्स कोमी, जनसंपर्कप्रमुख मायकेल डय़ूक, कर्मचारी उपप्रमुख केटी वॉल्श अशा अनेकांना ट्रम्प यांच्या हाताखाली काम करणे असह्य़ झाले. ही अशी राजीनामा देणाऱ्यांची संख्या डझनाने असेल.

यात बॅनन यांचे जाणे अधिक महत्त्वाचे. याचे कारण ट्रम्प यांच्या उजव्या, राष्ट्रवादी, देशी धोरणांचे ते सूत्रधार. त्यांनाच जावे लागणे हे त्यामुळे सूचक ठरते. या बहुधर्मीय, बहुभाषिक, बहुवर्णी, जागतिक वातावरणात इतक्या संकुचिताचे असणे हेच मुळात धोकादायक होते. हा संकुचितवाद चालणारा नाही, असा संदेश बॅनन यांच्या राजीनाम्यातून मिळतो. हे महत्त्वाचे आहे. कर्मठ उजव्यांच्या विचारसरणीतील डावेपण त्यातून पुढे आले. आज देशोदेशी अशा संकुचितांचा प्रादुर्भाव वाढत असताना अमेरिकेत त्यास आळा बसणे आवश्यक होते. त्यातून योग्य तो संदेश जाईल ही आशा.

  • बहुधर्मीय, बहुभाषिक, बहुवर्णी, जागतिक वातावरणात संकुचितवाद चालणारा नाही, असा संदेश बॅनन यांच्यासारख्याच्या राजीनाम्यातून मिळतो. मात्र ट्रम्प यांना पदाचे काही गांभीर्य आहे की नाही, असा चहूबाजूंनी विचारला जाणारा प्रश्न कायम राहतो..