पावसाची उघडीप झाली की हा शत्रू नव्या फौजा निर्माण करू लागतो आणि आपण मात्र हल्ले सुरू होऊन गलितगात्रपणा येताच जागे होऊ  लागतो..

विज्ञानावर स्वार होऊन असंख्य आश्चर्याची उकल करणाऱ्या प्रगत माणसाला या क्षुल्लक दिसणाऱ्या शत्रूने दिलेले आव्हान हेच नव्या जगाचे उलगडणारे कोडे बनून राहणार, की त्याची कायमची उकल करण्याचा मंत्र माणसाला सापडणार, या कुतूहलाचे ओझे आपण आणखी किती काळ डोक्यावर वाहायचे हा खरा प्रश्न आहे.

सध्या सर्वत्र एक अत्यंत संवेदनशील, युद्धजन्य आणि अधिक बेसावधपणा दाखविल्यास जीवघेणी ठरेल, अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. आपल्याकडे कितीही अतिशक्तिशाली क्षेपणास्त्रे असोत, विध्वंसक अण्वस्त्रे असोत किंवा शत्रूला पाणी पाजण्यासाठी आपल्याकडची सारी शस्त्रे परजून आपण सारे त्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असू, तरी हा शत्रू मात्र समोर उभाच नाही. त्याने छुपा हल्ला चढविला आहे आणि या शत्रूशी दोन हात करण्यासाठी, आपल्याकडे असलेला दारूगोळा, शस्त्रास्त्रे आणि सारी अण्वस्त्रे, हत्यारेही कुचकामी ठरणार आहेत. अशी परिस्थिती अत्यंत शहाणपणाने, संयमाने आणि समंजसपणा दाखवून हाताळावी लागते. आम्ही कोण आहोत माहीत नाही काय, आमच्याकडे किती युद्धसज्जता आहे याची कल्पना नाही काय, अशा थाटात मारलेल्या वल्गना या शत्रूच्या कानावरदेखील पडणार नाहीत आणि त्याची त्याला कवडीची पत्रासदेखील नाही. त्यामुळेच, या शत्रूला समोरासमोर हरविणे सोपे राहिलेले नाही. ही परिस्थिती आजचीच नाही. पावसाळा सुरू झाला, आसपास स्वच्छ पाण्याचे मुबलक साठे झाले, हिरवाई माजू लागली, की अवघी सृष्टी आणि माणसांचे जग आनंदाने मोहरून गेलेले असते आणि नेमक्या या बेसावध क्षणी या शत्रूला त्याचा गनिमी कावा साधण्याची संधी मिळते. त्याचे हल्ले सुरू होतात. पावसाची उघडीप झाली, मधूनमधून उन्हाची तिरीप अंगावर येऊ  लागली, की हा शत्रू नव्या फौजा निर्माण करू लागतो आणि आपण मात्र हल्ले सुरू होऊन गलितगात्रपणा येताच जागे होऊ  लागतो. मग सावधगिरीच्या आणि शत्रूपासून बचावाच्या उपाययोजना आखण्याच्या मोहिमा सुरू होतात आणि हल्ले परतवण्यासाठी काय करावे या उपदेशाचे डोस पाजण्याची स्पर्धाही सुरू होते.

साधारणपणे वर्षांगणिक ठरावीक हंगामात ही अशी युद्धजन्य परिस्थिती ओढवतच असते आणि असे असूनही आपण मात्र स्वबळाच्या गर्वात वावरत बेसावधच राहिलेले असतो. त्यामुळेच पहिल्या हल्ल्याची नेमकी संधी साधून शत्रू अंगावर आला, की साहजिकच पहिला पवित्रा आक्रमणाचा नव्हे, तर बचावाचा घ्यावा लागतो आणि पुढे शत्रूपासून बचाव कसा करावा याचेच धडे शिकत, समोर ठाकलेल्या परिस्थितीचा हतबलपणेच मुकाबला करावा लागतो. गेल्या काही वर्षांत हा शत्रू अधिकाधिक प्रबळ होत चालला आहे. अर्थात, या शत्रूला देशाच्या, प्रांताच्या, भाषेच्या किंवा धर्माच्याही भौतिक सीमारेषांचे कोणतेच अडथळे नाहीत आणि आपणच एकटे या शत्रूचा मुकाबला करताना हैराण झालेलो आहोत असेही नाही. जगातील एक तृतीयांश लोकसंख्येसमोर या शत्रूच्या रूपाने हे संकट उभे आहे आणि त्यामुळेच हा क्षुल्लक वाटणारा शत्रू जीवघेणा ठरत चालला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याने माणसापुढे आव्हान उभे केले असले तरी अनेक राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि आरोग्यव्यवस्थादेखील त्याच्यापुढे हतबल झालेल्या दिसतात. विज्ञानावर स्वार होऊन असंख्य आश्चर्याची उकल करणाऱ्या प्रगत माणसाला या क्षुल्लक दिसणाऱ्या शत्रूने दिलेले आव्हान हेच नव्या जगाचे न उलगडणारे कोडे बनून राहणार, की त्याची कायमची उकल करण्याचा मंत्र माणसाला सापडणार, या कुतूहलाचे ओझे आपण आणखी किती काळ डोक्यावर वाहायचे हा खरा प्रश्न आहे. या शत्रूचे नाव एव्हाना कानोकानी झालेले आहे. एडिस इजिप्त नावाचा, स्वच्छ पाण्यात पैदास होणारा एक छोटासा डास डेंग्यू नावाचा एक साथीचा आजार पसरवून माणसासाठी जीवघेणा ठरू शकतो आणि या शत्रूला लगाम घालण्यासाठी केवळ बचावाखेरीज कोणताच उपाय आपल्या हाती नसतो, ही या युद्धजन्य परिस्थितीतील माणसाची हतबलता! पौष्टिक अन्न खाऊन, भरपूर व्यायाम करून आणि शरीराच्या सुयोग्य पोषणासाठी आवश्यक असलेल्या साऱ्या उपायांचे कसोशीने पालन करून जमा केलेली सारी रोगप्रतिकारशक्ती पणाला लावूनच या आजाराशी सामना करताना, अनेक जण जेरीस येतात. या डासाच्या दंशातून शरीरात शिरलेल्या जंतूंचे आक्रमण परतवून लावताना शरीरातील प्रतिकारशक्तीचा कस लागतो आणि त्यामध्ये जो जिंकतो, तो तरून जातो. अन्यांना या जंतूंशी दीर्घकाळ सामना करत राहावे लागते. ही परिस्थिती म्हणजे डेंग्यूच्या जंतूंशी सुरू होणारे युद्ध, म्हणजे माणसाला अंथरुणाला खिळविणारे केविलवाणे आजारपण असते. या आजारपणावर प्रभावी ठरेल असे परिणामकारक औषध किंवा लस अद्याप सापडलेली नाही आणि या आजाराच्या फैलावाचे माध्यम ठरणाऱ्या एडिस जातीच्या मच्छरांचा फैलाव रोखण्याचा उपायदेखील आपल्याला सापडलेला नाही. म्हणून अवघे जगच या साथीच्या भयाने चिंतित आहे.

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात मुंबईसह अनेक शहरांना आणि लहानमोठय़ा गावांनाही या साथीने विळखा घातला आहे. स्वच्छ पाण्याचे साठे शोधून त्यामध्ये वाहकांच्या नव्या फौजा निर्माण करण्याच्या एडिस मच्छराच्या सवयीमुळे, उच्चभ्रू वस्त्यांमध्येच म्हणजे, आम्हाला कोण काय करतो, या भावनेचा दर्प जेथे बहुधा दरवळतच असतो, अशा ठिकाणीच या डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे मुंबईत निदर्शनाला आले. तसे ते याआधीही अनेकदा आढळलेले आहे. खरे तर, डास नावाची कीटकाची ही जमात माणसाची जात, धर्म, देश पाहात नाही, तसेच माणसाच्या भौतिक दर्जाशीही त्याला काडीचेही देणेघेणे नसते. तरीही, विद्या बालनला डेंग्यू झाला, कपूर नावाच्या कुणा सेलिब्रिटी कुटुंबाच्या निवासाच्या परिसरात एडिसच्या अळ्या सापडल्या आणि सनदी अधिकाऱ्यांच्या घरातच या डासांनी ठाण मांडल्याचे निदर्शनास आले, की त्याच्या बातम्या फैलावू लागतात आणि या आजाराचे गांभीर्य अधिकच जाणवू लागते. इस्पितळे, खासगी दवाखाने गर्दीने ओसंडू लागले, काहींचे बळी गेले, म्हणजे साथीची जाणीव अधिकच चटके देऊ  लागते आणि साऱ्या व्यवस्था बाह्य़ा सरसावून उभ्या राहतात. एका वैज्ञानिक गटाच्या जागतिक पाहणीनुसार, जगभरात वर्षांगणिक सुमारे चाळीस कोटी लोकांना डेंग्यूची लागण होते आणि या आजाराशी लढू शकतील अशी प्रतिजैविके अद्याप विज्ञानाच्या हाताला लागलेली नाहीत, यावरूनच या आजाराचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे, सध्या तरी एडिस जातीच्या डासांची पैदास रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न करीत राहणे एवढाच उपाय आपल्या हाती आहे आणि डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी समंजसपणे तो करीत राहणे गरजेचे आहे.

चीनमधील राजवंशात पहिल्यांदा आढळलेल्या आणि सतराव्या शतकात मोठय़ा प्रमाणावर फैलावलेल्या या साथीने जगातील शंभराहून अधिक देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. सुमारे ५३ वर्षांपूर्वी, १९६३ मध्ये कोलकाता येथे या आजाराची पहिली साथ आली आणि पुढे या साथीने देशात हातपाय पसरले. आज भारत हा दक्षिण आशियातील सर्वात संवेदनशील डेंग्यूप्रवण देश ठरला आहे. अशा साथी सुरू झाल्या, की आरोग्यरक्षक यंत्रणा, सत्ताधारी पक्ष, सरकारांच्या नावाने बोटे मोडण्याचे राजकारण सुरू होते. ते बहुधा जिवंत लोकशाहीचे लक्षण मानण्याची एक प्रथा समजली जाते. पण या आजाराच्या फैलावाशी निव्वळ सरकारच्या कामगिरीचा संबंध नसतो, तर जनतेच्या सावधगिरीतूनच या आजारापासून लांब राहणे कदाचित शक्य होऊ  शकते. हे शहाणपण शिकविणे ही मात्र सरकारी यंत्रणांची जबाबदारी असते. ती जबाबदारी या यंत्रणा बहुतेकदा इमानेइतबारे पार पाडत असतात. ते स्वीकारून, बचावात्मक पवित्रा हाच स्वसंरक्षणाचा उपाय असल्याचे मान्य करण्याचा विनयशीलपणा अंगी बाणविला, तर या आजाराच्या चिंतेचे ओझे वाहण्यासाठी मानसिक बळ तरी मिळेल.