दहशतवाद नागरिकांच्या मनांवर द्वेषाचाच परिणाम घडवतो.. त्याच्याशी मुकाबला करण्याच्या नव्या पद्धतीच शोधून काढाव्या लागणार आहेत.

अमेरिकेत, युरोपात अनेक भारतीयांना वांशिक विद्वेषाचा सामना करावा लागत आहे, त्यात त्यांचा दोष काय आहे? दोष असेल तर तो हवेत पसरलेल्या द्वेषभावनेचा आहे. एकीकडे द्वेषाची लागण झालेले ‘ट्रम्पिझम’ग्रस्त देश, तर दुसरीकडे धर्माच्या अफूने मेंदू मंद झालेले अतिरेकी आणि त्यातून जन्मास आलेल्या आयसिससारख्या हिंस्र धर्माध संघटना असा हा संघर्ष आहे.

कोणताही दहशतवादी हल्ला लहान-मोठा नसतो. त्यात किती मारले गेले, त्यासाठी कोणती शस्त्रे वापरण्यात आली यावर त्याचे मूल्यमापन केले जात नाही. ते केले जाते त्यातून निर्माण होत असलेल्या दहशतीच्या भावनेवर. दहशतवादी हल्ल्याचा खरा हेतू असतो तो तोच. लोकांच्या मनात भय निर्माण करायचे. राज्यव्यवस्था आपले संरक्षण करूच शकणार नाही अशी भावना तयार करायची. लंडनमध्ये बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर तेथीलच नव्हे, तर जगभरातील प्रत्येक सुसंस्कृत नागरिकाच्या मनात ही भयशंका नक्कीच निर्माण झाली असेल. याचे कारण म्हणजे या हल्ल्याचे स्वरूप. ते गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर बदलले आहे. सत्तरचे दशक हे युरोपातील दहशतवादी हल्ल्यांनीही गाजले. ब्रिटननेही आयरिश रिपब्लिकन आर्मीचे हल्ले पाहिले आहेत, त्यांनी केलेले खूनसत्र अनुभवले आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना, जर्मनीतील बॅडर-मेनहॉफसारखी अतिडावी संघटना येथपासून इलियास रामिरेझ सांचेझ ऊर्फ कालरेस द जॅकल याच्यासारखा भाडोत्री दहशतवादी अशा विविध दहशतवादी संघटना वा व्यक्ती यांच्या हिंसक कारवाया संपूर्ण युरोपने अनुभवल्या आहेत. आपल्याकडील नक्सलबारीतून निर्माण झालेली नक्षलवादी चळवळ ही त्याच काळातील. परंतु आता हे विचित्र वाटत असले, तरी तेव्हाच्या त्या दहशतवादामागे एक प्रकारचा ‘रोमँटिसिझम’ होता. नव्वदच्या दशकापर्यंत ते सारेच संपले आणि सुरू झाला तो हिंसेचा हैदोस. हा सर्व दहशतवाद संघटित स्वरूपात होता. त्याची तंत्रे सारखीच होती आणि त्याचा मुकाबला करण्याची पद्धतही. आज मात्र त्याने मोठीच कलाटणी घेतली आहे. एकल व्यक्तीकडून होणारा हल्ला हे त्याचे नवे रूप आहे. नीस, डलास, न्यू यॉर्क, ब्रसेल्स आणि आता लंडन अशा विविध ठिकाणी ते दिसून आले आहे. दहशतवादी हल्ल्यांची ही नवी पद्धत आताच समोर आली आहे असे नव्हे. अल कायदाचे विघटन झाले. अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांमधील सुरक्षा व्यवस्था दिवसेंदिवस कठोर आणि कडक होत गेली. संशयितांवर नजर ठेवण्याची यंत्रणा तर सर्वव्यापीच बनू लागली. या सगळ्याच्या परिणामी हल्ल्यांचा हा नवा पर्याय समोर आला. आजवरच्या सर्व दहशतवादी प्रकारांपेक्षा अत्यंत भयकारी आणि परिणामकारक असा हा पर्याय आहे. संघटित स्वरूपाचा दहशतवाद रोखणे हे तुलनेने सोपे. जगभरातील सुरक्षा यंत्रणांची कार्यपद्धती त्या दृष्टीने तयार झालेली आहे. एकल हल्ल्यांचे तसे नाही. ते कधी, कोण आणि कोठे करील याचा अंदाज बांधणे अशक्यप्राय. नागरिकांवर नजर ठेवण्याच्या कितीही आधुनिक यंत्रणा विकसित झाल्या, तरी कोणाच्या डोक्यात काय शिजते आहे हे शोधून काढणे अशक्यच. पुन्हा अशा हल्ल्यांसाठी फार मोठी तयारी करण्याचीही आवश्यकता नसते. एखादा सुरा, एखादी बंदूक, एखादे वाहन आणि मरण्याची तयारी एवढे त्यासाठी पुरते. लंडनमधील किंवा गतवर्षी नीसमध्ये झालेल्या हल्ल्याने जगाला त्याचे अत्यंत हिंस्र दर्शन घडविले आहे. कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल असे ते होतेच, परंतु जगातील अनेक विकृतांना प्रेरणादायी असेही ते होते. आज सुसंस्कृत समाजासमोर आव्हान आहे ते याचे. हे हल्ले रोखण्याचे काम केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे नाही. ते अधिकाधिक कडक कायदे करूनही होणारे नाही की नागरिकांवर नजर ठेवण्याची नवनवी तंत्रे शोधूनही होणार नाही. एखाद्या देशावर बॉम्बफेक केल्यानेही ते थांबणार नाही. त्यासाठी दहशतवादाच्या मुकाबल्याच्या नव्या पद्धतीच शोधून काढाव्या लागणार आहेत. लंडन हल्ल्यानंतर जगासमोर उभे राहिलेले आव्हान आहे ते हेच.

या आणि यांसारख्या अनेक हल्ल्यांसाठी आज युरोपीय देश जबाबदार धरीत आहेत ते स्थलांतरितांना, निर्वासितांना, विदेशी वंशाच्या नागरिकांना. गेले वर्ष स्थलांतरितांच्या प्रश्नाने गाजले. नुसते गाजलेच नाही, तर त्याने संपूर्ण युरोपमध्ये ट्रम्पिझम नावाचा नवाच कुविचार जन्मास घातला आहे. त्याला कोणी जागतिकीकरणविरोधी म्हणते, कोणास त्यात अल्पसंख्याकांच्या अनुनयाविरोधातील प्रतिक्रिया दिसते, तर कोणास बहुसंख्याकांच्या अस्मितेचा हुंकार. ते काहीही असले, तरी त्याचा पाया आहे तो द्वेषाचा. वर्ण, वंश, धर्म, एवढेच नव्हे तर तर्कविचार, तथ्ये यांबाबतच्या द्वेषाचा. त्यामुळेच लाखो लोकांना स्थलांतर का करावे लागते, त्याला आपली राजकीय धोरणे तर कारणीभूत नाहीत ना, अशा प्रश्नांच्या खोलात तो विचार जात नाही. अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे हे त्याचे रूप असते. ते लोक नावाच्या गर्दीला अधिक भावते. ब्रिटनसारख्या संसदीय लोकशाही परंपरांची पताका सतत मिरवीत असलेल्या देशालाही उदारमतवादी विचारसरणी झिडकारून ‘ब्रेग्झिट’ करावेसे वाटावे यातच या ट्रम्पवादाने युरोपातील समाजजीवनास कसे ग्रासले आहे हे दिसून येते. एकीकडे हे देश, तर दुसरीकडे धर्माच्या अफूने मेंदू मंद झालेले अतिरेकी आणि त्यातून जन्मास आलेल्या आयसिससारख्या हिंस्र धर्माध संघटना असा हा संघर्ष आहे. आयसिसप्रणीत इस्लामी राज्याचे आवाहन आज जगभरातील अनेक तरुणांना भुलवीत आहेत. त्यांच्या मनात द्वेषाचा विखार पेरणे हे इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे अधिक सोपे झाले आहे. आयसिस वा अल कायदा यांसारख्या संघटनांशी थेट संबंध नसतानाही अनेक तरुण त्यांचे स्वयंसेवक बनत आहेत. त्यांच्या विखारी प्रचाराने भारून त्यातलाच एखादा उठतो आणि स्वयंस्फूर्तीने दहशतवादी हल्ला करतो. त्याला रोखायचे असेल, तर पहिल्यांदा समाजजीवनाला आजारी पाडू पाहणारी द्वेषाची हवा आधी स्वच्छ केली पाहिजे. द्वेषाला द्वेषाने, िहंसेला िहसेने उत्तर देण्यातून द्वेष आणि हिंसा हेच वाढत असते. त्याचीच परिणती अशा एकल हल्ल्यांमध्ये होत असते, हे नीट समजून घेतले पाहिजे. अनेकांना हे दिसणार नाही, पटणार नाही. ते पटूच नये यातही अनेकांचे हितसंबंध सामावलेले आहेत. त्यामुळे असे प्रयत्न हाणून पाडण्याचाच प्रयत्न केला जाणार. किंबहुना तो सातत्याने सुरूच आहे. लंडन हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिरंजीवांनी लंडनचे महापौर सादिक खान यांचे एक विधान विकृत स्वरूपात मांडून त्यावर ट्विप्पणी केली. दहशतवादी हल्ले हा मोठय़ा शहरांमधील जीवनाचा एक भागच आहे असे खान म्हणाल्याचे त्याचे म्हणणे होते. त्यावर ब्रिटनमधील जाणत्या जनांनीच त्याला उत्तर दिले. हा खान यांना बदनाम करण्याचाच ट्रम्प यांच्या दिवटय़ाचा प्रयत्न होता. अशा प्रकारे खोटय़ा आणि विकृत प्रचारातून द्वेषभावना पेटती ठेवण्याचे प्रयत्न सातत्याने चालूच असतात आणि असंख्य निरपराध व्यक्ती नाहक त्याची शिकार बनत असतात. एरवी लंडन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले चार नागरिक, जखमी झालेले विविध वंशांचे, धर्माचे, देशांचे सुमारे ४० जण यांचा त्यात दोष काय होता? अमेरिकेत, युरोपात अनेक भारतीयांना वांशिक विद्वेषाचा सामना करावा लागत आहे त्यात त्यांचा दोष काय आहे? दोष असेल तर तो हवेत पसरलेल्या द्वेषभावनेचा आहे.

ब्रेग्झिटोत्तर ब्रिटनमध्ये सादिक खान नावाची व्यक्ती लंडनच्या महापौरपदी निवडली गेली, ही घटना अशा वातावरणात म्हणूनच आशादायी ठरली. त्यातून लंडनकरांचा जो उदारमतवादी चेहरा दिसला होता, त्यावर ओरखडे ओढण्याचा प्रयत्न बुधवारच्या हल्ल्याने केला. तेथील सुसंस्कृत समाजासमोर आज आव्हान असेल तर हेच की, या हल्ल्यामागील विचारांचा सामना कसा करायचा? तो बंदुकीच्या गोळ्यांनी करता येत नाही, हे वारंवार घडणाऱ्या एकल दहशतवादी हल्ल्यांनी दाखवून दिले आहे.