राणे काय किंवा शिवसेना काय, या दोघांची तूर्त समस्या ही की त्यांना कोठे, कोणत्या मार्गाने जावे हे कळेनासे झाले आहे..

शिवसेना आणि नारायण राणे या दोघांची अवस्था एकच आहे. सहन करावयाचे तर आहे, सांगायचेही आहे आणि तरी कोणी आमचे ऐकत नाही म्हणून रडायचेही आहे. ही अवस्था ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ याच्या पुढची. ‘मातोश्री’वर सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यादेखत त्यांचे कथित मर्दमावळे आपल्याच सरकारातील मनसबदारांवर चालून जात असताना तिकडे अपरांती काँग्रेसीचे कथित स्वाभिमानी नारायणराव राणे आपल्या दोन चिरंजीवांसह समोर नसलेल्या शत्रूवर तोफगोळे झाडण्यात विजयश्री मानत होते. नारायणराव मूळचे शिवसेनेचे. सध्या आहेत काँग्रेसीत. आणि जायचे आहे भाजपत. तसेच शिवसेना सध्या आहे भाजपबरोबरच्या संसारात. जवळपास तीन दशकांचा हा संसार. तो फळला नाही असे म्हणावे तर तेही नाही. या काळात मधे मधे उगवलेल्या सत्तावृक्षास मोठी गोमटी फळे लागली आणि ‘मातोश्री’वरून समृद्धी ओसंडून वाहू लागली. हा संसार फळला. बहरला. त्या वेलीवर जी काही फुले लागायची होती तीही लागली. तेव्हा या संसाराने सुख दिले नाही, असे म्हणायची सोय नाही. तरीही आपला जोडीदार आपणास विचारत नाही या काल्पनिक भीतीने शिवसेनेस ग्रासले आहे. बरे, वैवाहिक समुपदेशकांनी मध्यस्थीच्या मिषाने जोडीदार विचारत नाही म्हणजे काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेस तेही सांगता येईना. हातीपायी काहीही काम होत नाही अशी अवस्था आली की वृद्धावस्थेत अनेकांना आजार काहीही नसतो, पण तरी निरोगी वाटेनासे होते. शिवसेनेचे हे असे झाले आहे.

girish mahajan eknath khadse
“आता तुमचं भविष्य…”, एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “मी आहे म्हणून…”
raghuram rajan
“भारतातील तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी”, RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन असं का म्हणाले?
What Prithviraj Chavan Said About Modi?
पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल, “दगडात देव असतो का?, भावनिक करुन..”
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना

राणे काय किंवा शिवसेना काय, या दोघांची तूर्त समस्या ही की त्यांना कोठे जावयाचे आहे अणि तो मार्ग कोणता हेच कळेनासे झाले आहे. नारायणरावांच्या बाबत ही समस्या अधिक गंभीर. कारण त्यांच्या डोक्यावर आपल्या कर्तृत्ववान चिरंजीवांच्या भवितव्याचे ओझे आहे. सेनेत असताना ते मुख्यमंत्री होते. तेथे राहून अधिक काही मिळणार नाही याची जाणीव झाल्यावर ते काँग्रेसमध्ये गेले. तेथे मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते फुरंगटलेले असत. पण म्हणून समोर आलेली मंत्रिपदे धुडकावण्याचा स्वाभिमान त्यांनी कधी दाखवल्याचे उदाहरण नाही. ताटात वाढलेले सोडायचे नाही. पण तरी समोरच्याच्या ताटातलेही हवे म्हणून भोकाड पसरायचे असे त्यांनी सतत केले. त्रागा करावयाचा पण हातातली जी काही आहे ती सत्ता सोडायची नाही, असा हा खाक्या. आणि तरीही स्वत:च्या मर्दुमकीच्या बाता मारायच्या. कोकणात आपणास फार मान आहे, असे या राणे संप्रदायास वाटते. ते कशाच्या जोरावर हे कोणाही शहाण्यास कळणारे नाही. स्वत: नारायणराव हरले, एका चिरंजीवांचा पराभव झाला, आपल्या एके काळच्या सहकाऱ्यांना पळवून सत्ताधीशांनी फितवले आदी जहागिरी गेल्याची सर्व लक्षणे समोर असली तरी आपण पराभूत झालो हे मानायचे मात्र नाही. हे स्वत:पुरते ठीक. परंतु स्वत:च्या ताकदीचा आभास इतरांनी वास्तव म्हणून स्वीकारावा आणि नाही स्वीकारला तर आदळआपट करावी हे कसे? राणे यांचे वास्तव पहिल्यांदा काँग्रेसने ओळखले. तेव्हा यांना वाटले भाजप आपल्याला पायघडय़ा घालून बोलावेल. अलीकडे भाजपदेखील काँग्रेसच्याच मार्गाने जात असल्याने त्या पक्षाने राणे यांच्या पक्षप्रवेशाची बातमी तेवढी सोडली आणि प्रत्यक्षात घेतले मात्र नाही. म्हणजे काँग्रेसचा दोर तुटत आलेला, किंबहुना श्रेष्ठींनी तो सोडून दिलेला आणि भाजपचा झुला काही हाती लागावयास तयार नाही, अशी ही अवस्था. तेव्हा मिळेल त्या धाग्यास लोंबकळत राहण्याखेरीज राणे यांच्यासमोर पर्याय नाही. आणि समजा भाजपने जरी त्यांना एकावर दोन मोफत याप्रमाणे घेण्याची चूक केली तरी ती कृती गरजवंत राणे यांच्यासाठी असेल. ही गरजवंतगिरी राणे यांना करावी लागते कारण उद्या आपल्या आलिशान महालाचा दरवाजा सक्तवसुली संचालनालयाने ठोठावू नये ही इच्छा.

शिवसेनेचेही नेमके तेच आहे. भाजपसमवेत त्यांचे सत्तेत असणे हे पूर्ण ऐच्छिक आहे. भाजपसमवेत राहून तुम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायलाच हवा, असे काही या महाराष्ट्राचे म्हणणे नाही. तेव्हा पटत नसेल तर काडीमोड घेण्याइतके सेनानेतृत्व नक्कीच सज्ञान आहे. तरीही ही कृती करण्यास सेना धजावत नाही आणि कितीही मोठय़ांदा गळा काढून दाखवला तरी धजावणारही नाही. त्याची कारणे तीन. एक म्हणजे भाजपशी घटस्फोट घेतलाच तर पुढील किती काळ सत्तेशिवाय काढावा लागेल याचा काही अंदाज बांधता येणार नाही. परत स्वबळावर सत्ता येईलच याची शाश्वती नाही. दुसरे कारण म्हणजे आपण भले मर्दुमकीचा आव आणत सत्ता सोडायचो. पण आपले साजिंदेच फुटून पुन्हा कमळाबाईकडेच गेले तर काय घ्या, अशीही भीती उद्धव ठाकरे यांना असणारच असणार. ती किती खरी आहे, हे सांगावयाची गरज नाही. उद्धव यांनाही याचा अंदाज असल्याने आणि शपथा, शिवबंधन वगरे किती तकलादू असते याची जाणीव असल्याने ते हा निर्णय घेणार नाहीत. आणि समजा घेतला तरी भाजपविरोधात आपली ताकद ते किती रेटू शकणार हा प्रश्नच आहे. हा तिसरा मुद्दा. तो महत्त्वाचा अशासाठी की आजचा भाजप हा वाजपेयी/ अडवाणी यांचा स्नेहाळ भाजप नाही आणि आजची सेनाही बाळासाहेबांची सेना नाही. म्हणजे उद्धव ठाकरे हे काडीमोडानंतर फारच भाजपविरोधात ताणू लागले तर सेनेच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या सार्वजनिक होणार नाहीत असे नाही. मग चौकशी वगरे आली. त्यास सामोरे जावयाचे तर वाघाचे काळीज लागणार. परत लढण्यास सोबत तेवढेच रग्गड ताकदीचे सवंगडीही लागणार. या दोन्हींच्या अभावी भाजपशी दोन हात करणे सेनेसाठी केवळ अशक्यच आहे. तेव्हा शिवसेना भले कितीही म्हणो, आमची निर्णयाची वेळ आली आहे वगरे. त्यांच्या धमकीने फार काही थरार निर्माण झाला असे नाही. उलट ही धमकी हसण्यावारीच नेली जाईल. मातोश्रीवरच्या बठकीत ठाकरे यांच्यादेखत सनिक आणि सुभेदार हे एकमेकांना भिडले. त्यास उद्धव ठाकरे यांची संमती तरी असणार किंवा ते पारच अशक्त झाले आहेत, हे तरी खरे असणार. या दोनांशिवाय तिसरा पर्याय नाही. आणि या दोनांतील कोणताही एक खरा असेल तर ते भूषणावह नाही. पहिल्याने सेनेच्या सुभेदारांत उद्धव यांच्याविषयी नाराजी निर्माण होईल तर दुसरा पर्याय खरा असेल तर सामान्य शिवसनिक दुखावला जाईल. यातील काहीही खरे असले तरी ते वाईटच.

तेव्हा शिवसेना असो वा माजी शिवसनिक नारायणराव राणे. आपले लक्ष्य, मार्ग आणि पद्धत या तीनही आघाडय़ांवर हे दोन्ही अप्रामाणिक राहिले म्हणून या दोघांवर ही वेळ आली. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना या संदर्भात आपल्या उद्दिष्टांची साफसफाई करावी लागेल. नपेक्षा परिस्थिती त्यांना रेटेल. ते परिस्थितीस रेटू शकणार नाहीत. मिर्झा गालिब हा शायरोत्तम या दोघांच्या अवस्थेचे चपखल वर्णन करतो.

रौ में है रख़्श-ए-उम्र, कहां देखिए थमें

न हाथ बाग़ पर है न पा है रक़ाब में

(आयुष्याचा घोडा चौखूर उधळलाय

कोठे थांबेल ते पाहायचे

ना हातात लगाम, ना पाय रिकिबीत.)