24 August 2017

News Flash

आता निघायला हवे..

जवळच्या मित्रमंडळांत त्यांचा उल्लेख लॉर्ड गोविंदराव असा केला

लोकसत्ता टीम | Updated: March 23, 2017 4:13 AM

गोविंदराव तळवलकर

मराठीचे भाषासौष्ठव जपणाऱ्या गोविंदराव तळवलकरांकडे भाषिक मर्यादा ओलांडून जाण्याची क्षमता होती आणि त्या त्यांनी ओलांडल्याही..

जवळच्या मित्रमंडळांत त्यांचा उल्लेख लॉर्ड गोविंदराव असा केला जाई इतके ते विचाराने पाश्चात्त्य. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि अर्थातच भारत आदी ठिकाणच्या वाढत्या असहिष्णुतेने ते अस्वस्थ होत. जगभरातली बदलती राजकीय संस्कृती हा त्यांच्या चिंतेचा विषय होता आणि ते ती चिंता उघडपणे व्यक्त करीत. भारतातील अलीकडच्या निवडणुका आणि नंतरच्या काही राजकीय नेमणुका ही त्यांची शेवटची वेदना. या बदलत्या राजकीय विचारधारेशी जुळवून घेणे त्यांना दिवसेंदिवस अशक्यप्राय वाटू लागले होते.

गोविंदराव तळवलकरांचे आकाश मराठी वर्तमानपत्रांच्या चौकटीत मावेल इतके लहान नव्हते. करकरीत बुद्धिवादी आणि अभिजात सौंदर्यवादी, या बुद्धिवादास साजेशी प्रसंगी कोरडी वाटेल अशी भाषाशैली आणि तरीही उत्तमोत्तम काव्याचा आनंद घेण्यादेण्याइतके हळुवार, जे जे हिणकस, सपक, क्षुद्र असेल त्याचा समाचार घेताना लेखणीने रक्तबंबाळ करण्याची क्षमता आणि तरीही कमालीचे उदारमतवादी हे गोविंदरावांचे लेखनवैशिष्टय़. परंतु केवळ एवढय़ातूनच त्यांच्या मोठेपणाचा परिचय करून देता येणार नाही. ज्या काळात सर्वसाधारण मराठी संपादक साहित्य संमेलनांतील उचापती, वैयक्तिक उणीदुणी, एखाद्या सामाजिक मुद्दय़ाची भावोत्कट मांडणी आदी ग्रामोद्योगांत मग्न होते त्या काळात गोविंदराव मराठी वाचकांना आंद्रे साखारॉव्ह, बोरीस पास्तरनाक, आर्थर कोस्लर, स्टीफन झ्वेग अशा एकापेक्षा एक पाश्चात्त्य रत्नलेखनाची ओळख करून देत. गोविंदराव त्या अर्थाने त्या काळचे आणि त्या वातावरणातलेही नव्हते. त्यामुळे ह. रा. महाजनी, विद्याधर गोखले, दि. वि. गोखले, अनंतराव भालेराव, रंगा वैद्य असे मोजकेच काही सोडले तर गोविंदरावांनी जवळीक साधावी असे तत्कालीन मराठी पत्रकारितेत फार कोणी त्या वेळी नव्हते. त्यामुळे शामलाल, गिरिलाल जैन, निखिल चक्रवर्ती, एन. राम अशा राष्ट्रीय स्तरावरील संपादकांतच ते अधिक रमत. समृद्ध वाचनाने आलेल्या बौद्धिक श्रीमंतीचा गोविंदरावांना अभिमान होता आणि त्यामुळे अशा जातीच्या रावबहादुरी उमरावासारखेच त्यांचे वागणे असे. लोकप्रिय होण्याचा सोस नाही आणि कोणास काय वाटेल याची पत्रास ठेवण्याचे कारण नाही, असा त्यांचा खाक्या. त्याचमुळे फुटकळ मालिका आदी लिहिण्यात धन्यता मानणाऱ्या आणि लेखनबाह्य़ उचापतींसाठीच ओळखल्या जाणाऱ्या संपादकासमवेत व्यासपीठावर बसण्यास त्यांनी नकार दिला होता आणि दुसऱ्या एका संपादकाच्या बहुचर्चित ग्रंथाचे वर्णन त्यांनी ‘बालवाङ्मय’ असे केले होते.

मराठीस बुद्धिवादाची एक समृद्ध परंपरा आहे. गोविंदरावांच्या रॉयवादामुळे या परंपरेस वेगळीच धार आली. त्या वेळी महाराष्ट्रात मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तर्कवादाचे पाईक असे अनेक थोर होऊन गेले. ह. रा. महाजनी, गोविंदभाई परिख, इंदुमती परिख, व्ही. एम. तारकुंडे आणि अशा सगळ्यांचे अग्रणी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे गोविंदरावांचे निकटवर्ती. ही एकापेक्षा एक व्यासंगी मंडळी. तर्ककठोरता हा त्यांच्या विचारांचा गाभा. कोणत्याही विषयाचे विश्लेषण करावयाचे ते भावनेस चार हात दूर ठेवून हे या सगळ्यांचेच वैशिष्टय़. गोविंदरावांत हे गुण संपादक या नात्याने पुरेपूर मुरलेले होते. त्यामुळे विषय आंतरराष्ट्रीय असो की राष्ट्रीय. वॉटरगेटसारखे प्रकरण असो की आचार्य विनोबा भावे यांच्यासारख्या आदर्शाच्या वर्तनाची चिकित्सा असो. गोविंदरावांच्या बुद्धिवादास भावनेने कधीही आडकाठी आणली नाही. त्याचमुळे आणीबाणीची भलामण करणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांचा समाचार गोविंदराव ‘सूक्ष्मातील विनोबा, स्थूलातील आपण’ अशा अग्रलेखाद्वारे घेऊ शकले. रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांनी संघाच्याच ऑर्गनायझर साप्ताहिकात समान नागरी कायद्यास विरोध करणारी मुलाखत दिली. गोविंदरावांनी त्यावर भाष्य करताना तत्कालीन सरसंघचालकांना ‘लीगबंधू गोळवलकर’ असे संबोधले. सत्तरच्या दशकात दलित चळवळ हा मोठा नाजूक आणि प्रक्षोभक विषय होता. देशात दलितांविरोधात काहीही घडले की त्याचे पडसाद सर्वदूर उमटत आणि समस्त दलित आणि त्यांना सहानुभूती देणारे नेतृत्व समाजास वेठीस धरत असे. दलित लेखक, नेते यांच्यावर टीका करणे हे त्या वेळी जवळपास दुरापास्तच होते. परंतु गोविंदरावांनी त्या विषयावर ‘सत्याग्रह की आततायीपणा?’ असा थेट प्रश्न विचारण्याचे धाडस त्या वेळी दाखवले. यातील अनेक व्यक्ती गोविंदरावांच्या व्यक्तिगत स्नेहातील होत्या. परंतु हा व्यक्तिगत स्नेह गोविंदरावांच्या व्यावसायिक कर्तव्याच्या आड कधीही आला नाही. रामराव आदिक वा देवकांत बारुआ यांच्यावरील गोविंदरावांचे अग्रलेख याचे उदाहरण ठरावे. आदिक हे वैयक्तिक आयुष्यात गोविंदरावांचे चांगले मित्र होते. परंतु जर्मनीतून परतताना विमानात रामराव आदिक यांच्या हातून काही नको ते घडले. त्याचा इतका कडवा समाचार गोविंदरावांनी घेतला की आदिक यांच्या शत्रूसदेखील हे साध्य झाले नसते. बारुआ यांचेही तसेच. या माणसाचा ग्रंथसंग्रह अचंबित करणारा होता आणि ते गोविंदरावांच्या ग्रंथस्नेही वर्तुळातील होते. परंतु काँग्रेसप्रमुख या नात्याने बारुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ असे लांगूलचालनी विधान केले आणि गोविंदरावांनी त्यांना झोडपले. परंतु आपल्या ग्रंथविषयक पुस्तकात याच बारुआ यांच्या महाप्रचंड ग्रंथसंग्रहाविषयी त्यांनी कौतुकानेही लिहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील त्यांच्या वैयक्तिक स्नेहींपैकी. इतके की १९९५ साली सेना भाजपची सत्ता आली असता बाळासाहेबांनी मुख्यमंत्री कोणास करावे यावर गोविंदरावांशी चर्चा केली होती. परंतु म्हणून सेनेच्या राजकारणावर कोरडे ओढताना गोविंदरावांनी कधीही हात आखडता घेतला नाही.

हे त्या काळचेच एका अर्थाने वैशिष्टय़. अलीकडे ज्याचा उच्चार शिवीसारखा केला जातो त्या उदारमतवादी, म्हणजेच लिबरल, विचार घराण्याचे गोविंदराव पाईक. या मुद्दय़ावरही गोविंदरावांचा परीघ हा त्या वेळच्या मराठी संपादकांपेक्षा किती तरी मोठा होता. मिनू मसानी, नानी पालखीवाला, बॅ. तारकुंडे अशी अनेक एकापेक्षा एक मातबर मंडळी त्यांना कार्यालयात भेटावयास येत. वास्तविक हे आणि असे सर्वच मराठी वाचक असण्याची शक्यता कमीच. परंतु या भाषिक मर्यादा ओलांडून जाण्याची क्षमता गोविंदरावांत होती आणि त्या त्यांनी ओलांडल्याही. आणीबाणीच्या काळात भूमिगत असताना जॉर्ज फर्नाडिस काही काळ गोविंदरावांच्या घरी राहिले होते. एस. एम. जोशी, मधु लिमये, मधु दंडवते असे अनेक साथी गोविंदरावांच्या स्नेहवर्तुळातील. पण तरीही त्यांनी समाजवाद्यांची यथेच्छ टिंगल केली. आर्थिकदृष्टय़ा गोविंदराव उजवे होते परंतु सांस्कृतिकदृष्टय़ा ते डाव्यांत बसत. याचा अर्थ भांडवलशाही व्यवस्थेत समाजाचे भले आहे असे ते ठामपणे मानत आणि भांडवलशाही वर्तमानपत्रांचे संपादक म्हणून हिणवणाऱ्यांचा ते कठोर समाचार घेत. परंतु त्याच वेळी सांस्कृतिक आणि धार्मिक उजवेपण यांचा गोविंदरावांना कमालीचा तिटकारा होता. रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेले दि. वि. गोखले, सावरकरवादी विद्याधर गोखले,   स. ह. देशपांडे, म्हैसाळ प्रयोगकर्ते मधुकर देवल अशा अनेकांशी त्यांचा व्यक्तिगत संबंध होता. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशीही त्यांचा चांगला दोस्ताना होता. परंतु असे काही सन्माननीय अपवाद वगळता उजव्यांच्या कर्कश, तर्कशून्य आणि मागास राजकारणाचे ते वाभाडे काढीत. या देशात मध्यममार्गी भूमिका घेतल्याखेरीज सर्वसमावेशक राजकारण करताच येणार नाही, असे ते मानत. विचाराने आधुनिक असलेल्या गोविंदरावांना नेहरूवादाचे आकर्षण नसते तरच नवल. पं. नेहरूंच्याही आधीचे मोतीलाल, चक्रवर्ती राजगोपालाचारी आदींच्या स्वराज पक्षाशी गोविंदरावांची वैचारिक नाळ जुळती होती. गोविंदराव कमालीचे नास्तिक होते आणि वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांनीही त्यांना कधी देवभक्त वगैरे बनवले नाही. अमेरिकेत स्थायिक झाल्यावर अनेकांना देवधर्माचा पुळका येतो. गोविंदरावांचे शेवटपर्यंत तसे झाले नाही. आपण बरे आणि आपले वाचन बरे, असेच त्यांचे वर्तन होते. याचा अर्थ समाजात मिसळण्यास त्यांचा विरोध होता असे नाही. परंतु टवाळ्या करीत निर्थक हिंडणे त्यांना मंजूर नव्हते. जवळचे वैयक्तिक गुरू ह. रा. महाजनी, मित्र विद्याधर गोखले यांच्या आग्रहासाठी पिला हाऊसमध्ये विठाबाईची लावणी असो वा म्हैसाळ प्रकल्प असो. गोविंदरावांनी आवश्यक भेटीगाठीस कधीच नाही म्हटले नाही. अगदी अलीकडे अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्य़ूस्टन येथून ओहायोमधील क्लीव्हलँड येथे स्थलांतर करताना वाटेत वाकडी वाट करून गोविंदराव थॉमस जेफरसन यांचे घर आणि ग्रंथसंग्रह पाहण्यासाठी गेले. इतकी ज्ञानलालसा त्यांच्या ठायी होती.

हे त्यांचे आणखी एक वेगळेपण. गोविंदरावांसाठी संपादकपद हे नैमित्तिक होते. पण ग्रंथवाचनाचे तसे नाही. गोविंदराव पूर्णपणे ग्रंथोपजीवी. नगरपालिकेच्या शाळेत शिकून पुढे विविध क्षेत्रांत पांडित्य गाठणाऱ्यांची एक पिढी आपल्याकडे होऊन गेली. गोविंदराव त्या पिढीचे. शब्दश: शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे वाचन सुरू होते आणि नवनवीन पुस्तके मिळवून वाचण्याची त्यांची इच्छा कायम होती. वयाच्या नव्वदीत साधारणपणे आता काय राहिले आपले.. असा सूर असतो. गोविंदरावांच्या वाटय़ास तो सूर कधीही गेला नाही. भाषेविषयी कमालीचे संवेदनशील हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय़. त्यांच्या अग्रलेखांच्या मथळ्यांवरून त्यांच्या भाषासौष्ठवाचा अंदाज यावा. ‘विचारवंतांचे योगवाशिष्ठ’, ‘ग्रंथपाल की शिशुपाल?’, ‘शालिनीबाईंची खंडणी’, ‘अखेर गाढव उकिरडय़ावर गेले’, ‘नमन नटवरा’, ‘कडा कोसळला’, ‘मोहिते यांचे जांभुळझाड’, ‘यशवंतराव वीसकलमे’, ‘पुण्यश्लोक नामजोशी’, ‘समाजवादी लक्षभोजने’ अशी किती उदाहरणे द्यावीत! या अशा संवेदनशील भाषाजाणिवेमुळे गोविंदराव स्वत:चे लेखन छापून येताना कमालीचे साशंक असत. भाषेची हेळसांड त्यांना खपत नसे आणि ते करणारी व्यक्ती त्यांच्या नजरेतून कायमची उतरत असे.

गोविंदराव आयुष्यभर पाश्चात्त्य उदारमतवादाचे पूजक राहिले. तेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान. जवळच्या मित्रमंडळांत त्यांचा उल्लेख लॉर्ड गोविंदराव असा केला जाई इतके ते विचाराने पाश्चात्त्य होते. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि अर्थातच भारत आदी ठिकाणच्या वाढत्या असहिष्णुतेने ते अस्वस्थ होत. जगभरातली बदलती राजकीय संस्कृती हा त्यांच्या चिंतेचा विषय होता आणि ते ती चिंता उघडपणे व्यक्त करीत. भारतातील अलीकडच्या निवडणुका आणि नंतरच्या काही राजकीय नेमणुका ही त्यांची शेवटची वेदना. या बदलत्या राजकीय विचारधारेशी जुळवून घेणे त्यांना दिवसेंदिवस अशक्यप्राय वाटू लागले होते. स्टीफन झ्वेग हा त्यांच्या आवडत्या लेखकांपैकी एक. सुरुवातीला अनेकांना आवडणारा राष्ट्रवाद पुढे कसा फॅसिस्ट वळण घेतो याचा तो भाष्यकार. हिटलरच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रसार पाहून तो ऑस्ट्रिया सोडून ब्रिटनच्या आश्रयाला जातो आणि एकंदरच नाझीवादाचा प्रसार पाहून अमेरिका आणि मग ब्राझीलमधे स्थलांतर करतो. तेथून युरोपकडे पाहताना वातावरणातील वाढती असहिष्णुता त्यास अस्वस्थ करते. या वातावरणात उदात्त आणि उदारमतवादी युरोपचे काय होईल या विचाराने त्यास इतके नैराश्य येते की तो आपले आयुष्य संपवतो. मृत्यूसमयी त्याने लिहून ठेवलेले पत्र वाङ्मयात अजरामर झाले आहे. ‘बौद्धिक आनंद आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा उपभोग घेता येत आहे, त्याच वेळी निघालेले बरे. आता वेळ झाली,’ हे झ्वेग याचे शेवटचे शब्द होते. एका अस्वस्थ क्षणी प्राण त्या थकलेल्या कुडीचा निरोप घेत असताना गोविंदरावांना झ्वेग आठवला असेल का? त्यांचा लाभलेला स्नेह सांगतो की या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल. या मनस्वी प्रकांड विद्वानास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.

First Published on March 23, 2017 4:13 am

Web Title: veteran editor govind talwalkar
 1. K
  kumar
  Mar 23, 2017 at 5:17 am
  गोविंदरावांचे अग्रलेख वाचनाच्या आनंदास आम्ही मुकलो.खेदाने नमूद करावेसे वाटते कि हा लेख गोविंदरावांना समर्पित कमी आणि लेखकाच्या स्वतःच्या राजकीय द्वेषभावने विषयी जास्त आहे.आस्तिक असणे म्हणजे वाईट,कोत्या मनाचे लक्षण असे नव्हे. लिबरल च्या नावाखाली "Minority Appeat" करू नये.कृपया गोविंदरावांच्या खान्द्यावरतरी बंदूक ठेवून गोळीबार करू नये. लेखक सगळया विरोधकांना मूर्ख समजतात.मनाविरुद्ध झालेल्या लहान मुलं सारखं वागणं वाटतय. UP मध्ये गेली कित्येक वर्षे असलेल्या यादव/मुस्लिम दहशतीबद्दल काय ?
  Reply
  1. P
   pamar
   Mar 23, 2017 at 4:20 am
   गोविंदरावांच्या कारकिर्दीचा उत्तम धांडोळा ! गोविंदराव विलक्षण संपादक तर होतेच पण त्यांच्या इतर साहित्यिक लेखनाने माझे तरुणपणातीलआयुष्य समृद्ध केले. माझ्यासारकाचे बरेचसे जण मटा त्यांच्या संपादकीयाकरिता वाचायचे. पण दुर्दैवाने गोविंदराव यशवंतरावांच्या पठडीत वाढल्यामुळे त्यांच्यावर कधीही टीका करू शकले नाही. तसेच आणीबाणीत , जेंव्हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच झाला तेंव्हा गोविंदरावांनी मूग गिळून गप्पा राहणे पसंत केले. हे काही दोष सोडल्यास गोविंदरावांचे लेखन अप्रतिम होते. त्यांना मनपूर्वक श्रद्धां
   Reply
   1. P
    Prashant
    Mar 23, 2017 at 6:41 pm
    आज पहिल्यांदाच विनोद रावांनी अर्थपूर्ण आणि वाचनीय अभिप्राय दिला आहे! धन्यवाद!
    Reply
    1. प्रवीण
     Mar 24, 2017 at 3:35 am
     आपण किती आणि कोठे परखडपणा दाखवला? उदारमतवादाबद्दल भोंगळ टीका ( शिव्या शाप युक्त , जी आता हे उत्तर बघितले कि आपल्या लेखणितों झर झर उतरेल) करत बसण्याला परखडपणा म्हणत असाल तर आपल्याइतका परखड दहा हजार वर्षात येणार नाही. मोदी नामाचा गजर हि परमेश्वराने दिलेली मोठी जबादारी समजून चालत राहा.
     Reply
     1. D
      Dev
      Mar 23, 2017 at 3:30 am
      Excellent tribute to Govind Talwalkar. Very correct analysis on ever increasing nationalism which can become fascist if not controlled. Also it has ability to engulf democracy. Ongoing example is ban on cow slaughter in Maharashtra and likelihood of that happening in UP. Surprisingly hon. SC is also not taking hard stand against such rightist thinking !!
      Reply
      1. R
       Ramdas Bhamare
       Mar 23, 2017 at 5:39 am
       अतिशय चांगला लेख . "बौद्धिक आनंद आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा उपभोग घेता येत आहे, त्याच वेळी निघालेले बरे. आता वेळ झाली " हे स्टीफन झ्वेगचे शब्द सध्यस्थितीत भारतात अनेकांच्या मनात येत असतील .
       Reply
       1. R
        ravindrak
        Mar 23, 2017 at 4:32 am
        सुंदर अग्रलेख, ते सुंदर अग्रलेख लिहायचे माझे तेव्हा वय १८ वर्षे वगैरे असेल.नंतर केतकर आले, सुरवातीला तेही चांगले लिहीत पण नंतर काँग्रेसी व्यभिचारी महाराष्ट्र टाइम्स वाचवेना म्हणून ते वृत्तपत्र वाचायचे बंद केले पण नंतर त्यांनीच ते वृत्तपत्र सोडले बहुतेक. त्याची आठवण झाली .
        Reply
        1. S
         Suhas J.
         Mar 30, 2017 at 3:22 pm
         विनोद हे इथे विनोदासाठीच येतात ...
         Reply
         1. S
          Sandesh Sankhe
          Mar 23, 2017 at 1:04 am
          भारतात कोणतीही अिष्णुता नाही.हा सेक्युलरवाद्यांनी पोसलेला व पसरवलेला आवडता भ्रम आहे.कारण भारताच्या गुणसूत्रांमध्येच िष्णुता आहे हे साम्यवाद्यांनी दिलेल्या भ्रष्ट इतिहासाचे कडू फळ आहे.भारताचा भव्य इतिहास भारत विसरून गेला आहे.स्मृतिभ्रंश झालेल्या व गतवैभव विसरलेल्या इसमाप्रमाणे भारताची अवस्था सेक्युलरनाई करून ठेवली आहे.
          Reply
          1. S
           shashank
           Mar 23, 2017 at 5:33 am
           नितांत सुंदर लेख ......
           Reply
           1. S
            Shriram
            Mar 23, 2017 at 5:31 am
            एवढ्या सगळ्यांनी म्हटले म्हणजे ते 'ग्रेट' नक्की असणार. पण शरद पवारांशी त्यांची चांगली मैत्री होती आणि वसंतदादांच्या पाठीत पवारांनी जो खंजीर खुपसला त्याला त्यांचा पाठिंबा होता तसेच कुमार केतकर हे स्वतःवर गोविंदरावांचा खूप प्रभाव आहे म्हणतात हे कळल्यावर .....
            Reply
            1. S
             Shriram
             Mar 23, 2017 at 8:14 am
             तसेच एकमेकांची पाठ खाजवून 'तुम्ही ग्रेट आम्ही ग्रेट'. सगळे कसे गोड गोड.
             Reply
             1. S
              Shriram
              Mar 24, 2017 at 4:46 am
              भाजप/ मोदी कमाल ३५ ते ४० टक्के मते मिळवून निवडून येतात. तेव्हा उरलेले बहुमत त्यांच्या विरुद्ध असते. ते नैतिक धरून त्याचे लांगुलचालन बहुतांश माध्यमे खास करून एक्सप्रेस ग्रुप करत आहे . आता माउली कोण ?
              Reply
              1. S
               Shriram
               Mar 24, 2017 at 8:40 am
               स्टीफन झ्वेग हा झेक लेखक होता. त्याने उलट-सुलट इतकी विधाने करून ठेवली आहेत की कोणालाही कोणत्याही गोष्टीच्या समर्थनासाठी कोट करण्यासाठी ती उपयोगी पडतात. मुळात तो एक होता की त्या नावाने अनेकांनी लेखन केले आहे कळत नाही. जेम्स हेडली चेस प्रमाणे.
               Reply
               1. S
                sanjay
                Mar 23, 2017 at 10:10 am
                "लॉर्ड वाचस्पती" ला भावपूर्ण श्रद्धांजली.
                Reply
                1. S
                 shashank
                 Mar 23, 2017 at 3:15 am
                 गोविंदराव कशे होते हे माहित नहीं पण जुन्या पीढ़ी चे विचारक टिपिकल किवा पूर्वाग्रही होते हे स्पष्ट आहे.आज जितक्या मोकल्यापणे कुठल्या ही मुद्द्यावर विचार मांडले जातात तसे आधी होत नसावे. म्हणून जर एखादवेळा टिपिकल लाइन सोडून विचार मांडला की लगेच त्याचे उदो उदो व्याहचे अणि दाखले दिले जायचे, ऐसे दिसते. साम्यवादी विचार करणे,टिपिकल सेक्युलर भूमिका घेणे, सत्ताधारी नेतान बरोबर चिटकुन रहाणे, विषिश्ट संस्थान न झोड़पने,हे सगळे लक्षण होती आधी च विचारकांची.आजचा टीवीच युगात तर असले विचारक लगेच एक्सपोज़ होत आहेत.
                 Reply
                 1. S
                  Sunil Kulkarni
                  Mar 23, 2017 at 5:29 am
                  THIS IS CALLED TRUE EVALUATION SALUTE TO THE PERSON.BUT HE IS NO MORE TO READ ABOUT WHAT OTHERS THINK ABOUT HIM
                  Reply
                  1. S
                   suresh deuskar
                   Mar 23, 2017 at 11:24 am
                   आजचे उदाहरण खूपच डोळ्यात अंजन घालणारे आहे. खा.रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया तील कर्मचाऱ्याला चपलेने मारले.ओवैसी याना दिल्लीत संसदेच्या बाहेर एका शिवसैनिकांनी कानशिलात लगावली.ही िष्णुतेची उदाहरणे आहेत का?
                   Reply
                   1. S
                    Shrikant Yashavant
                    Mar 23, 2017 at 5:01 pm
                    गोविंदरावांचा आपल्या लेखणीवर चांगलाच प्रभाव असल्याचे वेलोवेली जाणवते
                    Reply
                    1. S
                     Shrikant Yashavant
                     Mar 23, 2017 at 5:24 pm
                     हल्ली संपादकांच्या संपदकीयावरच वाचकांनी लिहीलेले छापून येणे हमखास असते हे विक्रांत एस यांच्या जून कसे ध्यानात आले नाही?
                     Reply
                     1. U
                      umesh
                      Mar 23, 2017 at 10:52 am
                      गोविंदराव शेवटी अस्वस्थ होण्याचे हे कारण होते. आपले लाडके आश्रयदाते पवार यांना जनतेने लाथाडले आहे हे त्यांना पाहावे लागले. शिवाय त्यांचेही काही महत्व राहिले नव्हते. पवारांची आयुष्यभर चमचे गिरी करणारा पत्रकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख राहील. अर्थात बरेचसे जुने पत्रकार अजूनही पवारांच्या खाल्ल्या मिठाला जगात असल्याने ते हि ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करणारच. कुबेर साहेबही त्याला अपवाद नाहीत. अन्यथा त्यांनी पवारांच्या हस्ते पुरस्कार घेतलाच नसता
                      Reply
                      1. Load More Comments