रॉजर फेडररसारखा साधासुधा माणूस विम्बल्डनवरील जेतेपद सहजी खिशात टाकतो तेव्हा ते एका व्यक्तीचे जिंकणे राहात नाही..

ज्या काळात सौंदर्यापेक्षा सामर्थ्यांस, मार्दवापेक्षा मर्दानगीस, सौहार्दापेक्षा सूडभावनेस, नजाकतीपेक्षा नाठाळपणास, मौनापेक्षा मस्तवालपणास, अदबशीरतेपेक्षा आडदांडपणास, अभिजाततेपेक्षा अर्धवटपणास महत्त्व दिले जाते त्या काळात रॉजर रॉबर्ट फेडरर याच्या आठव्या विम्बल्डन विजेतेपदाचे मोल ‘खेळ’ या संकल्पनेपुरतेच मर्यादित राहात नाही. ते खेळाच्या सीमा ओलांडून समग्र समाजजीवनास व्यापून टाकते. निखळनितांत सुंदर हे विशेषण फेडररच्या खेळाचे वर्णन करण्यास अपुरे ठरेल. अत्यंत शिष्टसंमत आणि अभिजनांच्या साक्षीने खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पध्रेत रविवारी रॉजर फेडरर याने क्रोएशियाच्या मरिन चिलीच याचा अगदीच सहज पराभव केला. मान्य आहे की हा सामना अंतिमतेच्या दर्जापेक्षा दशांगुळे कमीच होता. मान्य की या सामन्यात चिलीच हा कोणीही चिरडून जावे इतका साधा खेळाडू भासला. हेही मान्य की यामुळे फेडररची विक्रम नोंदणी अधिक सुलभ झाली. परंतु या निरीक्षणांसमोर मान तुकवताना हेही मान्य करावयास हवे की संपूर्ण विम्बल्डन स्पर्धा मालिकेत एकही सेट न गमावता थेट विजेतेपद पटकावणारा फेडरर हा गेल्या ४६ वर्षांतील एकमेव खेळाडू आहे. जे विजेतेपद धापा टाकत, घामाच्या धारा पुसत, आपल्यातील उद्दाम ऊर्जेचे दर्शन घडवत पटकावयाचे असते ते दुष्प्राप्य अजिंक्यपद रॉजर फेडरर हा अगदीच किरकोळ देहयष्टीचा, प्रचलित निकषांनुसार अजिबात पुरुषी न वाटणारा आणि कालबाह्य़ मानली जाणारी कुटुंबवत्सलता मिरवणारा इसम सहजी खिशात टाकतो तेव्हा ते एका व्यक्तीचे जिंकणे राहात नाही. ती संस्कृतीने सामर्थ्यांला दिलेली संयत परंतु ठाम समज असते.

Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

टेनिस या सभ्य आणि तरीही क्लेशदायी खेळाने अलीकडच्या पाच दशकांत तीन महान कलाकार जगास दिले. बियाँ बोर्ग, पीट साम्प्रास आणि अर्थातच रॉजर फेडरर. तिघांच्या खेळाची वैशिष्टय़े भिन्न. तरीही त्यातला एक धागा समान. तो म्हणजे डोक्यातील शीतकपाटाचा. या तिघांनीही खेळताना कधीही भावनांचे प्रदर्शन केले नाही. समोर जॉन मॅकेन्रो याच्यासारखा शीघ्रकोपी, थयथयाटी खेळाडू असो, जिमी कॉनर्ससारखा सुप्त आक्रमक स्पर्धक असो किंवा इव्हान लेंडल याच्यासारखा कष्टकरी प्रयत्नवादी असो. बोर्गच्या चेहऱ्यावर एक कायम योगिक शांतपणा असे. ८० साली विम्बल्डनमध्ये त्याने मॅकेन्रो याचा केलेला पराभव म्हणजे टेनिसच्या इतिहासातील एक महाकाव्यच. कधीही वाचले तरी तितकेच आनंददायी.  बोर्ग याची ही विराट विरागी कर्तृत्वाची परंपरा अमेरिकी साम्प्रास याने अंगी बाणवली.  चमत्कृतीपूर्ण शैलीदार आंद्रे आगास्सी, बुम बुम बोरिस बेकर आदी एकापेक्षा एक गुणवान स्पर्धक असताना साम्प्रास इतक्या सहजपणे विजेतेपद खिशात घालून जात असे की अचंबित व्हावे. त्याच्यात एक विचित्र गुणवंत कायम दडलेला होता. परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत मदानावर धुडगूस घालूनही परीक्षेत पहिला क्रमांक पटकावण्याची कला जशी काहींकडे असते, तसा साम्प्रास होता. अंगभूत गुणवान. अत्यंत किमान कष्टात कमाल पराक्रम करणारा. या दोघांतील उत्तमांचा गुणाकार म्हणजे आजचा रॉजर फेडरर.

मध्यमवर्गीय स्विस घरात जन्मलेला. वडील रॉबर्ट हे सिबा या स्विस औषध कंपनीतील मध्यव्यवस्थापक. आई गृहिणी. अशा वातावरणात जन्मलेल्यावर काही किमान मूल्यसंस्कार सहज होतात. रॉजरवर ते तसे झाले. कुमारावस्थेतच अमेरिकेत टेनिस स्पध्रेत विजेता ठरल्यावर मिळालेल्या पशातले अवघे २०० डॉलर त्याने केस रंगवण्यावर खर्च केले म्हणून आईवडिलांनी त्याचे कान उपटले होते. दोघांचे म्हणणे असे की आपल्याला काय मिळवायचे आहे हे आणि त्यासाठी काय करावयाचे नाही, हे तुला कळायला हवे. झुलपे रंगवणे आदी उटपटांग गोष्टींत वेळ आणि पसा घालवत बसलास तर तुझ्यातील खेळाडू मागे पडायचा धोका आहे. रॉजरने हे बोल गांभीर्याने घेतले आणि पुढे कधीही टेनिसखेरीज कशावरही वेळ घालवला नाही. फेडरर दाम्पत्याचे मोठेपण म्हणजे त्यांनी रॉजरची आवड प्राणपणाने जपली. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी त्याने स्वित्र्झलडच्या दुसऱ्या टोकास असलेल्या विशेष प्रशिक्षण केंद्रात जेव्हा दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याच्या पालकांनी त्यास सहज अनुमती दिली. ही गोष्ट का महत्त्वाची? तर त्या वेळी त्याच्या आईला रॉजरच्या टेनिसमधील गुणवत्तेची काहीही माहिती नव्हती. तरीही आपल्या पोरावर त्यांनी विश्वास टाकला आणि रॉजरने त्यास कधीही तडा जाऊ दिला नाही. पालकत्वाच्या आधुनिक संकल्पना, मुलांचा कल ओळखण्याच्या १०१ युक्त्या किंवा आपल्या मुलास ‘लिट्लि चॅम्प’ कसे करावे वगरे काहीही फेडरर दाम्पत्यास ठाऊक नव्हते. ठाऊक होते ते इतकेच की आपल्या मुलास फुटबॉल आणि टेनिस दोन्हीही खेळांत उत्तम गती आहे आणि त्यातील त्याला जे हवे ते करू दिले तर त्याला त्यात आनंद मिळेल.

रॉजर तो आजही भरभरून लुटतो. त्याच्या यशात ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याचे कारण त्याचे अनेक समकालीन आईवडिलांच्या हट्टाखातर किंवा काही तरी मिळवण्यासाठी म्हणून टेनिसकडे वळले. रॉजर केवळ आनंदासाठी खेळू लागला. याचा परिणाम असा की त्याला त्यामुळे सरावाचा, खेळण्याचा कधीही कंटाळा येत नाही. गेली जवळपास २५ वष्रे रॉजर सतत खेळतो आहे. खेळाची असोशी इतकी की त्यामुळे आजारपणाची सुटीही त्याला कधी घ्यावी लागलेली नाही. त्याचाच समकालीन असणाऱ्या स्पेनच्या राफेल नादालकडे पाहिले की याचे महत्त्व लक्षात यावे. खरे तर नादाल हा फेडररपेक्षा पाच वर्षांनी लहान. परंतु त्याच्या शरीरातील जवळपास सर्वच बिजागऱ्या एव्हाना बदलून झाल्या आहेत. त्यामुळे त्यास खेळताना किती आटापिटा करावा लागतो. रॉजर फेडरर याचे तसे नाही. त्याच्या खेळातील सहजता थक्क करणारी आहे. ही सहजता हेच थोरपणाचे लक्षण असते. म्हणजे जे तानापलटे घेता यावेत यासाठी अनेक गवयांना कित्येक तास गळामेहनत करावी लागते ती तान लताबाई सहजपणे फेकतात. त्यामुळे गाणेच सोपे वाटू लागते. किंवा दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमापार करण्यासाठी अन्य मर्त्य फलंदाजांना कष्ट उचलावे लागत असताना सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर इतक्या सहजपणे फटके लगावतात की क्रिकेट सोपे वाटू लागते. तसे रॉजर फेडरर या अद्भुताचे आहे. सामर्थ्य हे मिरवायचे असते असे मानले जाण्याच्या काळात यशासाठी सामर्थ्यांची गरजच काय, असा प्रश्न त्याची शैली विचारते तेव्हा ती खरी वाटू लागते.

हे रॉजर फेडरर याचे मोठेपण. ते मानायचे अशासाठी की आसपास सगळे आपल्यातील सामर्थ्यांच्या जाहीर आविष्कारासाठी संधीच्या प्रतीक्षेत असताना हा जिवाची कोणतीही उरस्फोड न करता जे काय म्हणायचे ते म्हणतो. ते म्हणताना ना आनंदाची भावना असते. ना रागाची. त्वेषाची तर नसतेच नसते. ज्यासाठी प्रयत्न करावयाचा ते साध्य झाले की त्याचा आनंद अश्रूद्वारे सांडला तर त्याला त्यात कमीपणा वाटत नाही. अलीकडे जगभरात बहुतेकांचा आपल्यातील पौरुषतेच्या हिंस्र प्रदर्शनावर भर दिसून येतो. त्यामुळे सौंदर्य हे सामर्थ्यांस मारक असते, असा एक खुळचट समज वातावरणात भरून राहिलेला आहे. नजाकत, अभिजातता हे जणू दुर्गुणच आहेत असेच सगळे वागू लागलेत. अशा वेळी वातावरणातील हा दोष दूर करण्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य रॉजर फेडरर हा खेळाडू करतो. म्हणून त्याचे जिंकणे हा केवळ एका खेळाडूचा विजय नसतो. ती कवितेने कर्तृत्वावर केलेली मात असते. टेनिसच्या खेळमदानास कोर्ट म्हणतात. रॉजर फेडरर याचे खेळणे ही त्या कोर्टातील कविता आहे. त्याची प्रचंड यशोगाथा ही त्या काव्यगुणाचा गौरव ठरते. प्रगतीसाठी सामर्थ्यांइतकीच संस्कृतीचीही गरज असते, हे जमेल तेथे दाखवून द्यायलाच हवे.

  • बियाँ बोर्ग, पीट साम्प्रास आणि रॉजर फेडरर या तिघांनीही खेळताना कधी भावनांचे प्रदर्शन केले नाही. आनंदासाठी खेळणारा फेडरर हा तर बोर्ग आणि साम्प्रास या दोघांतील उत्तमांचा गुणाकार. नजाकत, अभिजातता यांचा सहज आविष्कार..