वर्ल्ड ट्रेड सेंटरसह अनेक संस्थांचीही उभारणी करणारे डेव्हिड रॉकफेलर हे अमेरिकेला महान बनवणाऱ्या खानदानी उद्योगपतींपैकी अखेरचे..

जागतिक अर्थकारणाचे भान, हाती जगातल्या प्रमुख बँकांतली एक बँक आणि प्रभावशाली आडनाव ही तीन आयुधे त्यांच्या हाती होतीच; पण कलासक्त मन, जगातील अनेक नेत्यांशी विश्वासाचा संबंध, राजकारणात आणि लोकांच्या भल्यात रस आणि त्यासाठी सढळ देणग्या देण्याची तयारी हे गुणही होते..

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Job Opportunity UPSC Exams career
नोकरीची संधी: यूपीएससीच्या परीक्षा
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

देश किती मोठा आहे वा होईल हे त्या देशातील व्यक्तींच्या उंच होण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. व्यक्ती क्षुद्र आहेत आणि देश मोठा आहे, असे होऊ शकत नाही आणि देशच ‘लहान’ असेल तर व्यक्तींच्या मोठे होण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. याचा अर्थ असा की व्यक्तीस मुक्तपणाने मोठे होऊ देण्याची देशाची क्षमता ही त्या व्यक्ती आणि प्रदेश या दोघांनाही मोठे करीत असते. अशा देशांतील व्यक्तींचे मोठेपण हेवा वाटावे असे असते आणि अशा अनेक व्यक्तींना सामावून घेणारा तो देश त्याहूनही मोठा होत असतो. रॉकफेलर आणि अमेरिका हे असे मोठे होऊ पाहणारी व्यक्ती आणि अशा मोठेपणाची स्वप्ने पाहणाऱ्यांना जवळ करणारा प्रदेश असे नाते आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास- म्हणजे आपल्याकडे तात्या टोपे आणि झाशीची राणी बंडाची तयारी करीत होत्या त्या सुमारास- अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया येथील एका प्राध्यापकास भूगर्भात काही एक ज्वलनशील पदार्थ असू शकतो अशी जाणीव झाली आणि त्याच गावच्या एका उनाड मुलास हा ज्वलनशील पदार्थ विकण्याचा उद्योग सुरू करता येईल हे लक्षात आले. एका मद्यपी सुमाराच्या पोटी जन्मलेल्या या उनाडाने जमिनीखालून हा ज्वलनशील पदार्थ बाहेर काढून विकण्याचा उद्योग सुरू केला आणि तो इतका मोठा झाला की १८९२ साली त्याची संपत्ती ही बिल गेट्स याच्या आजच्या संपत्तीपेक्षा दुप्पट होती. एके काळच्या या उनाडाची औद्योगिक ताकद एवढी वाढली की तीसमोर अमेरिकी अध्यक्ष लिंबूटिंबू भासू लागला. सरकारला आव्हान देणारे हे औद्योगिक साम्राज्य अखेर तोडावे लागले. परंतु म्हणून या उद्योगपतीची ताकद कमी झाली नाही. एग्झॉन, शेव्हरॉन, मोबील अशा मूळच्या कंपन्यांइतक्याच अजस्र कंपन्या त्यातून उभ्या राहिल्या. म्हणूनच केवळ अमेरिकेतच नव्हे तर साऱ्या विश्वात जॉन डी रॉकफेलर आणि स्टँडर्ड ऑईल हे नाव अजरामर झाले. जागतिक औद्योगिक साम्राज्याचे भीष्म पितामह जॉन डी रॉकफेलर यांचे नातू आणि आपल्या आजोबांइतकेच कर्तबगार व्यावसायिक डेव्हिड रॉकफेलर मंगळवारी वयाच्या १०१ व्या वर्षी निवर्तले. केवळ रॉकफेलर घराण्यात जन्म झाला इतकीच त्यांची पुण्याई नाही. त्यांच्या मृत्यूची दखल घ्यायलाच हवी, अशी अनेक कारणे आहेत.

यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डेव्हिड यांनी आपल्या आजोबांनी सुरू केलेल्या अनेक उद्योगांना नवीन आयाम दिला आणि ते अधिक उंचीवर नेले. थोरल्या रॉकफेलर यांना एकच मुलगा. जॉन रॉकफेलर ज्युनियर या नावचा. डेव्हिड हा या ज्यु. रॉकफेलर यांचे शेवटचे हयात अपत्य. त्यांच्या नावे तीन अचाट कामे आहेत. पहिले म्हणजे चेस मॅनहॅटन नावाची बलाढय़ बँक. या बँकेची ओळख एके काळी डेव्हिड्स बँक अशी केली जायची इतका तिच्यावर डेव्हिड रॉकफेलर यांचा प्रभाव होता. हॉवर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा अभिजनी शिक्षणसंस्थांत पदवी आदी घेतल्यानंतर डेव्हिड या बँकेत उमेदवार म्हणून दाखल झाले आणि लवकरच बँकेचे प्रमुख बनले. रॉकफेलर आडनावाची म्हणून एक पुण्याई असते. तिचा पुरेपूर वापर डेव्हिड यांनी केला. जागतिक अर्थकारणाचे भान, हाती जगातल्या प्रमुख बँकांतली एक बँक आणि प्रभावशाली आडनाव या तीन आयुधांचा वापर करीत रॉकफेलर यांनी या बँकेचे साम्राज्य असे काही वाढवले की त्यास तोड नाही. डेव्हिड यांना भटकंतीची हौस. पण ती निरुद्देश नाही. या अशा भटकंतीत डेव्हिड भेटले नाहीत, असा एकही जागतिक नेता शिल्लक नसेल. गेमाल अब्दुल नासर ते लिओनिद ब्रेझनेव्ह इतका मोठा त्यांचा पल्ला होता. यामुळे जगातल्या अनेक देशांत या बँकेसाठी दरवाजे खुले झाले. तिचा व्याप आणि व्यवसाय इतका वाढला की या बँकेने काही काळासाठी सिटी बँक, बँक ऑफ अमेरिका आदींना मागे टाकले. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनीसुद्धा माझ्याइतका जागतिक नेत्यांशी संपर्क साधला नसेल, असे डेव्हिड म्हणत, त्यात तथ्य होते. अर्थात या सर्वच भेटी काही व्यवसायवृद्धीसाठी नसत. त्यामागे अमेरिकी मुत्सद्देगिरीचीदेखील काही कारणे असत. १९७९ साली अयातोल्ला रूहल्ला खोमेनी यांच्या उदयानंतर परागंदा व्हावे लागलेल्या इराणच्या शहा महंमद रझा पहलवी यांना अमेरिकेत आश्रय देण्यात डेव्हिड रॉकफेलर यांचा मोठा हात होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांच्याकडेच त्या वेळी रॉकफेलर यांनी शहांसाठी शब्द टाकला. कार्टर यांनी त्यांचे ऐकले खरे. परंतु तरी रॉकफेलर हे काही कार्टर समर्थक नव्हेत. ते त्यांचे टीकाकारच. कार्टर तसे नेमस्त. ते अमेरिकी अध्यक्ष म्हणून शोभत नाहीत, असे रॉकफेलर म्हणत. अमेरिकेचा अध्यक्ष हा कसा एकमेव जागतिक महासत्तेचा प्रमुख वाटला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे असा तोरा मिरवणारे रोनाल्ड रेगन हे रॉकफेलर यांना आवडत. रेगन यांच्या काळात गाजलेल्या निकाराग्वा बंडखोर प्रकरण काळात रॉकफेलर यांनी राजनैतिक कारणांसाठी आफ्रिकी कम्युनिस्ट देशाची सैर केली होती.

रॉकफेलर कमालीचे कलासक्त होते. न्यूयॉर्कमधील जगद्विख्यात कलादालन ज्यांनी कोणी पाहिले असेल त्यांना रॉकफेलर यांच्या कलाप्रेमाची जाणीव व्हावी. डेव्हिड यांच्या आईने- अ‍ॅबी आल्ड्रिच रॉकफेलरने- म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट ऊर्फ मोमा आणि रॉकफेलर सेंटर या कलादालनांच्या उभारणीचा प्रारंभ केला. पुढे डेव्हिड यांनी ते पूर्ण केले आणि जगातील अद्वितीय कलाकृतींनी ते भरून टाकले. उद्योगपतींनी, धनाढय़ांनी आपल्याकडील संपत्तीचा मोठा वाटा चित्रकृती खरेदीसाठी राखावा असा त्यांचा आग्रह असे. आज अनेक उद्योगपती कलासंग्रह करताना दिसतात. त्याचे मूळ डेव्हिड यांनी त्या काळी केलेल्या प्रयत्नांत आहे. न्यूयॉर्क ही त्यांची कर्मभूमी. या नात्याने ते न्यूयॉर्कच्या स्थानिक राजकारणातही सक्रिय होते. परंतु पुढे आर्थिक तंगी आल्यावर न्यूयॉर्कमधील उद्योगपतींना एकत्र आणून त्या शहरासाठी त्यांनी भरभक्कम निधी उभारला. त्या अर्थाने ते मुक्त अमेरिकी भांडवलशाहीचे निस्सीम उपासक आणि राजदूत होते. अमेरिकी अध्यक्षासमोर देशाच्या हितसंबंधांखेरीज काहीही अन्य असता नये, असे ते म्हणत. विविध उपक्रमांसाठी प्रचंड देणग्या देणे हा त्यांचा छंद. शनिवार-रविवारी निवांतपणा मिळावा म्हणून बांधलेल्या १०७ खोल्यांच्या घरात बालपण घालवण्याचे भाग्य लाभलेल्या डेव्हिड यांनी अलीकडेच आपल्या मालकीची तब्बल पाच हजार एकर जमीन नगरपालिकेस शहर विकासासाठी दिली. त्यांनी दिलेल्या रोख देणग्यांची रक्कम एखाद्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक भरेल. ते इतके लोकप्रिय होते की त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी त्यांच्यासमवेत भोजनसंधीचा लिलाव केला असता त्यांच्या पंगतीत मांडीला मांडी नाही पण खुर्चीला खुर्ची लावून बसण्याची संधी तब्बल ९० हजार डॉलर्स इतक्या रकमेला विकली गेली. हा सर्व पैसा त्यांनी विविध संस्थांना वाटून टाकला.

उत्कट, भव्य विचार, स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची आस हे या रॉकफेलर घराण्याचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. आपल्या चेस मॅनहटन बँकेच्या मुख्यालयासाठी त्यांनी तब्बल ६१ मजली इमारत उभारली. इतकेच नव्हे तर न्यूयॉर्कसारख्या व्यापारचुंबकी शहरात अर्थसत्तेची ग्वाही देणारे उत्तुंग मनोरे असायला हवेत, असा त्यांचा आग्रह होता. त्यातून वर्ल्ड ट्रेड सेंटर उभारले गेले. ही रॉकफेलर यांची देणगी. आत्मचरित्र लिहिणारा हा एकमेव रॉकफेलर. जागतिक अर्थकारणाची गती समजून घेऊ इच्छिणाऱ्यांत त्यांचे ‘मेमॉयर्स’ हे आत्मचरित्र लोकप्रिय आहे. वयाच्या शंभरीनजीक असता त्यांना विचारले गेले, तुम्ही आत्मचरित्र का लिहिलेत? त्यावर हा भूतलावरील कुबेरपुत्र उत्तरला: Well, It just occured to me that I had led a rather interesting life. त्यांच्या निधनाने औद्योगिक विश्वातील शेवटचा उत्तुंग मनोरा कोसळला. या उत्तुंगतेची आस निर्माण करणे हीच त्यांना आदरांजली.