नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला आणि सरत्या वर्षांच्या रात्री आपोआप मने जल्लोषाच्या भावनेने भारून जातात..

सरत्या वर्षांचा लेखाजोखा मांडताना आलेल्या उत्तराच्या भांडवलातूनच या वर्षांचा निरोप समारंभ आणि नव्या वर्षांच्या स्वागताचा सोहळा आपल्याला साजरा करावयाचा आहे. हातून हुकलेली गणिते कायमची गायब झालेली नाहीत, तर पुढच्या वाटचालीतील एखाद्या पावलावर ती अचानकपणे समोर येऊन उभी ठाकतील आणि सोडविण्याचे आव्हानही आपल्याला देतील, याची जाणीव ठेवावीच लागेल.

आपण सारे कुठल्या तरी अज्ञाताचे प्रवासी आहोत. जन्माला आल्यापासून हा प्रवास सुरू होतो. तो कुठे संपणार आहे, हे आपल्याला सर्वानाच माहीतही असते, पण त्याचे अंतर मात्र कुणालाच माहीत नसते. तरीही त्या प्रवासात सारेच उतरतात. अनेकदा वेडीवाकडी वळणे लागतात, चढउतार लागतात, कधी दमछाकही होते. वाटेत एखादा लांबलचक, अंधारा बोगदाही लागतो. तरीही पावले पुढे पडतच असतात. बोगदा संपला की अंधारही संपणार आहे आणि पुन्हा उजेडाची तिरीप पाहायला मिळणार आहे, या आशेवर अंधारवाटेवरदेखील पावले मागे हटत नाहीत. किंबहुना, या प्रवासात मागे पाहायची संधीच नसते. मागे पाहण्याची इच्छा झाली, तरी मागे वळणे शक्य नसते. म्हणून, प्रत्येक पाऊल पुढेच टाकावे लागते. कधी सहजपणे, कधी खडतरपणे, कधी एकाकीपणे, तर कधी कुणाच्या आधाराने, प्रवासाची ही अज्ञात वाट चालत राहावे लागते. कारण तो पल्ला आपल्याला गाठावा लागणारच असतो. कधी ना कधी तो येणार याची आपल्याला खात्रीही असते. म्हणूनच, या प्रवासाचा कंटाळा करून चालत नाही. असे जर असेल तर प्रवासातील वेडीवाकडी वळणे, चढउतार, उजेड-अंधार, एकटेपणा किंवा साथसंगत याचा विचार करण्यातही अर्थ नसतो. वाटेत लागणारा एखादा अंधारा बोगदा असो, किंवा अनपेक्षितपणे समोर येणारे काळेकुट्ट भुयार असो, ते पार केल्याशिवाय उजेड दिसणार नाही याची पक्की खूणगाठ मनाशी बांधलेली असेल, तर अशी भुयारे किंवा असे बोगदे ओलांडण्याची मानसिक तयारी होते आणि धैर्यही गाठीशी साठते. हे जर पक्के, निश्चित आहे, तर त्या अंधाऱ्या भुयारांची, वेडय़ावाकडय़ा वळणवाटांची, चढउतारांची चिंता करण्यापेक्षा, त्या प्रवासाच्या प्रत्येक पावलावर आनंद उधळण्यात, किंवा एकमेकांमध्ये वाटून घेण्यात काय गैर आहे?.. कदाचित त्यामुळे प्रवास सुखकर होईलच, पण आपल्यासोबत चालणारे, आपल्या आसपासचे अशाच प्रवासातले वाटसरूदेखील आनंदाने पुढची पावले टाकू लागतील आणि सारे प्रवासी सुखावतीलही!..

नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला आणि सरत्या वर्षांच्या रात्री आपोआप मने जल्लोषाच्या भावनेने भारून जातात. त्या अवस्थेतच, काही काळासाठी तरी जुन्याचा विसर पडतो. हे सारे, जाणीवपूर्वक विसरावे लागते असे नाही. ते नैसर्गिकपणेच होत जाते. कारण, वर्षअखेरीला साजऱ्या केल्या जाणाऱ्या जल्लोषाला बहुधा, जुन्या अनुभवांतील आनंदाचे क्षण परस्परांवर उधळण्याच्या विचाराचीच झालर चढविली गेलेली असावी. वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेल्या प्रवासातले एक पाऊल पार पडले, याचा आनंद साजरा करावा आणि पुढच्या पावलाची उमेद गाठीशी बांधावी, हाच त्या जल्लोषाचाही हेतू असावा. आपल्याला पुढेच चालावयाचे आहे, कंटाळा आला, इच्छा असली तरी पावले माघारी वळणार नाहीत, किंबहुना मागची वाटच बंद झाली आहे, हे नक्की असल्याने, मागे वळून पाहण्यातच अर्थ नाही आणि तसे केले तरच पुढचा प्रवास आनंदाने पार करता येईल, ही खूणगाठ मनाशी पक्की असणे कधीही चांगलेच! सरत्या वर्षांला निरोप देताना, आपल्या मनात अनेक भावनांचा कल्लोळ दाटलेला असेल, मागच्या प्रवासातील कडू-गोड आठवणी मनात दाटून आल्या असतील, आठवणींचा आणि अनुभवांचा कप्पा कदाचित गेल्या वर्षभराच्या प्रवासात थोडा अधिकच गच्च भरून गेला असेल. पण त्याचे ओझे न समजता, ती पुढच्या प्रवासाची शिदोरी समजली, की पुढचा प्रवास अधिक निश्िंचत आणि साहजिकच, सुसह्य़देखील होईल. मग पावले पुढेच पडतील आणि मागे वळण्याची इच्छादेखील होणार नाही. केवळ, सरत्या वर्षांला निरोप, असे या उत्साहाचे रूप राहणार नाही, तर नव्या वर्षांचे आणि पर्यायाने, पुढच्या प्रवासाच्या पहिल्या पावलासाठी नव्या वाटेने आपल्याकरिता मांडलेला तो स्वागत सोहळा ठरेल. म्हणूनच, कोणतेही कल्लोळ आसपास माजले असले, त्याच्या झळा सोसाव्या लागल्या असतील, तरी सरत्या वर्षीच्या रात्रीच्या आतषबाजीत केवळ नववर्षांच्या स्वागताचा दिमाखदार सोहळाच साजरा होईल, यात कोणतीच शंका नाही. कारण आपण दर वर्षीच तोच सोहळा, त्याच भावनेने साजरा करत आलो आहोत. प्रत्येक सरत्या वर्षांवर उमटणाऱ्या पाऊलखुणा पुसून नव्या पाऊलखुणा उमटविण्याचा उत्साह हीच आपली उमेद असते.

या उमेदीलाच निसर्गाचीदेखील पुरेपूर साथ असते. खरे म्हणजे, रोजच, प्रत्येक रात्रीनंतर नवा दिवस उजाडतो आणि दररोज होत असला, तरी प्रत्येक दिवशीचा सूर्योदय हा प्रत्येकासाठीच नवा सूर्योदय असतो. नेहमीच, सूर्य मावळला की रात्र होतच असते. पण प्रत्येक रात्र ही काही गडद अंधारलेली, अमावास्येची रात्र नसते. रात्रीच्या अंधारातही आनंद शोधता यावा यासाठी आकाशात चांदण्याचा आणि चंद्र-तारकांचा अनोखा मेळा भरलेला असतो. जमिनीवरही, मंद चांदण्याची पखरण झालेली असते. अशा रात्रीच्या अंधारात, पुढची पावले टाकतानाही, काही पावलांनंतर त्या अंधाराला नजर सहज सरावते आणि मग पुढची वाटही लख्ख दिसू लागते. अंधारातून झिरपणाऱ्या चांदण्याचा आनंद उपभोगण्याची सवय लागली, की रात्रीच्या अंधाराचीही भीती वाटतच नाही, उलट अंधारातले ते चांदण्याचे कवडसे अधिकच आनंददायी वाटू लागतात. प्रकाशाचा पावलापुरता कवडसाही नवी उमेद देतो आणि उद्याच्या उजेडाच्या दिशेने नव्या उत्साहाने पुढची पावले पडू लागतात. उद्या उजाडणार आहे, सूर्योदय होणार आहे आणि लख्ख प्रकाशातच पुढचा प्रवास करणार आहोत, याची आपोआपच खात्री वाटू लागते.. खरे म्हणजे, हे सारे काही एकाच, केवळ सरत्या वर्षांच्या रात्रीच अनुभवायला मिळत असते असेही नाही. रोज आपण चालतच असल्याने, रोजच दिवस मावळतो, रोजच रात्रही होते, रोजच्या प्रवासातही, प्रत्येक पावलावर चढउतार येतात, कधी कधी वळणेही लागतात, दमछाकही होते आणि एकाकीही वाटू लागते. कधी सोबतीला आणखीही साथीदार मिळतात. प्रत्येक दिवसागणिक साचणाऱ्या या अनुभवांची ही शिदोरी पुढच्या प्रवासासाठी पुरेशी आहे की नाही हे पाहण्यासाठी मात्र, सरत्या वर्षांच्या अखेरच्या दिवसासारखा अन्य मुहूर्त नाही. या मुहूर्तावर साऱ्या शिदोरीचा लेखाजोखा घ्यायचाच असतो.

त्या प्रथेप्रमाणे तो लेखाजोखा आजही आपण सारे घेणार आहोत. असा लेखाजोखा मांडताना, बेरजेची गणिते कदाचित कमी झालेली आढळतील, वजाबाकी मोठी झाल्याचे जाणवेल, गुणाकार तर झालाच नाही असेही वाटू लागेल आणि भागाकाराचेच प्रसंग अधिक आल्याने, कंसातील गुणाकाराचे वर्ग मांडून ती गणिते सोडविण्याची तर संधीदेखील लाभलेली नसेल. तरीही आपल्याआपल्या लेखाजोख्याचे एकएक उत्तर आपल्याआपल्या हाताशी आलेले असेल. त्या उत्तराच्या भांडवलातूनच सरत्या वर्षांचा निरोप समारंभ आणि नव्या वर्षांच्या स्वागताचा सोहळा आपल्याला साजरा करावयाचा आहे, तरीही त्यात आपल्यापुरता आनंदच असेल. हातून हुकलेली गणिते कायमची गायब झालेली नाहीत, तर पुढच्या वाटचालीतील एखाद्या पावलावर ती अचानकपणे समोर येऊन उभी ठाकतील आणि सोडविण्याचे आव्हानही आपल्याला देतील, याची जाणीव ठेवावीच लागेल. कारण एक वर्ष संपले असले, प्रवासातील एक पाऊल पुढे गेले असेल, मागची वाट बंद झाली असेल, तरी पुढे प्रवास करायचाच आहे, आणि ते अंतर किती हे माहीत नसले, तरी टप्पा येईपर्यंत चालावेच लागणार आहे. त्यासाठीची उमेद आज मिळावी, यासाठी शुभेच्छांची देवाणघेवाणही सुरू झाली आहे. त्यामध्ये आमच्याकडूनही एक गुच्छ!..