पाकिटातून क्रेडिट, डेबिट कार्डाची चळत काढून राजेशनं माझ्यासमोर पसरवली. त्या कार्डाकडे तो किती तरी वेळ समाधानानं बघत राहिला. त्या नजरेत काय नव्हतं? नवव्या इयत्तेपासून भोगलेलं दु:ख, केलेले कष्ट, झालेली अवहेलना आणि आत्ता पालटलेले दिवस, सारं काही त्या नजरेत होतं. संगणकीय क्षेत्रात उच्चपदावर असणारा राजेश आपला भूतकाळ अजिबात विसरलेला नाही. असंच त्याचा तो काळासावळा, तेजस्वी चेहरा बघताना मला वाटत राहिलं.

‘‘क्रेडिट कार्ड, ताई क्रेडिट कार्ड! माझ्या आजच्या यशाचा प्रमुख साथीदार म्हणजे ही क्रेडिट कार्डस्!’’ राजेशच्या कार्यालयात मी बसले होते. तसा त्याचा आवाज फारसा मोठा नसला तरी मला हे सांगताना आजूबाजूला बसलेल्या चार माणसांनी चमकून राजेशकडे बघितलं. राजेशलाही ते जाणवलं असावं. त्यामुळे थोडं वरमून जीभ चावत त्यानं विषय बदलला.

अनेक बँकांची केडिट कार्ड्स आपल्या पाकिटात असणं म्हणजे यशस्वी होणं ही राजेशची यशस्वी होण्याची व्याख्या अनेकांना काहीशी चमत्कारिक वाटेल, पण राजेशचा इतिहास ऐकताना त्याची ही यशाची व्याख्या काही अगदीच ‘अशी तशी’ नाही अशी अनेकांची खात्री पटेल.
एक आटपाट नगर होतं. त्या सुंदर नगरीतील घरंही तशीच सुंदर होती. पण ती सुबक, घरं होती श्रीमंत माणसांची. गरीब माणसं त्या वैभवशाली घरांच्या आसपास राहायची. छोटय़ा, छोटय़ा वस्त्यांतील, छोटय़ा छोटय़ा खोल्यांना आपलं घर म्हणायची. श्रीमंत माणसं कुरकुरत का होईना या आसपासच्या माणसांचं अस्तित्व मान्य करायची. त्यांच्या कामाच्या अनेक गरजा त्यामुळे पूर्ण व्हायच्या हाही अंतस्थ हेतू त्यात होताच म्हणा!

अशाच एका छोटय़ाशा वस्तीतल्या छोटय़ाशा घरात राजेशचा जन्म झाला. पाठोपाठ एक भाऊ आणि एक बहीणही आले. राजेशच्या वडिलांचं एक छोटंसं विडीकाडीचं दुकान होतं. त्यातून येणाऱ्या पैशांतून घर फार सुखानं नसेल, पण आनंदानं नक्की चालायचं. राजेशचे आईवडील आदर्श पालक होते म्हणायला काहीच हरकत नव्हती. पहाटे उठून मुलांना फिरायला नेणं, त्यांच्याशी खेळणं, त्यांचं हस्ताक्षर चांगलं व्हावं म्हणून जिवापाड प्रयत्न करणं (ज्याचं हस्ताक्षर चांगलं तो हुशार असं राजेशच्या वडिलांचं पक्कं मत होतं) हे सगळं राजेशचे वडील हौसेनं करीत. घर लख्ख ठेवणं, मुलांना चांगला आहार मिळेल याची काळजी घेणं ही राजेशच्या आईची जमेची बाजू होती.

असं एकंदर छान चाललं होतं. आणि तेही थोडंथोडका काळ नव्हे. राजेश चौदा वर्षांचा होईपर्यंत सगळं कसं निर्विघ्न चालू राहिलं. मग दिवस बदलत गेले. गावाकडच्या जमिनीवरून भावाभावात वाद निर्माण झाले. कोर्ट-कचेऱ्या सुरू झाल्या. साक्षीदारांनी आपल्या बाजूनं साक्ष द्यावी म्हणून त्यांना दारू पाजता, पाजता राजेशचे वडील या व्यसनाच्या कधी आहारी गेले हे कळलंच नाही. किंबहुना कळलं तेव्हा फार उशीर झाला होता. राजेश तेव्हा नववीत होता. वडिलांचं व्यसन आणि आईची हतबलता बघताना त्याचे कोवळे खांदे जबाबदार बनत गेले. राजेश ऐन दहावीच्या वर्षी जवळच्या एका प्रतिष्ठित घरात नोकरी करायला लागला. राजेशनं कोणत्या म्हणजे कोणत्याच कामाला नाही म्हटलं नाही. घरातल्या श्वानाला फिरवून आणणं असो, चहा करून देणं असो की फाइल्स पोचवणं असो, राजेश सदैव कामाला हजर असायचा.

राजेशची नोकरी सुरू झाली आणि तिन्ही मुलांची शिक्षणं सुरळीत चालू झाली. त्या दरम्यान एक प्रसंग घडला आणि राजेशची पुढची वाटचाल सुरळीत होणार आहे, याचे जणू संकेतच त्याला मिळाले. त्या दिवसांत राजेशचे वडील दारू पिऊन कुठं ना कुठं पडलेले असायचे. मग घरी कुणाचा तरी फोन यायचा. वडिलांची जुनी स्कूटर घेऊन राजेश तिथं धाव घ्यायचा. वडिलांना उचलून स्कूटरवर बसवून घरी आणायचा. एखादं काम असावं, तसंच झालं होतं ते. दिवसाच्या कुठल्या तरी वेळेला (बहुधा सायंकाळी) फोन येणार, राजेश जाणार आणि वडिलांना घेऊन येणार, येताना त्यांच्या शिव्या झेलणार, हाच नित्यक्रम. पण एकदा राजेशला वाटेत त्याला काम देणारे हितचिंतक भेटले. राजेशच्या घरच्या परिस्थितीचा किंचितसा अंदाज त्या सद्गृहस्थांना होता पण अतिशय शांत, हसतमुख दिसणाऱ्या या मुलाच्या वाटय़ाला इतकं रखरखीत वास्तव आलं असेल याची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती. त्या क्षणापासून राजेशला रक्तबंधनापलीकडच्या एका सुजाण पालकाचा लाभ झाला आणि तो शेवटपर्यंत टिकला.

राजेशचा पुढचा प्रवास खडतर होता, पण त्यानं त्याही परिस्थितीत संगणक क्षेत्रातली पदवी घेतली. शिक्षण महाग होतं व मिळणारं वेतन तुटपुंजं होतं. या काळात राजेशनं जमेल त्याच्याकडून पैसे घेतले व त्यातली पैन् पै फेडली. एकाही माणसाचं देणं ठेवलं नाही. याच सुमारास त्याच्या जीवनात वर उल्लेखिलेल्या क्रेडिट कार्डस्चा प्रवेश झाला. राजेशला कोणी तरी हे कार्ड विकण्याचं काम दाखवलं. प्रत्येक कार्डमागे दीडशे रुपये मिळणार होते. राजेश हर्षभरित झाला. हे काम जमलं तर घरात पैसे देता येणार होते. शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फिटणार होतं. धाकटय़ा भावंडांच्या पुढील शिक्षणाची काही प्रमाणात व्यवस्था करता येणार होती. राजेशनं या ‘सेल्समनगिरीचा’ नेहमीप्रमाणे खूप अभ्यास केला. आय. टी. क्षेत्रातली मंडळी दुपारी चहा, सिगरेट, पान यांचा आस्वाद घेतात. त्या वेळी ते थोडे मोकळे असतात हे हेरून राजेशनं आपलं काम सुरू केलं. त्यात त्याला कल्पनेपलीकडे यश मिळालं. पहिल्या महिन्यात त्यानं चाळीसचा आकडा ओलांडला. शिक्षणाची फी चाळीस हजार, विकलेली कार्ड चाळीस. आशा अंकुरित झाली पण फलित झाली नाही. या व्यवहारात फसवणूक झाली. काम देणाऱ्यानं जेमतेम चार हजार हातावर ठेवले. फसवणूक झाली खरी, परंतु कार्डाचं बीज मनात पडलं. कार्ड विकताना लोकांच्या पगाराची स्लिप हातात पडायची. एवढय़ा तरुण मंडळींना लाखांत पगार मिळतो? आपल्यालाही मिळवायला हवा, अशी आकांक्षा अंकुरली फुलली. त्याची संगणक विषयातली पदवी त्या आकांक्षेला खतपाणी देत राहिली.

हा लेख लिहिण्याच्या निमित्तानं राजेशची भेट झाली तेव्हा पाकिटातून (स्वत:च्या) क्रेडिट, डेबिट कार्डाची चळत काढून राजेशनं माझ्यासमोर पसरवली. त्या कार्डाकडे तो किती तरी वेळ समाधानानं बघत राहिला. त्या नजरेत काय नव्हतं? नवव्या इयत्तेपासून भोगलेलं दु:ख, केलेले कष्ट, झालेली अवहेलना आणि आत्ता पालटलेले दिवस, सारं काही त्या नजरेत होतं. संगणकीय क्षेत्रात उच्चपदावर असणारा राजेश आपला भूतकाळ अजिबात विसरलेला नाही. असंच त्याचा तो काळासावळा, तेजस्वी चेहरा बघताना मला वाटत राहिलं.
राजेश अगदी लहान होता, तेव्हा त्याची आणि माझी भेट झाली. त्याच्या वस्तीत आम्ही काही जण ‘बालभवन’ घ्यायचो. राजेश आणि त्याचे जीवश्चकंठश्च मित्र नाथा आणि अमित आमचे मुख्य सभासद! त्यांच्याच आधारावर तर आम्ही ते ‘बालभवन’ किती तरी र्वष चालवू शकलो. पुढे आणखी काही कामात गुंतलो आणि राजेशशी संपर्क कमी होत गेला. आमचं त्या वस्तीत जाणं थांबलं, ‘बालभवन’च्या त्या काळात राजेशचं बालपण निकोप, निरोगी होतं. पुढं त्यात इतक्या घटना घडल्या असतील याची कल्पनाच आली नाही. इतक्या संकटाच्या काळात आमच्याशी संपर्क का साधला नाहीस, असं विचारता राजेशनं दिलेलं उत्तर स्मरणात राहिलं. राजेश म्हणाला, ‘‘तुम्ही तरी कोणाकोणाला मदत करणार? तुमच्या जवळ असणारी गरजू मुलं बघितली की वाटायचं आपली गरज कमी आहे. शिवाय मला ‘आई’ आहे.’’ आई राजेशचा वीक पॉइंट आहे.

राजेश आयुष्यात चार व्यक्तींना मानतो. त्याची आई, जिनं त्याच्यातील प्रेरणास्रोत कायम ठेवलं. मी, जिनं त्याला व्यसनापासून कायम दूर राहण्याची प्रेरणा दिली. त्याचे हितचिंतक, ज्यांनी त्याच्या जडणघडणीच्या प्रत्येक वळणावर कमालीची मदत केली आणि त्याचा धाकटा भाऊ, (राजेश त्याला प्रेमानं दादूल्या म्हणतो) ज्यानं जन्माला आल्यापासूनच त्याची पाठ कधी सोडली नाही.
एवढं सगळं सांगितल्यावर राजेश डोळे मिचकावत मिश्कीलपणे म्हणतो, ‘‘ताई, पाचवा प्रेरणास्रोत सांगायचा राहिला.’’ माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहून हलकेच हसत तो म्हणतो, ‘‘क्रेडिट कार्ड, ताई क्रेडिट करड.’’

– रेणू गावस्कर