रेणू गावस्कर, गेली ३५ र्वष वंचित मुलांसाठी काम करताहेत. वेगवेगळ्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या वयाची, वेगवेगळ्या स्वभावाची मुलं त्यांना भेटली. प्रत्येकाचं जगणं म्हणजे एक पोकळी होती. त्या शून्यातून त्या मुलांना घडवायचं होतं. ते सोपं नक्कीच नव्हतं. प्रत्येक मूल परीक्षा बघणारं, प्रत्येक प्रसंग आव्हानात्मक, प्रत्येक अनुभव काही तरी शिकवून जाणारा. त्यातूनच रेणुताईंनी खूप काही गाठीशी बांधलं. अनुभवांच्या शाळेचं आता विद्यापीठ झालं आहे. त्यातलेच हे काही अनुभव, त्यातलीच काही मुलं या सदरातून भेटणार आहेत. ही मुलं, त्यांचं जगणं तुम्हा-आम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. उद्याचा समाज हा बालककेंद्रितच व्हावा, असं वाटायला लावणारं हे सदर दर पंधरवडय़ाला.

 

वाचकहो, नमस्कार
२०१६ या नवीन वर्षांत आपण या लेखमालेच्या माध्यमातून एकमेकांना भेटणार आहोत. मी लेख लिहिणार आहे, ते आपण वाचाल या अपेक्षेनं व आशेनंदेखील. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मुलांच्या जगातली ‘माझी शाळा’ पस्तीस वर्षांपूर्वी सुरू झाली. आता, एवढय़ा वर्षांनी मागे वळून बघताना कधी कधी वाटतं की, बहुधा शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन मला या क्षेत्रातील ‘विद्यापीठा’त प्रवेश मिळाला आहे.
या इतक्या वर्षांत वेगवेगळी मुलं भेटली. निरनिराळे प्रसंग घडले. अकल्पनीय असे संघर्ष पाहिले. भयंकर हा शब्ददेखील सौम्य वाटावा, अशा परिस्थितीत मुलं, माणसं टिकून तरी कशी राहिली, असा संभ्रम पडला. या सगळ्या अनुभवातून जाताना काही गोष्टी कायमच्या मनावर बिंबल्या. त्यातली एक म्हणजे मुलांची असहाय्यता, हतबलता व दुसरी म्हणजे त्यांची सहजसुंदर अशी जीवनेच्छा. ही जीवनेच्छाच बहुधा मोठय़ा माणसांनाही जगायला प्रवृत्त करते. या जीवनेच्छेचं साक्षात रूप असलेल्या या मुलांना शब्दबद्ध करते आहे.
या मुलांनी माझं आयुष्य समृद्ध आणि चैतन्यमय केलं. या मुलांनी मला विचार करायला प्रवृत्त केलं. बदलाला उद्युक्त केलं. वाचकांनाही या चैतन्याचा लाभ व्हावा असं वाटतं. वंचित मुलांच्या जीवनाची ही शब्दचित्रं केवळ रंजनासाठी नाहीत किंवा केवळ करुणा निर्माण व्हावी म्हणूनही नाहीत. वाचकांच्या मनात या मुलांच्या प्रातिनिधिक रूपानं घर करावं व एका बालककेंद्रित युगाची पहाट व्हावी म्हणून सर्वानीच समविचारांचं व कृतिशीलतेचं िरगण धरावं, अशी अपेक्षा करते व तशी पहाट होईल अशी आशा करते.
‘जोपर्यंत बालकं या पृथ्वीवर जन्म घेताहेत तोपर्यंत ईश्वराचा माणसांवर विश्वास आहे, असं नि:शंकपणे मानावं’ असं रवींद्रनाथ टागोर म्हणत असत. आज आसपास आणि सर्वदूर एकंदरीत बालकांची अवस्था बघता, ईश्वराचा अजूनही आपल्यावर विश्वास आहे असं म्हणणं थोडं धाडसाचंच ठरेल. पण तरीदेखील ईश्वराचा आपल्यावर विश्वास बसावा, आपण ‘बालपण’ या मानवी आयुष्यातील सर्वात चैतन्यमय स्थितीला फार प्रेमानं जपावं आणि ईश्वरीय विश्वास सार्थ ठरवावा, असं अनेकांना वाटतं. मलाही वाटतं. हा विचार करताना गेल्या पस्तीस वर्षांत सहवासात आलेली अनेक मुलं तर आठवतातच, पण स्वत:चं बालपण, त्या वेळचे सवंगडी आणि घडलेल्या घटनाही आठवणींची पाठ धरून राहतात. त्या दिवसांतील म्हणायला गेलं तर अगदी सामान्य असे त्या वेळी न जाणवलेले, अनेक महत्त्वाचे संदर्भ नव्यानं समजू लागतात.
माझी आजी मोठी गोष्टीवेल्हाळ होती. तिने पाहिलेले बालविवाह (तिचा स्वत:चा विवाह आठव्या वर्षी झाला होता) व त्याचे अल्पवयीन मुलींवर झालेले भीषण परिणाम या विषयी आजी बोलत असे. त्या हरवलेल्या बालपणाविषयी ऐकताना अंगावर काटा यायचा. मोठी झाले तेव्हा आजीच्या काळात मुलींना ‘बालपण’ माहीतच नव्हतं, त्या एकदम ‘मोठय़ाच’ होत होत्या, एवढं मात्र पक्कं लक्षात राहिलं. माझं लहानपणही, त्यातल्या कडूगोड आठवणींसहित मनात रुंजी घालतं. तसं ते प्रत्येकाच्या मनात असतं म्हणा. ते आठवताना आता वाटतं, ‘लहानपण देगा देवा’ एवढं सोपं बालपण नसतं सारं! आता एवढी ‘मेरिट’ची चढाओढ नसली तरी ‘ढ’पणाचा शिक्का बसलेल्या मुलांनी सोसलेलं दु:ख मी आमच्या वर्गातच अगदी जवळून बघितलं. नापास होणारी मुलं म्हणजे ‘कंडम’ मुलं. ते बालपण म्हणजे जवळपास बहिष्कृत बालपण असे. अभ्यासात हुशार असणाऱ्या मुलांनाच शालेय जीवनातील इतर क्षेत्रांत (खास करून सांस्कृतिक) प्राधान्याने प्रवेश असायचा. त्यातूनही या प्रतिकूलतेतून अभ्यासातला एखादा ‘चुकार ढ’ खेळात हुशार ठरल्यास ‘खेळण्याशिवाय येतंय काय दुसरं?’ अशी त्याची / तिची संभावना व्हायची.
आई-वडिलांच्या प्रेमळ सहवासाचं कवच लाभलेली, सुरक्षित बालपण लाभलेली मुलंदेखील आसपास होतीच आमच्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नर्तिका सुचेता भिडे चाफेकर यांचं नृत्यमय बालपण मी पाहिलंय. शेजारी राहायच्या लहानपणी त्या आमच्या. आम्ही मैत्रिणी लहान होतो त्यांच्यापेक्षा. पण त्यांची देखणी, नृत्यासाठीच जन्मलेली मूर्ती बघताना आमची मनं आनंदानं उचंबळून यायची. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील, हेही आमचे शेजारी. त्यांच्या धिप्पाड वडिलांसोबत जाणारी ही बालमूर्ती, मागे वळून वळून त्या जोडगोळीकडे बघायला लावायची. पण याच सोबतीला जवळच राहणाऱ्या एका स्त्रीचं अचानक निधन झाल्यावर, अक्षरश: पोरकी झालेली सतत घरातच बसून राहणारी दोन छोटी मुलं आजही मला आठवतात. जबाबदार पालकत्वाच्या अभावी एकमेकांना घट्ट बिलगून कशी तरी वाढली ती मुलं. अशी अनेक मुलं दिसायची आसपास. या मुलांना विसरता तर आलं नाहीच, उलट मोठेपणी प्रतिकूलतेशी झगडणाऱ्या मुलांशी जवळून जोडली गेल्यावर भूतकाळातल्या अशा किती तरी आठवणी उफाळून वर आल्या. त्यातली एक आठवण तर अगदी स्वत:शीच जोडलेली आहे. माझी आई पार्किन्सन्स नावाच्या असाध्य व्याधीनं ग्रासली होती. माझा भाऊ आणि मी बाहेर खेळताना, आसपासच्या बायका आमच्याकडे बघून हळहळत. आम्हाला ‘बिच्चारी मुलं’ म्हणत, असं मला पक्कं आठवतं. तेव्हापासून या बिच्चारेपणाचाच इतका तिटकारा वाटायला लागला की, पुढच्या आयुष्यात कुणाला म्हणजे अगदी कुणालाही ‘बिच्चारं’ म्हणायचं नाही, असं ठरवलं आणि ते पाळलंसुद्धा.
पुढे किती तरी वर्षांनी, ‘हमारे यहाँ कोई नही आता, आप तो आ जाव’ ही मुलांची हाक ऐकून मुंबईतील माटुंगा येथील ‘डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल’ या कायद्याच्या भाषेत ‘उन्मार्गी’ आणि लोकभाषेत ‘गुन्हेगार’ (दोन्ही शब्द मुलांच्या संदर्भात अयोग्यच) मुलांच्या संस्थेत त्यांना भेटायला जायला सुरुवात केली. तेव्हा एक वेगळ्या, अगदी सर्वस्वी अपरिचित जगाचे दरवाजे उघडले असं वाटलं. वरवर चेहऱ्यावर उर्मट भाव दाखवत फिरणारी मुलं, अंतर्यामी किती एकाकी आहेत, हे दिवसेंदिवस समजत गेलं. हळूहळू डेव्हिड ससून व तत्सम संस्थेतली मुलं, रिमांड होम्स, महानगरपालिकेच्या शाळांतली मुलं, असे आम्ही परस्परांच्या
सहवासात आलो. एकदा मुंबईत वरळी येथील पोलिसांच्या कामाच्या संदर्भातली प्रदर्शनी बघायला ‘डेव्हिड ससून’च्या मुलांसोबत गेले होते. पोलीस मुलांशी फार सौजन्यानं वागले. पोलिसांनी सर्व माहिती सांगितली. परतताना बसमध्ये बसवलं. मुलं नुसती भारावून गेली. तोपर्यंत रस्त्यावर, स्टेशनवर, थिएटरबाहेर
राहताना पोलिसी दंडुक्यांचा प्रसाद त्यांना माहीत होता. पोलिसी सौजन्यानं त्यांची जणू दुनियाच बदलून गेली. जणू वाळवंटात चालताना त्यांना थंडगार पाण्याचा स्पर्श झाला.
पस्तीस वर्षांत अनेक मुलं भेटली. त्यांच्याविषयी, त्यांच्या परिस्थितीविषयी विचार करताना जाणिवांचे परीघ विस्तारत गेले. भेटणारं प्रत्येक मूल वेगळं होतं. खंबीर, जिद्दी, हताश, अशी अनेक रूपं! सुरुवातीला एकटेपणाला घाबरणारी आणि मग हळूहळू उठून उभी राहणारी. परिस्थितीशी दोन हात करणारी मुलं.
यातली काही मुलं खूप शिकली. काहींनी थोडक्यात समाधान मानलं. काही जण पैशानं मोठे झाले, काहींनी कलेत नाव कमावलं. व्यसनी मात्र कुणीच झाले नाहीत, याचं समाधान वाटतं.
आईच्या व्यसनापायी अक्षरश: रस्त्यावर आलेला पण आज भाजीच्या व्यवसायावर चार ट्रकचा मालक झालेला प्रवीण, दोन मुलींसह गरिबीचा पण सुखाचा संसार करणारा सुरेश, कुठल्याही परिस्थितीत नृत्यांचं वेड न सोडणारा ब्रिजेश, डॉक्टर होऊ पाहणारी मंजू, पदवीधर झालेली (सात पिढय़ांतली पहिली शिक्षित) सलमा आणि चित्रकलेत विलक्षण गती दाखवणारी सुजाता सारेच महत्त्वाचे, लक्षणीय. या सर्वाची शब्दचित्रं रेखाटावीत असं वाटणं साहजिकच नव्हे काय? ही मुलंच तर राष्ट्रपित्याचे ‘श्रद्धा होना’ हे शब्द अधिक अर्थपूर्ण बनवतील, यात मला तरी शंका वाटत नाही.
eklavyatrust@yahoo.co.in