उमा डॉक्टर झाली. त्या वस्तीत राहून डॉक्टर झाली. लाऊडस्पीकर, रेडिओ आणि टी.व्ही.चा घणाघात ऐकत मानवी जीवनातील स्खलन आणि हार बघत, आजूबाजूला स्त्री-जातीचा प्रचंड पराभव बघत डॉक्टर झाली खरी पण उदास असायची. तिच्या डोळ्यातल्या काही प्रश्नांना उत्तरे नव्हती. किंबहुना उत्तर नसलेलेच प्रश्न होते ते!
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असं आपण म्हणतो पण उमाचं वर्णन करायचं झालं ना तर मी म्हणेन, ‘मूर्ती लहान पण आवाज मात्र महा महान.’ जोरात बोलायचं, ठासून बोलायचं आणि ठसक्यात बोलायचं? ही बोलण्याची सगळी विशेषणं उमाला अगदी चपखल बसतात. ‘बसतात’ असं अगदी आवर्जून म्हणते कारण तिला पहिल्यांदा चौथीत पाहिलं. तेव्हाही अशीच ठसक्यात बोलत होती आणि परवा डॉक्टर झाली म्हणून अभिनंदन करायला गेले तेव्हाही अधूनमधून तो ठसका आपलं डोकं वर काढत होताच. आता वयामुळे त्या बोलण्याला थोडी गांभीर्याची धार आली आहे एवढंच.
उमाला मी तिच्या शाळेत पहिल्यांदा भेटले तेव्हाचा प्रसंग मला स्पष्ट आठवतोय. माझी एक आहारतज्ज्ञ मैत्रीण माझ्यासोबत होती. अतिशय गरीब घरातून आलेली ही मुलं. त्यातही देवदासींच्या मुलांची प्रकर्षांनं हजेरी. त्यामुळे आहारातील अनियमितता, आर्थिक अडचणी व त्यामुळे मुलांची होणारी कमालीची आबाळ या बाबी शाळेसाठी नित्याच्याच होत्या. काही प्रमाणात तरी मुलांना आहार देण्यात आम्ही (शाळेचे हितचिंतक) यशस्वी झालो होतो. पण मुलांना खरं तर पूर्णान्नाची गरज होती. या आहारतज्ज्ञ मैत्रिणीनं मदतीची तयारी दाखवली म्हणून मी तिला घेऊन शाळेत गेले.
आम्ही दोघी एकामागून एक वर्गात जाऊन मुलांशी व वर्गशिक्षकांशी बोलत होतो. मैत्रीण मुलांना आहाराविषयक बारीकसारीक प्रश्न विचारत होती. उमाला विचारलं तशी ती ठसक्यात म्हणाली, ‘‘अहो बाई, सकाळ-संध्याकाळचं काय विचारता? आमच्या शाळेतली किती तरी मुलं एकदाच जेवतात. मी सांगते ना तुम्हाला. मी पण आहे त्यांच्यातच.’’ ऐकणारे सगळेच गार झाले. मी तोपर्यंत उमाला पाहिलं होतं. पण त्या वेळी बोलताना तिचे तेजस्वी, काळेभोर डोळे मनात ठसले. गोरीपान, छोटीशी अगदी कानांपाशी दोन वेण्या घालणारी आणि मोठय़ानं बोलणारी व त्याहून मोठय़ानं हसणारी उमा खूपच आवडून गेली. शिवाय तिच्या त्या रोखठोक बोलण्यानं शाळेतल्या सर्व मुलांना पूर्ण आहार मिळालाच पाहिजे या आमच्या निर्धारानं आणखी उचल खाल्ली व पुढं आम्ही ते करण्यात यशस्वी झालो. पुढच्या काही दिवसात उमाची आम्हा सगळ्यांशी मैत्रीच झाली. उमा अभ्यासात हुशार होती. तल्लख होती. खास करून इंग्रजी व गणित हे तिचे आवडीचे विषय. त्यात उमाला पैकीचे पैकी मार्क मिळायचे. उमाच्या हसऱ्या डोळ्यात आम्हाला तिच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं दिसायची.
अशी दोन र्वष गेली आणि एक दिवस उमा अचानक दिसेनाशी झाली. शाळेत तिची गैरहजेरी लागायला सुरुवात झाली. तशी आम्ही तिच्या घराकडे मोर्चा वळवला. उमा एका देवदासीची मुलगी होती. शाळेच्या जवळच राहत होती. पण तोपर्यंत आम्ही कधीच तिच्या घरी गेलो नव्हतो. त्या दिवशी उमा घरी भेटेल, तिला परत शाळेत घेऊन येऊ या आशेनं गेलो खरे, पण उमा मुळी तिथं नव्हतीच. तिच्या आईनं उमाला पार दूर, खेडेगावातल्या आपल्या घरी पाठवून दिलं होतं. उमाला परत आणण्याचा मानस नव्हता तिचा. सतत होणाऱ्या पोलिसांच्या फेऱ्या, त्यातून वयात येणाऱ्या मुलींना वाटणारी कमालीची असुरक्षितता आणि भीती याचा धसका घेतला होता उमाच्या आईनं. आमच्याशी बोलत असताना अगदी कोरडय़ा कंठानं आणि तेवढय़ाच कोरडय़ा डोळ्यांनी (या जीवघेण्या परिस्थितीनं जणू सगळे स्त्रोतच आटून जातात की काय न कळे) ती म्हणाली, ‘‘जो मेरा हुआ, वो उसका नहीं होना चाहिए। शादी करेंगे उसकी। पढाई नहीं होगी तो कुछ नहीं बिगडता।’’
उमाच्या आईला तिच्या शादीची काळजी होती, पण उमाला मात्र काळजी होती स्वत:च्या शिक्षणाची. नाही तर राज्याच्या सीमा पार करून गावी पोहोचलेल्या उमानं आमच्याशी संपर्क साधला याला काय म्हणायचं? विविध माध्यमातून उमानं आमची पाठ धरली, आईची आर्जवं केली, उपोषण केलं, रडली, भेकली, पण परत यायचा हट्ट मात्र सोडला नाही तिनं.
उमाच्या आईनं लेकीच्या हट्टापुढे हार मानली. लेकीला या भयंकर असुरक्षित ठिकाणी तिनं परत आणलं. उमा परत शाळेत यायला लागली. पण मधे जवळपास सहा महिन्यांचा काळ गेला होता. त्या काळात पुस्तक तर सोडाच, कागदाचा कपटा दिसणंही दुरापास्त होतं. पण मग शाळेतील शिक्षकांनी, स्वयंसेवकांनी, सगळ्यांनीच खूप कष्ट घेतले. उमानं प्रयत्नांची शिकस्त केली. तिच्या आईनंही त्या दिवसात उभारी धरली आणि उमाच्या शिक्षणाची गाडी रुळावर आली एकदाची.
त्या दिवसात उमाची आई आम्हाला भेटायला खूपदा यायची. एरवी या बाई खूप कमी बोलायच्या, बहुधा रागावलेल्या असायच्या. बोलल्या तरी मोजून, मापून-बोलण्याला भावनेचा स्पर्श होणार नाही अशी जणू काळजी घेताहेत की काय असं वाटायला लावणाऱ्या होत्या त्या. पण उमा शिकायला लागली. वक्तृत्वात चमकायला लागली तशी उमाच्या आईच्या ओठांची घडी हळूहळू मोडायला लागली. त्यांच्या गतायुष्याची कहाणी बाहेर येऊ लागली. उमाची आई आठ भावंडांतली सर्वात थोरली. भावंडांना सांभाळताना आई-बापांनी हात टेकले आणि या मुलीला कोणी तरी या बाजारात आणून उभं केलं. कोवळ्या वयातले आघात पचवता आले नाहीत. आपल्या आयुष्याची माती झाली, आता या तीन पोरींची नको, असं मनानं घेतलं. (तोपर्यंत उमाच्या आईचं तिथं येणाऱ्या एका माणसाबरोबर लग्न(?) झालं होतं.) ‘बाई, यांचं शाल-शेले नेसवून लग्न करा. एवढंच स्वप्न हाय माझं,’ उमाची आई सांगायची.
उमानं आणि आम्ही मात्र उमाचं शिकण्याचं, मोठं व्हायचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करण्याचं ठरवलं. उमाचे अनेक गुण कारणापरत्वे समोर यायचे. आणि आमच्या निश्चयाला आणखी बळकटी यायची. एकदा मुलांची सायंकाळची अभ्यासिका चाललेली असताना एक पत्रकार मुलांना भेटायला आले. त्यांनी खास पत्रकारी शैलीत मुलांशी संवाद साधला. मुलं खुशीत आली. पाहुण्यांशी बोलू लागली. पण पत्रकारिता आणखी पुढं सरकली व त्या महाशयांनी अचानक, ‘या इथं आजूबाजूला, तुम्हाला न आवडण्यासारखं काय, काय घडतं,’ असा सूचक प्रश्न केला. प्रश्न इतक्या कौशल्यानं विचारला गेला होता, तरीही मुलं एकदम सावध झाली. त्यांनी एकमेकांकडे बघितलं व ती गप्प झाली. रंगाचा बेरंग झाला. तरीही स्वत:ला सावरून घेत मुलांनी काही उत्तरं दिली. उदाहरणार्थ, मोठय़ा आवाजात इथं रेडिओ लावतात, खूप मारामाऱ्या करतात, वगैरे. असं मुलांचं घुटमळत बोलणं चालू असतानाच उमा तीव्र स्वरात म्हणाली, ‘‘आम्हाला आमच्या इथलं काही सांगायचंच नाही, समजलं?’’
पत्रकार हिंदी भाषिक होते, त्यामुळे उमाचे शब्द कदाचित् त्यांना अक्षरश: समजले नाहीत पण तिच्या एकंदर आवेशावरून आशय मात्र बरोब्बर समजला. ते इतके चपापले की त्यांनी संभाषणच आटोपतं घेतलं. त्यानंतर मुलांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी असे अटपटे सवाल कोणी करू नयेत, याविषयी आम्ही जागरूक होत गेलो. पण मुळात मला सांगायचंय हे की, उमाला ते पत्रकार काय विचारत होते ते कळलं, जसं ते इतर मुलांनाही कळलं, पण तिनं एकटीनं आणि तेही तत्क्षणी आपला निषेध नोंदवला.
उमाच्या शिक्षणाची गाडी कधीच सुरळीत चालली नाही. उमाच्या आईची असुरक्षिततेची भावना खूप प्रबळ होती. उमा एखाद्या मुलाच्या प्रेमात पडेल या भीतीनं ही माता कमालीची गांगरलेली असे. आम्हाला तिचा प्रसंगी राग येई. पण तिची असुरक्षितता आम्हाला समजत असे. अशा वेळी उमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते तिचे वडील. खरं तर उमाच्या आयुष्यात त्यांचा प्रवेश खूप उशिरा झाला होता. पण या तीनही मुलींवर (उमा आणि तिच्या दोन बहिणी) त्यांनी मनापासून प्रेम केलं. तीनही बहिणींत उमा शिकणार हे त्या गृहस्थाला उघड दिसत होतं. ते साध्य व्हावं म्हणून या साध्यासुध्या माणसानं आपली ताकद पणाला लावली.
उमा डॉक्टर झाली. त्या वस्तीत, स्वत:च्या घरात राहून डॉक्टर झाली. लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश किंचाळ्या ऐकत वेडेवाकडे नाच बघत, रेडिओ आणि टी.व्ही.चा घणाघात ऐकत मानवी जीवनातील स्खलन आणि हार बघत डॉक्टर झाली. आजूबाजूला स्त्री-जातीचा प्रचंड पराभव बघत, तो पचवण्याचा प्रयत्न करत तिनं विजयाची पताका फडकवली.
उमा मला कधी कधी दिसते. कधी तरी भेटते. ती भेटली की तिच्या या आभाळाएवढय़ा यशाची मला आठवण येते व माझं मन आनंदानं, अभिमानानं भरून येतं. पण उमा मात्र मला कधीच तेवढी आनंदी दिसत नाही. उलट ती खिन्न दिसते, उदास असते. डोळ्यात प्रश्न दिसतात. विचारलं तर फारसं बोलत नाही. नुसतीच हसते. उमा पुढे जाते आणि तिच्या संबंधातले काही प्रश्न मला वेढून टाकतात. का बरं उदास असते उमा? बाहेरचं जग आणि तिचं जग यातली तफावत जाणवते म्हणून? की दोन्ही जगातली आपली ओळख नीटशी पटत नाही म्हणून? की इतकी शिकूनही समाज मूळ ओळख विसरू देत नाही म्हणून? नुसतेच प्रश्न. उत्तरं नसलेले. कोणी देईल का या प्रश्नांना आपल्या मनात घर?

 

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
arvind kejriwal arrets
केजरीवालांच्या ‘कट्टर भक्ता’चा देशात बोलबाला; एका व्हिडीओमुळे व्हायरल झालेले राम गुप्ता नेमके कोण?

रेणू गावस्कर
eklavyatrust@yahoo.co.in