मोहन आपल्या दूर आडवळणाच्या गावी अधूनमधून जातो. शाळेत न जाणारी मुलं हुडकून काढतो. त्यांच्या शाळेत न जाण्याची, कारणं शोधतो. आर्थिक अडचणी असतील तर त्या स्वखर्चानं दूर करतो. परतल्यावर मला भेटला की सारं सांगतो. ‘बच्चे दरोगा बनना चाहते है, तो उन्हे पढाना चाहिए।’

तो आणि मी दररोज सकाळी समुद्रावर फिरायला जायचो. त्याचं वय होतं दहा आणि माझं चाळीस. रोज सकाळी सहा वाजता त्याची बटुमूर्ती माझी वाट बघत पिठाच्या गिरणीबाहेर उभी असायची. नाव मोहन. राहणार – पिठाच्या गिरणीत. मूळचा राहणार उत्तर प्रदेशातील एका खेडेगावी. गोरापान, खूप बुटका, पिंगट डोळ्यांचा, शुभ्र दातांचा आणि विलक्षण बोलक्या चेहऱ्याचा मोहन मला पहिल्यांदा भेटला तो त्या गिरणीत दळण टाकायला गेले तेव्हा. मोठय़ा कौशल्यानं त्याचे हात आपल्या काकाच्या कामात मदत करत होते. डबे उचलणं, त्यातले गहू दळणाच्या धडधडत्या यंत्रात टाकणं, त्या यंत्रावर हातातल्या हातोडीनं ठाक् – ठाक्  असा आवाज करून पीठ काढणं, सगळं कसं निगुतीनं करायचा. त्याहून खास म्हणजे गिऱ्हाईकाला डबा देताना त्याचं ते मोहक हसू ओठांवर उमटायचंच.

आमची ओळख झाली आणि माझ्या लक्षात आलं की काकासमोर मोहनच्या ओठांची घडी उकलत नाही, पण चुलत भावंडांबरोबर असला की खालच्या आवाजात गाणी म्हणतो, हसत, हसत काही ना काही बोलत राहतो. एकदा अचानक गावाकडे कोणीतरी वारलं म्हणून काका आपल्या मोठय़ा मुलावर गिरणी सोपवून गावी गेला. मोठय़ा भावाच्या मदतीला राहिलेल्या मोहननं मोकळा श्वास घेतला असावा.

त्या मोकळ्या श्वासाची चुणूक मला लगेचच दिसायची होती. मी रोज सकाळी फिरायला जाते हे मोहननं हेरलं असावं. काका गेल्याच्या तिसऱ्या की चौथ्या दिवशीच गिरणीच्या बाहेर माझी वाट बघत तो घुटमळत होता. मला पाहिल्याबरोबर आपल्या सुंदर स्टायलीत हसत सरळ माझ्या बरोबर चालत सुटला. समुद्राच्या मोकळ्या वाऱ्यानं, क्षितिजापर्यंत दिसणाऱ्या अमर्याद जलानं मोहनला मोकळं केलं. त्या एवढय़ाशा बालजिवाच्या अंतरंगात एवढं काही दडलं असेल असं वाटलंच नव्हतं.
मोहन अगदी लहानपणीच आपलं मूळ घर, गाव सोडून वडील आणि काकांबरोबर मुंबईत आला. त्याचे वडील उपनगरातील एक गिरणी बघायचे आणि मुख्य भागातली एक गिरणी काका बघायचे. वडिलांकडे मोहनचा मोठा भाऊ आणि हा धाकटा काकांपाशी. फिरताना भरून आलेल्या आवाजात मोहन म्हणाला, ‘‘सारे घर काही बँटवारा कर दिया! माँ और बहन वहाँ यू.पी.में। भाई और मैं यहाँ बम्बई में होने के बावजूद अलग, अलग।’’ याहूनही अधिक मोहन सांगायचा. म्हणायचा की त्याला या अलगपणाचं दु:ख वाटतं. त्याला गावाकडे राहायचं होतं. खेतीबाडी करायची होती. बहिणींशी खेळायचं होतं. पण बालपणातला खेळ, सवंगडी सारंच मागे राहिलं आणि अगदी कोवळ्या वयात पोटापाण्याचं ‘ट्रेनिंग’ मात्र पाठी लागलं.

मोहनचे काका मग काही महिने परत आलेच नाहीत. त्यामुळे आमचं पहाटेचं फिरणं निर्वेधपणे चालू राहिलं. आम्ही खूप लांबवर फिरायचो. तासाभराच्या त्या फिरण्यात मोहन बोलायचा आणि मी श्रवणभक्ती करायचे. त्या दहा-अकरा वर्षांच्या मुलाच्या अंत:करणात खूप काही दडलं होतं आणि त्याला ऐकणारं कोणीतरी हवं होतं. असे काही दिवस गेले आणि मोहननं माझ्या समोर शाळेचा प्रस्ताव मांडला. मोहनला ‘दरोगा’ व्हायचं होतं त्यासाठी शिकायला हवं, याचं भान त्याला होतं. मोहननं खरंतर केव्हापासून काकाच्या पाठी शाळेचा धोशा लावला होता. पण एरवी त्याच्याशी चांगले वागणारे काका, शाळेचं नाव काढलं की संतापत असत. मुलांना शिकवलं की ती या प्रतिष्ठा नसलेल्या धंद्याला यायला लाजतात, हे त्या मुरब्बी माणसाच्या चांगलंच लक्षात आलं होतं. त्यामुळे आपल्या स्वत:च्या, आपल्या भावाच्या मुलांनी शाळेत जायचं नाही हे त्यांनी पक्कं ठरवून ठेवलं होतं. पण इथं तर हा पुतण्या शिकायचं स्वप्न बघत होता. दरोगा बनण्याचं स्वप्न बघत होता. काही महिने काका गिरणीकडे फिरकायचे नाहीत. ही खात्री पटल्यावर हृदयात दडवून ठेवलेल्या आकांक्षेनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं.

मोहन माझ्या घरी शिकायला यायला लागला. धूळपाटीवर त्याची पहिली अक्षरं उमटली तेव्हा त्याला झालेला आनंद खरोखर असीम होता. मोहननं पहिली अक्षर गिरवली आणि पुढची अक्षर तो गिरवतच राहिला. मोहन लिहायवाचायला फार भराभर शिकला. बघता बघता सोपी पुस्तकं (मराठी, हिंदी) तो वाचायला लागला. लावून, लावून अक्षर वाचायचा. मग मन लावून, जीभ बाहेर काढून गिरवत राहायचा. त्याची ती जीभ बाहेर काढून कष्टानं अक्षरं गिरवणारी छोटी मूर्ती बघताना मन भरून यायचं. मोहनची आमच्या घरी शिकायला येण्याची वेळ मात्र कधीच निश्चित नसायची. गिरणीतल्या कामानुसार त्याच्या वर्गाची वेळ बदलायची. असा अचानक उगवला आणि मला वेळ नसला किंवा बाहेर जायचं असल्यास मोहनची मुद्रा खिन्न व्हायची. डोळ्यात पाणी यायचं. कापऱ्या स्वरात ‘काम बहोत था ना।’ असं म्हणून तो परत फिरायचा.
असे काही महिने गेले. मोहन न अडखळता लिहू, वाचू लागला. दरोगा बनण्याचं स्वप्न आपण पूर्ण करणार, असं आत्मविश्वासानं म्हणू लागला. त्या काळात आमचं फिरणं चालू होतं. मनोरथांची देवाणघेवाण सुरू होती. मोठे मजेचे दिवस होते ते. पण प्रत्येक स्वप्नाला शेवट असतोच. मोहनचे काका परतले व सर्वात आधी त्यांनी मोहनची शाळा बंद करून टाकली. मी त्यांना भेटले. विनंती केली, हुज्जत घातली. पण त्यांचा नकार कायम राहिला. शेवटी एकदा मी परत या विषयावर बोलल्यास मोहनला मुंबईबाहेर इतरत्र रातोरात पाठवून देईन असंही त्यांनी बजावलं. त्यांच्याकडे बघताना ते असं करू शकतील याविषयी मोहनची आणि माझी खात्री पटली.

त्या रात्री मोहन मला भेटला. गिरणीत मी येऊ नये, असं त्यानं मला परत परत कळकळीनं सांगितलं. त्याला जमेल तसा तो माझ्याकडे शिकायला येईल असंही तो म्हणाला. त्यातलं वैयथ्र्य त्या क्षणीही त्याला आणि मला जाणवत होतं. वर्ष-दोन र्वष मोहनच्या धूर्त आणि चाणाक्ष काकांनी त्याला उपनगरातील दुसऱ्या गिरणीत पाठवून दिलं. शिक्षणाचं भूत अणि माझा सहवास दोन्ही टाळणं हा त्यातला उद्देश होता व तो निदान त्या वेळी साध्य झाला.

पण मोहन न मला विसरला, न शिक्षणाला. दोन-तीन वर्षांनी परत येऊन भेटला तेव्हा ओठांवर किंचित मिसरुड फुटली होती. आवाज भसाडा झाला होता. पण डोळ्यातली कोवळीक आणि ओठावरचं हसू मात्र तसंच अगदी तसंच होतं. या वेळी मोहनसोबत त्याचे वडील होते. मोहननं आमची भेट घडवून आणली. भेटीत त्याचे वडील भावनावश झाले. मोहनचं नुकसान झालं, असं म्हणाले. मोठय़ा भावासमोर आपलं काही चालत नाही, अशी कबुलीही दिली त्यांनी. मोहनचं शिक्षण अधुर राहिलं व दरोगा बनण्याचं त्याचं स्वप्नही. तो अक्षरओळख विसरला नाही, एवढं मात्र नक्की. कधीतरी यायचा, काहीतरी वाचायचा आणि खिन्न मुद्रेनं निघून जायचा.
मोहन मोठा झाला. त्यानं वडील व काका यांच्यातर्फे चालत आलेला गिरणीचा व्यवसाय मोठय़ा नेकीनं सचोटीनं चालवला. नुसता चालवला नाही तर भरभराटीला आणला. एकाच्या दोन गिरण्या मोहन चालवायला लागला. त्याचं लग्न झालं. पहिल्या मुलाच्या जन्माचे पेढे द्यायला आता तेव्हा चेहऱ्यावरून आनंद नुसता उतू जात होता. पेढा दिला आणि म्हणाला, ‘‘इसको पढा सीखा के दरोगा बनाऊँगा। छोडूंगा नहीं।’’

मोहनने आपले शब्द खरे केले. मोहनची दोन्ही मुलं उत्तम शाळेत जातात. मोहन वेळात वेळ काढून त्यांना शाळेत पोचवायला जातो. पण मोहनची गोष्ट एवढय़ावर संपत नाही. मोहन आपल्या दूर आडवळणाच्या गावी अधूनमधून जातो. शाळेत न जाणारी मुलं हुडकून काढतो. त्यांच्या शाळेत न जाण्याची कारणं शोधतो. आर्थिक अडचणी असतील तर त्या स्वखर्चानं दूर करतो. शिक्षकांना, पालकांना आवर्जून भेटतो. त्यांच्या अडचणींची आत्मीयतेनं चौकशी करतो.
परतल्यावर मला भेटला की सारं सांगतो. ‘बच्चे दरोगा बनना चाहते है, तो उन्हे पढाना चाहिए।’ असं हसतमुखानं आणि पाणावलेल्या डोळ्यानं सांगतो आणि पुढे चालू लागतो..