‘नाटय़ संमेलनाध्यक्षपद हे निव्वळ शोभेचे आहे,’ असे खेदयुक्त विधान ९५व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्ष फैयाज यांनी संमेलनाध्यक्षपद सोडताना गेल्या वर्षी ठाण्यात केले होते. अगदी तशाच प्रकारचे विधान ९६व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी संमेलनाध्यक्षपदाची मुदत संपताना परवाच्या रविवारी उस्मानाबाद येथे केले. या दोन माजी अध्यक्षांनी त्यांच्या त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत जे अनुभवले त्याची गुणात्मकता किंवा अवगुणात्मकता इतकी सारखी असावी, यात काहीही नवल नाही. आणि आत्ताचे अध्यक्ष जयंत सावरकर यांना पुढील वर्षभरात काही चांगला अनुभव यावा, अशा शुभेच्छा देऊनही त्याचा उपयोग होईल, असेही वाटत नाही. ही अशी भावना नोंदवण्याचे कारण म्हणजे उस्मानाबादमधील नाटय़ संमेलनाने काय दिले, या प्रश्नाचे फारसे उत्साहवर्धक नसलेले उत्तर. उन्हाळा असूनही संमेलनास गर्दी चांगली होती, भारतीय जनता पक्षाचे आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी स्वागताध्यक्षपदाची भूमिका चोख वठवीत उत्तम नियोजन केले. अशा पद्धतीच्या बाबीच मोजणीत घ्यायच्या असतील तर हे संमेलन यशस्वी ठरले, असे म्हणता येईलही कुणाला. पण अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे यश हे शिरगणती आणि टापटीप याच्या पल्याडच्या मापदंडांनी मोजायचे असते. संमेलनास आलेल्यांना मानसिक, बौद्धिक, भावनिक आनंद, समाधान किती मिळाले याची मोजणी येथे महत्त्वाची. ते उस्मानाबादेत फारसे मिळाले नाही. याचा प्रारंभ अगदी संमेलनाध्यक्षांच्या भाषणापासूनच व्हावा, हे खेदाचे. संमेलनाध्यक्षांनी काही महत्त्वाचा नवा विचार मांडणे, भोवतालचा आढावा मांडणे हे अपेक्षित असते. त्याऐवजी संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात प्रामुख्याने मांडली ती मागण्यांची जंत्री. त्यांनी मांडलेल्या मागण्या रास्त होत्या, पण संमेलनाध्यक्षांनी अध्यक्षीय भाषणातून त्या मांडण्याचे कारण काय? त्यासाठी इतरही व्यासपीठे आहेतच की. संमेलनातील कार्यक्रमांची रूपरेषा आजवरच्या संमेलनांशी एकदम फटकून वागणारी. सध्या फारशा प्रकाशझोतात नसलेल्या मंडळींचे नाटय़प्रयोग, एकांकिका, एकपात्री प्रयोग हाच कार्यक्रमांचा कणा. बाकी परिसंवाद, चर्चात्मक कार्यक्रमांना पूर्ण बगल दिलेली. नाटक ही केवळ रंजनासाठी पाहण्याची गोष्ट आहे आणि उगीच कशाला त्यावर चर्चाबिर्चा करायची, अशी धारणा नाटय़ परिषदेची झाली आहे की काय, ते कळावयास मार्ग नाही. ती तशी असल्यास बदलणे आवश्यक आहे, एवढे नक्की. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे पुण्यातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडल्याच्या प्रकरणी निषेध ठराव करण्याचीही हिंमत संमेलनाने न दाखवणे. ज्या गडकरी यांची नाटके मराठी रंगभूमीचे भूषण मानली जातात, त्यांच्या स्मृती अत्यंत हिणकसपणे पायदळी तुडविल्या जातात व त्याचा सभ्य शब्दांत निषेध करावा असे नाटय़ परिषदेला वाटत नाही, हे कशाचे लक्षण? नाटय़ परिषदेच्या बोटचेपे धोरणाचे, की असंवेदनशीलतेचे? अशीच असंवेदनशीलता दिसली ती राज्य सरकारच्या पातळीवर व तीही उद्घाटनातच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन व्हायचे होते, मात्र हे दोघेही त्यास अनुपस्थित होते. संमेलनाच्या या अशा पडलेल्या नाटकात केवळ एकच गोष्ट काहीशी आशादायी व ती उस्मानाबादकरांच्या दृष्टीने. जिल्ह्य़ाचे ठिकाण असूनही या शहराच्या परिसरात नाटय़ चळवळ तशी फारशी रुजलेली नाही. येथे नाटय़प्रयोगही होण्याचे प्रमाण अल्प. खरे तर नाटक या गोष्टीचा प्रसार अशा भागांत होण्याची गरज अधिक आहे, आणि संमेलन म्हणजे त्यासाठीचा उत्तम मार्ग. या संमेलनाच्या निमित्ताने परिसरातील जनतेला नाटक जवळून बघायला, अनुभवायला मिळाले. त्याचा काहीएक फायदा होऊन नाटकाच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार होईल, हीच एक आशा.