देशातील एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ म्हणून कीर्ती मिळवलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतिपदी बसवण्याचा हट्ट त्या वेळच्या वाजपेयी सरकारचा. असे करून एकाच दगडात अनेक पक्षी मारता येणार होते, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. पण कलाम यांच्या पेइकरुम्बु या त्यांच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या स्मारकात त्यांच्या पुतळ्याशेजारी गीतेची प्रतिकृती ठेवण्याच्या प्रकाराने किती जणांना घायाळ केले, याने अनेकांना तृप्ततेची ढेकर देता येत असेल. प्रत्यक्षात ज्या कलामांनी धर्म या गोष्टीला आपल्या आयुष्यात कधीच फारसे महत्त्व दिले नाही, त्यांच्या स्मारकात हा धर्म आणण्याचा सोवळेपणा करण्याचे काही कारणच नव्हते. वैज्ञानिकाने प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा सिद्ध होण्याची वाट बघायची असते, पण आपल्याकडे तर अवकाशात सोडावयाच्या उपग्रहासाठीही तिरुपतीच्या बालाजीला साकडे घातले जाते. एवढेच नव्हे, तर संख्येबाबतची अंधश्रद्धाही पाळली जाते. ‘पीएसएलव्ही १२’ या उपग्रहानंतर एकदम ‘पीएसएलव्ही १४’ असे नामकरण करताना ‘१३’ हा आकडा अशुभ मानणे हे अशाच अंधश्रद्धेपोटी घडते. राष्ट्रपतिपदी निवड झाल्यावर राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी शुभ दिवस बघायचा का, असा प्रश्न जेव्हा डॉ. कलाम यांना विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी ‘‘खगोलशास्त्रानुसार प्रत्येकच दिवस उत्तम असतो,’’ असे उत्तर दिले होते. या पाश्र्वभूमीवर स्मारकातील कलाम यांच्या वीणाधारी पुतळ्याजवळ गीतेची प्रतिकृती ठेवण्याची गरजच खरे तर वाटायला नको होती. पण असे करून कुणाला खूश ठेवता येईल, असे वाटणे अधिक भयावह म्हटले पाहिजे. वैज्ञानिकाच्या स्मारकात धर्मग्रंथ ठेवण्याची ही कल्पनाच मुळी कलाम यांच्या वैचारिकतेशी फारकत घेणारी. पण एवढे धैर्य एकवटण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होणे तर त्याहूनही भयानक. त्यामुळेच गीतेवरून सुरू झालेला वाद शमवण्यासाठी या ग्रंथाशेजारी कुराण आणि बायबल ठेवण्यासही स्पष्टपणे विरोध होऊ लागतो. ‘मन की बात’मध्ये देशातील धर्मवाद, जातिवाद, भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करत असताना, त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालेल्या कलाम यांच्या स्मारकात तो उफाळून यावा हे तर अशोभनीयच. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांत वैज्ञानिकांनीही या अंधश्रद्धा जपण्याचे काम मनोभावे केले. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिल्यामुळे त्याची स्वदेशी निर्मिती करण्याचे मोठे आव्हान लीलया पेलण्यात वैज्ञानिकांना यश आले, पण त्याच्या उद्घाटनावेळी नारळ फोडून पूजा करण्याने आपण विज्ञानवादी नसल्याचेच सिद्ध करीत आहोत, याचे भान राहिले नाही. इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे प्रत्येक उपग्रहाची प्रतिकृती बालाजीच्या चरणी अर्पण करण्यात येते. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केलेले भारतरत्न डॉ. सीएनआर राव यांनी या अंधश्रद्धेस स्पष्ट शब्दांत विरोध केला. पण त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले मात्र नाही. इस्रोमधील एक वरिष्ठ रॉकेट वैज्ञानिक प्रत्येक रॉकेट उड्डाणाच्या वेळी नवाच शर्ट परिधान करत असे. एवढेच काय, पण भारताची मंगळ मोहीमही मंगळवारीच सुरू झाली. वैज्ञानिक वातावरणात प्रत्येक घटनेचा कार्यकारणभाव समजून घेणे अपेक्षित असते. तो समजण्यासाठी घटनेच्या मुळापर्यंत जाण्याची तयारी लागते. त्यासाठी मनुष्याकडे असलेली कुतूहल वृत्ती सतत जागी ठेवावी लागते. का? हा प्रश्न विचारण्याचे धैर्यही अंगी एकवटावे लागते. असे करताना आपल्याला अज्ञात शक्ती मदत करतील आणि सारे काही सुरळीत होईल, असे मानणे संस्थात्मक पातळीवर अधिक धोक्याचे मानायला हवे. त्यामुळेच डॉ. कलाम यांच्या पुतळ्याशेजारी गीता ठेवून ते आपल्याच विचारांचे होते, असे मानणे शहाणपणाचे नव्हे!