भारत हा झुंडींचा देश बनत चालला आहे की काय अशी भयशंका आज अनेकांच्या मनात उभी आहे. सातत्याने कुठून ना कुठून झुंडीने केलेल्या हिंसाचाराच्या बातम्या कानावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाने हत्या केली. नग्न करून दगडांनी ठेचून मारले त्यांना. त्याच दिवशी हरयाणात रेल्वेमध्ये १५-२० जणांच्या जमावाने एका तरुणाला जीव जाईपर्यंत मारले. त्याआधी.. कधी झारखंड, कधी हरयाणा, कधी राजस्थान, कधी महाराष्ट्र, तर कधी आसाम.. कधी अखलाक, तर कधी पहलू खान.. गणती तरी किती घटनांची करायची? आणि हे गेल्या काही वर्षांतच घडत आहे असेही नाही. महाराष्ट्रातील नागपूरने तर अशा किती तरी घटना पाहिल्या आहेत. १८ वर्षांपूर्वीची अक्कू यादव हत्या आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर इक्बाल शेख, गफार डॉन, मोहनीश रेड्डी.. तेथील भरतवाडा परिसरात स्त्रीवेशातील तिघा जणांना जमावाने दगडांनी ठेचून ठेचून मारले होते. चोर समजून त्यांचा हा न्याय करण्यात आला. नंतर समजले ते चोर नव्हते, बहुरूपी होते. कधी चोर समजून, तर कधी मुले पळविणाऱ्या टोळीतील समजून, कधी एखाद्याच्या गुंडगिरीला वैतागून, तर कधी जात, धर्माच्या कारणावरून.. आता तर गोमाता हे एक नवीनच कारण तयार झाले आहे. गोवंशाची वाहतूक करणे हा माणसाला ठेचून ठार मारण्याचा गुन्हा झाला आहे. कारणे वेगवेगळी असली, तरी ती फारशी महत्त्वाची नाहीत. महत्त्वाचे आहे ते जमावाचे पाशवीपण. ते अधिक घाबरविणारे आहे. कारण त्यातून आपण एक समाज म्हणून कोणत्या गर्तेत चाललो आहोत हेच दिसते आहे. ही गर्ता क्रौर्याची आहे, जंगली कायद्याची आहे, संस्कृतिहीन समाजाची आहे. प्रश्न आहे तो हे सारे आले कोठून? अजूनही या देशात कायद्याचे राज्य आहे. व्यवस्था आहे. अजूनही येथे माणसेच राहतात. पण ही माणसे एकत्र आली की त्यांच्या मनात ही श्वापदे कोठून जन्माला येतात? माणसांची साधी गर्दी, जमाव आणि झुंड यांत एक फरक असतो. झुंडीत माणसाचे बोध व्यक्तित्व लोपलेले असते. त्याचे अबोध सामूहिक व्यक्तित्वात रूपांतर झालेले असते. माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वच गळून पडते त्यात. तर्कशुद्ध विचारांना फारकत घेतो. भावनावश, विकारवश असे त्याचे व्यक्तिमत्त्व बनते. जे माणसाचे, तेच झुंडीचे. समोरील परिस्थिती हीच त्याची प्रेरकशक्ती बनते. तिला तो प्रतिसाद देतो. सुसंस्कृत समाजाला भय वाटावे ते या प्रतिसादाचे. प्रत्येकाच्या मनात आदिम भावना असतातच. त्या दडपणे यात माणूसपण असते. ते गमावले जाणे हे कोणा एकेकटय़ा व्यक्तीकरिताच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेकरिता घातक असते. म्हणून व्यवस्थेने स्वत:ला सातत्याने भक्कम ठेवायचे असते. आज त्या व्यवस्थाच शक्तिहीन झाल्या आहेत. हे एका दिवसात घडलेले नाही. पण आता जणू ती प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. माणसे एकत्र येताच त्यांच्या झुंडी बनत आहेत. एरवी नेवाळीत महिला पोलिसांचा विनयभंग होता ना, काश्मिरात पोलिसाला मारले जाते ना. एरवी माणसापेक्षा गाय नावाचा पशू अधिक किमती ठरता ना. ही सारी हिंसा करणारे लोकच तेवढे दोषी आहेत असेही मानता कामा नये. कारण त्यांच्या या कृत्याला समर्थन देणाऱ्या मेंदूंच्या झुंडी आज घराघरांत आहेत. त्या कधी सभा-संमेलनांतून, कधी समाजमाध्यमांतून या झुंडींना बळ पुरवीत आहेत.. देशात म्हणून ही श्वापदे मोकाट सुटली आहेत..