फ्रान्स हा अत्यंत सेक्युलर असा देश. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर ठाम विश्वास असलेला. आज मात्र बुर्किनी नामक वस्त्रावर बंदी घालून हा देश मुस्लीम कट्टरतावाद्यांच्या रांगेत जाऊन उभा राहिला आहे. दुसऱ्या बाजूला बुर्किनीवरील बंदी उठविण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उभे राहून आपण आता स्वातंत्र्याबरोबरच न्यायाच्याही बाजूचे नसल्याचे त्याने दाखवून दिले आहे. एकंदर बुर्किनीने फ्रेंचमधील विवेकवादी समाजासमोर मोठाच पेच निर्माण केला आहे. त्यातील खेदाची बाब अशी, गेल्या सुमारे नऊ महिन्यांतील जिहादी हल्ल्यांमुळे या देशातील विवेकी जनांचे वर्तुळही आकसत चालले आहे. धर्म कशा प्रकारे राजकारण नासवू शकतो याची अनेक उदाहरणे जगाच्या पाठीवर आहेत. फ्रान्स हा देश त्या यादीत यावा हे मात्र अनेकांसाठी क्लेशदायी आहे. या सगळ्या वादाच्या मुळाशी आहे तो बुर्किनी हा पोहण्याचा वेश. कडव्या इस्लाममध्ये महिलांना मुळात सार्वजनिक ठिकाणी पोहण्याचीच बंदी. त्यांचे तर नखही दिसता कामा नये म्हटल्यावर बिकीनी हा पोशाख त्यांच्यासाठी तौबाच. तेव्हा ऑस्ट्रेलियातील अहेदा झनेट्टी या लेबनानी वस्त्र-अभिकल्पकार महिलेने हा फक्त हात- पाय- तोंड उघडे ठेवणारा पोहण्याचा पोशाख तयार केला. साधारणत: बुरख्यासारखा दिसणारा, पोहण्यास सोयीस्कर असा. मुस्लीम महिलांना तो पटला.  सलाफी इस्लामने, आयसिसने मात्र या पोशाखास तीव्र विरोध दर्शविला असून दोन वर्षांपूर्वी मोरोक्को या इस्लामी देशाने त्यावर बंदी घातली होती. फ्रान्समध्येही आधीपासूनच या पोशाखाला विरोध होता. याचे कारण हिजाबप्रमाणेच हा पोशाख फ्रान्स या राष्ट्राची नतिक मूल्ये आणि सेक्युलर विचारधारेच्या विरोधात असल्याचे अनेकांचे मत आहे. गेल्या जुलमध्ये नीस शहरात झालेल्या दहशतवादी ट्रकहल्ल्याने व त्याच्या आगेमागे झालेल्या जिहादी हिंसाचाराच्या घटनांमुळे फ्रान्समध्ये इस्लामच्या सलाफी विचारधारेविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याला तेथील सत्ताकारणाची जोड मिळाली आहे. पुढच्या वर्षी तेथे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. गेल्या वेळी फ्रान्स्वाँ ओलांद यांच्याकडून पराभव सोसावा लागलेले निकोलास सार्कोझी हे उजवे नेते या वेळी जोमात आहेत. त्यांनी बुर्किनी हा आपल्या प्रचारातील एक मुद्दा बनविला आहे. मुळात मुद्दा कपडय़ाचा नाही. तो धार्मिक अस्मितेचा आहे आणि त्यात दोन्हीकडून महिलाच भरडल्या जात आहेत. त्या मुस्लीम महिलांना मुळात पोशाख-निवडीचे स्वातंत्र्य नाही.  त्यांचा धर्म त्यांना पोहण्याची परवानगी देत नाही. हे सारे झुगारून त्यांनी बुर्किनीची निवड केली. या वस्त्राचा धर्माशी अजिबात संबंध नाही, पण त्यावर अन्य धर्मीय उजव्यांकडून बंदी घालण्यात येत आहे. त्यामागे द्वेष आणि भयाचे राजकारण आहे हे तर उघडच आहे आणि याच राजकीय शक्ती आज आपापल्या अस्मितांचे झेंडे नाचवत न्यायालयाच्या आदेशांविरोधातही उभ्या राहताना दिसत आहेत. फ्रान्समधील ३० पालिकांनी बुर्किनीवर बंदी घातली. त्यातील एका पालिकेविरोधात तेथील स्टेट कौन्सिल या न्यायसंस्थेने निकाल दिला. बंदी संस्थगित केली. हा निर्णय मान्य करण्यास तेथील किमान तीन पालिकांनी नकार दिला आहे. सार्कोझींसारखे नेते देशव्यापी बंदीची मागणी करीत आहेत. अशा गोष्टी अंतिमत: समाजातील विवेकाला संपवीत असतात आणि अविवेकी समाज अखेर स्वत:लाच खात असतो. धर्माचे राजकारण सामाजिक अविवेकावरच आधारलेले असते. आजवर जे धर्ममरतड बुर्किनीला विरोध करीत होते, ते आता बुर्किनीला आपल्या धार्मिक अस्मितेशी जोडून घेताना दिसत आहेत आणि यात काही अंतर्वरिोध आहे हेही या समाजाच्या लक्षात येत नाही. एकंदर बुर्किनी या पोशाखाने फ्रान्समध्ये मोठाच (पाय)घोळ घालून ठेवला आहे.