कोणत्याही परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांस आपली उत्तरपत्रिका नीट तपासली जाईल आणि आपल्याला योग्य गुण मिळतील, असा विश्वास वाटणे अतिशय आवश्यक असते. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पाहिल्यानंतर डोक्याला हात लावण्याची वेळ आली. याचे कारण, या उत्तरपत्रिका नीटपणे तपासल्याच गेल्या नव्हत्या, असे पुनर्परीक्षणानंतर आढळून आले आहे. मुंबईतल्या एका विद्यार्थ्यांस सर्व विषयांत ऐंशी टक्के गुण मिळाले, मात्र गणितात केवळ पन्नासच गुण मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या उत्तरपत्रिकेची पुन्हा तपासणी करण्यासाठी अर्ज केला. त्याचे बदलून आलेले गुण मात्र नव्वद एवढे होते. याचा अर्थ मूळ गुणपत्रिकेतील गुणांमध्ये सुमारे चारशे टक्क्यांनी नंतर वाढ झाली. दिल्लीतल्या एका विद्यार्थिनीच्या गुणपत्रिकेत तर गणित विषयाचे गुण धरलेलेच नव्हते, असे लक्षात आले. एका विद्यार्थ्यांला अर्थशास्त्र विषयात अनुत्तीर्ण दाखवण्यात आले होते, तो नंतर त्याच विषयात उत्तीर्ण झाला. उत्तरपत्रिका तपासणीतील सदोषता याच्या मुळाशी असते. त्याहीपेक्षा तपासणाऱ्याचे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या पर्यवेक्षकाचे दुर्लक्ष यामुळे असे घडते. सुमारे दहा लाख विद्यार्थी जेव्हा कोणत्याही परीक्षेसाठी बसतात, तेव्हा उभारावी लागणारी यंत्रणा जगडव्याळ रूप धारण करते. प्रश्नपत्रिका तयार करणे, त्याची गुप्तता पाळणे, परीक्षा आयोजित करण्यासाठी व्यवस्था करणे, तेथे कॉपी होऊ नये यासाठी दक्षता घेणे, उत्तरपत्रिका सुरक्षितपणे तपासनीसांच्या हाती पोहोचवणे, त्यांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांवरील गुण एकत्र करून संगणकात नोंदवणे आणि विशिष्ट वेळांत हा निकाल सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे काम किचकट आणि कटकटीचेही असते. या सगळ्या यंत्रणेत हजारो जण सहभागी झालेले असतात आणि त्या सगळ्यांकडून गुप्ततेची अपेक्षा असते. उत्तरपत्रिकेवर सांकेतिक क्रमांक चिकटवण्याच्या पद्धतीमुळे ती कोणत्या विद्यार्थ्यांची आहे, हे समजणे अवघड असते व त्यामुळे तपासणाऱ्यास भ्रष्टाचार करणे शक्य नसते, हे खरे असले, तरीही त्यातून पळवाटा काढून काही गडबड होतच नसेल, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. अनुत्तीर्णास उत्तीर्ण करण्यासाठी पैसे घेणारे परीक्षक या यंत्रणेत असू शकतात, मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवणारी पर्यवेक्षकाचीही यंत्रणा असते. पण गुणपत्रिकेत बेरीज करण्याचेच राहून जाणे, हे केवळ हलगर्जीपणामुळे घडू शकते. महाराष्ट्रातही शालान्त परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंधरा लाखांच्या आसपास असते. वर्षांनुवर्षांच्या सरावामुळे परीक्षा घेणे, हे यंत्रवत होत असले, तरीही त्याली मानवी सहभागामुळे हे सारे यंत्राप्रमाणे सुरळीतपणे पार पडतेच असे नाही, हे सीबीएसईच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिक्षण पद्धतीत परीक्षेचे असलेले महत्त्व गेल्या काही वर्षांत वाढत चालले आहे. शालान्त परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येमुळे त्याच्या निकालाबद्दल नेहमीच संशय व्यक्त केला गेला. परिणामी सगळ्याच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याची पद्धत अवलंबिण्यात येऊ लागली. त्यामुळे दहावी-बारावीपेक्षा प्रवेश परीक्षेत किती गुण मिळाले, याला महत्त्व प्राप्त झाले. कोणत्याही परीक्षेची विश्वासार्हता त्याच्या निकालातील पारदर्शकतेमुळेच वाढते, हे लक्षात घेतले तर त्यातील सगळ्याच यंत्रणा किती कार्यक्षम असावयास हव्यात, ते कळू शकते. सीबीएसईच्या निकालातील हा गोंधळ विद्यार्थी आणि पालकांच्या मनात परीक्षेबद्दल साशंकता निर्माण करणारा ठरू शकतो. पैसे घेऊन गुण वाढवणे ही परीक्षा यंत्रणेला लागलेली कीड अद्यापही अनेक विद्यापीठांमध्ये अस्तित्वात असल्याचे ऐकू येते तेव्हाही, परीक्षा या मूल्यमापन पद्धतीबद्दलच चर्चा सुरू होते. वर्षांखेरीस होणाऱ्या आणि स्मरणशक्तीवर अवलंबून असलेल्या सध्याच्या परीक्षा पद्धतीचा, परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तपासणी करणाऱ्या यंत्रणेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता अशा घटनांमुळे पुन:पुन्हा पुढे येते.