‘२७ साल, उत्तर प्रदेश बेहाल’ ही घोषणा देत काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीचा प्रचार सुरू केला होता. उत्तर प्रदेश जिंकणार, असा निर्धार करीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही जाहीर केला. ब्राह्मण चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे करा, असा सल्ला प्रशांत किशोर या निवडणूकतज्ज्ञाने दिला. मग शोधाशोध करण्यात आली. तसा कोण चेहराच सापडत नव्हता. शेवटी दिल्लीचे तीनदा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या आणि थोडे चालल्यावर चेहऱ्यावर थकवा जाणवणाऱ्या शीला दीक्षित यांचे नाव पुढे करण्यात आले. राहुल गांधी यांची किसान यात्रा किंवा पक्षाच्या प्रचार अभियानापासून शीलाताई दूरच होत्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसला बरे दिवस येतील, असा प्रशांत किशोर यांनी अंदाज व्यक्त केला होता, पण वस्तुस्थिती मात्र वेगळी होती. गेल्या वेळी काँग्रेसने २८ जागा जिंकल्या होत्या. यंदा पक्ष १० ते १५ जागा जिंकण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. जनमत चाचण्यांमध्ये ८ ते १० जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला गेला. काँग्रेसच्या गोटात चलबिचल होती.कोणाशी आघाडी करता येईल, याची चाचपणी केली जात होती. मायावती अजिबात थारा देण्यास तयार नव्हत्या. तेवढय़ात समाजवादी पार्टीतील यादवी पेटली. मुलायमसिंह यादव आणि अखिलेश पिता-पुत्रांमध्ये संघर्ष सुरू झाला. अमरसिंग, काका शिवपाल, सावत्र आई सारेच विरोधात गेल्याने अखिलेश यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली होती. काँग्रेसबरोबर हातमिळवणी  करण्याचे संकेत दिले होते. काँग्रेसला तर संधीच मिळाली. शेवटी कोणी तरी आघाडीस तयार झाले, याचेच काँग्रेसला समाधान होते. समाजवादी पार्टीचे सायकल हे चिन्ह मिळाल्याने अखिलेश यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेसशी आघाडी करून अखिलेश आता िरगणात उतरणार आहेत. लवकरच आघाडीची अधिकृत घोषणा केली जाईल, असे संकेत अखिलेश यादव आणि गुलाम नबी आझाद यांनी दिले आहेत. सुरुवातीला  मायावती यांची हवा होती, पण तीही आता कमी झाली आहे. भाजप आणि अखिलेश यांच्यातच लढत होणार आहे. उत्तर प्रदेशातील १९ टक्के मुस्लीम मते महत्त्वाची आहेत. या मतांचे समाजवादी पार्टी,  बसपा आणि काँग्रेसमध्ये विभाजन व्हावे, असा भाजपचा प्रयत्न आहे; पण अखिलेश आणि काँग्रेस एकत्र येणार असल्याने भाजपपुढे आव्हान उभे राहणार आहे. अखिलेश पुन्हा सत्तेत येतील, असे वातावरण तयार झाल्यास मुस्लिमांची एकगठ्ठा मते या आघाडीला मिळू शकतात. मुलायमसिंह यादव यांनी वेगळी चूल मांडली तरी यादव समाजाची मते मोठय़ा प्रमाणावर अखिलेश यांना मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांना भविष्यात पंतप्रधान व्हायचे आहे. यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन मोठय़ा राज्यांमधून खासदारांचे पुरेसे संख्याबळ मिळणे आवश्यक आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या  कुबडय़ा घेऊन काँग्रेस सत्तेत आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या मदतीने पक्ष पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच १२० खासदार असलेल्या या दोन मोठय़ा हिंदी भाषक राज्यांमध्ये काँग्रेसला अन्य पक्षांच्या मदतीशिवाय पर्याय नाही. तसेच अखिलेश यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाल्यास राहुल गांधी यांना भविष्यात प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश जिंकण्यावर भर दिला आहे. अखिलेश यादव यांच्यामुळे भाजपच्या घोडदौडीला लगाम बसत असल्यास काँग्रेसला ते हवेच आहे. यासाठी काँग्रेसने ही तिरकी चाल खेळली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला आधाराची गरज  होतीच, अखिलेश यादव यांच्या रूपाने ती पूर्ण करता येणार आहे.