आपल्या कौशल्याची जाहिरात करून ग्राहक आकृष्ट करण्यासाठी आता महाराष्ट्रातील डॉक्टरांनी कंबर कसली आहे. आपण काय करतो आहोत आणि त्यातून काय साध्य करायचे आहे, याचा विसर पडल्यामुळे असेल कदाचित, परंतु डॉक्टरांनी अशा जाहिरातबाजीला परवानगी मागून आपले हेतू स्पष्ट केले आहेत. वैद्यकीय क्षेत्र हे सामाजिक आरोग्याची काळजी करते. समाजातील अनारोग्याशी लढा देत सुदृढ आणि संपन्न पिढी घडवण्याची नैतिक जबाबदारी या व्यवसायात काम करणाऱ्या प्रत्येक घटकावर असते. डोळ्यात आसवे आणून डॉक्टरकडे आयुष्याचे दान मागणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना जे केवळ पैशाने मिळत नाही, असे भावनिक आश्वासन वैद्यकीय व्यवसाय मिळवून देत असतो. परंतु गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात बोकाळलेली व्यावसायिकता आता धंद्याच्या पातळीपर्यंत येऊन ठेपली आहे. वैद्यकीय शाखेस प्रवेश घेताना मोजलेले लाखो रुपये रुग्णांकडून वसूल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने कौशल्य पणाला लावण्याची तसदी न घेता जाहिरातबाजी करून या व्यवसायात असलेला मानवी चेहरा विद्रूप करण्याची मागणी खुद्द डॉक्टरच आग्रहीपणे करतात, तेव्हा केवळ आश्चर्य वाटत नाही, तर त्यामागील हेतू अधिक उघडपणे समोर येतात. कायद्यातील तरतुदींनुसार वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करताना रुग्णालयांना जाहिरात करण्यास परवानगी असते. मात्र नंतरच्या काळात अशा जाहिराती करण्यास बंदी असल्याने डॉक्टर कारवाईस पात्र ठरतात. वस्तुत: या नियमातून पळवाट काढत माध्यमांनी डॉक्टरांसाठी नवनवी ‘पॅकेजे’ बाजारात आणली आहेत. त्यांच्या मुलाखती, लेख, छायाचित्रे छापवून आणून थेट पैसे मिळवण्याचा उद्योग सध्या फोफावतो आहे. राज्यात सर्वत्र रुग्णालयांच्या जाहिरातींचे फलक जागोजागी ठळकपणे दिसत आहेत. मात्र अशा कोणावरही कारवाईचा बडगा उगारला जात नाही. तो कडकपणे उगारण्याची खरेतर गरज आहे. इंडियन मेडिकल कौन्सिलच्या २००२ च्या अधिसूचनेनुसार डॉक्टरांना थेट किंवा अन्य मार्गाने रुग्णांना आकर्षित करून घेण्यास परवानगी नाही. मात्र व्यवसायाच्या प्रारंभी, नव्या प्रकारची सेवा देताना, पत्ता बदलल्यास, गैरहजेरी कळवण्यासाठी, व्यवसाय बंद करताना किंवा दुसऱ्या व्यवसायास प्रारंभ करताना सार्वजनिकरीत्या जाहिरात करण्यास मान्यता आहे. हा कायदा न तपासता सर्रास जाहीरपणे ही जाहिरातबाजी सुरू असून त्याद्वारे विविध प्रकारची प्रलोभनेही दाखवण्यात येत आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने याबाबतच्या तक्रारींची शहानिशा करून कारवाई करणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात आता या संघटनेचे अधिकारीच डॉक्टरांना जाहिरात करू देण्याच्या बाजूने उभे राहत असतील, तर या व्यवसायातील साधनशुचितेचे तीनतेरा वाजण्यास वेळ लागणार नाही. एवीतेवी ‘कट प्रॅक्टिस’ हे या व्यवसायाचे विद्यमान धंदेवाईक स्वरूप आहे, असे अनेक जण खासगीत मान्यही करतात. गेली अनेक दशके या व्यवसायात कानोपकानी होणारी जाहिरात महत्त्वाची मानली जात असे. अन्य व्यवसायात जाहिरातीच्या माध्यमातून जी प्रचंड फसवाफसवी सुरू आहे, ती पाहता किमान वैद्यकीय व्यवसायात हे दुर्गुण शिरता कामा नयेत, यासाठी अधिक काळजी घ्यायला हवी. तसे करण्याऐवजी आपल्या कौशल्यांची जाहिरात करून नवी पंचतारांकित संस्कृती रुजवण्यासाठी जेव्हा डॉक्टर मंडळीच कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी न्यायालयात जाण्याची भाषा करतात, तेव्हा त्यांना त्यांच्या व्यवसायाचे खरे रूपच समजलेले नाही, असा अर्थ होतो.