सरचिटणीस, तुमची पाठ आणि माझी नजर : माझे डोळे देत आहेत जन्म या कवितेला : सेलफोनवरल्या माझ्या बोटांनाही जाणवतोय दाह : मी या कवितेसाठी सखोल विचार करतोय : शोध घेतोय माझ्या देहातील कणाकणाचा : ती अडवतेय माझ्या नसा, माझ्या रक्तवाहिन्या : ती झुलतेय या देशातील दोन्ही मोठय़ा नद्यांमध्ये : धावतेय महाभिंतीवरून : पाठलाग करतेय ‘वन बेल्ट, वन रोड’वरून : उंटांच्या गळ्यांतील घंटांचा : अन् विशाल जहाजांतून आणि हायस्पीड ट्रेन्समधून : येणाऱ्या उबदार परमानंदाचा..
चीनमधील शिनुहा या सरकारी वृत्तवाहिनीचे उपसंचालक पू लिये यांच्या काव्यपुष्पाचा हा शब्दश: अनुवाद. या कवितेचे नायक आहेत चीनचे अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस क्षी जिनपिंग. गेल्या शुक्रवारी त्यांनी शिनुहाच्या कार्यालयाबरोबरच पक्षाचे मुखपत्र पीपल्स डेली आणि राष्ट्रीय वाहिनी सीसीटीव्ही यांच्या कार्यालयांना भेट दिली. त्याने भारावलेल्या कवी-पत्रकाराने केलेली ही कविता सध्या जगभरात फिरत आहे. चीनमध्ये एक नवी माध्यमक्रांती आकाराला येत आहे. तिची द्वाहीच ही कविता, खरे तर ती ज्या भावनेतून लिहिली गेली आहे ती भावना देत आहे. हुकूमशाही राजवटीतील माध्यमांची वृत्ती, प्रवृत्ती आणि संस्कृती कशी बनते हे जाणून घ्यायचे असेल तर ही भावना लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. चीनमधील सर्व माध्यमे ही तेथील सत्ताधाऱ्यांची गुलाम आहेत, यात काहीही शंका नाही. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही गुलामगिरी गळून पडेल असा अनेकांचा भाबडा होरा होता. तोही खोटा ठरला आहे. उलट औद्योगिकीकरणाच्या कालखंडातील माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा तंत्रयुगातील माध्यमांवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे झाले आहे. हुजिंताओ यांच्या अध्यक्षपदाच्या कालखंडातही सरकारी माध्यमांवर नियंत्रणे होतीच; परंतु ही माध्यमे आधुनिक अंकीय पर्यावरणास प्रतिसाद देणारी असावीत, जनमत तयार करण्यात त्यांनी भूमिका बजावावी असे त्यांचे मत असे. क्षी जिनिपग आल्यानंतर मात्र माध्यमांचे हे किंचितसे स्वातंत्र्यही संपले. पक्ष आणि सरकार हाच देश म्हटल्यावर, त्यांचे जे म्हणणे आहे ते मांडणे एवढेच माध्यमांचे काम राहते. त्यांनी ते मुकाट करावे. जे पत्रकार तसे करणार नाहीत ते देशद्रोही आणि मुळात हा ‘देशद्रोह’ करण्याची संधीच तेथील माध्यमकर्मीना मिळू नये अशीच तेथील व्यवस्था आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये सरकारी सेन्सॉरच्या परवानगीशिवाय साधा ‘कर्सर’ही हलू शकत नाही की सरकारच्या मर्जीविरोधात नागरिक एखादे पानही पाहू शकत नाहीत. ज्यांनी हलविण्याचा प्रयत्न केला ते देशाचे शत्रू म्हणून तुरुंगात आहेत. असे असतानाही क्षी जिनिपग यांनी नवे माध्यमधोरण आणले आहे. उपरोक्त कविता हा त्या ‘क्रांती’चा परिणाम. वेसण घातलेल्या माध्यमांचा वापर आपल्या प्रतिमासंवर्धनासाठी करण्यासाठी करणे हा कोणत्याही हुकूमशाही मनोवृत्तीच्या नेत्याच्या कार्यक्रमपत्रिकेवरील पहिला मुद्दा असतो. क्षी जिनपिंग नेमके तेच करू इच्छित आहेत. पक्ष आणि सरकार म्हणजे आपणच. देश म्हणजे आपणच. आपणच वरदवंत, कीर्तिवंत, यशवंत अशी आपली प्रतिमा तयार करण्याचे काम त्यांनी चालविले आहे. त्याला अर्थातच चीनमधील सत्तासंघर्षांची किनार आहे. शिनुहा वा सीसीटीव्ही आजही आपल्या पूर्ण नियंत्रणाखाली नाही असा क्षी यांचा समज असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळेच क्षी यांनी आपला पंजा अधिक आवळला आहे. मोडलेली निबे आणि वाकलेल्या लेखण्यांतून माध्यमकर्मीदेखील एका नव्या परमेश्वराला जन्माला घालत आहेत.