संगणक प्रणालीत एखादा विषाणू सोडून संपूर्ण जगाला वेठीस धरायचे आणि माहितीवर डल्ला मारायचा. या माहितीवरील कब्जा सोडण्यासाठी खंडणी मागायची. आत्तापर्यंत हॉलीवूडपटांनी दाखविलेली माहिती-महायुद्धाची भयस्वप्ने आता प्रत्यक्षात येताहेत. ‘डाय हार्ड-४’सारख्या चित्रपटातही हेच कथानक होते. नुकत्याच झालेल्या जागतिक सायबर हल्ल्यातून हे गंभीर वास्तव जगासमोर आले आणि हल्लेखोराने संपूर्ण जगाला हलवून सोडले. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच प्रगत देश माहितीच्या मागे धावू लागले व आज ते सायबर क्षेत्रातही आघाडीवर आहेत. याचबरोबरीने दुसरीकडे या माहितीचा वेध घेण्यासाठी दहशतवादीही तयार होत होते. हे दहशतवादी हातात बंदुका किंवा बॉम्ब घेऊन आपल्यासमोर उभे नव्हते, तर त्यांच्या हातात केवळ एक लॅपटॉप आणि संगणकात तल्लख असा मेंदू आहे. या बळावर जागतिक सुरक्षा यंत्रणांना दाखला दिला जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या संगणकातील हत्यार पळवून संपूर्ण जगाची झोप उडवून देणे त्यांना शक्य झाले. या हल्ल्याचा फटका भारतालाही बसला असून आंध्र प्रदेश पोलिसांच्या संगणक ताफ्यातील १०२ संगणक निकामी झाले. या हल्ल्यामुळे जगातील प्रगत देशांना मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत केवळ विकसनशील देशांतील कमकुवत यंत्रणांमुळे या देशांनाच सायबर हल्ल्याची भीती आहे, असे बोलले जात होते. मात्र या हल्ल्यामुळे माहितीयुद्धाची तसेच माहिती-दहशतवादाची भीती सर्वानाच सारखी, हे आता मान्य करावे लागले. भारताचा विचार केला असता भारताला सीमेवरील संरक्षणाबरोबरच संगणक आणि माहिती संरक्षणासाठीही झटावे लागणार आहे. सध्या आपल्याला डिजिटल भारताचे स्वप्न दाखविले जात आहे. हे करत असताना या यंत्रणांच्या सुरक्षेचे काय? ती खरोखरच अभेद्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे कोणीही देऊ शकत नाहीत. कारण आपण आजही छोटे छोटे सायबर हल्ले परतवून लावण्यासाठी सक्षम नसल्याचे वारंवार समोर आले आहे. देशात नोटाबंदी जाहीर झाली  तेव्हा अवघ्या तीन दिवसांमध्ये चीन, पाकिस्तान, अमेरिका, रशिया, रोमानिया, युक्रेन, दुबई आणि स्वीडन या देशांतील सायबर हल्लेखोरांनी तब्बल तीन लाख ३५ हजार सायबर हल्ले केले. नुकत्याच झालेल्या सायबर हल्ल्यामुळे देशातील ७० टक्क्यांहून अधिक एटीएम धोक्यात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामधील सुरक्षा यंत्रणा भेदणे हल्लेखोरांना सहज शक्य आहे. आपल्या देशातील आधार प्रणालीमध्ये सर्वाधिक माहितीचा तपशील आहे. कोणत्या व्यक्तीचे कोणत्या बँकेत खाते आहे इथपासून ते ती व्यक्ती कोणत्या संस्थेत काम करते, कोणत्या संस्थेत शिकते, कोणत्या रुग्णालयात उपचार घेते इथपर्यंतचा तपशील यात असतो. हा तपशील जर हल्लेखोरांच्या ताब्यात आला तर त्यांच्यासाठी ती पर्वणीच ठरेल. यामुळेच आपल्या सर्व प्रणालींवर सतत नजर ठेवणे आणि सुरक्षा कवच अधिक सक्षम करणे आवश्यक आहे; पण आपल्याकडे सध्या कागदाची जागा संगणकाने घ्यावी आणि आपण डिजिटल झाल्याचा पोरकट दावा करावा व मोदीभक्तांनी मोठय़ा मनाने त्याचे स्वागत करावे असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे वेळीच भविष्यातील माहितीयुद्धाला सामोरे जाण्यासाठी माहितीचे सुरक्षा कवच अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे. यासाठी सायबर सुरक्षारक्षक तयार करणेही आवश्यक आहे. हे झाले आणि आपण आपल्यावर होणारे हल्ले परतवू लागलो तरच खऱ्या अर्थाने आपण डिजिटल भारत होऊ शकतो. अन्यथा जगात सर्वाधिक माहिती असलेल्या आपल्या देशाला ही माहितीच घातक ठरू शकेल.