अहमदाबादला होणाऱ्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला स्थान न मिळाल्यामुळे सध्या राज्यातील एकंदर कबड्डी क्षेत्रात टाहो फोडला जात आहे. संभाव्य भारतीय चमूतील २७ जणांमध्ये सहा जण महाराष्ट्राचे होते. पण अंतिम १४ खेळाडूंमध्ये महाराष्ट्र नामशेष झाल्याचे दिसून आले. स्वाभाविकपणे भारतीय संघाचे विश्लेषण करण्यात आले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात होणाऱ्या स्पध्रेसाठी त्यांच्याच राज्यातील एक फारसा माहीत नसलेला किरण परमारचा शोध लागला. त्यामुळे हा भारतीय संघात दिसतो, मग महाराष्ट्राचे खेळाडू का नाहीत? असे प्रश्न राज्यातील कबड्डी धुरंधरांना पडू लागले. रिशांक देवाडिगा, काशिलिंग आडके, नीलेश शिंदे, सचिन शिंगार्डे, विशाल माने आणि गिरीश ईर्नाक या सहा खेळाडूंपकी महाराष्ट्राचा एखाद्दुसरा खेळाडू सहज बसू शकला असता, अशी माफकच अपेक्षा ही मंडळी करीत आहेत. याचाच अर्थ नामशेष नव्हे, तर आम्हाला ‘उरलेसुरले एखाद्दुसरे घटक’ एवढय़ाच अर्थाने ‘अवशेषा’वरसुद्धा समाधान वाटले असते.  पहिल्या विश्वचषकात महाराष्ट्राचा शैलेश सावंत हा एकमेव खेळाडू भारतीय संघात होता, तर दुसऱ्या विश्वचषकासाठी पंकज शिरसाट आणि गौरव शेट्टी हे दोघे जण भारतीय संघात होते. १४ खेळाडूंच्या भारतीय संघातील एखाद्दुसरा खेळाडू म्हणजे अवशेषच म्हणायचे ना? हुतूतू ते कबड्डी हा प्रवास मागील शतकाचा. त्याचा साक्षीदार समस्त महाराष्ट्र. कबड्डीच्या इतिहासाच्या अनेक पाऊलखुणांमध्ये महाराष्ट्र सहजगत्या दिसून येतो. कबड्डीमहर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांनी कबड्डीचे हे रोपटे लावले होते. शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्याने लक्ष घातल्यामुळे हा वृक्ष फोफावला. कालांतराने कबड्डी विकसित होत असताना या खेळाची सूत्रे महाराष्ट्राकडून कधी निसटली, हे समजले तेव्हा वेळ निघून गेली होती. आता गेहलोत पती-पत्नी यांचा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनांवर एकछत्री अंमल सुरू आहे. त्यामुळे कबड्डीतील सरकार त्यांचे, नियम त्यांचे आणि दिशाही त्यांचीच. अर्थात, गेल्या काही वर्षांत प्रो कबड्डीने या देशी खेळाला संजीवनी दिली. खेळाडूंचा खेळ आणि वैशिष्टय़े यांवर आता सर्वसामान्य नागरिक क्रिकेटप्रमाणेच चर्चा करू लागले आहेत. महाराष्ट्राच्या एखाद्दुसऱ्या खेळाडूची अपेक्षा तसेच निवृत्तीकडे झुकलेला ४१ वर्षीय धर्मराज चेरलाथन आणि परमारचा आश्चर्यकारक समावेश वगळता निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर टीका करण्यास कुठेही जागा नाही. या संघात उत्तरेकडील विशेषत: हरयाणाच्या खेळाडूंचा भरणा अधिक आहे. कबड्डीत अद्याप तरी विभागनिहाय संघाचा कोटा अशी पद्धती नसल्यामुळे हे सारे खेळाडू आपले कौशल्य, तंदुरुस्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली मैदानी कामगिरी दाखवून संघात आले आहेत. कबड्डीचा भूतकाळ जरी महाराष्ट्राचा असला, तरी वर्तमानकाळ हा उत्तरेच्या वर्चस्वाची खात्री देतो. हे वास्तव स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. पहिले दोन विश्वचषक अनुक्रमे २००४ आणि २००८ साली झाले होते. याचप्रमाणे १९९० पासून आशियाई क्रीडा स्पध्रेत भारतीय कबड्डीचा ‘सुवर्ण’प्रवास सुरू झाला. पण या प्रत्येक भारतीय संघात महाराष्ट्राचे खेळाडू, हे टोलेजंग आधुनिक इमारतींच्या दाटीत कापड गिरण्यांच्या चिमण्यांचे अवशेष दिसावेत, तितकेच तुरळक होते. मग इतक्या वर्षांत जाग आली नाही आणि आत्ताच नामशेष झाल्यावर ऊर बडवण्यात काय अर्थ आहे? जाग आल्याचे सोंग करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कबड्डीला ऊर्जितावस्था आणण्याचे प्रयत्न केल्यास राज्यातील खेळाची संस्कृती जपली जाईल.