आयएनएस बेटवा ही तीन हजार आठशे टन वजनाची, क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका नौदलाच्या गोदीतून जलावतरणाच्या प्रसंगी कलंडते, त्यात या नौदलासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युद्धनौकेचे प्रचंड नुकसान होते, या अपघातामुळे समुद्राचे खारे पाणी शिरल्यामुळे तिच्यातील उपकरणांची हानी होते, ती इतकी की या युद्धनौकेचे आयुष्य कदाचित त्यामुळे कमी होऊ शकते, ही घटना भारतीय नौदलास अत्यंत अशोभादायक आहे. संपूर्ण देशभरात, देशभक्तीने सळसळत असलेल्या सध्याच्या वातावरणात मोठय़ा उत्साहाने साजऱ्या करण्यात आलेल्या नौदल दिन सोहळ्यातील बॅण्डचे सूर विरतात न विरतात तोच या दुर्घटनेचे वृत्त आले. त्यातील अपघातातील आणखी एक मोठे नुकसान म्हणजे दोन नौसैनिकांचा मृत्यू. या सर्व प्रकाराची आता रीतसर चौकशी होईल. चौकशा करून काय होते, असा एक तिरसट बाळबोध सवाल येथे उभा राहू शकतो. परंतु त्या आवश्यक असतात, कारण त्यातूनच तर नेमक्या काय चुका झाल्या, त्या कोणाच्या बेजबाबदारीमुळे झाल्या हे समजू शकते. चुकांची ठेच का लागली हे समजले की त्यातून पुढचा शहाणपणा येतो. परंतु नौदलाच्या बाबतीत तसे म्हणता येईल की काय याबाबत मात्र शंका आहे. याचे कारण म्हणजे नौदलाने गेल्या काही वर्षांपासून दुर्घटनांबाबत राखलेले सातत्य. त्यातील सर्वात भीषण अपघात होता तो आयएनएस सिंधुरक्षकचा. तीन वर्षांपूर्वी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या या पाणबुडीमध्ये स्फोट झाला. त्यात १८ नौसैनिकांचा मृत्यू झाला. ती पाणबुडी निकामी ठरली. एवढे प्रचंड नुकसान सहन करण्याची भारताची क्षमता आहे का, हा प्रश्न बाजूला ठेवला, तरी एक सवाल उरतोच, तो म्हणजे त्यापासून आपण काही धडा शिकलो की नाही? तर तसे दिसत नाही. त्यानंतरही आयएनएस विराट, आयएनएस कोंकणमधील आगीपासून आयएनस तरकशने मुंबई बंदरात जेटीला दिलेल्या धडकीपर्यंत विविध छोटे-मोठे अपघात घडले आहेत. सोमवारी आयएनएस बेटवा ही युद्धनौका ‘दुरुस्तीसाठी’ मुंबईच्या गोदीत आणण्यात आली होती, तीसुद्धा एका अपघातामुळेच. २२ जानेवारी २०१४ रोजी मुंबई बंदरात शिरताना तिची ‘कशाशी तरी’ धडक झाली. त्यात तिच्या स्वनवेधी-नयनयंत्रणेचे (सोनार सिस्टम) नुकसान झाले. युद्धनौका वा पाणबुडी यांना अशा प्रकारचे अपघात घडणे हे खरोखरच परवडणारे नाही. याचे कारण केवळ आर्थिक नाही, तर ते देशाच्या सुरक्षेशी निगडित आहे. एखादी युद्धनौका वा पाणबुडी अशा प्रकारे अपघात होऊन एखाद्या गोदीत दोन-दोन वर्षे उपचार घेत असेल, तर त्याचा परिणाम देशाच्या संरक्षणासाठी आखण्यात आलेल्या व्यूहसज्जतेवर होतो. यातील बहुतांश अपघात हे मानवी चुकीमुळे घडलेले आहेत. आता लष्कर आणि त्यातील जवान हे देशभक्तीचे अंतिम शिखर असल्याने त्यांच्या हातून काही चूक होते असे म्हणणे हा गुन्हा ठरावा असे वातावरण सध्या देशात असल्याने या गोष्टींची चर्चा न होणे साहजिकच आहे. परंतु त्यात अखेर देशाचेच नुकसान आहे. एकीकडे सीमेवर लढत असलेल्या जवानांना अ‍ॅसॉल्ट रायफली, बुलेटप्रूफ जॅकेट, अग्निरोधक तंबू अशा मूलभूत गोष्टी उपलब्ध नाहीत, दुसरीकडे लष्कराकडे उच्च तंत्रज्ञानाधारित शस्त्रसामग्रीचाच नव्हे, तर दारूगोळ्याचा तुटवडा आहे. असे असताना संरक्षणावरील मोठा खर्च असा पाण्यात जावा ही लज्जास्पदच नव्हे, तर गुन्हेगारी स्वरूपाची बाब आहे. देशप्रेम वगैरे मुद्दे चित्रपटगृहात राष्ट्रगीत म्हणण्यापलीकडेही असतात आणि त्यात जबाबदारीने काम करणे ही बाब येत असते. हे सेनादलांतील ‘दुर्घटनां’नंतर सांगण्याची वेळ यावी ही काही बरी गोष्ट नाही.