काँग्रेसपुढे जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे, असे विधान करून पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी पक्षातील सद्य:स्थितीवर नेमके बोट ठेवले आहे. रमेश यांनी मुलाखतीत मांडलेली अन्य काही मतेही महत्त्वाची आहेत. सत्ता गेली, पण अजूनही सत्तेत असल्याच्या थाटात नेतेमंडळी वावरतात. सुलतानशाही गेली, पण वागतात मात्र सुलतानाप्रमाणे, असे ते म्हणाले. या परखड मतांमुळे काँग्रेसचे नेते आणि सामान्य कार्यकर्ते यांच्यात नक्कीच समाधानाची भावना निर्माण झाली असेल, कारण रमेश यांनी मांडल्या त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनाच. रमेश हे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांमधील एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या मतांना अधिकच महत्त्व प्राप्त होते. काँग्रेसपुढे सध्या अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे. भाजपची वाटचाल ‘काँग्रेसमुक्त भारत’ या उद्दिष्टाच्या दिशेने सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी भाजपने केलेली ही घोषणा बऱ्याच अंशी अमलातही आणली. बिहार, गोवा, मणिपूर येथील भाजपचे सत्ताकारण काहीही असो, आजघडीला स्वबळावर अथवा आघाडी करून देशातील २९ पैकी १८ राज्यांमध्ये भाजपचे कमळ फुललेले आहे. हे घडले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीमुळे. त्यावर भाष्य करताना रमेश यांनी, हे दोन्ही नेते वेगळ्या पद्धतीने विचार करून तशी पावले टाकतात. त्यांच्या आव्हानांचा सामना करण्याकरिता धोरणांमध्ये लवचीकता ठेवावी लागेल, असे मत मांडले. याउलट काँग्रेसमध्ये सध्या निर्नायकी आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट होत आहे. तरीही पक्षातील दरबारी राजकारणाचा बाज कायम आहे. त्याचा फटका काँग्रेसला सातत्याने बसलेला आहे. यूपीएच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पवनकुमार बन्सल आणि अश्विनकुमार या दोन मंत्र्यांची प्रकरणे बाहेर आली. त्यांना राजीनामा द्यावा लागला. पंतप्रधानांच्या निकटच्या मंत्र्यांच्याच भानगडी कशा बाहेर आल्या हे वेगळे सांगायला नको. पक्षांतर्गत दरबारी कुरघोडीचे राजकारण होते ते. भाजपमध्ये मात्र सारेच वेगळे चित्र आहे. मोदी किंवा शहा यांना आव्हान देण्याची हिंमत कोणात नाही. कोणी तसा प्रयत्न  करीत नाही. केल्यास काही खरे नाही, असा ‘आदर’ आहे. तिकडे काँग्रेसमध्ये राहुल यांना पक्षाचे नेतेच गांभीर्याने घेत नाहीत. त्यांच्या अध्यक्षपदाला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. दीड वर्षांपूर्वी राहुल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याची सारी तयारी पूर्ण केली होती; पण सोनिया गांधी यांच्या भोवताली असलेल्या ढुढ्ढाचार्यानी राहुल यांच्या मार्गात अडथळे उभे केले. आता काँग्रेसमध्ये राहुल यांच्या कलाने निर्णय होत असले तरी त्यांच्याकडे सारी सूत्रे आलेली नाहीत. त्यातच पक्षात सोनियानिष्ठ आणि राहुलनिष्ठ अशी दरी निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या संमतीने  झालेल्या नियुक्त्यांवरून जुन्याजाणत्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल हे या वर्षांअखेरीस अध्यक्षपद स्वीकारतील अशी आशा व्यक्त करतानाच रमेश यांनी, अशा तऱ्हेची यापूर्वी केलेली भाकिते खोटी ठरल्याची कबुली दिली आहे. पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे मत गेल्या तीन वर्षांत अनेक नेत्यांनी मांडले; पण त्यानेही काही फरक पडलेला दिसत नाही. राहुल गांधी यांच्यात अद्यापही सातत्याचा अभाव आहे. महत्त्वाच्या विषयांवर लोकसभेत सरकारवर टीका करण्याची संधीही ते साधू शकत नाहीत. तेव्हा रमेश यांनी व्यक्त केलेली मते पक्षाला खरोखरीच विचार करायला लावणारी असली, तरी ते अरण्यरुदनच ठरण्याची अधिक शक्यता आहे.