जम्मू-काश्मीर पोलीस दलाने कालच्या बुधवारी आपला एक उमदा शिपाई गमावला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराने पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ अहमद यांचा मृत्यू झाला. दहशतवादी, फुटीरतावादी यांच्या पंज्यातून हे राज्यच नव्हे, तर भारताची एकात्मता वाचविण्याच्या प्रयत्नात अनेक जवानांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. अनेक सुरक्षारक्षक शहीद झाले आहेत. त्या अमर जवानांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले. काश्मीरच्या पोलिसांसाठी हा मोठा धक्का आहे आणि दहशतवाद्यांना मिळालेले फार मोठे यश आहे. असे कोणी आपल्यातून गेले की ‘त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढता येणे शक्य नाही’ अशी एक गुळगुळीत कोरडी श्रद्धांजली वाहण्याची रीत आपल्याकडे आहे. अल्ताफ यांच्या जाण्याने मात्र जम्मू-काश्मीर पोलीस दलाला नक्कीच एक पोकळी निर्माण झाल्याचे जाणवत असणार. तसे अल्ताफ अहमद हे काही कोणी उच्चपदस्थ नव्हते. साधे फौजदारच होते. दक्षिण काश्मीरमधल्या कुलगामचे ते रहिवासी. वयाच्या २३-२४ व्या वर्षी पोलीस दलात दाखल झाले ते पोलीस ठाण्यात लिखापढी करणारे मुहारीर म्हणून. कारकीर्दीच्या प्रारंभी एका घटनेमुळे त्यांच्यावर निलंबनाची वेळ आली होती. ते ज्या ठाण्यात काम करीत होते, तेथील कोठडीतून एकदा काही कैदी पळाले. त्याचे खापर त्यांच्यावर फुटले. नंतर त्यांची बदली झाली. त्याच काळात अल्ताफ यांनी स्वत: पदरमोड करून एक लॅपटॉप घेतला. त्याचा वापर करून ते दहशतवाद्यांच्या संभाषणावर पाळत ठेवू लागले आणि हळूहळू पोलिसांना चकविणारे दहशतवादी अलगद जाळ्यात सापडू लागले. अल्ताफ यांच्या या तंत्रकौशल्याने त्यांना ‘अल्ताफ लॅपटॉप’ हे उपनाम प्राप्त झाले. हे टोपणनाव नव्हतेच. ते जणू त्यांना मिळालेले पदक होते. २०१० मध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांना उपनिरीक्षकपदी बढती दिली. तंत्रकौशल्य आणि कर्तव्यावरील असीम निष्ठा यामुळे त्यांच्याकडे विशेष तपास पथकाचे नेतृत्व देण्यात आले. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार २००८ पासून पोलीस दलाला जे यश मिळाले आहे, त्यातील निम्म्या कारवायांचे श्रेय अल्ताफ यांचे आहे. २०१० मध्ये फुटीरतावादी नेता मसारत आलम याला झालेली अटक असो, की गाझी मिसबाह याच्यासारखे हिज्बुल मुजाहिदीनचे कमांडर, जुन्नेद उल इस्लामचा प्रवक्ता मुझफ्फर अहमद दर, कमांडर परवेझ मुशर्रफ, हानीफ खान यांच्यासारखे अतिरेकी असोत, त्यांना हातकडय़ा पडल्या त्या अल्ताफ यांच्यामुळेच. त्यांच्या नावावर जमा असलेले आणखी एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे पोलिसांच्या हत्येचा तपास. २०१२ मध्ये झालेल्या काही अधिकाऱ्यांच्या हत्येमागे अब्दुल रशीद शिंगन नावाच्या पोलिसाचाच हात असल्याचे अल्ताफ यांनी उघडकीस आणले. हे सर्व अल्ताफ यांना शक्य झाले याचे कारण त्यांचा अभ्यास. दहशतवादी, त्यांची कार्यप्रणाली याचा ते विश्वकोशच होते. त्याचबरोबर त्यांचे खबऱ्यांचे जाळेही भक्कम होते. जम्मू-काश्मीर आजही भारताचा अविभाज्य प्रांत आहे तो अशा जवानांमुळे आणि त्याचबरोबर अशा ‘अल्ताफां’मुळे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा अल्ताफच्या हौतात्म्याला प्रणाम करताना, ‘सगळेच मुसलमान दहशतवादी नसतात, परंतु सगळे दहशतवादी मुसलमान असतात’ अशा भंपक कुतर्काची आणि ‘आम्हाला असे राष्ट्रप्रेमी मुसलमान पाहिजेत’ अशा घोषणांमागील हेतूंची नीट तपासणी करणे हे सगळ्यांचेच कर्तव्य ठरते.