अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटाला अनेक कंगोरे आहेत. हा स्फोट जर्मनीच्या दूतावासाबाहेर आणि भारतीय दूतावासापासून केवळ शंभर मीटरच्या अंतरावर झाला. तेथून जवळच जपान, अमेरिका, फ्रान्स आदी देशांचे दूतावास, तसेच अफगाणी अध्यक्षीय प्रासाद, संरक्षण खात्याचे मुख्यालय आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये तनात असलेल्या बहुराष्ट्रीय सन्याला इशारा देणे हा दहशतवाद्यांचा एक हेतू तर आहेच. अमेरिकेने तेथून मोठय़ा प्रमाणावर सन्य मागे घेतले असले तरी अद्याप अमेरिका व दोस्त देशांचे काही सन्य तेथे आहे. त्यांना हा परत जाण्याचा इशारादेखील आहे, असा निष्कर्ष काढता येतो. मात्र याशिवाय या हल्ल्याला धार्मिक किनारही आहे. तो जगभरच्या मुस्लीम धर्मीयांसाठी पवित्र असणाऱ्या रमझान महिन्याच्या सुरुवातीला झाला आहे. सामान्य मुस्लीम रमझानकडे अधिक पुण्यकर्म करण्याचा महिना म्हणून पाहात असले तरी दहशतवाद्यांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. हे दहशतवादी, पुण्याचा संबंध प्रेषित महम्मद पगंबरांनी इ.स. ६२४ मध्ये रमझानच्या महिन्यात सौदी अरेबियातील बद्रच्या लढाईत विरोधकांवर मिळवलेल्या विजयाशी जोडतात. त्यांना वाटते की या महिन्यात विरोधकांचे जितके जास्त रक्त सांडू तेवढे जास्त पुण्य मिळेल . असे करणाऱ्या संघटना हे विसरतात की त्यांच्या हल्ल्यांत निष्पाप मुस्लीम मारले जात आहेत. काबूलमध्ये  किमान ९० आणि स्थानिकांचेच बळी अधिक गेले. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने नाकारली आहे. अफगाण गुप्तहेर संघटना आणि सरकारने हल्ल्यामागे हक्कानी नेटवर्क ही दहशतवादी संघटना आहे आणि पाकिस्तानच्या ‘आयएसआय’च्या मदतीने त्यांनी हा हल्ला केल्याचे म्हटले जाते. ते खरे असल्यास या घटनेला वेगळा आयाम मिळतो. तो समजून घेणे अधिक उद्बोधक आहे. पाकिस्तान कायम भारताविषयी भयगंडाने ग्रासलेला आहे. पाकिस्तानची भौगोलिक रचना पाहिल्यास लक्षात येते की त्या देशाची रुंदी कमी आहे, ती भारताच्या पश्चिम सीमेवर पसरलेली एक चिंचोळी पट्टी आहे. म्हणजेच पाकिस्तानला ‘स्ट्रॅटेजिक डेप्थ’ नाही. त्याचमुळे, ‘भारत युद्ध पुकारून सहज पाकिस्तानच्या आरपार घुसू शकतो’ अशी भीती पाकिस्तानला असते. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानला रस असण्याचे कारण या भयगंडात आहे. त्यातून, पाकिस्तान अफगाणिस्तानला आपले ‘स्ट्रॅटेजिक बॅकयार्ड’ म्हणजे व्यूहात्मक किंवा सामरिक परसदार समजतो. अफगाणिस्तानशी सतत संलग्नता राखावी, असा पाकिस्तानचा आटापिटा असतो तो याच समजातून.  ही ‘संलग्नता’ म्हणजे तेथील सीमेवरून दहशतवाद्यांचे येणे-जाणे सुरू ठेवणे व तेथे पाकधार्जिणी राजवट असणे हे पाकिस्तान हिताचे समजतो. याउलट भारताचे अफगाणिस्तानशी पूर्वापार चांगले संबंध आहेत आणि भारत हा अफगाणिस्तानकडे, पाकिस्तानवर दबाव ठेवण्यास उपयोगी असलेला मित्र म्हणून पाहतो. त्यामुळेच भारताचा अफगाणिस्तानमधील वाढता प्रभाव पाकिस्तानला खुपतो आहे. आणि त्याला पायबंद घालण्यासाठी पाकिस्तान हक्कानी नेटवर्क व अन्य दहशतवादी गटांचा भारतविरोधात वापर करत आहे. पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तान प्रांतात हक्कानी नेटवर्कचा बालेकिल्ला असून त्यांचे कार्यक्षेत्र अफगाणिस्तानमध्येही पसरले आहे.  या ताज्या हल्ल्यात भारतीयांना हानी पोहोचलेली नाही. मात्र त्यामागे हक्कानी नेटवर्कचा प्रभाव वाढविण्याचे गणित असण्याची दाट शक्यता आहे.