बॅडमिंटन या खेळाचे जन्मस्थान भारतात, पुणे शहरात असूनही आपल्या देशात या खेळाकडे अपेक्षेइतके लक्ष दिले गेलेले नाही. ऑलिम्पिक व जागतिक स्तरावरील अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यापासून ते अलीकडे घवघवीत यश मिळविणाऱ्या पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत यांच्यापर्यंत अनेक खेळाडूंनी भारतास बॅडमिंटनमध्ये गौरवास्पद स्थान मिळवून दिले असले तरीही क्रिकेटइतके वलय या खेळास अजूनही प्राप्त झालेले नाही. श्रीकांत याने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन सुपरसीरिजमध्ये विजेतेपद मिळवीत भारतीय खेळाडूही बॅडमिंटनमध्ये हुकमत गाजवू शकतात हे दाखवून दिले आहे. त्याने हे विजेतेपद चिनी खेळाडूस नमवून मिळविले, हे आणखी विशेष. क्रिकेटमध्ये अनेक वेळा सपाटून मार खाऊनही असंख्य चाहते व प्रायोजक या क्रिकेटपटूंच्या मागे धावत असतात. मात्र सायना नेहवाल, सिंधू यांच्यासारख्या खेळाडूंनी केवळ बॅडमिंटनमध्ये नव्हे, तर अन्य खेळाडूंपुढेही चांगला आदर्श निर्माण केला असला तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणाऱ्या ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा यांच्यासारख्या बॅडमिंटनपटूंना प्रायोजक मिळविण्यासाठी संघर्षच करावा लागला आहे. ऑल इंग्लंड स्पर्धा ही बॅडमिंटनमधील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. ऑलिम्पिकइतकेच महत्त्व या स्पर्धेस प्राप्त झाले आहे. या खेळात पहिला भारतीय विजेता होण्याचा मान पदुकोण याने मिळविला होता. त्यानंतर दहा वर्षांनी गोपीचंद याने याच किताबावर मोहोर नोंदविली. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे हे या दोन्ही खेळाडूंना जाणवले. त्यामुळेच अनेक स्तरावर संघर्ष करीत या खेळाडूंनी स्वत: सुखाची नोकरी सोडून प्रशिक्षण अकादमी सुरू केली. पदुकोण याला विमलकुमार याच्यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूचीही साथ मिळाली. क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे झाकोळलेल्या क्रीडा क्षेत्रात आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी प्रत्येक स्तरावर झगडावे लागणार आहे हे पदुकोण व गोपीचंद या दोन्ही खेळाडूंना माहीत आहे. त्यामुळेच परदेशी प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर, मसाजिस्ट आदी जागतिक स्तरावरील सर्व सुविधा आपल्या खेळाडूंना मिळतील याची काळजी अकादमीत घेण्यात येत असल्यामुळेच जी. ऋत्विका शिवानी, एच. एस. प्रणोय, अजय जयराम, आर. एम. व्ही. गुरुसाईप्रणीत, पारुपल्ली कश्यप यांच्यासारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा उंचावली आहे. श्रीकांत, प्रणोय, कश्यप आदी गोपीचंद यांच्या अकादमीत तयार झालेले खेळाडू जागतिक स्तरावर केवळ स्वत:चा नव्हे तर आपल्या प्रशिक्षकाचाही नावलौकिक उंचावत असतात. मात्र खेळातील स्पर्धेचे मर्मच न कळलेल्या आणि क्रिकेटवरूनही राजकारणच करणाऱ्या आपल्या देशात अशा बॅडमिंटन-खेळाडूंना पाण्यात पाहणारी अनेक मंडळी असतात. ही मंडळी या प्रशिक्षकांविरुद्ध वातावरण निर्माण करण्यात पटाईत असतात. जे क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांच्याबाबत घडत आहे, तसेच काहीसे वातावरण गोपीचंद यांच्याविरोधात निर्माण होऊ लागले आहे. तिकडे खेळाचे किंवा खेळाडूंचे काहीही होवो, आपला उद्देश कसा सफल होईल हेच ही मंडळी पाहात असतात. हीच भारतीय क्रीडा क्षेत्राची शोकांतिका आहे. एक मात्र खरे की, केवळ क्रिकेटला कवटाळून बसणाऱ्या प्रायोजकांनी बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, बुद्धिबळ, तिरंदाजी, नेमबाजी आदी खेळांमध्ये जागतिक स्तरावर चमक दाखविणाऱ्या खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची वेळ आता आली आहे. श्रीकांतचे यश हे त्या दृष्टीने नवी सुरुवात ठरावे आणि श्रीकांतचे ‘सेलेब्रिटी’करण पुढे व्हायचे तितके होवो, पण बॅडमिंटन या खेळाला आता तरी न्याय मिळावा.