विमनस्कतेचा मनोविकार जडलेल्या मुलाने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने घरी लवकर जाऊ द्या, अशी विनवणी करणाऱ्या अधिकाऱ्याची विनंती अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) भगवान सहाय यांनी धुडकावली आणि त्या अधिकाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली. मंत्रालयातील ही मन सुन्न करणारी घटना. सेवा आणि घरातील कामे याची गल्लत करू नये, असे नेहमी बजाविले जाते. एका अर्थी ते योग्य असले तरी अखेर काही बाबतीत त्याला अपवाद करावाच लागतो. कचेरी शिस्तीवर चालते, म्हणून तेथे माणुसकी, संवेदनशीलता यांना थारा असता कामा नये असा नियम नाही. या प्रकरणात तर केवळ संवेदनशीलतेचा अभावच नव्हे, तर कार्यशिस्तीच्या नावाखाली चाललेला विकृत छळवादच अधिक दिसतो. वडील घरी गेल्याने मुलगा वाचला असता का, वगैरे चर्चा आता निर्थक ठरते. हाताशी आलेल्या मुलाच्या मृत्यूने कृषी खात्यातील सहसचिव राजेंद्र घाडगे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. सरकारी किंवा खासगी सेवांमध्ये हाताखालील कर्मचाऱ्यांची छळवणूक किंवा पिळवणूक करण्यात काही वरिष्ठांना समाधान मिळते. भगवान सहाय हे सनदी अधिकारी या वर्गातील आहेत. अनेक वर्षे सेवेत असूनही प्रशासनात वा निर्णयप्रक्रियेत हे सहाय महाशय कोणतीही छाप पाडू शकले नाहीत, पण कनिष्ठांना त्रास देण्याच्या अनेक तक्रारी त्यांच्याविरुद्ध आहेत. स्वत:ला अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती मिळावी यासाठी तत्परता दाखविणाऱ्या सहाय यांनी राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) बढती देण्याच्या प्रक्रियेत काही चांगल्या अधिकाऱ्यांना मुद्दामहून डावलल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे आल्या आहेत. मंत्रालयात पूर्वी एक अधिकारी कर्मचाऱ्यांना नेहमी रात्री उशिरापर्यंत थांबविण्यासाठी कुप्रसिद्ध होते (सेवेत असताना त्यांचे अलीकडेच निधन झाल्याने त्यांच्या नावाचा उल्लेख टाळला आहे.). महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यावर त्या अधिकाऱ्याला समज देण्यात आली. तो राग त्याने नंतर कर्मचाऱ्यांवर काढला होता. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिंदे नावाच्या अधिकाऱ्याबद्दल अशाच तक्रारी मंत्रालयात अलीकडेच प्राप्त झाल्या आहेत. आपल्या विभागातील महिलांसह सर्व कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागेल अशा पद्धतीने सायंकाळी काम या अधिकाऱ्याकडून दिले जाते. रात्री उशिरा घरी जाताना एका कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यावर या शिंदे यांनी काखा वर केल्याची तक्रार नगरविकास सचिवांकडे करण्यात आली. अशा मुजोर अधिकाऱ्यांना सरळ करणे हे वास्तविक वरिष्ठांचे काम, पण वरिष्ठ अधिकारीही मवाळ भूमिका घेतात तेव्हा अशा अधिकाऱ्यांचे फावते. मागे महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या कामगार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हात लावण्याची वरिष्ठांची हिंमत झाली नव्हती. कर्मचाऱ्यांबाबतीत काहीशी कठोर भूमिका घेणे क्रमप्राप्तच आहे, पण त्याचा अतिरेकही होता कामा नये. वरिष्ठांच्या मुजोरपणामुळे एका अधिकाऱ्याला आपला मुलगा गमवावा लागला असल्यास संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे. सहाय यांच्याशी वितुष्ट घेण्यास वरिष्ठ अधिकारीही धजावत नाहीत. तेव्हा मुख्य सचिवांनी निष्पक्षपणे चौकशी करावी हीच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. सहाय यांच्या नावात भगवान असले तरी त्यांची कृती ही भगवानासारखी नव्हती हे मात्र निश्चित. मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात हे  महत्त्वाचे ठरणार आहे.