महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती म्हटल्यावर शरद पवार किंवा अजित पवार, लातूर म्हणजे विलासराव देशमुख, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे, नांदेडमध्ये अशोक चव्हाण ही समीकरणे जुळलेली होती. यापैकी सोलापूरमध्ये शिंदे यांचा पराभव झाला, लातूरमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली, नांदेडमध्ये चव्हाणांसमोर भाजपने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला; पण नांदेडचा बालेकिल्ला अशोक चव्हाण यांनी राखला. ‘आदर्श’ घोटाळ्यापासून अशोकराव चांगलेच अडचणीत आले होते. तरीही नांदेड या बालेकिल्ल्यातील पकड त्यांनी कमी होऊ दिली नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा सर्वत्र पार धुव्वा उडाला, पण अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये विजय मिळविला. विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये नांदेडमध्ये काँग्रेसला यश मिळाले. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत ८१ पैकी तब्बल ७२ जागा जिंकून अशोकरावांनी भाजपला धूळ चारली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यातूनच नांदेडमध्ये भाजपने जोर लावला. काँग्रेस, राष्ट्रवादी व आता शिवसेना असा प्रवास केलेल्या आमदार प्रताप चिखलीकर आणि वादग्रस्त निवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे या जोडगोळीला भाजपने आयात केले. जोडीला लातूरमध्ये काँग्रेसचा पाडाव करणारे कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील होते. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले होते.  नांदेडमध्ये मात्र मुख्यमंत्र्यांची जादू चालली नाही. भाजपला पाचच जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचा आमदार भाजपच्या निवडणुकीचे नियोजन करतो तेथेच चुकीचा संदेश गेला. यश मिळविण्यासाठी भाजपने अन्य पक्षांतील प्रभावी नेत्यांना लाल गालिचा अंथरला. हा प्रयोग पुणे, नाशिकमध्ये यशस्वी ठरला असला तरी नांदेडमध्ये आयात केलेले नेते तोंडघशी पडले. अशोक चव्हाण यांना तुरुंगात धाडू, असा प्रचार लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी यांनी केला होता. या वेळी फडणवीस यांनीही चव्हाणांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले. चव्हाणांच्या मुलींच्या सदनिकांचे प्रकरण बाहेर काढण्यात आले; पण अशोकरावांना वैयक्तिक लक्ष्य केल्यावर नांदेडकर त्यांच्या पाठीशी उभे राहतात हे लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळाले. एमआयएम  या पक्षाने राज्यात प्रथम पाय रोवले हे पाच वर्षांपूर्वी नांदेडमध्येच. टप्प्याटप्प्याने राज्याच्या अन्य भागांत एमआयएमला यश मिळत गेले; पण यंदा एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही. अलीकडेच निवडणुका झालेल्या भिवंडी, परभणी, लातूर, मालेगावपाठोपाठ नांदेडमधील मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसला यश मिळाले. याचाच अर्थ अल्पसंख्याक समाजात एमआयएमबद्दल तेवढा विश्वास राहिलेला नाही किंवा एमआयएमला मत म्हणजे भाजपला मदत हा प्रचार अधिक रूढ झाला असावा. गेल्या निवडणुकीत १४ नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली.  नांदेडच्या प्रचारात भाजप आणि शिवसेनेने परस्परांवर चिखलफेक केली. मतदारांनी या दोन्ही पक्षांना नाकारले. या विजयाने अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन वाढले आहे. अशोकरावांसह अ. र. अंतुले किंवा शिवाजीराव निलंगेकर-पाटील या मुख्यमंत्र्यांना गैरव्यवहारांच्या आरोपांवरून राजीनामा द्यावा लागला होता. अंतुले किंवा निलंगेकर यांना मुख्य प्रवाहात येण्याकरिता बरीच वाट बघावी लागली. त्या तुलनेत अशोकराव सुदैवी ठरले आहेत. ‘आदर्श’ची टांगती तलवार दूर झाल्याशिवाय त्यांचे राजकीय पुनर्वसन मात्र कठीण आहे.